मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला अकोले इथून सुरवात झाली. या सगळ्या दिवसावर इनकमिंगवाल्यांचा प्रभाव होता. उदयनराजेंना दिल्लीला घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धावपळ होती. प्रत्यक्ष यात्रेवरही पिचड, विखे, कर्डिले, डावखरे अशा काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमधे आलेल्या नव्या जुन्या नेत्यांचाच पगडा जाणवत राहिला.
आम्ही सकाळी नऊलाच संगमनेरहून अकोलेकडे निघालो. रस्त्यावर ठिकठिकाणी बॅनर, स्वागत कमानी लावलेल्या होत्या. जसं जसं गाडी अकोले मतदारसंघाच्या हद्दीत गेली तसं सारा माहोल बॅनरमय झाला होता. सगळीकडे आमदार वैभव पिचड यांच्या फोटोसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा सबकुछ वैभव पिचड माहोल होता.
एखादं दुसरा अपवाद वगळता सगळेचे बॅनर आणि कमानींवर पिचड यांचेच फोटो झळकत होते. या पोस्टरबाजीचा माग काढतच आम्ही अकोले गाठलं. पाऊण तासात २४ किलोमीटरचं अंतर कापून आयटीआय मैदानावरच्या सभास्थळी पोचलो. अकोले हे शहरवजा गाव असलेलं तालुक्याचं ठिकाण आहे. हा आदिवासीबहुल तालुका आहे. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे.
आदिवासींचे राज्य पातळीवरच नेते, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला म्हणून अकोलेची ओळख आहे. ही जागा आतापर्यंत कधीच भाजपला जिंकता आली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड हे बापल्योक भाजपमधे जाणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. नंतर मधुकर पिचड यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सगळीकडे भाजपला भरघोस मताधिक्य मिळालं. असं असताना अकोलेकरांनी मात्र पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना जवळपास ३१ हजाराची लीड दिली. लोकसभेत अफवा ठरलेला पिचड बापल्योकांचा भाजपप्रवेश विधानसभेच्या तोंडावर एक ब्रेकिंग न्यूज बनला.
महिनाभरापूर्वी भारतीय जनता पार्टीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांच्या मेगाभरतीचा पहिला टप्पा सुरू झाला. याच टप्प्यात पिचड बापल्योकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ काढून भाजपचं कमळ हातात घेतलं. कुठल्याही शक्तिप्रदर्शनाशिवाय मुंबईत पक्षप्रवेशाचा हा सोहळा झाला. त्यामुळे पिचडांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघात सभा घेण्याची गळ घातली होती. या आग्रहावरूनच अकोलेत आज महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली.
महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा अकोलेत सुरू होण्यामागं आणखी एक कारण सांगितलं जातं. गेल्या महिनाभरात भाजपमधे अनेक मोठी घराणी दाखल झालीत. अकलूजचे मोहिते पाटील, अहमदनगरचे विखे पाटील, उस्मानाबाद आणि इंदापूरचे नुसते पाटील, कोल्हापूरचे महाडिक, नवी मुंबईचे नाईक आणि अगदी कालपरवा आलेले साताऱ्याचे भोसले. हे सगळे घरंदाज राजकारणी भाजपात आले.
पण यापैकी कुणाच्याही नशिबी अख्ख्या घराण्यासह भाजपमधे येता आलं नाही. सगळे जण सुटेसुटे भाजपात आले. सुरवातीला अनेकांची मुलंच भाजपमधे आली. नंतर त्यांचे बापलोक भाजपमधे आले. पण पिचड बापल्योकांनी मात्र खांद्याला खांदा लावून भाजपप्रवेश केला. त्यामुळे इथल्या सभेला वेगळं महत्त्व असल्याचं अकोलेतला माहोल बघितला तर चटकन लक्षात येतं.
अकोलेत लावण्यात आलेल्या बॅनरवर सभा सकाळी दहाला असल्याचं सांगण्यात आलं होतं. तशी सभा सुरूही झाली. दुसरीकडे राष्ट्रवादीतूनच भाजपमधे आलेले ठाण्याचे नेते निरंजन डावखरे आणि वैभव पिचड यांची तयारीचा आढावा घेण्याची धावपळ सुरू होती. स्टेजवर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची भाषणं सुरू होती. कधीच जिंकता न आलेल्या अकोले मतदारसंघात आता भाजपचं कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे जुनेजानते पुढारी बोलून दाखवत होते.
आम्ही सगळी मंडळी पिचड यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं ही मंडळी सांगत होती. एका अर्थाने अकोले म्हणजे सबकुछ पिचड या समीकरणावरच ही मंडळी शिक्कामोर्तब करत होती. आदिवासीबहुल अकोले इथे खड्ड्यांतून रस्ता शोधत गाडी चालवावी लागते. अशा अकोलेत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरवात केली. यामागचा आणखी एक पदर भाजपच्या जुन्याजाणत्या मंडळींची ही भाषण ऐकत असताना उलगडत गेलं.
मुख्यमंत्री येता येता बारा वाजले. स्टेजवर बसलेले मधुकर पिचड तोल सांभाळत पायऱ्यांजवळ गेले. खालून येत असलेल्या मुख्यमंत्र्यांना फुलांचा गुच्छ देत स्वागत केलं. पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन, काँग्रेसमधून भाजपमधे आलेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वैभव पिचड स्टेजवर आले. सत्कार आटोपले. गळ्यात भाजपचे गमछे घालण्याचा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरवातीलाच वैभव पिचड भाषणासाठी उठले. पण त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा नव्हता. हे बघून एका जुन्यापुराण्या कार्यकर्त्याना पिचडांच्या गळ्यात गमछा घातला. मतदारसंघातल्या विकासकामांना गती देण्यासाठी आपण भाजपमधे आलोय. आता तालुक्यातल्या रस्त्यांचा प्रश्न येत्या काळात मार्गी लावायचाय. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अशी मागणी पिचड यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचंही छोटेखानी भाषण झालं. ‘जय भाजप’ असा नारा देत विखे पाटलांनी आपलं भाषण संपवलं. जिल्ह्यातले जुनेपुराणे नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांना मात्र भाषण करण्याची संधी मिळाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करत भाषणाला सुरवात केली.
आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात फडणवीस यांनी गल्लीपासून पाकिस्तानपर्यंतच्या विषयांना हात घातला. केंद्रातल्या मोदी सरकारच्या कामगिरीचे दाखलेही दिले. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
२५ वर्ष सत्तेची फळं चाखणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात जो विकास केला नाही, तो आम्ही केवळ पाच वर्षांत केला. आमची विकासकामं जनतेला भावली आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता २५ वर्ष तरी सत्तेची स्वप्नं बघू नयेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. विशेष म्हणजे, २५ हून अधिक वर्ष सत्तेचे सगळे लाभ घेतलेले पिचड, विखे पाटील, डावखरे हे स्टेजवर होते.
भाषण आटोपताच महाजनादेश यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या आलिशान बसच्या रथातून मुख्यमंत्री आणि वैभव पिचड हे अभिवादन करत वर आले. राम शिंदे, विखे पाटील हेही रथावर आले. जनतेला अभिवादन करतच यात्रा संगमनेरच्या दिशेने रवाना झाली. यात्रा रवाना झाली, पण आम्ही मात्र गर्दीमधे अडकलो. कशीबशी गर्दीतून सुटका करून घेतली. मग ट्रॅफिक कोंडीतून वाट काढत आमची गाडी संमगनेरकडे निघाली.
रस्त्यावर ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्या पडलेल्या होत्या. बॅनर काढण्याची लगबग सुरू होती. गाडी जशीजशी संगमनेर मतदारसंघाच्या हद्दीत शिरू लागली तसं रस्त्यावरच्या होर्डिंगची संख्या कमी झाली. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा ठेवली. पण इथे भाजपकडे उमेदवाराच नसल्याचं बॅनरबाजीवरून स्पष्ट दिसलं.
जिथे कुठे तुरळक स्वरूपात होर्डिंग, बॅनर, स्वागत कमानी होत्या तिथे सबकुछ विखे पाटील बापल्योकाची छाप होती. प्रवरा लोणीचं विखे पाटील कुटुंबचं इथला भाजपचा किल्ला लढवतंय याच्या सर्व खाणाखुणा आपल्याला इथल्या पोस्टरबाजीवरून स्पष्ट दिसतात. स्टेजवरही विखे बापल्योक होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हे संगमनेरचे रहिवासी आहेत. पण त्यांचा फोटो असलेले बॅनर शोधूनही सापडत नाहीत.
सभेच्या स्टेजवर लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख हेही होते. भगव्या कागदात गुंडाळलेला फुलांचा गुच्छ देऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनीही इंदुरीकर महाराजांचंही स्वागत केलं. महाराजांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना लाखाचा चेकही दिला. महाराज सभा होईपर्यंत स्टेजवर होते. त्यामुळे थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज शड्डू ठोकणार, अशी चर्चा राज्यभर रंगली.
महाराज शेजारच्या अकोले तालुक्याचे रहिवासी आहेत. ऐन निवडणुकीत भाजपच्या स्टेजवर हजेरी लावल्याने संगमनेर शहरात उलटसुलट चर्चा रंगली. पण दुसऱ्या दिवशी स्वतः महाराजांनीच आपण निवडणुकीच्या फंदात पडणार नसल्याचं स्पष्ट केलं. आपल्या शाळेला मदत निधी देणाऱ्यांमधे पहिली व्यक्ती भाऊसाहेब थोरात हे होते. थोरात कुटुंबियांसोबतचे ऋणानुबंधही सांगितले.
संगमनेरहून मुख्यमंत्र्यांची ही यात्रा लोणीच्या दिशेने गेली. दुपारी साडेबाराला पोचणारी यात्रा अडीचच्या सुमारास लोणीत आली. विखे पाटील समर्थकांनी यात्रेचं जंगी स्वागत केलं. फुलांचा वर्षाव केला. रस्त्यात ठिकठिकाणी बुलडोझरला हार लावून रथावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना ते घालण्यात येत होते. आतषबाजी सुरू होती. लोणीहून मुख्यमंत्र्यांचा ताफा राहुरीकडे रवाना झाला. रस्त्यात ठिकठिकाणी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या समर्थकांनी बॅनर लावले होते. साडेपाचला मुख्यमंत्र्यांचा ताफा राहुरीत आला.
राहुरीत महाजनादेश यात्रेंतर्गत आजच्या दिवशीची तिसरी सभा झाली. इथे शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. २००९ मधे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव कर्डिले यांनी सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक मात्र भाजपच्या तिकीटावर लढवली. राहुरी, अहमनगर आणि पाथर्डी अशा तीन तालुक्यांनी मिळून बनलेल्या मतदारसंघात कुठलीही संघटनात्मक बांधणी नसताना कर्डिले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं बोट पकडून विजय मिळवला.
कर्डिलेंनी राहुरीचे प्रस्थापित नेते प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला. एवढंच नाही तर अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर जावई संग्राम जगताप यांना निवडून आणण्याची किमयाही केली. २००९ मधे भाजपमधे प्रवेश केला त्यावेळी ते अहमदनगर उत्तर मतदारसंघातून आमदार होते. आता मात्र कर्डिले यांच्या उमेदवारीला भाजपमधल्या जुन्या नेतेमंडळींचा विरोध होतोय.
भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचा मुलगा सत्यजित यांनी कर्डिले यांच्यापुढे आव्हानं उभं केलंय. सत्यजित हे थेट जनतेतून झालेल्या निवडीत प्रवरा देवळालीचे नगराध्यक्ष झालेत. आतापर्यंतच्या दौऱ्यात राहुरीतच भाजपमधले दोन गट एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं बॅनरबाजीतून समोर आलं.
जुन्यांचा विरोध होत असला तरी मुख्यमंत्र्यांनी राहुरीला जाहीर सभा घेऊन संबंधितांना इशारा दिलाय. दहा वर्षांआधी भाजपमधे आलेले कर्डिले आता भाजपचा जिल्ह्यातला चेहरा म्हणून नावारुपाला आलेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनेही ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. राहुरीहून यात्रा अहमदनगरच्या दिशेने निघाली.
रस्त्यातच पाऊस सुरू झाला. रस्त्यावरचा माहोल टिपण्यासाठी धावत्या रथावर कॅमेरा टीम तैनात करण्यात आली होती. पण पावसामुळे रस्त्यातच ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांच्या कॅमेरा टीमला ताफ्यात असलेल्या गाड्यांमधे घेण्यात आलं.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास आम्ही ताफ्यासोबत अहमदनगरमधे पोचलो. यात्रेत कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यात ठिकठिकाणी वाहनं अडवण्यात आली. यात्रेचं स्वागत करण्यासाठी शहरात यात्रामार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. बॅनर, होर्डिंग लावण्यात आले होते. घोड्यावर स्वार असलेल्या महिलांनी यात्रेचं जंगी स्वागत केलं. दोनेक तास रोडशो चालला.
यात्रेच्या मार्गातच मोठ्या शहरात, जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असतो. आज पहिल्या दिवशी यात्रेचा मुक्काम अहमदनगरला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशासाठी दिल्लीला जायचं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री अहमदनगरचा मुक्काम टाळून पुण्याला रवाना झाले.
यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातला पहिला दिवस इनकमिंगवाल्यांचा होता. अकोलेत राष्ट्रवादीतून आलेल्या पिचड कुटुंबाने शक्तिप्रदर्शन केलं. संगमनेर, लोणीमधे काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांनी आपली ताकद दाखवून दिली. राहुरीतल्या बॅनरबाजीवरून आतले आणि बाहेरचा हा पक्षांतर्गत ड्रामा बघायला मिळाला. अहमदनगरमधल्या सभेवरही विखे पाटील कुटुंबाचाच प्रभाव दिसला.
हेही वाचाः
शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय
`आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय
जगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे
बी जे खताळ पाटीलः एका शतायुषी तत्त्वनिष्ठ राजकारण्याची गोष्ट
कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?