संयमाची सत्त्वपरीक्षा घेणारी फ्रेंच टेनिस स्पर्धा

२४ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकतीच फ्रेंच टेनिस स्पर्धा पार पाडली.  ‘लाल मातीवरचा सम्राट’ असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल या खेळाडूची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, हे सिद्ध केलं. महिलांच्या गटात बार्बरा क्रेजिकोवाने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. तिच्या रूपानं टेनिस जगताला नवी राणी मिळाली.

‘धीरा पोटी मिळतील फळे रसाळ गोमटी’ असं आपण नेहमीच म्हणत असतो. पॅरिसच्या रोलँड गॅरो मैदानावर नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत हेच पाहायला मिळालं. संयमी आणि चिकाटीने खेळण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या नोवाक जोकोविच याने शेवटच्या क्षणापर्यंत शांत डोक्याने खेळलं तर विजेतेपद खेचून घेता येतं, हे सिद्ध केलं.

महिलांच्या गटात बिगरमानांकित असलेल्या बार्बरा क्रेजिकोवा हिने अजिंक्यपदावर आपली मोहर लावून सर्वांनाच चकित केलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर महिलांच्या दुहेरीचं विजेतेपद मिळवलं आणि आपल्या चतुरस्र कौशल्याची आणखी एक झलक दिली.

ग्रँड स्लॅममधे स्वागतार्ह बदल

फ्रेंच खुली स्पर्धा लाल मातीच्या मैदानावर होत असल्यामुळे इथं भल्याभल्या दिग्गज खेळाडूंची नेहमीच सत्त्वपरीक्षा असते. विम्बल्डनच्या ग्रासकोर्टवर वेगवान आणि बिनतोड सर्विस करणार्‍या आणि ताकदीने परतीचे फटके मारणार्‍या खेळाडूंचं वर्चस्व असतं. पॅरिसमधे मात्र सर्विस केल्यानंतर चेंडू थोडासा कमी वेगाने किंवा कमी उसळी घेऊन येत असतो. त्यामुळेच त्यावर परतीचे फटके मारताना खेळाडूंच्या अनुभव शैलीला अधिक वाव असतो.

प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या सर्विस आणि ताकदवान खेळाविषयी व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक अभ्यास करूनच खेळावं लागतं. लाल मातीवरचा सम्राट असं बिरुद लाभलेल्या राफेल नदाल याची सत्ता संपवताना जोकोविचने आपणही या मातीवर मर्दुमकी गाजवू शकतो, याचा प्रत्यय घडवला. जागतिक क्रमवारीत आपल्याला अव्वल स्थान सहजासहजी मिळालेलं नाही, हेही त्याने दाखवून दिलं.

चेक प्रजासत्ताकची क्रेजिकोवा हिने अजिंक्यपदाची वाटचाल करताना अनेक अनुभवी खेळाडूंना पराभूत केलं. तिच्या रूपाने फ्रेंच स्पर्धेला आणि अर्थातच टेनिस जगताला नवी राणी मिळालीय. अनुभवी खेळाडूंचं प्राबल्य असलेल्या ग्रँड स्लॅम स्पर्धांबद्दल हा स्वागतार्ह बदल घडला आहे.

हेही वाचा : अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

खेळाडू कशासाठी खेळतात?

खेळाच्या दृष्टीने प्रौढ असलेल्या जोकोविच, नदाल, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम या खेळाडूंनी सन्मानाने निवृत्त व्हावं, अशी टीका अनेकजण करत असतात; पण ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे हुकूमत गाजवण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाकांक्षा, संयम, आत्मविश्वास, चिकाटी हे गुण हल्लीच्या युवा खेळाडूंमधे अभावानेच दिसतात. तसंच सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे काबाडकष्ट घेण्याचीही त्यांची फारशी तयारी नसते.

जागतिकस्तरावरच्या स्पर्धांमधे सर्वोच्च यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, हे ज्येष्ठ खेळाडूंच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीद्वारे सिद्ध झालंय. सहजासहजी आणि नशिबाच्या साथीने मिळालेलं यश फारसं टिकत नसतं. सर्वोच्च स्थानावर पोचण्यासाठी एकाग्रतेने केलेल्या अफाट मेहनतीची गरज असते.

फेडरर, विल्यम हे ज्येष्ठ खेळाडू भरघोस पारितोषिकाच्या आमिषाने ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे खेळत नसतात. खेळाचा निखळ आनंद मिळवण्यासाठीच ते अजूनही मैदानावर चिकाटीने खेळत असतात.

मैदानावर असायचं कारण

टेनिसमधे शारीरिक तंदुरुस्तीची नेहमीच कसोटी असते. गुडघ्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया होऊनही फेडरर हा चाळिशीच्या उंबरठ्यावर ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे भाग घेत असतो, ते प्रामुख्याने आपल्यावर अलोट प्रेम करणार्‍या असंख्य चाहत्यांना आनंद देण्यासाठीच.

तीच गोष्ट सेरेनाबद्दलही म्हणता येईल. एक अपत्य झाल्यानंतरही तिने टेनिस खेळाला रामराम केलेला नाही. आपल्या असंख्य चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणूनच आपण अजूनही मैदानावर असतो, हेच ती आपल्या खेळाद्वारे सांगत असते.

हेही वाचा : स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

नदालच्या वर्चस्वाला तडा

फ्रेंच स्पर्धेचा अनभिषिक्त सम्राट असलेल्या नदाल याने गेल्या सोळा वर्षांत पॅरिस इथं फक्त तीनवेळाच पराभव स्वीकारला आहे. रॉबिन सॉडरलिंग याने २००९ ला जोकोविच याने २०१५ आणि यंदा त्याला पराभवाची चव चाखायला दिली. शंभरपेक्षा जास्त सामने जिंकणारा नदाल हाच संभाव्य विजेता मानला गेला होता.

उपांत्य फेरीतच नदाल आणि जोकोविच या श्रेष्ठ खेळाडूंमधे सामना झाला. हा सामना अंतिम लढतीइतकाच चुरशीने खेळला गेला. पहिल्या सेटमधे नदालने ५-० अशी आघाडी घेतली, तेव्हा ही लढत एकतर्फी होणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. प्रेक्षकांचाही पाठिंबा अर्थातच नदालला होता.

मात्र, कितीही दडपण असलं, तरी आपण डगमगत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्याकडे आहे, हेच जोकोविच याने दाखवलं. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने नियोजनबद्ध खेळ करत उर्वरित तीन सेटस् जिंकताना नदालच्या वर्चस्वाला तडा दिला.

नदाल याच्या खेळात जडत्वाचा थोडासा भास दिसून आला. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना जे कौशल्य आवश्यक असतं त्याचा अभाव नदालच्या खेळात उर्वरित तीन सेटसमधे दिसून आला.

प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अभ्यास

अंतिम फेरीत पोचल्यानंतरही विजेतेपद मिळवताना पुन्हा संयमाची जोड आपल्या खेळाला द्यावी लागणार आहे, हे जोकोविचने ओळखलं होतं. ग्रीस देशाचा २२ वर्षांचा खेळाडू स्टेफानोस सिसिपास आणि ३४ वर्षांचा खेळाडू जोकोविच यांच्यातल्या लढतीने टेनिस चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद मिळवून दिला. 

सिसिपास याने पहिले दोन सेट घेताना ताकदवान खेळाचा उपयोग केला. या सेटसमधे जोकोविच याला फारसं कौशल्य दाखवता आलं नाही. मात्र, त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा बारकाईने अभ्यास केला.

तिसर्‍या सेटपासून त्याने आपल्याकडे असलेली सगळी हुकमी अस्त्रं बाहेर काढली. आपला खेळ बहारदार करतानाच प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करायला भाग पाडण्याचं कसबही त्याने दाखवलं. प्रतिस्पर्ध्याच्या सर्विसेस तोडताना त्याने बॅकहँड, फोरहँड परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला.

हेही वाचा : जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

तारुण्यात असलेले खेळाडू

त्याचबरोबर त्याने नेट जवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. ही स्पर्धा जिंकून त्याने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे प्रत्येकी दोनवेळा विजेतेपद मिळवण्याचा अतुलनीय पराक्रम केला. यापूर्वी अशी कामगिरी रॉय एमर्सन आणि रॉड लेवर या दोनच खेळाडूंना करता आलेली आहे. त्याचं करिअरमधलं हे एकोणिसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. पहिल्या सेटपासून शेवटच्या गुणापर्यंत त्याला एका मुलाकडून सतत प्रोत्साहन मिळत होतं. सामना जिंकल्यानंतर या मुलाला त्याने रॅकेट भेट देत प्रेक्षकांची मनं जिंकली.

फेडरर आणि नदाल यांनी प्रत्येकी वीसवेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फेडरर याला चौथ्या फेरीतून माघार घ्यावी लागली. चाळिशीकडे झुकलेल्या फेडरर याच्या खेळातली नजाकत अजूनही टिकून आहे आणि चाहतेही तशीच अपेक्षा करत असतात. तर ज्येष्ठ खेळाडूंच्या मालिकेतल्या आंद्रेस सेप्पी या ३७ वर्षांच्या खेळाडूने २४ वर्षांच्या खेळाडू सेमी याला पराभूत करताना ‘अजूनही यौवनात मी’ याची झलक दिली होती.

अनेकांचं आव्हान संपुष्टात

महिलांच्या गटात अनेक आश्चर्यजनक निकाल पाहायला मिळाले. २४ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या सेरेना हिला चौथ्या फेरीत एलिना रिबाकिनाविरुद्ध चिवट लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. वयामुळे अपेक्षेइतका प्रभाव सेरेनाच्या खेळात दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे; तरीही आपल्यावर अलौकिक प्रेम करणार्‍या चाहत्यांच्या अपेक्षापूर्तीसाठीच मी खेळत असते, हेच तिने दाखवून दिलं.

रिबाकिना हिला नंतर मात्र प्रभावी कामगिरी करता आली नाही. ग्रीसची युवा खेळाडू मारिया सकारी हिने आपल्या देशाचा सहकारी सिसिपास याच्याकडून स्फूर्ती घेत उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या ईगा स्विआटेक हिला सरळ लढतीत पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिने क्रेजिकोवाला शेवटपर्यंत झुंजवलं. क्रेजिकोवा हिने शेवटपर्यंत संयमाने खेळ करत तिसर्‍या सेटमधे हा सामना जिंकला.

निर्णायक क्षणी आपली सर्विस आणि परतीचे फटके यावर योग्य नियंत्रण ठेवलं, तर आपोआपच विजयश्री आपल्याकडेच येते, हेच तिच्या खेळात दिसून आलं. अनास्तासिया पावल्युचेन्कोवा या रशियाच्या मानांकित खेळाडूने अंतिम फेरी गाठताना आपल्यापेक्षा मानांकनामधे वरचढ असलेल्या खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आणलं. त्यामुळे अंतिम फेरीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.

हेही वाचा : भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

अंतिम लढतीविषयी उत्कंठा

क्रेजिकोवा आणि पावल्युचेन्कोवा दोन्ही खेळाडू पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होत्या. त्यामुळे लाल मातीची राणी कोण होणार? हीच उत्सुकता चाहत्यांमधे निर्माण झाली होती. क्रेजिकोवाने फोरहँडचे पासिंग शॉटस् आणि सर्विसवरचं योग्य नियंत्रण, असा कल्पक खेळ करत पहिला सेट सहज मिळवला. दुसर्‍या सेटमधे तिला स्वतःच्या खेळावर नियंत्रण ठेवता आलं नाही; परिणामी तिने हा सेट गमवला. तरीही तिने जिद्द सोडली नाही.

शेवटच्या सेटमधे महत्त्वाच्या क्षणी सर्विस ब्रेक मिळवण्यात तिला यश आलं. या ब्रेकचा तिला विजेतेपदासाठी उपयोग झाला. एकेरीचं विजेतेपद नशिबाच्या जोरावर नसून, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावरच हे यश संपादन केलंय हे तिने दुहेरीत अजिंक्यपद मिळवत दाखवून दिलं. दुहेरीच्या लढतीत समन्वय कसा आवश्यक आहे, हे क्रेजिकोवा आणि कॅटरिना सियानकोवा यांनी केलेल्या खेळाने दिसून आलं.

लाल मातीवरच्या या स्पर्धेनंतर लगेच खेळाडूंपुढे आव्हान असतं ते विम्बल्डनच्या हिरवळीवरच्या टेनिस कोर्टचे. ग्रास कोर्टवरच्या या स्पर्धेत वेगवान आणि ताकदवान खेळाला भरपूर संधी असते. त्यामुळेच खेळाडूंच्या चतुरस्र खेळाची इथंही सत्त्वपरीक्षा असते आणि चाहत्यांनाही त्याविषयी कमालीची उत्कंठा वाटत असते. फ्रेंच स्पर्धेप्रमाणेच काही अनपेक्षित निकाल इथं पाहायला मिळतील आणि विजेतेपदावर युवा खेळाडूंनी मोहर नोंदवावी, अशी अपेक्षा आहे.

ओसाकाच्या निर्णयाचं कौतुक

आपली मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे स्पर्धेत मीडियाशी संवाद साधणार नाही, हे नाओमी ओसाका या जपानी खेळाडूने स्पर्धेपूर्वीच जाहीर केलं होतं. पण सामना संपल्यानंतर तिने मीडियाशी संवाद साधला नाही म्हणून तिला पंधरा हजार डॉलर्सचा दंड करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून तिने स्पर्धेतूनच नंतर माघार घेतली.

ओसाकाच्या निर्णयाचं सेरेना विल्यम्स आणि मार्टिना नवरातिलोवा यांनी कौतुकच केलं. मीडियाशी संवाद साधायचा की नाही, याचं प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्य असतं आणि ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही, याचंच या ज्येष्ठ खेळाडूंनी समर्थन केलंय.

हेही वाचा : 

'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!