'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. जाणिवेच्या पल्याड नेणाऱ्या 'परिजाद'विषयी ऋषिकेश तेलंगे यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
'कितना मरहूम हूं मैं
कितना मयस्सर हैं मुझे
जर्रा सहेरा हैं मुझे
कतरा समंदर हैं मुझे'
असे अनेक शेर 'परिजाद'मधे ऐकायला मिळतात. त्याचं साहित्यिक आणि कलामूल्य अतिशय उच्च आहे. प्रेम आयुष्याचा एक लहानसा भाग असला तरी आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देण्याइतपत त्याचा जीवनावर प्रभाव पडतो. त्यातून जे अनुभव येतात त्यावर माणसाची जडणघडण, वाटचाल अवलंबून असते. जितक्या जखमा अधिक तितका माणूस अधिकाधिक कणखर बनतो.
'हम टीवी' या पाकिस्तानी चॅनलची कवी, लेखक, कादंबरीकार हाशिम नदीम यांच्या याच नावाने असणाऱ्या कादंबरीवर आधारलेली मालिका 'परिजाद' ही अतिशय वेगळ्या आशय विषयाची दर्जेदार मालिका आहे. ती फक्त मनोरंजनच करत नाही तर तांत्रिक आशयाच्या बाबतीतही उजवी ठरते.
कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, अॅक्शन हे सगळं एकाचवेळी यात बघायला मिळतं. भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी मालिका चवीने पाहिल्या जातात. फक्त भारतातच नाही तर जगभरात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. अलीकडे ही मालिका प्रत्येकाच्या ओठावर आहे ते याच्या जबरदस्त कंटेंटमुळेच.
पाकिस्तानी मालिका उत्कृष्ट असल्या तरी काही अंशी साचेबंद असतात. जास्त इनडोअर शूटिंग, लो बजेट, वीएफएक्सचा वापर, पार्श्वसंगीत आणि कॅमेरा अँगल्सचा मर्यादित वापर पाकिस्तानी मालिकांमधे दिसून येतो. पण या मालिकेत असं काहीही जाणवत नाही. त्यामुळे वेबसिरीजच्या बरोबरीची ही मालिका झालीय.
या मालिकेत कथा कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. प्रत्येक एपिसोडमधे वेगळाच ट्विस्ट, नव्या वैशिष्ट्यपूर्ण पात्राचा प्रवेश, मोक्याच्या वेळी संपणारे एपिसोड, वेगवान कथा, हाशिम नदीम तसंच मुनीर नियाजींसारख्या उत्तमोत्तम पाकिस्तानी शायरांच्या गजला, गाणी, शेर हे सगळंच यात बघायला मिळतं.
ही मालिका बघताना उर्दू भाषेविषयी प्रेमही आपल्या मनात निर्माण होतं. पाकिस्तानी लोक आपल्या संस्कृतीशी, धर्माशी घट्टपणे जोडले गेलेत हे या मालिकेतून जाणवतं. एका सीनमधे भिंतीवर शाहिद आफ्रिदीचा फोटो दिसतो तर एका सीनमधे परिजादच्या हातात उर्दू शायर जौन एलियाचं पुस्तक दिसतं.त्यातून पाकिस्तानी लोकांचं क्रिकेट आणि साहित्यावर असलेलं प्रेम, जिव्हाळा दिसून येतो.
मालिकेत पियानोच्या पार्श्वसंगीतावर नायकाच्या तोंडून ऐकू येणारी शायरी, काही प्रसंगात केलेला स्लो मोशनचा सुंदर वापर हे खूपच अप्रतिम आणि वेगळं आहे जे पूर्वी जास्त कोणत्या टीवी मालिकेत तितकं पाहिलं नाही.
हेही वाचा : देशद्रोहाच्या कलमाला किंग ऑफ आयपीसी असं का म्हणतात?
मालिकेत लैंगिक समानता, गुन्हेगारी, प्रेमकथा, संघर्ष, साहित्य, कला, शिक्षण असे अनेक पैलू असणारे विषय, मुद्दे एकाचवेळी कथेतून पुढे येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय! युम्ना जै़दी, माशल खान, सबूर अली या सुंदर आणि पात्राला न्याय देणाऱ्या नायिकाही मालिकेत छानपैकी वावरताना दिसतात. वायोलिनची धून असणारं पार्श्वसंगीत पण अप्रतिम, मनाला भावणारं आहे.
अहमद अली अकबरने सुरवातीला शायर आणि नंतर बिझनेसमन झालेल्या परिजादची भूमिका अतिशय ताकदीने साकारलीय. त्याची देहबोली, भावमुद्रा यामधून त्याच्या अभिनयातले बारकावे आपल्याला बघायला मिळतात जे अतिशय सुखद आहे. परिजादपासून पी. झेड. मीर बनण्यापर्यंतचा पात्राचा तो प्रवास, ते रूपांतर त्यानं खूप सुरेखपणे दाखवलंय.
अहमद अली अकबर प्रत्यक्षात गोरा दिसतो पण परिजादचं पात्र रंगाने काळं सावळं असल्यानं त्याचा तसा मेकअप केलाय, पण त्यातही त्याचा अभिनय खुलून दिसतो. मालिकेत 'सिगरेट पीते हो? क्या जीते हो?' असे वनलाईनरही भाव खाऊन जातात. ज्यामुळे ही मालिका आपल्याला बिंज वॉच करायला भाग पाडते.
परिजाद हा शब्द डिक्शनरीत भेटणार नाही पण लेखक मुलाखतीत म्हणतो की या शब्दाचा अर्थ आहे की परीपासून जन्मलेला मुलगा. कादंबरीत एका गरीब महिलेला दिसायला काळा मुलगा जन्मतो आणि ती टोमणा मारत त्याला परिजाद म्हणते. मालिकेत मात्र ती आनंदाने त्याचं नाव परिजाद ठेवते.
परिजाद अतिशय साधाभोळा, रंगाने काळा आणि सज्जन मुलगा असतो. आपल्या रंगामुळे आणि गरिबीमुळे त्याच्या मनात एक कायम न्यूनगंड असतो. तसंच जागोजागी त्याला आपल्याला मिळणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीची प्रचितीही येते. हा परिजाद प्रेमात अनेक धोके खातो. आयुष्यात काही चांगले योग जुळून येत असले की कुठंतरी त्याचं नशीब मार खातं आणि हा 'जैसे थे' च्या पूर्वपदावर येऊन पोचतो.
आईवडलांचं छत्र हरवलेला आणि भावंडांच्या द्वेष, मत्सरपूर्ण वागणुकीचा बळी ठरलेला परिजाद आयुष्याशी झगडत असतो आणि समाजाच्या भाषेतलं तथाकथित 'यश' मिळवतो पण हे यश मिळाल्यावर त्याचं आयुष्य सोपं होतं का? त्याच्या सगळ्या समस्या संपतात का? त्याचा शोध संपतो का? आयुष्याकडून त्याच्या ज्या आशा-अपेक्षा, इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात का हे जाणून घेण्यासाठी मालिका जरूर बघावी.
हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
पाकिस्तानसारख्या देशातून येऊनही साधारण मालिकांमधे टॅबू मानले जाणारे बरेच विषय या मालिकेत मांडलेत. मुख्य म्हणजे यातल्या पाकिस्तानी कलाकारांचा अभिनय पाहिल्यावर अभिनय कशाशी खातात याची तिळमात्रही जाणीव नसणाऱ्या आपल्या ढामढूम ढामढूम करत संपणाऱ्या हिंदी, मराठी मालिकेतल्या अभिनेत्यांची कीव येते. पाकिस्तानी लोकांना बजेट पुरवलं आणि तिथले नियम जर आपल्याइतके सैल झाले तर हे लोक कंटेंटमध्ये सर्वांना काट्याची टक्कर देतील. तशी आताही उपलब्ध साधनांमधे ते टक्कर देतच आहेत.
फवाद खानसारखे काही अभिनेते अभिनेत्रीही पाकिस्तानी मालिकेतूनच बॉलिवूडमधे स्थिरावलेत. पण इथून पुढं सीमेवर घडलेल्या काही मागच्या प्रकरणानंतर हे थांबलं. त्यामुळे यापुढे तिथल्या अहमद अली अकबरसारख्या किती प्रतिभावंत कलाकारांना इथं संधी मिळेल याची शाश्वती नाही.
अलीकडेच बॉलिवूडमधल्या खान मंडळींनी या मालिकेचं कौतुक केलंय. सोशल मिडियामुळे ही मालिका मोठ्या प्रमाणात पसरली, पसरवली गेली. बरेच मीम, कॉमेडी वीडियोही वायरल झाले. पाकिस्तानमधे काही कट्टरवादी प्रेक्षकांनी, संघटनांनी यावर टीकाही केली. याविषयीचे काही निगेटिव रिव्यू तुम्हाला वाचायला मिळतील ज्यात परिजादचं पात्र कसं फालतू, अयशस्वी, दोषपूर्ण आहे हे दाखवून देण्याचा अतार्किक प्रयत्न केलाय.
भारतातही अनेक उर्दू शायर झालेत, अजूनही आहेत. त्यामुळे इथल्या अनेक साहित्य रसिकांचं उर्दू भाषेवर, त्यातल्या पद्य साहित्यावर प्रचंड प्रेम आहे. आजकाल इन्स्टाग्रामवर शेरोशायरींचे शॉर्ट वीडियोही खूप वायरल होत असतात जे लोकांना प्रचंड भावून जातात. ते जास्तीत जास्त शेअर केले जातात. ही मालिका लोकांना आवडली त्यामागे हेही एक कारण असावं!
परिजादचं पात्र, कथा, संवाद अतिशय उत्कृष्ट आहे. पाकिस्तानी अभिनेता, गायक, मॉडेल अहमद अली अकबरचा नैसर्गिक अभिनय काळजाचा ठाव घेतो. बरेच प्रसंग इतके ओरिजनल झालेत की बघताना डोळ्यात कधी पाणी येतं किंवा ऊर दाटून येतो ते समजतच नाही. आपण एक टीवी मालिका बघत आहोत या जाणिवेच्या पल्याड ही मालिका तुम्हाला नेऊन सोडते जे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे.
प्रत्यक्ष कादंबरीत कथेचा शेवट परिजादच्या मृत्यूने होतो पण इथं मात्र एका सुंदर नोटवर मालिका संपते. या मालिकेची कथा इथंच संपलीय त्यामुळे पुढचा सिझन येणार नाही. मालिकेचे प्रत्येकी ३७ ते ४० मिनिटाचे एकूण २९ एपिसोड असून ते 'हम टीवी' या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तिथं तुम्ही बघू शकता. परिजादच्या तोंडी सुप्रसिद्ध उर्दू पाकिस्तानी शायर मुनीर नियाजींची शायरी येते.
हमेशा देर कर देता हूं मैं।
कोई जरूरी बात कहनी हो,
कोई वादा निभाना हो,
उसे आवाज देनी हो,
उसे वापस बुलाना हो,
हमेशा देर कर देता हूं मैं।
हेही वाचा :
भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?
‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?