R0 ही गणितातली एक संकल्पना आहे. पण सध्या ती कोरोना वायरसची लागण किती वेगाने होते, हे शोधून काढण्यासाठी वापरली जातीय. प्रत्येक देशानुसार, देशातल्या राज्यांनुसार ही संख्या बदलू शकते. कोरोना साथरोग कधी संपणार हेही या संख्येवरून सांगता येतं. त्यामुळेच या एका संख्येवर साथरोगाच्या काळात देशाची धोरणं ठरतात. लॉकडाऊन कधी संपणार याचा अंदाजही आपल्याला ही संख्याच देऊ शकते.
लॉकडाऊन कधी संपणार? ऑफिस कधी सुरू होणार? आता पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही? मॉल्स, थेटर कधी सुरू होतील? घरी बसून कंटाळा आलाय, घराबाहेर कधी पडता येईल? शाळा कधी सुरू होणार? मित्रमैत्रीणींना कधी भेटणार? ही कोरोना वायरसची कटकट कधी संपणार?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका आकडेमोडीमधे दडलेली आहेत. जगभरातले शास्त्रज्ञ, संशोधक, आरोग्य अधिकारी, जागतिक दर्जाच्या वेगवेगळ्या संस्था अगदी गल्लीबोळातले डॉक्टर आणि शेअर मार्केटमधे पैसा गुंतवलेले व्यापारीसुद्धा कोरोना वायरसशी संबंध असलेल्या या संख्येवर लक्ष ठेऊन आहेत. या एका संख्येवर सगळ्या मानवजातीचं भविष्य अवलंबून आहे. गणिती भाषेत ही संख्या R0 अशी लिहिली जाते. तर तिचा उच्चार आर झिरो किंवा आर नॉट असा केला जातो.
हेही वाचा : हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
एखाद्या साथीच्या रोगात ही R0 संख्या अतिशय महत्त्वाची असते. हेल्थलाईन या वेबपोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, R0 मधला आर रिप्रोडक्शन हा शब्द सुचित करत असतो. म्हणजे, एखाद्या साथीच्या रोगात वायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे साधारणपणे किती लोकांना लागण होऊ शकते हे दाखवण्यासाठी या R0चा वापर केला जातो.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एखाद्या वायरसची आधी कधीही लागण झालेली नाही अशा लोकांच्या एका गटात त्या वायरसची लागण झालेल्या एका माणसाला सोडलं तर त्या एकट्या माणसामुळे साधारणपणे किती लोकांना त्या वायरसची लागण होते, हे सांगणारी संख्या म्हणजे R0. या संख्येवरून एखादा साथरोग किती झटकन पसरतो हे लक्षात येतं. त्यामुळेच साथरोगाचा अभ्यास करताना ही संख्या अत्यंत महत्त्वाची ठरते.
समजा, एखाद्या साथरोगाचा R0 ५ असेल तर त्या साथरोगाच्या वायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे साधारणपणे इतर ५ लोकांना त्या वायरसची लागण होईल. पुन्हा या ५ पैकी प्रत्येकामुळे आणखी ५ जणांना वायरसची लागण होईल. ही साखळी पुढे अशीच चालू राहते.
आपण गणित सोडवताना जी संख्या शोधायचीय त्याला क्ष किंवा एक्स मानतो. तसंच, एक व्यक्ती साधारणपणे किती लोकांना लागण करू शकते या संख्येला संशोधक R0 मानतात आणि गणित सोडवायला घेतात. कुठलाही माणूस मुद्दाम किंवा ठरवून वायरसचा प्रसार करत नसतो. त्यामुळे एखाद्या माणसाकडून दुसऱ्यांना वायरसची लागण झाली तरी ती नेमकी कुठल्या वेळेला, कुठल्या मिनिटाला झाली हे कळणं अवघड आहे. मग R0 संख्या काढण्यासाठी शास्त्रज्ञ घटनाक्रमांचा उलट अभ्सास करतात.
म्हणजे, साथरोगाबद्दल उपलब्ध माहितीवरून मृतांची संख्या, हॉस्पिटलमधे भरती होणाऱ्या पेशंटची संख्या आणि त्यांची तपासणी केल्यावर ती पॉझिटिव आलेल्यांची संख्या याचा अभ्यास शास्त्रज्ञ करतात. ही माहिती अर्थातच गेल्या काही दिवसांची असते. त्यामुळे संशोधकांनी आज शोधून काढलेला R0 हा खरंतर गेल्या दोन तीन आठवड्यांपूर्वीचा R0 असतो.
R0 शोधून काढण्यासाठी तीन गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे, संसर्ग होण्याचा काळ म्हणजे लागण झाल्यापासून किती दिवसांनी लक्षणं दिसू लागतात तो काळ, दुसरं, साथरोग पसरण्याचे मार्ग आणि तिसरं म्हणजे लागण झालेली व्यक्ती साधारणपणे किती लोकांच्या संपर्कात येते. लागण झाल्यापासून खूप दिवसांनी लक्षणं दिसत असतील तर त्या मधल्या काळात व्यक्ती नकळतपणे अनेक लोकांच्या संपर्कात येते. साहजिकच, अशावेळी R0 जास्त असतो.
शिवाय, साथरोग शिंकल्यामुळे किंवा खोकल्यामुळे पसरत असेल तर त्याची लागण जास्त लवकर होते. हेच, एचआयवीप्रमाणे लैंगिक संबंधातून किंवा रक्तातून पसरत असेल तर लागण होण्याची शक्यता कमी होते. तसंच, एखादा दुकानदार किंवा एखादा बिझनेसमन हा एखाद्या सामान्य माणसापेक्षा जास्त लोकांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे त्या परिस्थितीत R0 वाढण्याची शक्यता असते.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
या R0 नंबरवरून साथरोगाच्या प्रसाराचा वेग काढता येतो. त्यासाठी तीन शक्यता तपासल्या जातात.
१) R0 हा नंबर एकपेक्षा कमी असेल तर R0 < १ असं समीकरण मांडलं जातं. याचा अर्थ वायरसची लागण होणाऱ्यांची संख्या एकाहून कमी आहे. म्हणजेच, वायरसचा प्रसार होत नाहीय. अशा परिस्थितीत साथरोग हळूहळू कमी होतो आणि संपतो.
२) R0 नंबर एक असेल म्हणजे R0 = १ असं असेल तर कोरोना वायरसची लागण झालेल्या एका माणसामुळे आणखी एकाच माणसाला लागण होते. याचा अर्थ, वायरसचा प्रसार होत असतो पण त्याचा वेग मर्यादेत असतो.
३) पण R0 एकपेक्षा जास्त असेल तर R0 > १ असं समीकरण मांडलं जातं. याचा अर्थ, एका माणसाकडून एकाहून जास्त लोकांना वायरसची लागण होते. म्हणजेच या तिसऱ्या परिस्थितीत साथरोग भयंकर रूप धारण करून सगळ्या जगभरात पसरू शकतो.
हा R0 एकपेक्षा जास्त म्हणजे अगदी २ असला तरी रोगाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. कारण एक व्यक्ती दोघांना लागण करते. त्यानंतर त्या दोन व्यक्ती आणखी चार जणांना लागण करतात. पुन्हा चार व्यक्तींमुळे ८ जणांना लागण होते, असा हा आकडा वाढतच जातो.
R0 संख्या सतत बदलत राहते. त्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. साथरोग कसा आहे, तो कोणत्या मार्गाने पसरतो या गोष्टींचा परिणाम होतो. पण त्यासोबतच वायरस पसरलेल्या समुहातले लोक कसे वागतात, किती प्रमाणात शारीरिक अंतर पाळलं जातं, त्यांचं राहणीमान कसं आहे याचाही परिणाम R0 वर होत असतो.
देशाच्या भौगौलिक स्थितीचाही परिणाम त्यावर होतो. लोकसंख्येची घनता म्हणजे कमी जागेत दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त असणाऱ्या शहरांमधे आरनॉट जास्त असतो. याउलट खेडेगावात आरनॉट कमी असतो. महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या देशातल्या लोकसंख्येपैकी प्रत्येक माणसाला वारयसची लागण होईल अशी परिस्थिती असेल तरच ही R0 संख्या लागू होते. त्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
१) समाजातल्या कुणालाही त्या आजाराविरोधात लस दिली गेलेली नाही.
२) वायरसची लागण होऊन त्यातून बरी झालेली एकही व्यक्ती समाजात नाही.
३) साथरोगापासून लोकांचा बचाव करण्याचा इतर कुठलाही मार्ग अवलंबला जात नाही.
या तीन अटींची पूर्तता झाली तरच आरनॉट संख्या लागू होते. सध्याच्या कोरोना वायरसच्या काळात तर या तीनही अटींची पूर्तता होताना दिसते.
हेही वाचा : लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरवातीला झालेल्या संशोधनात कोरोना वायरसचा जागतिक R0 हा २ किंवा ३ असल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे, कोरोना वायरची लागण झालेल्या एका व्यक्तीमुळे २ किंवा ३ जणांना लागण होण्याची शक्यता आहे. पण मुळात कोरोना वायरसची R0 संख्या ही याहून जास्त असल्याचं अलीकडच्या काळात झालेल्या काही संशोधनात समोर आलंय.
सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेन्शन ही अमेरिकन आरोग्य संस्था आहे. या संस्थेच्या वेबसाईटवर ‘इमरजिंग इन्फेक्शनस डिसिज’ नावानं एक रिसर्च पेपर उपलब्ध आहे. त्यानुसार, कोरोना वायरसचा R0 हा ५.७ असल्याचं सांगितलंय. कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीमुळे ५ ते ६ लोकांना लागण होऊ शकते असा त्याचा अर्थ होतो. हे संशोधन चीनच्या वुहान शहरातला डाटा घेऊन करण्यात आल्यानं ते अतिशय अचूक असल्याचा दावा केला गेलाय.
या संशोधनात संसर्ग काळ म्हणजे वायरसची लागण झाल्यापासून ते त्याची लक्षणं दिसायचा काळ हा ४.२ दिवस असा मानण्यात आला होता. तसंच, डबलिंग टाईम म्हणजे कोरोना पेशंटच्या मृत्यूची संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ हा २ ते ३ दिवस असावा, असं या संशोधनातून समोर आलं. आधी हा काळ ६ ते ७ दिवसांचा असेल असं वर्तवण्यात आलं होतं. हा काळ जितका कमी तितका साथरोग पसरण्याचा वेग जास्त.
जगभरातल्या लोकसंख्येचा R0 हा ५.७ असेल तर जगातल्या ८२ टक्के लोकसंख्येकडे कोरोना वायरसविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती विकसित व्हायला हवी. म्हणजे, ८२ टक्के लोकांचं लसीकरण व्हायला हवं किंवा ८२ टक्के लोकांना कोरोना वायरसची लागण होऊन ते त्यातून बरे व्हायला हवेत. तरच, आपल्या सगळ्यांना कोरोना वायसरपासून कायमची सुटका मिळेल.
चेन्नईमधल्या गणितीय विज्ञान संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात १३ एप्रिल ते १० मे कोरोना वायरसचा R0 १.२९ इतका होता. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा R0 १.८३ इतका होता. R0 चा हा आलेख असाच खाली खाली आणत शुन्य कसा करता येईल यासाठी सगळं जग आणि पर्यायाने भारताचेही प्रयत्न सुरू आहेत.
साथरोग पसरला असताना या R0 च्या संख्येवर देशाची धोरणं ठरवली जातात. R0 जास्त असेल तर लॉकडाऊन वाढेल आणि आणखी कडक केला जाईल. R0 एक असेल तरी आपल्यावर काही प्रमाणात बंधनं येतील. मात्र R0 एकपेक्षा कमी झाला म्हणजे कोरोना वायरसचा धोका टळला.
R0 एकपेक्षा कमी झाला की सगळे झुंडीनं बाहेर पडायचं, आधीसारखं कामाला जायचं असं करता येणार नाही. कारण संपूर्ण समुहाची, समाजाची रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही तोपर्यंत कोरोना वायरसची टांगती तलवार आपल्यावर असणारच आहे. R0 कमी झाला म्हणून सगळे घराबाहेर पडू लागले तर झटक्यात R0 वर जाईल. मग पुन्हा शेअर बाजार, उद्योग धंदे, शाळा, मॉल्स बंद करावे लागतील. थोडक्यात, या R0 संख्येवर आपलं सगळं भवितव्य ठरलेलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
हेही वाचा :
वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?
महर्षी शिंदेंच्या डायऱ्या सांगतात, ११० वर्षांपूर्वीच्या प्लेगचा कहर
लॉकडाऊननंतर आपण महाराष्ट्रातल्या शाळा कसं सुरू करू शकतो?
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स
लॉकडाऊनमधे हे साधेसोपे व्यायाम करा आणि मोबाईलमुळे होणारी दुखणी टाळा