हू किल्ड जस्टिस लोया: अजून आहेत झुंजणारे रणात काही

३० जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


सोहराबुद्दीन प्रकरणाची केस प्रचंड गाजली. याचा तपास करणाऱ्या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण त्यातला फोलपणा दाखवणारं पत्रकार निरंजन टकले यांनी 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक लिहिलं. जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन यांनी एका पाठोपाठ एक पुढे करत रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं हा प्रश्न विचारलाय. हे पुस्तक शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड ठरतंय.

न्यायमूर्ती लोया यांचा १ डिसेंबर २०१४ला नागपुरात अचानक मृत्यू झाला. नवे न्यायाधीश म्हणून एम.बी. गोस्वामी यांनी १५ डिसेंबरला सोहराबुद्दीन प्रकरणाच्या केसचा कार्यभार हाती घेतला. या खटल्यात शंभरहून अधिक जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. अनेक संभाषणांची ध्वनिमुद्रितं आहेत. आरोपपत्र दहा हजार पानांच्याहून मोठं आहे. मात्र न्यायमूर्ती गोस्वामी कार्यभार हातात घेतल्यावर फक्त दोनच दिवसांत हा खटला निकालात काढला. ते इथंच थांबले नाहीत, तर हा खटला राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला आहे, अशी टिप्पणी त्याला जोडली!

या अशा परिस्थितीत शोध पत्रकारिता काय करू शकते, हे सांगत निर्भयपणे एक पत्रकार पुढे आला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय शोध पत्रकारितेतला एक मैलाचा दगड त्याने रोवला. शोध पत्रकारिता करायची म्हणजे कोणते अफाट कष्ट उचलावयाचे असतात, शोध पत्रकारिता करताना कोणती जोखीम पत्करायची असते आणि आपली शोध पत्रकारिता लोकांसमोर ठेवताना, त्यामुळे आता आपणाला कोणत्या यातनांना सामोरे जावे लागेल, याची तयारी ठेवावी लागते याचा हा वस्तुपाठ आहे.

शोध पत्रकारितेत उतरलेला पत्रकार

हा पत्रकार महाराष्ट्रीय आहे. मात्र फक्त इंग्रजीत लिहीत असल्याने आपल्यापैकी काही जणांना माहीत नसणार. याचं नाव निरंजन टकले. सॉफ्टवेअर इंजिनिअर. सॅम पित्रोदा यांनी भारताचा कायाकल्प करण्यासाठी जो तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांचा गट बनवला होता, त्यात हा होता. म्हणजे या क्षेत्रात तो विवेक सावंत, विजय भटकर यांचा सहप्रवासी होता.

सॅम पित्रोदा भारत सोडून गेल्यावर त्याने नोकरी सोडली. स्वत:ची 'लॉजिस्टिक सोल्यूशन' ही कंपनी सुरू केली. तीन वर्ष ही कंपनी यशस्वीपणे चालवली. बुद्धिमान तरुण या उद्योगात जसे धो धो पैसे मिळवतात तसे पैसे मिळवले. मात्र या तीन वर्षांत मनातले घोटाळे संपले. शोध पत्रकारिता हा आपला स्वधर्म आहे हे समजलं. कंपनी बंद केली.

२००० ला स्वत:ची ‘वेध' ही वाहिनी सुरू केली, २००५ला आयबीएन या वाहिनीसाठी शोध पत्रकारिता सुरू केली. त्याची पहिलीच शोध पत्रकारिता होती, 'सरकारी हॉस्पिटलमधून गायब होण्याच्या गर्भनळ्या'.२०११ मधे निरंजन 'द वीक'मधे नोकरी करण्यासाठी मुंबईला गेला. सहा-सात वर्ष त्याने अनेक वेगळे विषय लोकांसमोर आणले.

एका प्रश्नाच्या उत्तरासाठी चक्रव्यूहात

२०१७ च्या सुरवातीच्या काळात तीन-चार महिने 'मी एक महत्त्वाची शोध पत्रकारिता करणार आहे,' असं सांगून निरंजन कुठे गायब झाला, हे त्याच्या पत्रकार मित्रांनाही कळलं नाही. 'मारुती कांबळेचे काय झालं?' या प्रश्नाप्रमाणे 'जस्टीस लोया यांचं काय झालं?' या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी तो भोवताली तयार केलेल्या चक्रव्यूहात शिरला. त्याने झपाटल्यासारखं काम केलं.

खरं-खोटं कोण जाणे, पण जाणकार सांगतात की, नवं तंत्रज्ञान स्वतःच्या मुठीत असलेल्या निरंजनने स्वतःसाठी खोटी आधार कार्ड आणि पॅनकार्ड हवी तशी बनवली. पत्ते बदलले. काही वेळा चेहरासुद्धा थोडा बदलला. लपवलेले छोटे कॅमेरे आणि ध्वनिमुद्रक बरोबर घेऊन हा सहजपणे अनेक नावाने अनेकांना भेटला. विश्वास बसणार नाही, अशी माहिती त्याने गोळा केली.

अनेक कागदपत्रं, अनेक ध्वनिमुद्रितं, पोस्टमार्टम रिपोर्ट, फोरॅन्सिक अॅनॅलिसिस, हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट, विसेरा रिपोर्ट, अनुज लोया यांचं स्वहस्ताक्षरातलं पत्र, अनुराधा बियानी यांच्या डायरीतली पानं. एक ना अनेक यात अगणित गोष्टी आहेत. त्याची शोध पत्रकारिता सरकारी शोध यंत्रणेतल्या अनाकलनीय त्रुटी आणि या सर्वांतून सहजपणे पुढे येणारा प्रश्न, या सर्व गोष्टी न्यायमूर्तीच्या समोर ठेवल्या गेल्या असत्या तर निर्णय काय आला असता?

हेही वाचा: वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?

कहानी दीये और तूफान की

'द वीक' या नियतकालिकाने 'ही शोधयात्रा प्रसिद्ध करायला आपण असमर्थ आहोत,' म्हणून सांगितलं. निरंजनने नोकरी सोडली. काही काळाने तो कारवानमधे गेला. २० नोव्हेंबर २०१७ला कारवानने ५१ वर्षीय निरंजन टकले यांची ही महाभयंकर शोधयात्रा प्रसिद्ध केली. २७ नोव्हेंबर २०१७ला इंडियन एक्स्प्रेसने त्याचा प्रतिवाद करणारा लेख प्रसिद्ध केला. आपलं सांगणं अधिक आक्रमकपणे सांगणारा आणखी एक लेख इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केला.

२६ जानेवारी २०१८ला इंडियन एक्स्प्रेसमधल्या लेखातल्या त्रुटी दाखवणारा लेख कारवानमधे टकले यांनी लिहिला. मग इंडियन एक्स्प्रेसने आपला सुधारित लेख प्रसिद्ध केला, कारवान नियतकालिकाने 'आम्ही पूर्णपणे टकले यांच्या बरोबर आहोत,' म्हणून प्रसिद्ध केलं. पण कसेबसे चाळीस हजार वर्गणीदारांच्या साहाय्याने चालणाऱ्या कारवानची ताकद ती काय असणार? 'ये कहानी है दीये की और तूफान की' असा सगळा प्रकार!

व्हॉट्सअॅप ग्रूपवर म्हणजे आजकालच्या चावडीवर कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर आता अगली बार म्हणून निरंजनचं नाव भिरभिरत राहिलं! आता अशा या परिस्थितीत नोकरी जाणं ही तर अगदी मामुली गोष्ट! निरंजनने नोकरी सोडली. स्वतंत्र पत्रकार म्हणून त्याने काम करायला सुरवात केली. मात्र, की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने' असं म्हणणारे संपादक भोवताली फारसे नाहीत हे त्याच्या लक्षात आलं! त्यातून पत्रकाराला ज्या सोयीसवलती सरकार देते, त्या स्वतंत्र पत्रकाराला मिळत नसतात.

दोन हजारांची आवृत्ती संपलीही

माझ्या मते निरंजनच्या आयुष्यातलं हे यातनापर्व आहे. आता निरंजनचं 'हू किल्ड जस्टिस लोया' हे पुस्तक प्रसिद्ध झालंय. एखादी गोष्ट सांगावी तशा सहज, सोप्या पण प्रभावी इंग्रजीत त्याने या देशात जे काही महाभयंकर घडलं ते सांगितलेलं आहे. एक वेगळी गोष्ट.

निरंजनला आभासी दुनियेत हजारो चाहते आहेत. दोन महिन्यांत या पुस्तकाच्या दोनशे-तीनशे प्रतीही खपल्या नाहीत याचा अर्थ काय?' अशी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली. ट्रोल करणारे त्याच्यावर तुटून पडले! पण पुढच्या एका आठवड्यात त्याच्या चाहत्यांनी दोन हजारांची आवृत्ती संपवली! त्यानंतर एका वाचकाने आभासी दुनियेत टाकलेला मजकूर देतो. कारण ते पुस्तक वाचल्यावर मला जे वाटलं तेपण असंच आहे.

'त्यांची सावरकरांवरची 'द वीक' मधली कवर स्टोरी वाचून हाच माणूस माझ्या मतांना न्याय मिळवून देऊ शकेल, असा विश्वास बाळगून न्या. लोया यांची २१ वर्षांची भाची त्याला भेटायला येते. झपाटलेला हा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड खोदकाम करतो. 'सहा वर्ष एकाच ध्येयाने पछाडलेला हा शोध पत्रकार परमवीरचक्र पुरस्काराला पात्र आहे,' असं ज्येष्ठ पत्रकार लेखक आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी का म्हणाले, ते हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला समजतं.'

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

रोखठोकपणे प्रश्न विचारलाय

सर्वोच्च न्यायालयाने एखादा मृत्यू नैसर्गिकरीत्या झालाय, असा निर्णय दिल्यावर त्याच्यातला फोलपणा त्यांच्याही लक्षात यावेत; असं जिवाच्या कराराने गोळा केलेले पुरावे निरंजन एका पाठोपाठ एक पुढे करतो आणि रोखठोकपणे न्यायमूर्ती लोयांना कोणी मारलं असेल हा प्रश्न विचारतो. त्याचं उत्तरही वाचकांच्या लक्षात आणून देतो.

महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकातल्या अनेक प्रसंगांतून जाणते राजे, जाणत्या राजकन्या, तथाकथिक ज्येष्ठ आणि वजनदार राजकीय नेते, मोठमोठे संपादक, पत्रकार, त्यांचे मालक किती कातडीबचावू असतात किंवा हतबल असतात, हे निरंजनने दाखवून दिलं आहे. मात्र त्याच वेळी विशेष ओळख नसताना माहिती पुरवणारे आणि जिवावर उदार होऊन कुठल्याही अपेक्षेशिवाय या कामात मदत करणारी साधी माणसं हे सारं निरंजनने सांगितलं आहे.

निर्भयपणे पत्रकारिता

स्वातंत्र्यलढ्यातलं एक टोकदार हत्यार म्हणून 'नॅशनल हेराल्ड'ची स्थापना करताना आणि त्यात लिहिताना नेहरूंनी एक गोष्ट सांगितली होती, 'भीतीपोटी काही लिहू नका.' निरंजन याच्या खूप पुढे गेलाय. शोध पत्रकारिता करायची असेल तर आपण अथक प्रयत्नाने मिळवलेली माहिती वाचकांच्या समोर ठेवताना त्याचे काय महाभयंकर परिणाम होतील याचा विचार करू नका, असं सांगत हा बहुआयामी पत्रकार निर्भयपणे उभा आहे.

आपण सर्वांनी किमान एक गोष्ट तरी करायला हवी, आपण इंग्रजी फारसं वाचत नसलो तरीही हे पुस्तक विकत घ्यायला हवं. आणखी एक - मुग्धा धनंजय यांनी त्याचं भाषांतर करायला सुरवात केली आहे, लवकरच ते मराठीत प्रसिद्ध होईल. त्या वेळी आपण केवळ हे पुस्तक विकत घेऊन भागणार नाही. प्रत्येक गावात त्या पुस्तकाचा आपण लोकार्पण सोहळा पार पाडला पाहिजे. त्या वेळी निरंजनची विस्तृत मुलाखत घ्यावयास हवी.

निरंजन मराठीत लिहायला घाबरत असला तरी सरळ प्रवाही मराठीत तो फार छान बोलतो. 'अजून आहेत झुंजणारे रणात काही' म्हणून निर्भयपणे पत्रकारिता करणारा निरंजन आपण महाराष्ट्रात सर्वत्र पोचवला पाहिजे.

पुस्तक: हू किल्ड जस्टिस लोया
लेखक: निरंजन टकले
प्रकाशन: धम्म गंगा पब्लिकेशन
पानं: ३२० किंमत: ४५० रुपये

हेही वाचा: 

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?

(लेख साप्ताहिक साधनाच्या ताज्या अंकातून घेतलाय)