विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

०९ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनानं शेअर बाजार पावसासारखा बदाबदा कोसळतोय. जगभरातले गुंतवणूकदार गोंधळून गेलेत. सरकारं ठिगळं लावत आहेत. याच साऱ्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांनी आपल्या कंपनीची ऑनलाईन मिटिंग घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या काळातला गुंतवणुकीचा मार्ग कसा असेल याचं साधंसरळ मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा हा साधासोप्पा रिपोर्ट.

जगप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार वॉरेन बफे यांच्या मालकीच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीची शनिवारी २ मेला वार्षिक बैठक झाली. कोरोनामुळे पहिल्यांदाच ही बैठक विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या बैठकीत ८९ वर्षीय बफे यांनी सलग चार तास मार्गदर्शन केलं. या बैठकीकडं जगभरातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष होतं. सध्या कोरोनामुळं जगभरातले प्रमुख शेअर मार्केट कोसळताना अनेकांना यात गुंतवणूक करणं ही सुवर्णसंधी वाटतेय. पण ‘ओरॅकल ऑफ ओमाह’ या नावानं प्रसिध्द असणारे वॉरेन बफे यांच मत यापेक्षा वेगळं आहे.

वॉरेन बफे कोण आहेत?

अमेरिका ऐन जागतिक महामंदीच्या कचाट्यात सापडली असताना ३० ऑगस्ट १९३० ला वॉरेन बफे यांचा ओमाहा इथे जन्म झाला. स्टॉक ब्रोकिंग कंपनीत सेल्समन असलेल्या वॉरेनच्या वडलांना मंदीमुळं नोकरी गमवावी लागली. पुढं त्यांनी स्वत:चं स्टॉक ब्रोकिंग फर्म सुरू केली. लहान वॉरेन तिथं जाऊन शेअर मार्केटसंबंधी पुस्तकं वाचू लागला. त्यामुळं वॉरेनला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड निर्माण झाली. तो घरोघरी पेपर टाकायचं काम करायचा. सोबत त्यानं कोको कोला, च्युईंग गम विक्री सुरू केली.

कोलंबिया युनिवर्सिटीत प्रवेश घेतल्यावर तिथं त्यांची भेट वॅल्यू इन्वेस्टींगची संकल्पना मांडणारे प्रो. बेंजामिन ग्राहम यांच्याशी झाली. त्याचा फायदा वॉरेन यांना भविष्यात झाला. १९६२ मधे कपड्याचा उद्योग करणाऱ्या बर्कशायर हॅथवे या कंपनीचे काही शेअर्स वॉरेन यांनी खरेदी केले. हळूहळू बहुसंख्य शेअर्स खरेदी करून त्यांनी कंपनीवर मालकी मिळवली. नंतर कपड्यांचा उद्योग बंद करून बर्कशायर हॅथवे ही होल्डींग कंपनी बनवली आणि त्या माध्यमातून कोको कोला, वॉशिग्टन पोस्ट आणि इतर अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले.

वॅल्यू इन्वेस्टिंग या तत्वानुसार वॉरेन बफे हे चांगली गुणवत्ता असलेली कंपनी एखाद्या आर्थिक अडचणीत सापडल्यास तिचे पडते शेअर्स किंवा मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीचे शेअर्स खरेदी करायचे. २००८ मधे जागतिक मंदीच्या काळात रिस्क घेवून बफे यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले आणि पुढं त्याचा त्यांना अगणित लाभ झाला. आज बर्कशायर हॅथवेकडं मातब्बर अशा साठहून अधिक कंपन्यांची मालकी आहे.

हेही वाचा : कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

वॉरेन बफे यांचा गुंतवणूक सल्ला

विडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या या बैठकीला बफे यांचे ६० वर्षांहून अधिक काळ पार्टनर असलेले ९६ वर्षीय चार्ली मंगर हे अनुपस्थितीत होते. पण त्यांची तब्बेत ठणठणीत असल्याचं बफे यांनी सांगितलं. या बैठकीची सुरवात कोविड १९ च्या विषयानं झाली. बफे म्हणतात, ‘हे संकट काही खूप मोठं नाही. यापूर्वीही जगानं अशा संकटांना तोंड दिलंय. फक्त यातून बाहेर पडायला मोठा काळ जावा लागेल.’

कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं स्थान पटकवणाऱ्या आणि सातत्यानं या यादीत टॉपला राहणाऱ्या या ‘ओरॅकल ऑफ ओमाह’ वॉरेन बफे यांचे गुंतवणुकीचे फंडे ऐकण्यासाठी जगभरातल्या गुंतवणुकदारांचं कान नेहमीच टवकारलेलं असतात. बर्कशायरच्या वार्षिक बैठकीतील त्यांचे हे सल्ले नेहमीच्या आशावादासोबतच वास्तववादी असल्यानं त्यांना फॉलो करणाऱ्यांसाठी ते महत्वाचे आणि दिशादर्शक ठरणारे असतील. बफे यांनी दिलेले मुद्देसूद सल्ले असे आहेत,

मार्केटचं भवितव्य सांगू शकत नाही

बफे म्हणतात, २००८-०९ मधे मंदीनं आपली गाडी रूळावरून घसरली होती. यावेळी आपण त्या गाडीला रूळावरून बाजूला केलंय. योग्य वेळ येताच आपण ती पुन्हा रूळावर आणू. मार्केटच्या भवितव्याबद्दल कोणालाच काही सांगता येणार नाही. १० सप्टेंबर २००१ रोजी आम्ही हाच धडा घेतला होता. २००८ मधेही तोच धडा घेतला आणि गेल्या काही महिण्यांपासून तेच शिकतोय.

नेवर बेट अगेंस्ट अमेरिका

बफे यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या जवळपास २३८ वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली. ते म्हणतात, ‘१७८९ सालचं गृहयुध्द, १९२९ ची महामंदी, दुसरं महायुध्द, क्यूबन मिसाईल क्रायसिस, ९/११ चा हल्ला किंवा २००८ ची मंदी असो यापैकी कोणतीही गोष्ट अमेरिकेला थोपवू शकली नाही. बऱ्याचवेळा लोकांचा विश्वास डळमळीत होतो आणि अमेरिका आता काही करू शकेल का असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो.’

‘हा अमेरिकेसाठी टेस्टिंग पिरीयड आहे. अमेरिका यातून बाहेर पडेल आणि विकास करेल. कारण अमेरिकन जादूनं यापूर्वीही अशा अनेक वाईट संकटांवर वर्चस्व मिळवलंय. आणि आताही तेच घडेल.’ बफे यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास दाखवलाय. म्हणूनच ते म्हणतात, ‘नेवर बेट अगेंस्ट अमेरिका.’

हेही वाचा : हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

विमान कंपन्यांना भवितव्य नाही

बर्कशायर हॅथवे कंपनीनं अमेरिकेतल्या चार मोठ्या विमान कंपन्यातले आपले सगळे शेअर्स एप्रिलमधेच विकल्याचं जाहीर केलं. विमान क्षेत्रातल्या गुंतवणुकीला काही भवितव्य दिसत नसल्याचं ते म्हणतात. गेल्यावर्षी जेवढ्या प्रवाशांनी विमानानं प्रवास केला होता तितके प्रवासी पुढील तीन वर्षात प्रवास करतील का नाही याबाबत बफे साशंक आहेत. लॉकडाऊनच्या काळात विडिओ कॉन्फरन्स, वर्क फ्रॉम होम असे वेगवेगळे पर्याय निर्माण झालेत.

विमान कंपन्यांतली गुंतवणूक ही आमची चूक होती. त्यामुळं बर्कशायरचं आजचं मूल्य कमी झालंय अशी स्पष्ट कबूली बफे यांनी दिलीय. एप्रिलमधे बर्कशायरनं ६.५ बिलियन डॉलर्सचे स्टॉक विकले असून त्यातून आलेला पैसा हा सूपर सेफ ट्रेजरी बिल्समधे जमा केल्याचं सांगितलं. बफे यांच्या या निर्णयाचा जगभरातल्या विमान कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण बफे यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

भारतीय विमान कंपन्या आधीच अडचणीत आहेत. त्यात बफे यांच्यासारख्या गुंतवणूकदारांना साशंकता व्यक्त केल्यानं या अडचणी आणखी वाढल्यात. स्पाईस जेट, इंडिगो एअर लाईन्स या भारतीय कंपन्यांच्या गुंतवणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

इक्विटीतली गुंतवणूक बाँडपेक्षा सरस

बफे गुंतवणूकदारांना सल्ला देतात, की तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार असाल तर बाँडपेक्षा इक्विटीमधे गुंतवणूक करा. यातून कदाचित बफे यांना हे सुचवायचं असेल की, बाँडमधील दीर्घकालीन गुंतवणूकीतून जास्त परतावा मिळत नाही. वाढत्या महागाईमुळं कदाचित तोटाच होण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा इक्विटीचा पर्याय चांगला ठरेल.

रिस्कवर लक्ष द्या

गुंतवणूक करताना नेहमी आपण किती रिस्कमधे आहे यावर लक्ष देवून त्यापद्धतीनं काम करण्यास बफे सांगतात. एप्रिलमधे त्यांनी केलेली स्टॉकची विक्री हा त्याचाच भाग होता. बफे म्हणतात, सध्या मार्केटमधे खूप रिस्क आहे असं दिसतंय. गुंतवणूक व्यवस्थापनेचं सार लक्षात घेता सध्या पैशाच्या व्यवस्थापनेपेक्षा स्टॉकच्या विक्रीतच खूप पैसे आहेत आणि त्यातच शहाणपण आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

कर्जाच्या पैशातून गुंतवणूक नको

अनेक लोक कर्ज काढून शेअर मार्केटमधे गुंतवणूक करतात. अशा लोकांना बफे सल्ला देतात, ‘गुंतवणूक करताना आपल्याकडं अतिरिक्त असलेल्या पैशाचा वापर करावा. कर्ज काढून मार्जिनवर ट्रेड करू नये. कारण मार्केटचा काहीही अंदाज लावता येत नाही.’

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा

बफे यांच्या मते, कोणतीही गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असावी. शेअर्सच्या रोजच्या किंमतीकडं लक्ष देवू नका असा सल्ला देताना ते म्हणतात,  तुम्ही एखादी शेती घेतली तर त्यात अन्नधान्य पिकवणं हा उद्देश असतो. रोज उठून तुम्ही त्याची किंमत बघत बसत नाही. असचं स्टॉक मार्केटचं आहे. त्यातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी हवी आणि गुंतवणूकदारानं संयम बाळगायला हवा. पुढच्या एक-दोन वर्षाचं काही सांगू शकत नाही. पण आता शेअर मार्केटमधे गुंतवणूक केली तर ती पुढच्या २० ते ३० वर्षात नक्की फायदा मिळवून देईल.

बहुसंख्य लोकांसाठी गुंतवणुकीचा सोपा मार्ग

‘ज्याला स्टॉक मार्केटचं काहीच ज्ञान नाही पण गुंतवणूक करायची इच्छा आहे अशांनी सरळ एस अँड पी ५०० इंडेक्स फंड या कंपनीत गुंतवणूक करावी, हा चांगला पर्याय आहे,’ असा सल्ला बफे देतात. ते म्हणतात, ‘सध्याच्या घडीला कुणी तुम्हाला यापेक्षा वेगळा पर्याय सुचवत असतील तर तो केवळ त्याच्याच फायद्याचा असेल हे लक्षात घ्या.’

ते पुढं म्हणतात, ‘बर्कशायर कोणत्याही गुंतवणुकीवर वेळोवेळी चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टीनं चांगला पर्याय आहे. पण पुढच्या दहा वर्षातही आम्ही एस अँड पी ५०० इंडेक्स फंडला मागे टाकू की नाही याबाबत सांगू शकत नाही.’

हेही वाचा : कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

सध्या कोणतीही खरेदी करणार नाही

बर्कशायर हॅथवेकडं आता १३७ बिलियन डॉलर्स इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा राखीव आहे. यावर इतकी मोठी कॅश उपलब्ध असताना नवीन खरेदी का करत नाही असा प्रश्न विचारला असता बफे म्हणतात, ‘गुंतवणूक करायची इच्छा आहे. पण मार्केटमधे सध्या तसं काही आकर्षक दिसत नाही. आणि योग्य संधीही उपलब्ध नाही. तशी संधी आल्यास गुंतवणूक करू.’

पुढं ते म्हणतात, ‘आम्हाला परकीयांच्या तसंच मित्रांच्या दयाळूपणावर कधीच अवलंबून रहायची इच्छा नाही.’ त्यांचं हे उत्तर बर्कशायर नेहमी कॅश राखीव का ठेवतं हे स्पष्ट करतं.

बर्कशायर हॅथवेचं विभाजन नाही

बर्कशायर ही होल्डींग कंपनी आहे. आत्ताच्या घडीला तिच्या एका शेअरची किंमत जवळपास २ लाख ७४ हजार डॉलर्स इतकी आहे. बर्कशायरचं विभाजन का करत नाही या प्रश्नावर बफे म्हणतात, विभाजन केल्यास खूप सारे टॅक्स लागतील. भांडवल विभाजनाचीही समस्या निर्माण होईल. तसंच खरेदी-विक्रीसाठी मोठी फी द्यावी लागेल.

संपत्ती धर्मादाय संस्थेला दान करणार

दीर्घकाळचे सहकारी चार्ली मंगर आणि मी असं एकत्रित वय हे १८५ असल्याचं बफे सांगतात. लवकरच ते दोघंही मृत होतील हे सत्य त्यांनी स्वीकारलंय. बफे म्हणतात, बर्कशायरची संपत्ती ही काळानुसार मानवतावादी कार्यासाठी वापरली जाईल ही माझी खूप आधीपासूनची योजना आहे. त्यामुळं स्वार्थी लोक कंपनीपासून दूर राहतील.

या बैठकीत बफे यांनी आपली ९९ टक्के संपत्ती ही धर्मादाय संस्थांना देण्याच्या बांधीलकीचा पुनरुच्चार केला. त्यांनी याआधीही आपल्या संपत्तीचा उपयोग मानवतावादी कामांसाठी केलाय. बिल अँड मेलिंडा गेटस् फाउंडेशनला ३७०० करोड डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम दान केलीय.

हेही वाचा : 

कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावणं हा छळ असेलः अँजेला मर्केल

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री