दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

२८ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? आंदोलनातल्या सामान्यातल्या सामान्याला त्यामागची भूमिका काय आहे हे माहीत असणं हे! या निकषावर दिल्लीतलं शेतकरी आंदोलन फार यशस्वी ठरतंय. कुणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर सांगतो. त्यांच्या आवाजातला सच्चेपणा आपल्यापर्यंत पोचवणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थाचा हा रिपोर्ट.

याआधीचा भाग इथं वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

||नऊ||

मधेच रस्त्यावर उत्स्फूर्त घोषणा ऐकू येतायत. स्त्रियांचेही काही मोर्चे दिसतायत. त्यात तरुणी, वयस्कर महिला. त्यातून आज गुरू गोविंद सिंगांची जयंती असल्याने ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ चा नारा जास्त घुमतोय.

मोदी शहा मुर्दाबाद,

काले कानून रद्द करो,

गोदी मीडिया हाय हाय, 

अजून इतर पंजाबी घोषणाही आहेत. एकूणच राग, संताप, चेष्टा सगळं काही. माझी चित्रपटातली घोषणाही प्रसिद्ध झाली. ‘जब तक फोडेंगे नहीं, तब तक छोडेंगे नहीं.’

हे सगळं बघत असताना कान आणि डोळे मी उघडेच ठेवले आहेत. ट्रॉलीज बघतोय. खरंच खुराड्यागत जगणं आहे. काहीही ऐषोराम नाहीय. पण हे कसं सांगायचं लोकांना! फोटो मधूनच कळेल बहुधा.

राग, शिव्या, प्रेम, हालअपेष्टा असणारं हे फार मानवी आंदोलन आहे, असं मला वाटायला लागलंय.

||दहा||

अचानक डोक्यात एक विचार आला.

शेतकरी जर का खरंच आरामात राहत असतील, असं लोकांना वाटतंय, तर मग आपण हेल्थ कॅम्पवाल्या डॉक्टरकडे जाऊयात. त्यांनाच विचारूयात त्यांचे अनुभव. एकट्या सिंघू बॉर्डर वर ५० पेक्षा जास्त मेडिकल कॅम्प आहेत. 

त्यांपैकी एकामधे अमरजीत सिंग सेवा देतोय. तो मूळचा धरमकोटचा म्हणजे हिमाचल प्रदेशातला. दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेतोय. तो म्हणाला, दररोज आमच्याकडे कमीत कमी शंभर तरी शेतकरी पेशंट येतात.

काहींचे जुने आजार डोकं वर काढतायत. अतिश्रम, थकवा आणि प्रचंड थंडीमुळे काही नवे आजारही वाढलेत. खोकला, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, साधा ताप, सर्दी वाढलंय. हे प्रमाण वयस्कर लोकांमधे जास्त आहे.

अर्थात पंजाबमधे तर नवी दिल्लीपेक्षा नक्कीच जास्त थंडी आहे, त्यांना याची सवय आहे. पण तरी सोबत हेही बघायला हवं की दिल्लीची थंडी प्रचंड प्रदुषित आहे. तिथं वातावरणात प्रदुषकांचं गंभीर प्रमाण आहे. धुकं आणि धूर मिक्स होऊन तिथे घातक धुरकं किंवा स्मॉग तयार होतो, त्याचा त्रास अधिक असतो.

माझा मित्र श्रीनिधी दातारसुद्धा तिथं वैद्यकीय सेवा द्यायला गेला होता. त्याचेही काही अनुभव वाचले तेव्हा हेच वास्तव समोर येत गेलं. 

अजून एक पश्चिम बंगालचा विद्यार्थी तिथं डॉक्टर होता. त्याचं नाव विसरलो. पण त्याचेही अनुभव फार काही वेगळे नाहीयेत.

जवळपास मागचे २ महिने दिल्लीत रहात असल्यानं तिथं राहणाऱ्या लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवतायत. उगाच आरोप लावून त्यांना बदनाम करणं निदान आपण तरी टाळायला हवं.

तेवढी संवेदनशीलता दाखवुयात की!

हेही वाचा : समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

||अकरा||

दुपारी एक माणूस दिसला. कैद्यांसारखा पट्टेवाला पोशाख केलेला. हातापायांत साखळदंड अडकवलेले. माझी उत्सुकता वाढली. मधेच लोक यायचे, त्याच्यासोबत सेल्फी काढून घ्यायचे. गेलो मग बोलायला. सुरवातीची चौकशी झाली आणि मग बोलणं सुरु झालं.

त्यांचं नाव काबिल सिंग. पंजाब. फोन नंबर घेतला. 

‘बाकी सब छोडीये सर, आप तो पढे-लिखे दिखते हो. अगर किसी कानून को इतने जी जान से अपोज हो रहा हैं, तो सरकार ने क्या करना चाहिय, एक तो उस कानून को रद कर दे या फिर हमसे सीधी बात करनी चाहिय.’ 

मी म्हणालो, ‘हो, पण मीटिंग तर सुरू आहेत ना सरकारच्या तुमच्यासोबत?’

सरकारला आधी दोन कचकचीत शिव्या घालण्यात आल्या. नंतर तो म्हणाला, कुछ भी बाते नही होती हैं. हमे जिन मुद्दों पर बाते करनी होती हैं, उनको छोडके सभी पे बाते होती हैं. वो कोर्ट भी उनका ही साथ देती हैं. कमिटी के चारो लोग उन्हीके थे साले.

हे साखळदंड कशासाठी घातलंय? 

‘यह लोकतंत्र नही हैं, ‘लॉकतंत्र’ हैं. इसलिये. यही सबको दिखाना चाहता हूँ’

मी म्हणालो, ‘२६ जानेवारीला शहरात जाण्याचं नक्की ना?’

‘हां, जाना तो हैं... मगर शांती से जायेंगे’

‘और अगर सरकार ने मारपीट वगैरे कुछ की तो?,’  मी बिचकत विचारलं

अत्यंत भारावलेल्या स्वरात तो म्हणाला, ‘सर, हम सब हाथ में तिरंगा लेके जायेंगे, पोलिसने मारने के लिये डंडे उठाये तो यह तिरंगा उनके हाथ में दे देंगे! हमको आतंकवादी बुलाया जा रहा हैं, सबको बता देंगे हम भी इंडियन हैं’

‘सबसे ज्यादा सैनिक तो हमारे लडके ही हैं ना?’

‘आणि हिंसा झाली तर भीती नाही वाटत तुम्हाला?’

‘डर तो लगता हैं सर. सभीको बीवीबच्चे हैं. लेकीन पीछे भी नहीं हटेंगे, चाहे शहादत क्यों न देनी पडे! किसीना किसी को तो यह लढाई लढनी पडेगी ना?’

त्याच्या त्या शब्दांनी आणि उत्कटतेने माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. अजूनही हे लिहिताना येतंय.

कुठून येतं हे भारावलेपण?

||बारा||

कोणत्याही आंदोलनाचं खरं यश काय असतं? त्यातल्या सामान्यातल्या सामान्याला हे आंदोलन का सुरूय आणि त्याची त्यातली भूमिका काय आहे हे ठाऊक असतं तेव्हा! या निकषावर हे आंदोलन फार यशस्वी आहे. कोणालाही काहीही विचारलं तर फार मनापासून आणि सविस्तर तो सांगतोय.

बाहेर फिरत होतो. एका लोकल न्यूज रिपोर्टरला एक जण बाईट देत होता. म्हातारा माणूस होता. मी पण जाऊन गर्दीत थांबलो. ऐकत होतो. पलीकडे पोलिसांची छावणी. तिथून पोलीस याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकतायत. बाइट संपली आणि तो निघाला. मी पळतपळत त्याला गाठलं आणि बोलायला लागलो. 

हे जयकांतजी आहेत. सोनीपत, हरियाणाचे. बरंच काय बोलणं झालं. तेच तेच मुद्दे. आधी ऐकलेले. मग महत्वाच्या मुद्द्यावर आलो. ‘बाबाजी, लोक म्हणतायत की शेतकरी वगैरेंना एवढा रिकामपणा कुठे असतो! चार महिने झालेत आणि तुम्ही इथं आहात. शेतीचं काम कसं काय सांभाळता? हे शेतकरी नसून दुसरेच कोणीतरी आहेत.’

बाबाजी गोड हसून म्हणाले, ‘बेटे, मी काल दुपारी गावी गेलो होतो. शेतीचं एक काम आलं अचानक. गाव इथून ४० किमीवर. ते काम करुन आज पहाटे परत आलो.’

मी बऱ्याच लोकांना हाच प्रश्न विचारला. तिथले सगळे शेतकरी असंच करतायत. घरी कधी पोरं असतात किंवा बायकापोरी असतात. त्या शेतीचं काम बघतात. हे लोक आलटून पालटून शेतीकडे लक्ष देतात. कधी थोरला भाऊ येतो, कधी धाकटा येतो, कधी बाप असतो, कधी बेटा.

‘मला छोटी स्माईल देत म्हणाले शुरू में जब लाठीचार्ज हुआ था, मैंने भी मार खाया था. अब और क्यां बोलू?’

किसान आंदोलनाला दिशा देणारी ३२ जणांची एक टीम आहे. ती सगळे निर्णय घेते. त्यात हे बाबाजीही आहेत. 

मला म्हणाले, २६ जानेवारीला जाणं सौ प्रतिशत नक्की आहेच.

हेही वाचा : शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला?  

||तेरा||

संध्याकाळी थकून बसलो होतो मंडपात. तेव्हा दोन सायकलवीर आले. त्यांनी जालंधर ते नवी दिल्ली असा सुमारे ४०० ते ४५० किमीचा प्रवास सायकलने केला होता. मग त्यांना लोकांनी गराडा घातला. पंजाबीमधून कौतुक सुरू झालं. 

त्यांचं यूट्यूब लाईव करणारा एक पंजाबी तरुण माझ्या बाजूला उभा होता. ते झाल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्याचं नाव जशनदीप सिंग पंधेर. पंजाब-हिमाचल प्रदेश बॉर्डर वरच्या रूपनगर जिल्ह्याचा. गेल्या दीड महिन्यांपासून तो इथं आलाय. गावकरी आहेत सोबत. 

‘पढाई वडाई ज़्यादा होती नही मुझसे. दो ही कक्षा सिखके छोड दी पढाई. कबड्डी अच्छी लगती हैं.’

हा ८ एकरवाला शेतकरी. जीन्स पँट आणि फिलाचा टी शर्ट, पायात महागडे शूज घातलेला. 

मी हसत हसत म्हणालो, ‘बाहर लोग यही बाते करते हैं की इतने महंगे कपडे वाले क्या शेतकरी होते हैं!’

तो म्हणतो, ‘भैय्या, अब तुमसे क्या छुपाना, खेत्ती मे तो बहोत ही बत्तर कपडे होते हैं. लेकीन खेती के बाहर आया तो मैं ऐसेही कपडे पहनता हूं. अब क्या दिनभर वही पुराने कपडे पहने रखे?’

बात तो सही हैं भाई! आपल्याला वाटत राहतं की शेतकरी नेहमी फाटक्या, मळकट कपड्यांत असावा. आपल्या महाराष्ट्रातला बहुतांश शेतकरी तसा असतोही. पण याचं कारण दोघांच्या आर्थिक परिस्थितीत लपलेलंय, हे आपण कधी समजून घेणार आहोत?

हा गडी एकदम दिलखुलास निघाला. ‘सन्नी पाजी को कितना मानते थे हम पंजाबी. लेकिन भाजप में जाने के बाद किसानोंको गलत बोला. अब इज्जत चली गयी.’

कंगणा आणि दलजीतबद्दल पण बोलला भरभरून. आम्ही खूप हसलो. मग मला गरम दूध प्यायला घेऊन गेला. असली शहद का एक चम्मच आणि गरम दूध प्यायलो. व्वा व्वाऍ मजा आ गया!

तो म्हणतो, ‘अभी लोग यह भी कहेंगे की इतना असली शहद कहाँ से आता हैं? तो यह शहद गाव से आया हैं और भी आयेगा. सब को दिया जायेगा. किसी को ना नही कहां जायेगा.’

‘क्योंकी, लंघर यानी हमारे लिये रब्ब हैं और यह कभी बंद नही होगा.’

आम्ही मग शांतपणे ते चविष्ट दूध पिऊ लागलो.

हेही वाचा : 

फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील