ऑलिम्पिकमधे क्रिकेटची एण्ट्री, सर्वसमावेशाची संधी?

२४ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.

यंदा संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट टीमने उत्तम कामगिरी केली. ऐनवेळी ऑस्ट्रेलियासमोर कच खाल्ल्यामुळे आपल्याला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रकुल ही सहभागी देशांसाठी ऑलिम्पिकची पूर्व तयारी असते; तेव्हा राष्ट्रकुलच्या पाठोपाठ आता क्रिकेट ऑलिम्पिकमधेही प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

तसं बघायला गेलं तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमधे प्रवेश १९००लाच झाला होता. पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमधे तो १८९६ला होऊ शकला असता; पण इंग्लंड सोडून कुणी टीमने भागच घेतला नाही. १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमधे समावेश झाला तेव्हा इंग्लड आणि फ्रेंच ऍथलेटिक क्लब या दोन टीम स्पर्धेत उतरल्या होत्या.

ही जी दुसरी फ्रेंच टीम होती, ती फ्रान्सची नसून एक मिश्र टीम होती. १२ खेळाडूंच्या टीममधे ३ फ्रेंच, तर ९ ब्रिटिशच खेळाडू होते. थोडक्यात काय, तर ब्रिटनने आपल्याच दोन टीम खेळवत गोल्ड मेडल नक्की केलं होतं. यानंतर क्रिकेट ऑलिम्पिकच्या वाटेला पुन्हा फिरकलं नाही.

क्रिकेटच्या समावेशाची स्वप्नं

राष्ट्रकुल म्हणजे ज्या देशांवर एकेकाळी ब्रिटिशांचं राज्य होतं, ते सदस्य देश. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देश उतरले होते; पण राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक यात खूप अंतर आहे. जागतिक पटलावर दबदबा निर्माण करणारे अमेरिका आणि चीन राष्ट्रकुलमधे नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांचं फावतं. क्रिकेटचा विचार राष्ट्रकुलसाठी झाला तरी ऑलिम्पिकसाठी क्रिकेट पुन्हा पात्र ठरण्यासाठी क्रिकेट जगताला खूप मेहनत करावी लागेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१७ला क्रिकेट आता ऑलिम्पिक पुनरागमनासाठी तयार आहे, असं निवेदन करत ऑलिम्पिकसाठी तयारी चालू केली, असंही म्हणता येईल. सुरवातीला बीसीसीआय आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड हे श्रीमंत सदस्य क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशासाठी उत्सुक नव्हते; पण आता त्यांचा विरोध मावळल्यामुळे २०२८च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या समावेशाची स्वप्नं आपण बघत आहोत.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमधे समावेश करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आयसीसीला तजवीज करावी लागेल, ती क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात जागा निर्माण करण्याची. आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक दर पाच वर्षांसाठी जाहीर करते आणि याच आठवड्यात त्यांनी २०२३-२७चं वेळापत्रक जाहीर केलं. या व्यस्त वेळापत्रकात आयपीएलसारखी प्रचंड उलाढालीची स्पर्धाच भरवायला जेमतेम वेळ मिळतो तेव्हा ऑलिम्पिकसाठी वेळ काढणं नक्कीच आव्हानात्मक असेल.

हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

कमी वेळाची क्रिकेटची रूपं

यंदाच्या राष्ट्रकुलमधेही पुरुष क्रिकेटचा समावेश होऊ शकला नाही कारण आयसीसीच्या वेळापत्रकात त्याची तजवीज नव्हती आणि कुठचेही वेळापत्रकातले दौरे रद्द करणं म्हणजे प्रचंड आर्थिक नुकसान. वेळापत्रकाबरोबरच क्रिकेटचा ऑलिम्पिकमधे समावेश व्हायची इच्छा असेल, तर मॅचचा कालावधी कमी करावा लागेल. टेस्ट आणि वनडे प्रकारचा समावेश होणं निव्वळ अशक्य आहे.

ऑलिम्पिक समावेश आणि क्रिकेटची बाजारपेठ वाढवायच्या दृष्टीने क्रिकेटचा प्रसार करायचा, तर क्रिकेटच्या सामन्याचा कालावधी कमी आणि थरार जास्त, हे समीकरण अमलात आणणं ही काळाची गरज ओळखून आयसीसीने क्रिकेटमधे योग्य तो बदल केला. यातून ट्वेन्टी-ट्वेन्टी मॅचचा उदय झाला. अबूधाबीत तर १० षटकांची स्पर्धा होते आणि इंग्लंडमधे १०० म्हणजे एका डावासाठी १०० चेंडू अशी ट्वेन्टी-ट्वेन्टी पेक्षाही कमी वेळाची क्रिकेटची रूपं तयार झाली.

आजच्या घडीला फुटबॉल हा निर्विवादपणे सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ९० मिनिटांच्या थरारात प्रत्येक मिनीट उत्कंठावर्धक असतं. फुटबॉलशी टक्कर घेण्यासाठी क्रिकेटचं हे संक्षिप्त रूप गरजेचं होतं.
ऑलिम्पिकसाठी जरी साडेतीन तासांत संपणार्‍या ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटचा विचार करायचा झाला तरी टीमवर मर्यादा असेल कारण पात्रता फेरी ते पदक फेरी यात फार अंतर नसतं.

वेगळ्या नियमांची गरज

आज आयसीसीचे १२ देश हे पूर्ण सदस्य आहेत, तर ९४ देश हे सहभागी सदस्य आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश मिळेल याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? याचप्रमाणे या बारा देशांचा जरी क्रिकेटसाठी विचार केला तरी त्यात गोंधळ आहे.

ऑलिम्पिकमधे युनायटेड किंगडम हे ग्रेट ब्रिटन या एकाच नावाखाली स्पर्धेत उतरत असले तरी त्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स या तीन देशांचे खेळाडू असतात. नॉर्दन आयर्लंडच्या खेळाडूंना एकतर ग्रेट ब्रिटनबरोबर किंवा आयर्लंडबरोबर ऑलिम्पिकमधे उतरायचा पर्याय असतो पण क्रिकेटचा विचार केला तर इंग्लंड, आयर्लंड हे पूर्ण वेळ सदस्य असलेल्या वेगवेगळ्या टीम आहेत; तर स्कॉटलंड हा सदस्य देश असून, त्यांची वेगळी टीम आहे.

वेस्ट इंडिजबाबत तर अजून गोंधळ आहे. क्रिकेट जगतात वेस्ट इंडिज म्हणून एकाच नावाने खेळत असलेल्या क्रिकेट टीममधे तब्बल बारा कॅरिबियन बेटांमधले खेळाडू खेळू शकतात; पण हे बारा देश ऑलिम्पिकला स्वतंत्रपणे खेळतात. आताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही महिलांची वेस्ट इंडिजची टीम न उतरता बार्बाडोसची टीम उतरली होती, जी या बारा देशांपैकी एक आहे. तेव्हा इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला ऑलिम्पिकमधे खेळायचं असेल, तर काही वेगळे नियम करावे लागतील.

हेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

आयसीसीची अशीही महत्वाकांक्षा

क्रिकेटचा प्रसार आज जरी अनेक देशांत होत असला तरी स्पर्धात्मक दर्जाचं क्रिकेट अजूनही या देशात पोचलेलं नाही. मूळ भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलिया किंवा जिथं क्रिकेट उत्तम प्रस्थापित झालंय, अशा देशाच्या वंशाचे खेळाडू या सदस्य देशातून खेळताना दिसतात. त्यामुळे या सदस्य देशात प्रथा दर्जाच्या क्रिकेटच्या सुविधा, स्पर्धा यांचा अभावच आहे.

आयसीसीचा क्रिकेट अमेरिकेत लोकप्रिय करण्याचा मोठा मनसुबा आहे. याच कारणाने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतल्या शेवटच्या दोन मॅच अमेरिकेत फ्लोरिडाला ठेवलेल्या. अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय हे भारतीय कलाकारांचे लाईव करमणुकीचे कार्यक्रम किंवा क्रिकेट यांना भुकेले असतात, त्यामुळे वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या टीमविरुद्धच्या सामन्यांनाही मैदानं प्रेक्षकांनी भरली होती; पण यात बहुतांशी भारतीय वंशाचे प्रेक्षक होते. 

मूळ अमेरिकन लोकांमधे ब्रिटिशांचं क्रिकेट लोकप्रिय होणं हे दिवास्वप्न बघितल्यासारखं असेल. हे फ्लोरिडाचं मैदान, खेळपट्टी यथातथाच होते. २०२८चं ऑलिम्पिक लॉस अँजेलिसला आहे. तिथं लिओमॅग्नस क्रिकेट संकुल आहे, ज्यात चार मैदानं आहेत. आयसीसीने २०१६ला तिथं डिविजन ४ स्पर्धा भरवली होती; पण जर ऑलिम्पिकसाठी १२ पूर्णवेळ सदस्य टीमनी मैदानात गोल्ड मेडलसाठी खेळायची अपेक्षा ठेवायची असेल, तर खेळपट्ट्यांपासून बाकीच्या गोष्टींवर आतापासूनच मेहनत घ्यावी लागेल.

यजमान देश खर्च उचलतील?

२०२४ पॅरिस ऑलिम्पिक किंवा २०२८चं लॉस अँजेलिसचं यजमान फ्रान्स असो किंवा अमेरिका, आयसीसीचे बहुतांशी देश सदस्य आहेत तेव्हा तिथं लीग क्रिकेट खेळलं जातं. क्रिकेटची मैदानं आहेत. प्रश्न आहे तो ऑलिम्पिकमधे क्रिकेटचा पुनर्प्रवेश करायचा झाला तर ऑलिम्पिक गोल्ड मेडलचा मान राखण्याच्या दृष्टीने इथं उत्तम खेळपट्ट्या आणि सोयीसुविधा कराव्या लागतील.

जर क्रिकेटचा प्रसार अपेक्षित नसला, तर यजमान देश हा खर्च उचलतील? राष्ट्रकुलमधेही २००८ नंतर २०२२ला फक्त दुसर्‍यांदा क्रिकेटचा समावेश झाला. थोडक्यात, क्रिकेटचा ऑलिम्पिक पुनर्प्रवेश हा आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच अवलंबून असेल.

हेही वाचा: 

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश