कॉल सेंटरमधे काम करणारा मुस्लिम पोरगा स्कॉटलंडचा पंतप्रधान

०१ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


युरोपियन देश असलेल्या स्कॉटलंडच्या 'फस्ट मिनिस्टर'पदी पाकिस्तानी वंशाच्या हमजा युसूफ यांची निवड झालीय. फस्ट मिनिस्टर हा स्कॉटलंडचा सर्वोच्च नेता म्हणजेच आपल्याकडचा पंतप्रधान. मागच्या काही काळात जगभर दक्षिण आशियायी वंशाचं नेतृत्व सहजपणे स्वीकारलं जातंय. त्यादृष्टीनं उदारमतवादी विचारांच्या हमजा युसूफ यांची निवड आश्वासक म्हणायला हवी.

आशियायी देशांचं मूळ असलेल्या अनेक नेत्यांचा युरोपियन देशांमधे बोलबाला आहे. ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममधे इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड असे चार देश येतात. अगदी सहा महिन्यांपूर्वी यातल्या इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांनी शपथ घेतली होती. आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होतेय. कारण यातल्याच स्कॉटलंड देशाची धुरा पाकिस्तानी वंशाचे हमजा युसूफ यांच्याकडे आलीय.

चाळीशीतल्या हमजा यांनी २९ मार्चला स्कॉटलंडचे 'फस्ट मिनिस्टर' म्हणून शपथ घेतलीय. फस्ट मिनिस्टर हा सर्वोच्च नेता आणि सरकारचा प्रमुख असतो. त्यादृष्टीनं हमजा युसूफ यांना स्कॉटलंडचे पंतप्रधान म्हणता येईल. १५ फेब्रुवारीला निकोला स्टर्जन यांनी राजीनामा दिल्यानंतर स्कॉटलंडचा 'फस्ट मिनिस्टर' कोण होणार याबद्दलची उत्सुकता होती. हमजा युसूफ यांची प्रतिस्पर्धी असलेल्या कॅट फॉर्ब्स यांच्यात कडवी लढत झाली. पण यात हमजा यांनी बाजी मारलीय.

हेही वाचा: इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते? 

वर्णद्वेष आणि भेदभावाचा सामना

स्कॉटलंडमधलं सगळ्यात मोठं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लासगोमधे १९८५ला हमजा यांचा जन्म झाला. त्यांचे आजी-आजोबा मूळचे पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या पंजाब भागातल्या मियाँ चन्नू शहरात त्यांचं वास्तव्य होतं. हमजा यांचे वडील मुजफ्फर यांचा जन्म मियाँ चन्नू इथं झालाय. या भागात सुफी संत बाबा मियाँ चन्नू यांचं मोठं प्रभावक्षेत्र होतं. त्यामुळे या शहराला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. आजही त्या आठवणी युसूफ कुटुंबाशी जोडल्या गेल्यात.

१९६०च्या दशकात हमजा यांचे आजी-आजोबा कामानिमित्त स्कॉटलंडमधे स्थायिक झाले. पण सहिष्णू आणि समन्वयवादी भूमिका घेणाऱ्या सुफी परंपरेशी त्यांची नाळ कायम राहिली. हमजा यांची आई शाइस्ता या केनिया देशाच्या. त्याही दक्षिण आशियायी वंशाच्या. त्यामुळेच हमजा यांना बऱ्याचवेळा स्कॉटलंडमधे वर्णद्वेष आणि भेदभावाचा सामना करावा लागलाय.

त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं ते ग्लासगोतल्या 'हचेसन्स ग्रामर स्कुल'मधे. ग्लासगो युनिवर्सिटीमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पुढचं शिक्षण घेतलं. ते घेत असतानाच समोर रोजीरोटीचा प्रश्न होताच. त्यामुळे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना काळी एका कॉल सेंटरमधे कामही करावं लागलं होतं. पण लवकरच त्यांनी शिक्षणाला साजेसं असं काम शोधायचा निर्णय घेतला. आणि लागलीच तसं काम मिळालंही.

विशीत राजकारणात एण्ट्री

स्कॉटिश नॅशनल पार्टी हा स्कॉटलंडमधला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. १९३४ला स्थापन झालेल्या या पक्षानं ब्रिटनच्या छायेतून स्कॉटलंडनं वेगळं व्हावं ही मागणी सातत्यानं लावून धरलीय. याच पक्षाचे नेते आणि पहिले मुस्लिम संसद सदस्य बशीर अहमद यांचे संसदीय सहायक म्हणून काम करायची संधी त्यांना मिळाली. माजी फस्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन, खासदार एलेक्स सॅलमंड, ऐनी मॅकॉलॉघलिन यांच्यासोबतही त्यांनी अशाच प्रकारचं काम केलं.

स्कॉटिश नॅशनल पार्टी आणि संसदेचं कामही जवळून पहायची संधी त्यांना मिळाली. त्याचवेळी त्यांनी पक्षात काम करायला सुरवात केली. अशातच २०११ला वयाच्या अगदी विशीत हमजा संसदेचे सगळ्यात तरूण सदस्य बनले. तेव्हा ऍलेक्स सॅलमंड स्कॉटलंडचे फस्ट मिनिस्टर होते. वर्षभरातच सॅलमंडनी हमजा यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकास मंत्रीपदाची जबाबदारी दिली. ही त्यांच्यासाठी मोठी संधी होती. अशाप्रकारे मंत्रीपदी नियुक्ती झालेले ते पहिले दक्षिण आशियायी वंशाचे होते.

२०१६लाही ते स्कॉटलंडच्या संसदेत निवडून आले. त्यावेळी निकोला स्टर्जन या स्कॉटलंडच्या फस्ट मिनिस्टर होत्या. प्रभावी नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. या काळात हमजा त्यांच्या मर्जीतले बनले. त्यांच्याकडे न्याय सचिव, कोरोनाच्या काळात परिवहन, आरोग्यमंत्री अशी महत्वाची जबाबदारी आली. ती अगदी प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी पक्षात एक वेगळी छाप पाडली. स्वत:ला सिद्ध केलं.

हेही वाचा: शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण

हमजा युसूफ यांची जमेची बाजू

२०१६ ते २०२३ अशी ८ वर्ष निकोला स्टर्जन स्कॉटलंडच्या फस्ट मिनिस्टर राहिल्या. १५ फेब्रुवारी २०२३ला त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हमजा युसूफ यांच्याकडे मोठी संधी चालून आली. प्रतिस्पर्धी असलेल्या कॅट फॉर्ब्स यांना त्यांनी कडवी टक्कर देत त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. स्कॉटलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला एक मुस्लिम आणि दक्षिण आशियायी वंशाचा 'फस्ट मिनिस्टर' मिळाला.

स्कॉटलंडच्या स्वायत्ततेचा मुद्दा कायमच राजकारणाच्या अग्रभागी राहिलाय. ब्रिटनपासून पूर्णपणे विभक्त व्हायची मागणी कायमच करण्यात आलीय. २०१४ला त्यासाठी सार्वमतही घेण्यात आलं होतं. मुख्य म्हणजे स्कॉटिश नॅशनल पार्टी ही स्वायत्ततेच्या बाजूने उभी राहिलीय. त्यादृष्टीनं हमजा युसूफ किती प्रयत्न करतायत ते पहायला हवं. जेंडर आणि स्थलांतरितांच्या मुद्यावर ते फारच उदारमतवादी असल्याचं दिसतं. त्यांनी समलैंगिक विवाहाचं समर्थनं केलंय. वेळोवेळी त्या बाजूनं भूमिका घेतलीय.

हमजा हे निकोला स्टर्जन यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. या ओळखीच्या पलीकडे जात ते स्वतंत्रपणे किती प्रभाव पाडतायत आणि पक्षांतर्गतही आपली पकड किती घट्ट करतायत हेही पाहणं फार इंटरेस्टिंग असेल. पक्षांतर्गत स्पर्धेतही त्यांचा कितपत टिकाव लागतोय हे येणाऱ्या काळात कळेल. मध्यंतरी स्कॉटलंडमधे एक सर्वे घेण्यात आला होता. त्यात स्कॉटिश सरकार शिक्षण, आरोग्य यात मागे पडत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे लोक नाराज होते. ही गोष्टही हमजा यांना लक्षात ठेवावी लागेल.

भेदभावाच्या पलिकडे नेतृत्वाचा स्विकार

१९५०-१९६०च्या दशकात ब्रिटनमधे मोठ्या प्रमाणात जगभरातून स्थलांतर झाल्याची महत्वाची नोंद 'युनिवर्सिटी ऑफ ग्लासगो'मधे शिकणाऱ्या परवीन अख्तर यांनी नवभारत टाइम्सवरच्या एका लेखात केलीय. हे स्थलांतर प्रामुख्याने ब्रिटनच्या पूर्वीच्या वसाहती भारत, पाकिस्तान तसंच पूर्व आफ्रिका आणि कॅरेबियन देशांतून मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतं. ब्रिटनमधले उद्योगधंदे, कारखाने, गिरण्या असतील इथं ही स्थलांतरित लोक काम करायला लागले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हे सगळं आपलंसं केलं. तशीच इथली राजकीय संस्कृतीही.

सध्या दक्षिण आशियायी वंशाचे नेते युरोपियन देशांचं नेतृत्व करताना दिसतायत. यात इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सूनक, आयर्लंडचं पंतप्रधान लिओ वराडकर आणि आता हमजा युसूफ. हमजा यांनी स्कॉटिश संसदेत दुसऱ्यांदा निवडून आल्यावर उर्दूमधे शपथ घेत आपली मुळं आपल्या मातीशी किती घट्ट आहेत हे दाखवून दिलं होतं. स्कॉटिश लेबर पार्टीचे नेते अनस सरवर हेसुद्धा मूळ पाकिस्तानी वंशाचे आहेत. त्यांनाही अगदी सहजपणे स्कॉटलंडनं राजकीय नेता म्हणून स्वीकारलंय.

स्कॉटलंडचा 'फस्ट मिनिस्टर' झाल्यावर हमजा युसूफ यांची आई शाइस्ता जे बोलल्यात ते फार महत्वाचं आहे. 'ज्या देशावर आपण अतोनात प्रेम करतो त्याचं नेतृत्व करण्यासाठी कोणताही धर्म किंवा रंग आडवा येता नये.' असं त्या म्हणाल्या. त्यांचा हा संदेश जगभर पोचायला हवा. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कलमा हॅरिस असतील की लंडनचे महापौर सादिक खान ते अगदी ऋषी सूनक, हमजा युसूफ सगळे भेदाभेद मोडीत काढत जगभर असं नेतृत्व स्वीकारलं जाणं हे नक्कीच आश्वासक आहे.

हेही वाचा: 

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज