नाथ वैराळ: शिर्डीच्या साईबाबांची चित्रकथा रेखाटणारे चित्रकार

२८ जून २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


चित्रकार नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मंडळींना चित्रकार नाथ वैराळ यांची ओळख करुन देणारी ही भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.

सर्जेपुरा चौकात दैनिक केसरीचं कार्यालय होतं. नगरमधली माझी पत्रकारिता तिथून सुरू झाली. हाकेच्या अंतरावर रंगभवन. एकेकाळी पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर्सची गाजलेली हिंदी नाटकं तिथं होत असत. रंगभवनचं ते वैभव केव्हाच सरलं होतं. त्याचे रंग उडाले होते. वापर नसल्यानं तिथं कचराकुंडी तयार झाली होती.

जुन्या पिढीतले अभिनेते रघुनाथराव क्षीरसागर, चित्तरंजन पारखे यांच्यासारख्या दिग्गजांकडून रंगभवनबद्दल खूप ऐकलं होतं. त्यामुळे एकदा कचरा तुडवत, नाकाला रूमाल लावत रंगभवनमधे डोकावून आलो. नंतर काही लाख रूपये खर्च करून रंगभवनला संजीवनी देण्याचा प्रयत्न झाला, पण तो फसला. बाहेर बांधलेल्या गाळ्यांमुळं आणि वाहनांच्या गर्दीमुळं रंगभवनचं भलं होऊ शकलं नाही. आताच्या पिढीला तर रंगभवन नावाचं नाट्यगृह नगरमधे आहे, हेही ठाऊक नसेल.

हेही वाचा: इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!

चित्रकार नाथ वैराळ

रंगभवनशेजारीच एक फार मोठे चित्रकार राहत होते, हेही बर्‍याच नगरकरांना माहीत नसावं. मध्यंतरी वाईच्या सतीश कुलकर्णींशी फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता ते म्हणाले, ओशो म्हणजे रजनीश यांच्या दोनशेहून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार नाथ वैराळ तुमच्या नगरचे होते. रंगभवनजवळ ते राहायचे.

नाथ वैराळ यांचं १ सप्टेंबर २०१०ला निधन झालं. त्यांची भेट होणार नव्हती, पण निदान त्यांची चित्रं पाहण्याची उत्सुकता होती. ५९४३, सर्जेपुरा, गुरू मंदिराजवळ. हा पत्ता शोधत मी वैराळ यांच्या घरी गेलो. दरवाजा बंद होता. त्याला वंदन केलं. शेजारी चौकशी केली, तेव्हा समजलं, वैराळ कुटुंबीय आता सिविल हडकोत राहतात.

नाथ वैराळ यांच्या पत्नी कुसुमताई आणि कुटुंबियांकडून या महान चित्रकाराचं जगणं समजावून घेता आलं. नाथ वैराळ यांनी रेखाटलेली मूळ चित्रं, त्यांच्या पहिल्या पत्नीचं पोट्रेट वगळता आता उपलब्ध नाहीत. त्यांच्या चित्रांची मुखपृष्ठ असलेली काही पुस्तकं बघायला मिळाली. त्यात एक अप्रकाशित चित्रकथाही होती, शिर्डीच्या साईबाबांची.

जिद्दीने फुलवली कला

नाथ वैराळांचं पूर्ण नाव एकनाथ नामदेव वैराळ. एकनाथाचं पुढं ‘नाथ’ झालं. ‘अण्णा’ हे त्यांचं टोपणनाव. १६ जून १९३२ ही त्यांची नोंदवलेली जन्मतारिख. घरची प्रचंड गरिबी. वडील विठ्ठलभक्त. एकेवर्षी पंढरीच्या वारीला गेले असताना प्लेग होऊन कुरकुंभ इथं त्यांचं निधन झालं.

केरसुण्या तयार करण्याचा व्यवसाय करत आईनं संसार सांभाळला. क्लिनरच्या हाताखाली मोटारी धुण्याचं काम लहानगा एकनाथ करत असे. वाया गेलेला कोळसा लोणार आळीत नेऊन विकायचा. त्यातून मिळणार्‍या दोन-चार आण्यावर दिवस काढायचा.

अमेरिकन मिशनच्या शाळेत शिकत असताना र. बा. केळकर नावाच्या नामांकित चित्रकला शिक्षकानं नाथातले कलागुण ओळखून त्याला पैलू पाडले. हुबेहूब चित्र काढावं, ते नाथानंच. पेटिंगमधे त्यांनी कौशल्य मिळवलं.

शंकर खंडागळे या मित्राची साथ मिळाली. शालेय शिक्षण नववीत थांबलं, तरी नंतर जिद्दीनं शिकत नाथ वैराळ जी. डी. आर्ट झाले. नगरमधल्या पेंटर विटणकर यांच्याकडे त्यांनी काही काळ कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून काम केलं.

हेही वाचा: अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

मुंबईतली कलाकारी

वयाच्या बावीसाव्या वर्षी नाथ वैराळ नगरमधले मित्र पेंटर शंकर यांच्यासोबत मुंबईत आले. आपल्या चित्रांची कदर या मोहमयी नगरीत होईल, असं त्यांना वाटलं. मुंबईत एका पारशी गृहस्थानं त्यांना आपल्या स्टुडिओत काम दिलं. सुरवातीला मराठी-हिंदी सिनेमाचे होर्डिंग आणि साइनबोर्ड त्यांनी रंगवले. नंतर हासमभाई जेठा कंपनीत नोकरी लागली. सुरवातीला पगार होता १२५ रूपये. तो ८०० रूपये व्हायला ८ वर्षं जावी लागली.

काही काळ ते ‘रेहमान आर्टस’मधेही होते. दरम्यान, मित्र शंकरचं आकस्मिक निधन झालं आणि नाथ वैराळ मुंबईत एकाकी पडले. या धक्क्यातून सावरत त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्रपणे चित्रांचं काम करायला सुरवात केली. राजा साठे या प्रकाशकानं त्यांच्याकडून अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ तयार करून घेतली. लवकरच नामवंत कंपन्यांच्या कॅलेंडरवर, ग्रिटिंग कार्डवर वैराळ यांची चित्रं झळकू लागली.

त्यांनी काढलेल्या चित्रांनी लग्नपत्रिका सजू लागल्या. मशीन ड्रॉईंग आणि फोल्डरचीही कामं त्यांना मिळाली, पण नाथ वैराळ त्यात रमले नाहीत. त्याच दरम्यान मुंबईत गिरणी कामगारांची आंदोलनं वाढली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळही सुरु झाली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि नाथ वैराळ यांचं मैत्र जुळलं ते याच काळात.

अण्णाभाऊंशी जुळली मैत्री

अण्णाभाऊ ‘फकिरा’ कादंबरी लिहित होते. त्यातल्या रांगड्या नायकाचं वर्णन ते नाथ वैराळांना ऐकवत. ते ऐकताना त्यांच्या डोळ्यापुढे ते व्यक्तिमत्त्व साकारू लागलं. त्यातून जन्माला आलं फकिराचं देखणं मुखपृष्ठ. रूंद गर्दन, मर्दानी छाती आणि पोलादी मनगट असलेला हा नायक अण्णा भाऊंसह सगळ्यांना पसंत पडला. अनेक भाषांमधे अनुवाद होऊन फकिरा आणि नाथ वैराळांचं ते चित्र जगभर पोहोचलं.

‘शेठजी आणि धनाढ्य मंडळींसाठी कुंचला कशाला झिजवतोस? तुझी प्रतिभा वंचितांसाठी, कष्टकर्‍यांसाठी वापर’ असा सल्ला लोकशाहीर अण्णा भाऊंनी नाथ वैराळांना दिला. ते स्वतः तसेच जगत होते. नाथ वैराळांनी तो सल्ला मानला. त्यांच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरू झालं. अण्णा भाऊंनी के. ए. अब्बास, ए. के. हंगल, राज कपूर अशा मंडळींची ओळख करून दिली. त्यातून काही कामं मिळू लागली.

अण्णा भाऊ आणि नाथ वैराळांचे मैत्र चांगलंच जमलं. नाथ वैराळांबरोबर ते नगरला त्यांच्या घरी येत. दुर्दैवानं अण्णा भाऊंचा अखेरचा काळ आर्थिक विपन्नावस्थेत गेला. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांना त्यांची ही स्थिती बघवली नाही. एके दिवशी त्यांनी अण्णा भाऊंना घरी बोलवलं आणि कपाट उघडून सांगितलं, ‘तुला हवे तितके पैसे तिथून घे.’ अण्णा भाऊंनी नकार दिला.

हे पैसे पक्षाचे आहेत. पक्षकार्यासाठीच त्यांचा वापर व्हायला हवा. मी ते घेणार नाही, असं ते म्हणाले. त्या सगळ्या परिस्थितीचे साक्षीदार नाथ वैराळ होते. दुर्दैवानं १९६९ मधे नाथ वैराळांचा हा जवळचा मित्र त्यांना सोडून निघून गेला. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. अण्णा भाऊ साठे यांचं आज जगन्मान्य झालेलं चित्र नाथ वैराळ यांनीच काढलेलं आहे. मित्राला वाहिलेली ती श्रद्धांजली ठरली.

हेही वाचा: सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

रजनीश यांच्याशी भेट

दरम्यान, नाथ वैराळांची भेट रजनीश यांच्याशी झाली. तेव्हा ते मुंबईतच होते. नाथ वैराळांची चित्रशैली त्यांना भावली. आपल्या मनातली कल्पना ते सांगत. नाथ वैराळ त्याबरहुकूम चित्र काढून देत. रजनिशांचे ते आवडते चित्रकार बनले. अनेकदा दोघांनी एकत्र प्रवासही केला. रजनीश त्यांना अमेरिकेतही घेऊन जाणार होते, पण तो योग काही आला नाही.

काहीजण नाथ वैराळ यांना म्हणत, ‘तुझे आणि श्रींचे म्हणजेच रजनिशांचे चांगले संबंध आहेत. त्यांचं तुझ्याविषयी फार चांगलं मत आहे. तेव्हा तू दीक्षा का घेत नाहीस? त्यांचा शिष्य होऊन जा. ते तुझा सगळा खर्च करतील, सर्व सांभाळतील.’ त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीतला मोठा अभिनेता विनोद खन्ना यानं दीक्षा घेतली होती.

काय करावं, याचा विचार नाथ वैराळ करत असतानाच त्यांच्या पत्नीचं आजारपण उद्भवलं. त्यामुळे दीक्षा घेण्याचा विचार मागे पडला. नाथ वैराळ यांच्या पत्नीवर तळेगाव दाभाडे इथं उपचार सुरू होते. दुर्दैवानं त्यातून ती बाहेर पडू शकली नाही. त्यातच तिचं निधन झालं. तिचा अंत्यविधी उरकून नाथ वैराळ नगरला आले. काही दिवस ते इथंच राहिले.

रजनीश पर्वाची अखेर

त्यांची गैरहजेरी रजनिशांच्याही लक्षात आली. मुंबईला परतल्यानंतर नाथ वैराळ त्यांना भेटायला गेले. पत्नीचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर रजनीश म्हणाले, ‘जो आता है उसे एक दिन जानाही है. तेव्हा दुःख मानण्याचं कारण नाही.’ रजनीश त्या पलिकडे पोचले होते.

त्यांनी धीर देत नाथ वैराळ यांना विचारलं, ‘दुसरी शादी करोगे?’ त्यावर नाथ वैराळ म्हणाले, ‘आताच मी काही ठरवलेलं नाही.’ तेव्हा रजनीश लगेच म्हणाले, ‘और करना भी नही. बहुत झंझट होती है.’ रजनीशांचा हा अखेरचाच सल्ला ठरला. कारण त्यानंतर नाथ वैराळ आणि त्यांची भेट होऊ शकली नाही. नाथ वैराळ नगरला परतले आणि रजनीश मुंबई सोडून पुण्यात स्थायिक झाले.

ओशो म्हणून त्यांचं मोठं प्रस्थ निर्माण झालं. कोरेगाव पार्क भागातला ओशोंचा आश्रम देश-विदेशांतल्या भाविकांनी गजबजू लागला. नाथ वैराळ यांनी पुण्यात जाऊन रजनीशांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट दुरापास्त झाली. एक-दोनदा प्रयत्न केल्यानंतर नाथ वैराळांनी तो नाद सोडून दिला. त्यांच्या आयुष्यातलं ‘रजनीश पर्व’ संपलं.

हेही वाचा: पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

मुंबई सोडून नगरमधे वास्तव्य

पुढे नाथ वैराळांचा दुसरा विवाह स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर उमाप यांची मुलगी, कुसुमशी झाला. १९७२ नंतर त्यांनी मुंबई सोडली आणि नगरमधेच ते राहू लागले. नाथ वैराळ यांनी नगरच्या अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ केली. अशोक थोरे यांच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या ‘मातंगी’ आणि इतर काही पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांच्याच चित्रांनी सजली आहेत.

मेनका, रंभा, हेर, साहित्यलक्ष्मी या मासिकांच्या दिवाळी अंकांसाठी वैराळ यांनी काम केलं. नाथ वैराळ उत्तम चित्रकार तर होतेच, शिवाय ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत प्रभावी अशी व्यंगचित्रंही काढत. लिहितही छान. ‘धडपड’ नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि रजनीशांचं चित्र आहे. प्रस्तावना डॉ. सहस्रबुद्धे यांनी लिहिलीय.

नाथ वैराळ यांनी ‘ऊर्मी’ नावाचं पाक्षिक आणि व्यंगचित्रांना वाहिलेलं ‘व्यंग समाचार’ नावाचं साप्ताहिकही काढलं होतं. चौपाटी कारंजाजवळच्या अथर्व टॉवर्समधे त्यांचं कार्यालय होतं. त्यांचे चिरंजीव अविनाश वैराळ हे ‘नगर चौफेर’चे संपादक होते. मात्र, काहीजणांकडून फसवणूक झाल्यानं वैराळ कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला.

शिर्डीच्या साईबाबांची चित्रकथा

नाथ वैराळ अखेरच्या काळात शिर्डीच्या साईबाबांचं चित्रमय चरित्र तयार करत होते. त्याविषयी त्यांनी लिहून ठेवलंय, ‘मुलं आवडीनं चित्रं पाहतात. वाचण्यापेक्षा चित्रं पाहण्यात ते अधिक रमतात.’ श्रीसाईबाबांच्या कथा मुलांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशानं प्रचलित ३८ कथा निवडत नाथ वैराळ यांनी त्यांचं दोनशे चित्रांमधे रुपांतर केलं. ४० चित्रांचा एक भाग अशी पाच पुस्तकं प्रकाशित करण्याचा त्यांचा विचार होता. पण, तो अधुराच राहिला.

चित्रकार नाथ वैराळ यांच्या वाट्याला मोजकेच पुरस्कार आले. २००२मधे त्यांना महात्मा फुले फेलोशिप मिळाली. अण्णा भाऊंच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. पण पुरस्कार आणि प्रसिद्धीचा उपयोग रोजची भाकरी मिळवण्यासाठी होत नाही. ज्येष्ठ कलावंतांना शासन निवृत्तीवेतन देतं, पण तेही नाथ वैराळांच्या नशिबात नव्हतं. निवृत्तीवेतन मंजूर झालं, पण ते पत्र पोच करायला पोस्टमनला उशीर झाला.

ज्या दिवशी हे पत्र मिळालं, त्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबर २०१०ला नाथ वैराळ यांनी इहलोकीचा निरोप घेतला होता. कोल्हापूरच्या प्रा. डॉ. शरद गायकवाड यांच्या ‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ या पुस्तकाच्या रूपानं चित्रकार नाथ वैराळांची स्मृती जपली गेलीय. हे पुस्तक मागच्या वर्षी १ ऑगस्टला प्रकाशित झालं.

नाथ वैराळ यांनी तयार केलेली साईबाबांवरची चित्रकथा प्रकाशित करण्याची तयारी मध्यंतरी एका नेत्याने दाखवली होती, पण त्याला स्वतःचंच नाव त्यावर टाकायचं होतं. वैराळ कुटुंबानं त्याला नकार दिला. नगरचं कला आणि साहित्य वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मंडळींनी चित्रकार नाथ वैराळ यांची चित्रसंपदा जतन करायला हवी. त्यानिमित्तानं त्यांचं स्मरण पुढच्या पिढ्यांना होत राहील.

हेही वाचा: 

बरा झाला. नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?