ऑलिम्पिकमधून हक्काचे क्रीडा प्रकार वगळले तर भारताला तोटा

२४ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


क्रीडा क्षेत्रामधे पैसा येऊ लागला तशी वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातल्या गैरप्रकारांची संख्याही वाढतेय. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरच्या व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायानं खेळाडूंनाही बसतो. त्यामुळे २०२८ला होणार्‍या ऑलिम्पिकमधे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आलंय.

ऑलिम्पिकच्या तारखा आणि त्यातले खेळ हे साधारणपणे या स्पर्धांपूर्वी सहा-सात वर्षं अगोदरच निश्चित केले जातात. ऑलिम्पिकचं संयोजन करणार्‍या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मार्गदर्शनाखालीच हा निर्णय घेतला जातो. २०२८मधे लॉस एंजेलिस इथं ऑलिम्पिक आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धांसाठी कोणकोणत्या खेळांचा समावेश करायचा यासंबंधीचा निर्णय तिथल्या संयोजन समितीनं नुकताच घेतलाय.

बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि आधुनिक पेंन्टॅथलॉन हे तिन्ही खेळ सध्यातरी या स्पर्धांमधून वगळण्यात आलेत. वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंग या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमधला अंतर्गत वाद, पारदर्शी कारभाराचा अभाव, ढिसाळ व्यवस्थापन, उत्तेजक औषधांचं सेवन अशा प्रकरणांचा गांभीर्यानं निर्णय घेण्याचा अभाव, पंचांची सदोष कामगिरी या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आधुनिक पेंन्टॅथलॉनमधे असलेल्या अश्वारोहण स्पर्धांसाठी होणारा वाढीव खर्च, खेळाडूंचं बेशिस्त वर्तन ही कारणं देत आधुनिक पेंटॅथलॉन या जुन्या खेळालाही सध्या ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यात आलंय.

या तिन्ही खेळांचा २०२८च्या ऑलिम्पिकमधे समावेश करायचा की नाही, यासाठी संबंधित संघटनांना १८ महिन्यांची मुदत दिली गेलीय. जर या संघटनांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या द‍ृष्टिकोनातून योग्य पावलं उचलली नाहीत, तर कदाचित २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धांमधेही या खेळांना वगळलं जाण्याची शक्यता आहे.

यश मिळवण्यासाठी गैरमार्ग

ऑलिम्पिक ही जगातली सर्वश्रेष्ठ क्रीडा स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिकमधे भाग घेणार्‍या प्रत्येक खेळाडूचा ऑलिम्पिकमधला सहभाग हेच अंतिम ध्येय असतं. ऑलिम्पिकसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण करणं ही अवघड कामगिरी मानली जाते. हे लक्षात घेतलं तर ऑलिम्पिक पदक मिळवणं म्हणजे अशक्य वाटणारं स्वप्न असतं.

तरीही प्रत्येक खेळाडू हे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करतो. त्यासाठी तो आणि त्याचे पालक अनेक गोष्टींचा त्याग करतात. खेळामधे व्यावसायिकता वाढल्यानंतर सहभागी होणार्‍या खेळाडूंची संख्याही वाढत गेलीय. पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.

या गोष्टी येनकेनप्रकारे साध्य करण्याकडे काही खेळाडूंचा कल दिसून येऊ लागलाय. त्यासाठी उत्तेजकं घेण्याचा झटपट मार्ग स्वीकारण्यातही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत, असं गेल्या काही वर्षांमधे सातत्यानं दिसून येऊ लागलंय. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्युडो, टेनिस या ताकदीच्या खेळांबरोबरच अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग या खेळांमधेही उत्तेजकं घेण्याच्या घटना घडू लागल्यात.

हेही वाचा: मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

शिस्तीची अपयशी अंमलबजावणी

उत्तेजक द्रव्यं घेण्यामुळे जरी खेळाडूंना तात्पुरती ऊर्जा मिळत असली तरीही त्याचे त्यांच्या शरीरावर दूरगामी अनिष्ट परिणाम होत असतात. याबद्दल खेळाडूंमधे आणि त्यांच्या पालक, प्रशिक्षकांमधे कसलंही गांभीर्य दिसून येत नाही.

उत्तेजक द्रव्ययुक्‍त औषधं आणि अन्‍नघटक पुरवणार्‍या कंपन्या बऱ्याचदा प्रशिक्षकांची मदत घेतात. प्रशिक्षकांना भरपूर कमिशन देऊन खेळाडूंना उत्तेजक घेण्यासाठी उद्युक्‍त करण्यासाठी त्या तयार असतात. उत्तेजक चाचणीच्या वेळी खेळाडूंच्या शरीरात उत्तेजकाचा अंश दिसणार नाही, अशी औषधं याच कंपन्या पुरवतात आणि त्यासाठी प्रशिक्षकांना भरपूर कमिशन देतात.

ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धा उत्तेजक द्रव्यमुक्‍त होण्याच्या द‍ृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीनं खूप कडक पावलं उचललीत. उत्तेजक सेवनासंदर्भात नियमांचं योग्य पालन केलं जात नव्हतं म्हणून या संस्थेनं रशियाच्या उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची मान्यताच काढून घेतलीय आणि रशियन ऑलिम्पिक समितीवरही बंदी घातलीय.

उत्तेजकांविरोधात गांभीर्याचा अभाव

हे उदाहरण समोर असूनही आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेकडून अपेक्षित नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीय. त्यामुळे उत्तेजक द्रव्यं घेणार्‍या खेळाडूंची संख्या सातत्याने वाढतेय. २०१०मधे नवी दिल्लीतल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या वेळी यजमानपद असूनही भारतीय वेटलिफ्टिंग टीमवर कारवाईची नामुष्की ओढवली होती. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने मोठ्या प्रमाणात दंड भरला, तेव्हा भारतीय खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली.

फक्त भारतच नाही, तर इतर देशांवरही बऱ्याचदा यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने उत्तेजकविरहित स्पर्धा आयोजित करण्यासाठी स्वतःहून अशी ठोस पावलं उचलली नाहीत, असं मत खुद्द ‘वाडा’नं व्यक्‍त केल्यामुळे ऑलिम्पिक संघटकांनी या खेळाडूंसाठी ऑलिम्पिकची दारं बंद करायचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

हरवत चाललेली खेळभावना

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेमधे अर्थात एआयबीएत गेली अनेक वर्षं सातत्याने मतभेद दिसतायत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं वारंवार सूचना देऊनही या संघटनांचं व्यवस्थापन सुधारलेलं नाही. आर्थिक व्यवहारांमधे पारदर्शकतेचा अभाव, पंचांच्या कामगिरीत पक्षपातीपणा, त्यामुळे सातत्याने खेळाडूंचं खूप मोठं नुकसान होत आलंय. टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी भारताच्या मेरी कोमलाही सदोष पंचगिरीचा फटका बसला होता.

टोकियो ऑलिम्पिकच्या वेळी आधुनिक पेंन्टॅथलॉनच्या एका अनुभवी खेळाडूला पदक मिळवण्यात अपयश आलं, तेव्हा त्याने घोड्याला बडवलं होतं. एका खेळाडूच्या घोड्याने अडथळ्यावरून उडी मारायला नकार दिला होता. या स्पर्धा आयोजित करण्यात अनेक अडचणीही दिसून येतायत. तरुणांमधेही उत्साहाचा अभाव आहे, असंही ऑलिम्पिक संघटकांना वाटतंय. अशा अनेक कारणास्तव त्यांनी आधुनिक पेंन्टॅथलॉन या खेळासाठीही सध्या ऑलिम्पिकची दारं बंद ठेवली आहेत.

भारतीय खेळाडूंचं नुकसान

बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या दोन्ही खेळांना ऑलिम्पिकमधे प्रवेश नाही, या निर्णयाचा मोठा फटका भारतीय खेळाडूंना बसणार आहे. आजपर्यंत वेटलिफ्टिंगमधे भारताच्या करनाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक तर मीराबाई चानूनं रौप्य पदकाची कमाई केलीय. बॉक्सिंगमधे विजेंदर सिंग, मेरी कोम, लवलिना बोगोहेन यांनी कांस्य पदकावर मोहोर उमटवलीय.

गेल्या सहा-सात वर्षांमधे या दोन्ही खेळातून भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धत भरघोस यश मिळवत आहेत. जर ऑलिम्पिकचं दार बंद झालं तर त्यांच्या उत्साहावर आणि एकूणच कारकिर्दीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांवर भारताचे संघटक काम करतात. त्यांनी आपली ही पालक संघटना कशी चांगल्या रितीनं कार्यरत होईल, याचा विचार करायला हवा.

पालक संघटना स्वच्छ प्रतिमेची झाली तर आपोआपच त्याचं अनुकरण संबंधित संघटनांकडून केलं जाईल. पारदर्शी व्यवहार आणिउत्तेजक द्रव्यांच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणं ही ध्येयं या संघटकांनी ठेवली पाहिजेत. अशा उपाययोजना तातडीनं झाल्या तरच ऑलिम्पिक स्पर्धा स्वच्छ प्रतिमेची व्हायला मदत होईल.

हेही वाचा: 

विराट असा कसा तू वेगळा वेगळा

सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)