विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपल्या सरकारनं सत्तेवर आल्यापासून कोणत्या गोष्टी केल्या आणि भविष्यात काय करणार याची माहिती देशाला दिली. सरकारने कलम ३७० आणि ३५-अ रद्द केलं, तिहेरी तलाक रद्द केला आणि त्यासाठी सरकार अभिनंदनास पात्र झाले. त्याचे फायदे-तोटे भविष्यात दिसून येतीलच. पण या गोष्टी होणं गरजेच्या होत्या हे कुणीही नाकारणार नाही.
कलम ३७० रद्द केल्यामुळे ‘एक देश, एक संविधान’ ही संकल्पना अस्तित्त्वात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ‘एक देश एक ग्रीड’ ही योजना उर्जेच्या क्षेत्रांत याआधीच लागू झाली. कर आकारणीत जीएसटीच्या माध्यमातून ‘एक देश एक कर’ योजनाही सुरू आहे. आता ‘एक देश एक कार्ड’ योजना येणार आहे. ज्यामुळे अनेक कामांसाठी एकच स्मार्ट कार्ड उपयोगात येऊ शकणार आहे. याच धर्तीवर येत्या काळात 'एक देश, एक रेशन कार्ड' ही योजनाही राबवण्यात येणार आहे.
‘एक देश एक निवडणूक’ घेण्याचे सूतोवाचही मोदींनी केलंत. ‘एक देश एक समान नागरी कायदा’ ही तर त्यांची जुनीच मागणी. मोदींनंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनीही हिंदी दिनाच्या निमित्तानं म्हटलं की देशात हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून, ती संपूर्ण देश एकसंध ठेवू शकते. अमित शहा यांच्या या भूमिकेला अर्थातच अहिंदी भाषिकांतून तीव्र विरोध होतोय.
एक देश आणि त्यासाठी एकच एक योजना ही संकल्पना तशी चांगली आणि व्यावहारिक वाटते. पण आपण खोलात जाऊन विचार करतो तेव्हा काही प्रश्न आणि काही शंका मनात येतात. त्याला कारणीभूत आहे नरेंद्र मोदी यांचा पक्ष, भाजप आणि तो जी विचारधारा मानतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
हेही वाचाः एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?
एक देश आणि त्यासाठी एक योजना ही मूळ संघाची विचारधारा आहे. ही विचारधारा त्यांच्या हिंदूत्त्वातून उत्पन्न झालीय. संघाला भारतात एकच राष्ट्र, एकच भाषा, एकच धर्म हवाय. हिंदी-हिंदू-हिंदूत्त्व या त्रयीवर त्यांची ही विचारधारा प्रतिस्थापित झालीय. ती त्यांनी कधीच नाकारली नाही. भाजपनेही याच विचारधारेचा अंगिकार करून आजवर वाटचाल केली. त्यामुळे सत्तेवर येताच त्यांनी संघाचा अजेंडा राबववायला सुरवात केलीय.
आता एक देश आणि एक सर्व काही या गोष्टींकडे ते वळलेत. वरकरणी या गोष्टी तशा चिंताजनक वाटत नाहीत. भारतासारख्या मोठ्या देशात वेगवेगळ्या गोष्टी असण्यापेक्षा एक समान गोष्ट असेल तर ते व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी पडेल यात वाद नाही. वाद आहे तो या एकसमान गोष्टी कोणकोणत्या असतील याविषयीचा.
भाजप आणि संघाची मूळ प्रवृत्ती लक्षात घेता ते जेव्हा या एक देश एक सर्व काहीचा आग्रह धरतात तेव्हा त्यांना नेमकं काय हवं? याचा विचार केला पाहिजे. त्यांची वाटचाल या माध्यमातून नेमकी कशाकडे सुरू आहे आणि कशासाठी सुरू आहे याचाही विचार करण्याची गरज आहे.
संघाला या देशात एक भाषा हवी आहे, एक कायदा हवा आहे, एक संस्कृती हवी आहे, एक धर्म हवा आहे, एक विचारधारा हवी आहे. त्यांनी उघडपणे याचा वारंवार उल्लेख केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे देशात एकतेची भावना वाढीस लागेल. काही अंशी ते खरंच आहे. पण संघ इथंच थांबू इच्छित नाही. आणि मुळात हे त्याचं ध्येय नाही.
संघाकडून भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात एक भाषा, एक कायदा, एक धर्म, एक संस्कृती अशा गोष्टींचा आग्रह धरतात तेव्हा त्याचा विचार करणं भाग पडतं. त्यांच्या दृष्टीनं हिंदू धर्म हा धर्म नसून ती जीवनशैली आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. ही तशी उदार विचारसरणी वाटू शकते. पण प्रत्यक्षात त्याचा सरळ अर्थ असा होतो की ते आपली हिंदू संस्कृती इतर सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करताहेत. आणि त्याला ‘एकता आणि समानता’ असं गोंडस नाव देऊन भूलवत आहेत.
प्रत्यक्षात ते ‘सारखेपणाचा आणि शरणागतीचा’ आग्रह धरतायत. या देशात केवळ हिंदू संस्कृतीच रहावी आणि इतरांनी तिचंच अनुसरण करावं. इतर धर्मियांना या देशात राहता येईल पण त्यांनी हिंदू संस्कृतीलाच श्रेष्ठ मानावं. इतर धर्मच नाही तर हिंदू धर्मांतही अन्य सर्वांनी श्रेष्ठ अशा ब्राह्मण धर्माचंच अनुसरण करावं ही त्यांची मूळ इच्छा आहे.
आपली ही सांस्कृतिक दडपशाही त्यांनी फार पूर्वीपासून अत्यंत पद्धतशीरपणे सुरू ठेवलीय. आणि या सगळ्याला ते भारतीय संस्कृतीचं नाव देतात. पण या संस्कृतीचा अभ्यास केला तर त्यात केवळ ब्राह्मणी संस्कृतीच आढळते. कारण तीच त्यांच्या लेखी सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आपण यावर वेगळ्या अंगानेही विचार करूयात.
हेही वाचाः बी जे खताळ पाटीलः एका शतायुषी तत्त्वनिष्ठ राजकारण्याची गोष्ट
संघाला हिटलर, नाझीवाद, फॅसिझम, हुकुमशाही आणि एकाधिकारशाही यांचं कमालीचं आकर्षण आहे. आणि त्यांनी ते कधी लपवलंही नाही. भाजप हा राजकीय पक्ष असल्यामुळे त्याला उघडपणे या गोष्टींना पाठिंबा देता येत नाही. कारण ते एका लोकशाही देशात राहतात. आणि सत्ता मिळवण्यासाठी त्यांना लवचिक असण्याची गरज असते. पण याचा अर्थ त्यांचं मूळ ध्येयावरचं लक्ष विचलित झालंय असं नाही.
बहुमतात आल्यानंतरही आपल्याला हव्या त्या गोष्टी झटपट लागू करता येत नाहीत, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते एकेक गोष्ट हळूहळू मांडतायत. आणि त्याचा काय परिणाम होतो ते तपासून बघतायत. त्यांच्या सुदैवानं देशात सध्या त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय. विरोधक कमकुवत पडलेत आणि जागतिक परिस्थिती अशी आहे की त्यांच्यासारखीच सरकारं बहुतेक ठिकाणी स्थापन झालीत.
राष्ट्रवाद हा सगळीकडे सध्या परवलीचा शब्द झालाय. त्यामुळे मोदी सरकारच्या राष्ट्रवादी निर्णयांना देशांतर्गत किंवा देशाबाहेरही फारसा विरोध होत नाही. त्यामुळे त्यांची वाटचाल अजून निष्कंटक सुरू आहे. ती कोणत्या दिशेने सुरू आहे?
‘Unity, in Fascist terms, means uniformity; freedom of conscience means insubordination; co-ordination means coercion.’
डोरोथी थॉम्पसन यांच्या १९३९ मधे प्रसिद्ध झालेल्या ‘लेट द रेकॉर्ड स्पिक’ या पुस्तकातल्या पान क्रमांक २० वर हे वाक्य आहे. हुकुमशाहीत कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ होतो, याच्या व्याख्या त्यांनी दिल्यात. त्यानुसार, फॅसिझममधे, एकता म्हणजे समानता असते. मत स्वातंत्र्य, कर्तव्याची जाणीव ही फॅसिस्ट्स लोकांना मुजोरी किंवा शिरजोरी वाटते. आणि त्यांची सहकार्याची भावना म्हणजे प्रत्यक्षात बळजबरी असते. समानता म्हणजे एकता असं फॅसिस्टांना वाटतं.
भारतासारख्या देशात अशा प्रकारची समानता आली तर एकताही नांदेल असं संघाला वाटतं. याचा अर्थ सर्वधर्मियांनी हिंदूंचं अनुसरण करावं आणि हिंदूंमधेही सर्वांनी ब्राह्मणांचं अनुसरण करावं. जोनाह गोल्डबर्ग त्यांच्या ‘लिबरल फॅसिझम’मधे याच्या पुढचं वर्णन करतात.
‘Fascism is a religion of the state. It assumes the organic unity of the body politic and longs for a national leader attuned to the will of the people. It is totalitarian in that it views everything as political and holds that any action by the state is justified to achieve the common good. It takes responsibility for all aspects of life, including our health and well-being, and seeks to impose uniformity of thought and action, whether by force or through regulation and social pressure. Everything, including economy and religion, must be aligned with its objectives. Any rival identity is part of the ‘problem’ and therefore defined as the enemy’
संघाची विचारधारा आणि सध्याच्या मोदी सरकारची वाटचाल अशीच सुरू आहे. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःकडे हवी आहे. सगळ्या गोष्टींत सारखेपणा हवा आहे. त्यांच्या दृष्टीनं सर्वांनी एकच एक विचार आणि कृती करायला हवी. पण ती काय असेल हे ते ठरवणार. याला जे विरोध करतील ते त्यांच्या दृष्टीने त्यांचे नाही तर देशाचे, जनतेचे शत्रू ठरतील. आणि ते तसे आहेत हे ते वारंवार लोकांना सांगतील.
सरकारविरोध म्हणजे देशविरोध, मोदीविरोध म्हणजे देशविरोध, तसेच काँग्रेसमुक्त भारत, विरोधकमुक्त सत्ता ही भाजपची नवी राजकीय प्रचारशैली या संदर्भात लक्षात घेता येईल. हे पुस्तक २००८ मधे आलं आणि त्याचा संदर्भ अमेरिकेतल्या उदारमतवादी राजकीय पक्षांशी निगडीत होता. २०१६ मधे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय झाला. तर त्याआधी २०१४ मधे भारतात मोदींचं सरकार आलं.
हेही वाचाः पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच
संघाची वाटचाल गोल्डबर्ग म्हणतात त्याप्रमाणे, एकता आणि समानतेच्या आवरणात गुंडाळलेल्या सारखेपणाकडे सुरू आहे. मोदी सरकारही त्याच दिशेनं प्रवास करतंय का? मोदी आणि संघ, संघ आणि भाजप यामधे थोडा फरक आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे आणि त्याला सत्ता मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी लवचिक असावं लागतं. त्यामुळे ते सरसकट संघाचा अजेंडा राबवत नाही. पण तो राबवण्यासाठी ते ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीचा उपयोग करतात.
संघानं स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कधी जाहीर केल्या नाहीत. पण त्यांना राजकीय सत्ता हवी आहे हेही उघड. त्याशिवाय त्यांच्या स्वप्नातला गौरवशाली हिंदूस्थान जन्माला येणार नाही. आपण राजकीय बाबतीत हस्तक्षेप करत नाही, असं निदान तोंडदेखलं का होईना संघ आजवर म्हणत आला. पण आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय की जनतेच्या हितासाठी संघ सरकारी कामांमधे हस्तक्षेप करतो.
प्रश्न असा आहे की जनतेचं हित कशात आहे हे संघ ठरवणार आहे, जनता नाही. आणि संघाची विचारधारा बघता त्यांच्या दृष्टीनं असलेलं जनतेचं हित या देशातील बहुधर्मिय वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या रुपानं भाजप आणि संघाला एक कणखर, धाडसी नेता मिळाला. पण या नेत्याचेही काही अवगुण आहेत. मोदींना कमालीची आसूरी महत्त्वाकांक्षा आहे. त्यांना भारताला जगातलं सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचंय. आणि स्वत:ला जगातला एक सर्वश्रेष्ठ राजकीय नेता.
संघाकडून आपला अजेंडा राबवण्यासाठी मोदी आणि भाजपचा उपयोग करून घेतला जातो. तसंच मोदी आणि भाजपही सत्ता मिळवण्यासाठी संघाचा उपयोग करतात. या दोघांचीही युती त्यांच्यासाठी आणि त्यांच्या उद्दिष्टांसाठी पवित्र आणि यशदायी असली तरी भारताच्या भविष्यासाठीही असेल यावर शंका आहे. भाजप-संघ-मोदी समर्थकांना ही शंका निराधार आणि हास्यास्पद वाटेल आणि ती तशीच ठरो. नाही तर देश अनैसर्गिक परिस्थितीकडे जाईल असं सध्या तरी वाटतंय.
आपल्या मनात एखादी शंका असेल, काही वाईट घडण्याची भीती असेल तर त्याविषयी मोकळेपणानं आणि वेळीच बोलणं गरजेचं असतं. त्यामुळे हे विचार मांडलेत. त्यालाही आता कुणी देशद्रोहाचा मुलामा चढवला तर ते घातक ठरेल. लोकशाहीत मतस्वातंत्र्य असतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला पटलं नाही तरीही ते मान्य करायचं असतं. सध्या तरी तसं होतांना दिसत नाही. त्यामुळे सावधगिरीचा एक इशारा देणं भाग आहे.
हेही वाचाः
आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?
अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?