तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केलीय. तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांनी इथल्या विवेकी परंपरेतल्या सर्वांशी तुकोबांना जोडलंय. ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. या कादंबरीवर भाष्य करणारी डॉ. नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
संत तुकाराम हा एक अविरत शोध आहे. तुकोबांनी आपल्याला काय दिलंय, हाही एक निरंतर चिंतनाचा विषय आहे. तुकोबांनी आपल्याला जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. जीवनाचा अपूर्व अर्थ सांगितला. तुकोबांची जीवनदृष्टी विश्वव्यापी आहे. ती आता जगाला मान्य झालीय.
कधी कधी वाटतं, तुकोबांची कविता हाच या सृष्टीवरचा एक चमत्कार आहे. वास्तविक तुकोबा ही आपल्यासारखी संसारिक व्यक्ती. पण त्यांच्या कवितेने त्यांना देवत्वाची कीर्ती दिली. तुकोबांच्या कवितेची थोरवी इतकी की त्यांचं गाव, गावची नदी आणि डोंगरालाही त्यांच्या कवितेचं पावित्र्य लाभलं. तुकोबा मराठी म्हणून ते पावित्र्य मराठीलाही लाभलं.
तुकोबांकडे आकृष्ट होणाऱ्यांमधे सर्व स्तरातला माणूस आहे. विद्वान अभ्यासक, संशोधक ते कष्टकरी, वारकरी सर्वच तुकोबांच्या कवितेने संमोहित होतायत. यातून तरुण पिढीही सुटलेली नाही. अलीकडे अनेक तरुण जसे वारीमधे दिसतात, तसे ते तुकोबांच्या कवितेवर बोलताना दिसतात.
अशाच तरुणांचा एक प्रतिनिधी विनायक होगाडे यांची ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी नुकतीच वाचली. वास्तविक या पुस्तकाला कादंबरी म्हणावं की इतर कोणत्या आकृतिबंधात बसवावं, हा प्रश्न आहेच. पण, इतर वाङ्मयप्रकारांच्या तुलनेत कादंबरीचं मन मोठं आहे. ती या रचनेला स्वतःत सामावून घेईल, या विश्वासाने तूर्तास कादंबरी म्हणू.
तुकोबांच्या जीवनात दोन घटना सर्वात महत्त्वाच्या आहेत. पहिली दुष्काळ पडल्यावर तुकोबांना झालेल्या साक्षात्काराची आणि दुसरी आहे धर्मद्रोह केल्याच्या आरोपावरून कवितेच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला लागण्याची. या दोन्ही घटनांमधे तुकोबांनी केलेला मनासी संवाद खूप महत्त्वाचा आणि जीवनाचे अंतिम सत्य सांगणारा आहे.
कबीर म्हणतात तसं, कबीर मन निरमल भया जैसा गंगा नीर । तब पाछैं लगा हरि फिरै कहत कबीर, कबीर ।। आपले मन गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ झाल्यानंतर कबीराला आलेली ही अनुभूती आहे. मन एकदा स्वच्छ झालं की, परमेश्वरच स्वत: आपल्या मागे मागे आपला नामघोष करत येतो. त्याला शोधायला कुठं जावं लागत नाही. तुकोबांना ही अनुभूती आली. ती आल्यानंतर त्यांनी केलेल्या या दोन कृती आहेत.
तुकोबांच्या एखाद्या चेल्याला या दोन कृतीतला अर्थ कळण्यात मिळणारा आनंद हा अपार असतो. हा अर्थ कळलेला विनायक होगाडे एक आमचा तरुण मित्र आहे. त्याने लिहिलेली ‘डियर तुकोबा’ ही कादंबरी या अपार आनंदाचा साक्षात्कार आहे.
हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
तुकारामांची तीन दर्शनं या कादंबरीत आहेत. कादंबरीच्या सुरवातीला ‘तुकारामायण’ आहे. जे संपूच नये असं वाटतं. ज्यामधे तुकोबांची गांधीजी, गाडगेबाबा, साने गुरुजी, कबीर, सॉक्रेटिस, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, गॅलिलिओ आणि कर्मवीर आण्णा यांच्याशी भेट घडवलेली आहे. ही भेट फार हृद्य आहे. विचाराच्या धाग्याने परस्परांजवळ आलेल्या या थोर विभूती आहेत. यांच्या भेटीतील परस्परानुभूती खूप भावपूर्ण आहे.
भेटीबद्दलच्या या सर्व रचना एकत्र वाचल्यानंतर हे सर्व किती जीवाभावाचे मित्र आहेत, याचा साक्षात्कार होतो. या सर्वांचं कर्तृत्व विनायक होगाडे यांनी शब्दात नेमकेपणाने पकडलं. यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी माणसाला ‘माणूस’ बनवलं. माणसात ‘माणूसपण’ रुजवण्यासाठी झटलेले हे जीव आहेत. या सर्वांशी तुकोबांचा झालेला हृद्यसंवाद प्रत्यक्ष अनुभवावाच असा आहे.
कादंबरीच्या ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ पुढच्या भागात तुकोबांच्या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रसंगाचं चित्रण आहे. हा प्रसंग तुकोबांनी स्वत:च्या हाताने आपली कविता इंद्रायणीत बुडवण्याचा आहे. तुकोबांचा कविता करण्याचा अधिकार नाकारून त्यांची कविता नष्ट करण्याचा आणि कविता करणं कायमचं बंद करण्याचा आदेश धर्मपीठ देतं. हा आदेश म्हणजेच तुकोबांचा मृत्यू असतो.
तुकोबांचा प्राणच त्यांच्या कवितेत असतो. त्यामुळे तुकोबांचा हा मृत्यू ठराविक वर्णवर्चस्ववादी ब्राह्यण सोडले तर कोणालाच मान्य होत नाही. तुकोबा आपली कविता इंद्रायणीत बुडवतात आणि ते इंद्रायणीकाठी अन्नपाणी त्यागून निश्चिलपणे बसून राहतात. तुकोबांच्या अशा बसण्याला नेमकं काय म्हणायचं हाही एक प्रश्नच आहे. सत्याग्रह, आंदोलन, उपोषण काहीही म्हणा.
तुकोबा करतात ती गोष्ट मात्र नैसर्गिक आहे. ते मौनात जातात. जीवनावरची वासना सोडतात. कारण त्यांची कविता हीच त्यांचं जीवन असते. ती सुटते म्हणजे जीवन संपतं. ते अन्नपाणी त्यागतात. हा देह असाच जगवण्यात त्यांना स्वारस्य नसतं. तुकोबांच्या कवितेनं लोकांना वेडं केलं होतंच. पण, धर्मद्रोहाच्या आरोपानंतर त्यांनी घेतलेल्या या पावित्र्याने लोकांना त्यांच्याकडे खेचून घेतलं.
लोकांना आपलंच काही गेल्याची तीव्र जाणीव झाली. लोक सद्गदित झाले. आतून हालले. तुकोबांच्या वाणीत आपलं जीवन शोधणारी साधीभोळी माणसं या प्रसंगात त्यांच्याभोवती एकवटली. हा या सर्वांवरचाच अतिव दु:खाचा प्रसंग होता. या प्रसंगावर बेतलेली ही कादंबरी म्हणजे तुकोबांच्या जीवनाचा आणि कवितेचा खरा शोध आहे.
हेही वाचा: तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक
तुकोबांच्या काळात आजच्यासारखा मिडिया असता तर त्यांच्यावरच्या खटल्याचं मिडियावर काय चित्र दिसलं असतं, याचं एक कल्पनाचित्र या भागात आहे. वास्तविक तुकोबांवरचे आरोप आणि आरोप करणारा प्रस्थापित वर्ग तुकोबांशी ज्या पद्धतीने वागतो ते पाहता, ही ‘मिडिया ट्रायल’ वाचकाला महत्त्वाची वाटत नाही. वाचक तुकोबांवरच्या खटल्यात स्वत:च तुकोबांबरोबर आरोपी बनून उभा राहतो.
तुकोबा आपल्यापेक्षा वेगळे नाहीत, ही प्रत्येकाला येणारी अनुभूती हेच तुकोबांचं मोठेपण आहे. त्यांचं हे मोठेपण ही कादंबरी अधोरेखित करते. स्वत:ची उपजिविका विनासायास चालावी यासाठी निर्माण करण्यात आलेले वर्ण आणि त्यातून जन्मलेला श्रेष्ठकनिष्ठत्वाचा भाव ही कादंबरी पटलावर आणते. वर्णद्वेष किती टोकाचा असतो, माणसाला तो कडेलोटाच्या उंबरट्यावर उभा करतो, हे वास्तव ही कादंबरी तुकोबांच्या रूपाने सांगू पाहते.
तुकोबांचं थोरपण त्यांच्या काळातच सिद्ध झालं. त्यामुळे ब्राह्मण बहिणाबाई त्यांच्या शिष्य बनल्या. लोक तुकोबांची वाणी ऐकायला वेडेपीसे झाले. वारकरी पंथाची विचारधारा जातधर्म मानत नाही. श्रेष्ठकनिष्ठ भाव पाळत नाही. वर्णद्वेषाला तर या पंथात थाराच नाही. सगळे एका पातळीवर. त्यामुळे या पंथाकडे लोकांचे लोंढे येत राहिले.
तुकोबा या पंथाची शिकवण देत होते. विठ्ठलाची महत्ती गात होते. या पंथाकडे लोकांना आणणं म्हणजे त्यांना वर्णाश्रमाच्या जाचक बंधनातून मुक्त करणं. मुक्ततेचा मोकळा श्वास घेऊ देणं. त्यामुळे ब्राह्मणांना हे आपल्या अस्तित्वाला दिलेलं आव्हान वाटलं. त्यातून त्यांनी तुकोबांच्या कविता नष्ट करण्याचा कट रचला.
तुकोबांची वृत्तीच संताची झाली होती. ते केवळ कविता करतात म्हणून लोकांचे झाले नव्हते. त्यांनी दुष्काळात लोकांना स्वत:चं धान्य देऊन लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्यावरच्या कर्जाचं ओझं काढून टाकलं. त्यांनी आपल्या वर्तनातून मानवतेचा संदेश दिला होता. आपल्या कवितेतूनही ते हेच सांगत होते.
देवधर्म, श्रद्धाअंधश्रद्धेचा अर्थ सांगत होते. दैनंदिन जीवनातल्या सुखदु:खाच्या प्रसंगात येणाऱ्या अनुभूतीतून जीवनाचा मतितार्थ सांगत होते. जीवनाचं नवं दर्शन घडवत होते. जीवनाचा अर्थ उलघडून देत होते. कर्तव्याची जाणीव करून देत होते. वर्तनव्यवहाराची चिकित्सा करून नैतिक मूल्यं बिंबवत होते.
वर्तनातलं आणि जीवनातलं सत्यं सांगितलं. रागे येतील ते येवोत, पण आपण सत्य सांगत राहायचं, ही तुकोबांची भूमिका होती. आणि हे सत्य तुकोबा आपल्याच भाषेत सांगत असल्याने लोकांना ते आवडलं. लोक या नव्या जीवनदर्शनाने तुकोबांकडे आकृष्ट झाले. त्यांचं कीर्तन ऐकायला जमू लागले. तुकोबांचे साधेसोपे शब्द लोकांच्या लक्षात राहू लागले. लोकांनी ते मुखोद्गत केले. हे शब्द कर्णोपकर्णी झाले.
हेही वाचा: मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे
एका अर्थाने तुकोबांच्या शब्दांना पाय फुटले. त्यामुळे प्रस्तापित धर्ममार्तंडाना ही गोष्ट खटकली. तुकोबा त्यांना ‘धर्मठक’ म्हणत. मायाब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक । आपणा ऐसे लोक नागविले ।। असे तुकोबा रोखठोक बोलत. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा राहिले. त्यांचं पितळ उघडं पडलं. त्यांच्या लेखी तुकोबा आरोपी झाले. त्यांनी शिक्षा दिली. ती तुकोबांनी मान्य केली. कवितेच्या वह्या नदीत बुडवल्या. कवितेबरोबर आपलंही अस्तित्व शून्य करून टाकलं जातंय, हे तुकोबांना उमगलं. ते मूक झाले. त्यांचं मौन लोकांना सहन झालं नाही. वेडपट गुळव्यालाही ते असह्य झालं.
ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातल्या अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला धर्मद्रोह केला. धर्ममार्तंडांना त्यांनी आव्हान दिलं. ज्ञानदेव, नामदेव, कबीर, एकनाथ ही सर्व मंडळी जे काम करून गेली ते तुकोबांनी पुन्हा आरंभलं. त्यामुळे होगाडे यांनी तुकोबांच्या जीवनावर भाष्य करताना या सर्वांशी तुकोबांना जोडलं आहे.
माणसाला असलेला ज्ञानाचा अधिकार तुकोबांनी आपल्या कृतीतून कसा, व्यक्त केला याचं अतिशय हृद्य चित्र मिडिया ट्रायलच्या शेवटी येतं. तुकोबांच्या जीवनाची खरी साक्षीदार इंद्रायणी असते. त्यामुळे कवितेच्या वह्या पाण्यात बुडवून ते इंद्रायणीकाठी निश्चल बसून राहतात. एक प्रकारे आपलं दु:ख तुकोबा इंद्रायणीला सांगू पाहतात. इंद्रायणीच्या साक्षीनेच त्यांची कविता तरल्याचं चित्रही लेखक उभे करतात. इथं होगाडे तुकोबांची कविता पाण्यात बुडवूनही इंद्रायणीच्या साक्षीनेच उसळी मारून कशी वर येते ते कल्पितात. त्यांची ही कल्पना सूचक आणि विज्ञाननिष्ठ आहे.
मिडिया ट्रायलच्या शेवटी तुकोबांच्या जीवनातलं वादळ एका उंचीवर जातं. तुकोबा मौनाने लढाई आरंभतात आणि जिंकतात. तुकोबांभोवती जमलेल्या लोकांमधून कोणी इसम कान्होबाला, ‘हा खेळही तुकाने जिंकला रे कान्हा…’ असं म्हणतो. ते आज या टप्प्यावर किती खरं आहे, हे पटतं.
तुकोबांनी फार मोठी लढाई केली आणि ती जिंकली. त्यामुळेच मुक्या गुळव्याने ‘जगद्गुरू तुकाराम महाराज की…’ अशी जोरात घोषणा तुकोबांसमक्षच केली. म्हणून होगाडे पुढे लिहितात, मुक्याचा तो शब्द। अपंगांचे बळ । आधाराचे मूळ। तुकाराम ।। असं तुकाराम आता आपले मुख्य आधार बनले आहेत. सर्वांचे ‘डियर’ झाले.
लेखक ‘डियर तुकोबा’ला एक दीर्घ पत्र लिहून कादंबरीचा शेवट करतात. या पत्रात तुकोबांशी केलेला संवाद नव्या पिढीला तुकोबांशी जोडू पाहणारा धागा आहे. एकूणच ही कादंबरी तुकोबांच्या जीवनाचा नावीन्यपूर्ण शोध असून नव्या पिढीचा तुकोबांकडे पाहण्याचा नजरिया आहे. बोलक्या रेखाचित्रांसह घेतलेला तुकोबांच्या जीवनाचा शोध सर्वांना नक्कीच आवडेल असा आहे.
पुस्तक : डियर तुकोबा
लेखक : विनायक होगाडे
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन, पुणे
पानं : १६५ किंमत : २५०/-
हेही वाचा:
जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट
कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता
(लेखक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथं मराठी विभाग प्रमुख आहेत)