आज पाकिस्तानचा `टांग उपर` डे

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


गिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.

First Published : 6 September 2018

भारताच्या ताब्यातून काश्मीर मिळवणं हा पाकिस्तानचा उघड अजेंडा आहे. हा निव्वळ अजेंडा नाही तर याचसाठी पाकिस्तानचा जन्म झाल्यासारखी त्या देशातील सरकार आणि सैन्याची वागणूक असते. या अजेंड्याच्या माध्यमातून पाक सरकार आणि सैनिक हे नागरिकांना वेगवेगळ्या इवेंटमधे अडकवत असतात. या इवेंटचाच एक भाग म्हणजे पाकिस्तान डिफेन्स डे.

बरं हा दिवस साजरा करण्याचं निमित्त काय तर १९६५चं युद्ध. ६ सप्टेंबर रोजी भारतानं युद्धबंदीचा करार मोडून आपल्या हद्दीत घुसल्याचा दावा पाकिस्तान करतं.  भारताच्या या कथित घुसखोरीचा आपल्या सैन्यानं सक्षमपणे सामना केल्याचाही त्यांना अभिमान आहे. १९९६ पर्यंत तर या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जायची. नवाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचं विकीपिडीयावर म्हटलंय.

दरवर्षी या दिवशी पाक राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान देशाला संबोधतात. रावळपिंडी इथल्या पाकिस्तानी आर्मी मुख्यालयाच्या ठिकाणी डिफेन्स डेचा मुख्य कार्यक्रम होतो. देशभरातल्या मशिदीत यादिवशी विशेष नमाज अदा केली जाते. सैन्य दलातर्फे कवायती करत आपल्या शस्रास्रांचं प्रदर्शन केलं जातं. देशाची राजधानी रावळपिंडीत यादिवशी ३१ तोफांची सलामी दिली जाते. तर प्रांतिक राजधानीत २१ तोफांची. जिल्ह्याच्या ठिकाणी या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रम घेतले जातात. 

खरं तर या युद्धाची सुरवात पाकिस्ताननेच केली होती. काश्मीरवर हक्क सांगण्यासाठी पाकिस्तान एकही संधी सोडत नव्हता. यातूनच १९६५च्या एप्रिलपासून पाक सैन्य भारताच्या हद्दीत घुसखोरी करू लागलं. यासाठी पाकिस्ताननं टायमिंगही नेमका साधला होता, असं युद्ध अभ्यासकांनी नोंदवून ठेवलंय.

१९६२ साली चीनशी झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. देश या युद्धातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच मे १९६४ मध्ये पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं. ‘नेहरूनंतर कोण’ हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न निकाली काढत काँग्रेस पक्षाने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून निवडलं. ९ जून १९६४ रोजी शास्त्रीजींनी देशाची सूत्रं हाती घेतली. भारत दुष्काळ आणि आर्थिक तंगीचा सामना करत असतानाच काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या कारवायांना वेग आला. पुन्हा युद्ध देशाला परवडणारं नाही, असं शास्त्रीजींचं मत होतं. दुसरीकडं ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ नावानं पाकिस्तान भारतात घुसखोरी करून ताकद जोखण्याचा प्रयत्न करत होता. 

२५ ऑगस्ट १९६५ ला पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यातील काश्मीरच्या हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या या ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ मोहिमेत किती पाकिस्तानी सैनिक सहभागी होते याबद्दल अजून एकवाक्यता नाही. जवळपास ५,००० ते ३०,००० पाक सैनिकांनी यात सहभाग घेतल्याची नोंद आहे. काश्मिरी नागरिकांना ‘मुक्त’ करण्यासाठी हे ऑपरेशन असल्याचा दावा पाकिस्तानी इंटलेक्च्युअल्स आजही करतात.  या घुसखोरीविषीय सरकार चुप्पी साधून होतं. ते त्याची जबाबदारीही घेत नव्हतं. पण यात पाकिस्तानी सैनिक मात्र यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसत होते, असं बीबीसीच्या बातमीत म्हटलंय.

मात्र पाकिस्तानचे नेते आणि निवृत्त अधिकारी आजही या युद्धाची जबाबदारी आजही भारतावरच टाकतात. तेव्हाचे पाकिस्तानी अध्यक्ष जनरल अयूब खान यांचे पुत्र आणि संरक्षण सल्लागार गौहर खान यांनी युद्धाला ६० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीत तोच आरोप केलाय. ते म्हणतात, ` पाकिस्तानी सैन्याचे सर्वोच्च कमांडर असलेल्या अयूब खान यांना युद्ध व्हावं असं वाटतं नव्हतं. भारतामुळं आम्हाला युद्धात पडावं लागलं. तरीही या युद्धात आम्ही निर्विवादपणे जिंकलो.`

या युद्धाला नेमकी सुरवात कशी झाली याविषयी बीबीसीनं म्हटलं, की ३ सप्टेंबरला शास्त्रीजींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून पाकवर हल्ला करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार, ७ सप्टेंबरला पहाटे चार वाजता हल्ला करण्याचे निश्चित झाले. मात्र, पश्चिम क्षेत्राचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरबख्श सिंह यांनी २४ तास अगोदर म्हणजेच ६ सप्टेंबरलाच पाकवर चाल करण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार, भारतीय लष्करानं चार बाजूंनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आणि काही वेळातच भसीन, दोगाईच आणि वाहग्रियानवर ताबा मिळला. भारतीय लष्कर पाकच्या हद्दीत घुसेपर्यंत पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही नव्हता.

या युद्धात भारताचे २७६३ जवान शहीद, तर ८४४४ जवान जखमी झाले होते.  २२० टँक आणि ३६ विमानांचे नुकसान झाले. १६०७ जवान बेपत्ता झाले होते. दुसरीकडं पाकिस्तानचे १२०० सैनिक मारले गेले, तर दोन हजार सैनिक जखमी झाले होते. १३२ टँक आणि १९ विमानांचे नुकसान झाले, असा दावा करत पाकिस्तानकडून या युद्धात आपलाच विजय झाल्याचा डांगोरा पिटला जातो.

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात भारताचे जवळपास ३,००० जवान शहीद झाले. दुसरीकडे पाकिस्तानचे ३,८०० सैनिक मारले गेले. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या १८४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताबा मिळविल्याचा दावा केला, तर पाकिस्ताननं भारताच्या ५४० वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ताब्याचा दावा केला.

२२ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मध्यस्तीनं दोन्ही देश युद्धबंदीसाठी राजी झाले आणि ताश्कंद करार होऊन युद्ध संपलं. यात दोन्ही देशांकडून विजयाचा दावा केला जात असला तरी वास्तवात मात्र हे युद्ध अनिर्णीत राहिल्याचं मानावं लागेल. 

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जेएन चौधरी यांना विचारलं, ‘युद्ध आणखी काही दिवस सुरू ठेवलं तर भारत जिंकेल?’ यावर लष्करप्रमुख चौधरींनी भारताचा सर्व महत्वाचा युद्धसाठा संपत आला असून रणगाड्यांचंही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. वास्तवात मात्र भारतानं केवळ १४ टक्के युद्धसामुग्रीचाच वापर केला होता, असे बीबीसीनं आपल्या बातमीत नमूद केलंय.

दुसरीकडं युद्धामुळं प्रचंड निराश झालेल्या जनरल अयूब खान यांनी मंत्रीमंडळ बैठकीत सांगितलं, ‘५० लाख काश्मिरींसाठी पाकिस्तान कधीच १० कोटी पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही.’
मग जिंकलं कोण? ब्रिगेडिअर निवृत्त चित्तरंजन सावंत यांनी  द क्विंटशी बोलताना सांगितलं, `कोण जिंकलं आणि कोण हरलं हे दोन निकषांवर ठरतंय. एक, चाल करणाऱ्यांचा उद्देश आणि दोन, त्यांना काय मिळालं? पाकिस्तानला काश्मीर हवं होतं. त्यांना ते मिळालं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दुसरीकडं भारतानं मात्र आपली जमीन पाकिस्तानपासून सुरक्षित ठेवली.`

पाकिस्तानातील सैनिकी घडामोडींचं वार्तांकन करणारे प्रसिद्ध पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी एका लेखात म्हटलंय, ‘डिफेन्स डे हा पाकिस्तानी सरकार आणि सैन्य दलाच्या प्रचारतंत्राचा भाग आहे. स्वतःचं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी डिफेन्स डे सारखे कार्यक्रम सरकार आणि सैन्य दलाला घ्यावे लागतात. देशाची प्रगतीसाठी पाकिस्तानी नागरिकांनी अशा भ्रामक प्रचारापासून दूर राहिलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य व्हायचे असतील तर अगोदर डिफेन्स डेमागील सत्य जाणून घ्यायला हवं.’  असं सांगणाऱ्या सिद्दीकींना पाकिस्तानने हद्दपार केलं नसतं तरच नवल. ते आता फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत आणि सेफन्यूजरूम्स या दक्षिण आशियातील पत्रकारांसाठी कार्यरत वेबसाईटचे संस्थापक आहेत.

१९४८ किंवा १९७१ सालचं बांगलादेश युद्ध सपाटून हरल्यामुळे पाकिस्तानकडे तोंड दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा आहे तो १९६५च्या युद्धाचाच. जागतिक दबावामुळे ताश्कंद करार करावा लागल्याने हे युद्ध अनिर्णित मानलं गेलं. त्यामुळे आज डिफेन्स डे करण्याची संधी पाकिस्तानला मिळालीय.

(पत्रकार)