सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. प्रशासनही कामाला लागलंय. एनडीआरएफची तुकडीही दाखल झालीय. त्यामुळे पालघरच्या भूकंपाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण पालघरला भूकंप काही नवा नाही. त्याला मोठा इतिहास आहे.
भूकंप? तोसुद्धा पालघरला? एक-दोन नाही, तर भूकंपांची साखळीच. कोणी सांगेल, पूर्वी कधी झाला नाही, मग आताच कसा? कोणी काय म्हणतो ते म्हणू द्या, पण पालघरला भूकंपाचा जुना इतिहास आहे. माणसाच्या जन्माच्याही आधीचा, अगदी कोट्यवधी वर्षांपूर्वीचा.
सध्या तिथं भूकंप होतच असल्याने अस्वस्थता आहे आणि अनिश्चिततासुद्धा. रिश्टर स्केलवर ३ ते ४ एवढ्या क्षमतेचे अनेक धक्के. तीव्रता कमी असली तरी त्यांची संख्या जास्त आहे. पालघरमधे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात एनडीआरएफ दाखल झालं आणि गांभीर्य आणखीच वाढलं. प्रशासन म्हणतंय, ‘घाबरू नका’. पण तेवढ्याने लोकांच्या मनातली भीती दूर होणार नाही.
भूकंपाबाबत वस्तुनिष्ठ माहिती, पुढील शक्यता सांगाव्या लागतील. अन्यथा अस्वस्थता कायम राहील. टांगत्या तलवारीसारखी. आपल्याकडं या विषयाचे उत्तम अभ्यासक आहेत, पालघर भागात काम केलेले तज्ज्ञसुद्धा. पुण्यातले भूशास्त्रज्ञ डॉ. व्ही. व्ही. पेशवा, डॉ. विवेक काळे हे त्यापैकीच. त्यांचा अभ्यास तसंच, भूकंपशास्त्राची माहिती योग्य त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘भवताल’चा हा पुढाकार.
भूकंप उगाचच कुठंही होत नाहीत. त्यासाठी कमकुवत क्षेत्रं असावं लागतं. या जागांमधून पृथ्वीच्या पोटातली ऊर्जा बाहेर पडते आणि भूकंप होतात. यापैकी प्रमुख जागा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेले प्रचंड मोठाले भूखंड. किती मोठे?
एक उदाहरण म्हणजे, संपूर्ण पॅसेफिक महासागर हाच एक भूखंड आहे. हे भूखंड हळूहळू हलत असतात, फिरत असतात. त्यामुळे ऊर्जा बाहेर पडते. ती मुख्यत: या भूखंडांच्या कडांवर बाहेर पडते. तिथंच सर्वाधिक तीव्रतेचे भूकंप होतात. हिमालयातले भूकंप हे त्याचं उत्तम उदाहरण.
ते हिमालयात नाही किंवा भूखंडांच्या कडांवरही नाही. दुसऱ्या प्रकारचे भूकंप होतात ते भूखंडांच्या अंतर्गत भागात. तिथंही कमकुवत क्षेत्रं असतात. ती भूकंप होण्याला कारणीभूत ठरतात. हिमालयासारख्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या उर्जेपैकी काही ऊर्जा या अंतर्गत कमकुवत क्षेत्रात हालचाल घडवून आणू शकते. पण असं आतमधे तुलनेनं कमी क्षमतेचे भूकंप होतात.
महाराष्ट्रात होणारे सर्वच भूकंप या प्रकारात मोडतात. मग तो किल्लारीचा भूकंप असो, नाहीतर कोयना, पालघर, डहाणू, बोटा की खर्डीचा! ही सर्व ठिकाणं जमिनीत असलेल्या कमकुवत क्षेत्रावर वसली आहेत. पालघरसुद्धा. आता पालघरला भूकंप कसा? या प्रश्नाचं उत्तर वेगळं द्यायला नको.
आणखी एक माहिती म्हणजे, महाराष्ट्रातून जाणारं मोठं भूकंपप्रवण क्षेत्र शोधण्यात आलंय. अर्थातच ते अंतर्गत असल्याने कमी क्षमतेचे भूकंप घडवून आणतं. ते कोकणात डहाणूच्या जवळपास सुरू होतं. पुढे विक्रमगड, खर्डी, बोटा, किल्लारी ते तेलंगणात तंदूर आणि आंध्र प्रदेशापर्यंत पसरलंय. त्याची लांबी आहे, तब्बल १५०० किलोमीटर आणि रुंदी सुमारे ५० किलोमीटर.
डॉ. पेशवा, त्यांचे सहकारी डॉ. विवेक काळे यांनीच ते शोधलंय. त्याला नाव दिलंय, कुर्डुवाडी क्षेत्र. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे. या क्षेत्रात कमी तीव्रतेचे भूकंप होतात. त्यांची हिमालय किंवा त्यासारख्या भूकंपांशी तुलनाच होऊ शकत नाही.
महाराष्ट्रात असलेल्या कमकुवत क्षेत्रांबाबत आणखी एक उत्तम पुरावा म्हणजे इथून वाहणाऱ्या नद्या. आपल्या खडकाचा, पावसाचा विचार करता इथे नद्यांची रचना, पानांवर असलेल्या शिरांच्या आकाराची हवी. प्रत्यक्षात मात्र अनेक नद्या सरळ रेषेत वाहताना दिसतात. याचाच अर्थ त्या कमकुवत क्षेत्र धरून वाहतात.
कमकुवत क्षेत्र म्हणजे तिथं भूकंपाची शक्यता आलीच. सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडं बरंचसं क्षेत्र भूकंपप्रवण आहे. मोठ्या भूकंपाचं नसलं तरी छोट्या भूकंपासाठी नक्कीच.
पालघरच्या परिसरात पूर्वापार भूकंप होत आलेत आणि त्याचे पुरावेसुद्धा आहेत. काही पुरावे नद्यांच्या पात्रातल्या वाळूत दिसतात, तर काही तिथल्या खडकांमधे. खडकांची अचानक बदललेली रचना, वाळूचे खाली वर झालेले थर हे त्याचे पुरावे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं. संगमनेर ते नाशिक दरम्यानचा चंदनापुरी घाट हे तर त्याचं उत्तम उदाहरण.
पालघरजवळ डहाणूच्या पट्ट्यात काही ठिकाणी खडकांचा भुगा झालेला पाहायला मिळतो. अपर वैतरणा धरणाच्या फुगवट्याच्या टोकाजवळ खडक १०-१२ फूट खाली वर झालेले दिसतात. हे तिथे पूर्वी झालेल्या हालचालींचे पुरावेच. जमिनीची-खडकाची हालचाल म्हणजे भूकंप होणारच. हा भूकंपाचा इतिहास तब्बल चार कोटी म्हणजेच ४० मिलियन वर्षांपर्यंत मागं जातो.
कुर्डुवाडी क्षेत्राबद्दल बोलायचं तर काही हालचाली त्याहून कितीतरी मागं जातात. अगदी २०० कोटी वर्षांपर्यंतसुद्धा. अगदी अलीकडचं सांगायचं तर डहाणू इसवी सन १८५६, कोयना १९६७, भातसा-खर्डी १९८४, बोटा १९९०, किल्लारी १९९३, विक्रमगड १९९५, सूर्या-मेढी १९९६ इथे भूकंप अनुभवला मिळालेत.
कोयना इथे ६.५ रिश्टर आणि किल्लारीतला ६.२ रिश्टरचा हानीकारण भूकंप वगळता इतर धक्के अगदीच कमी तीव्रतेचे होते. कोयना परिसरात त्यानंतर अनेकदा ४ रिश्टरचे भूकंप झालेत. त्याचे धक्के अजूनही अधूनमधून बसतात. पण या छोट्या धक्क्यांमुळे हानी झालेली नाही.
कोयना, खर्डी, मेढी या भूकंपांचा विषय निघतो तेव्हा प्रश्न विचारला जातो, यांचा धरणांशी संबंध आहे का? कोयना धरण आहे. खर्डीजवळ भातसा धरण आहे आणि मेढीजवळ सूर्या जलाशय. पण याबाबत पुरेसा अभ्यास झालाय. आपल्याकडेही १९८५ मधे यावर सविस्तर अभ्यास झाला आणि पुढेसुद्धा. त्यामधे असा कोणताही संबंध पाहायला मिळालेला नाही.
वेगळा विचार म्हणून काही लोक अजूनही ही शक्यता मांडतात. पण भूशास्त्र आणि भूकंपशास्त्राच्या निकषांवर त्यात तथ्य आढळून आलेलं नाही. त्यामुळे हा विषय गॉसिपिंग किंवा चर्चाचर्वण म्हणून ठीक आहे. आधार विचाराल तर तो अजून सापडलेला नाही!
एखादं ठिकाण कमकुवत क्षेत्रावर असेल आणि त्याला भूकंपाचा इतिहास असेल, तर तिथे कधीही भूकंप होऊ शकतात. काही काळाच्या विश्रांतीनंतर ते ठिकाण पुन्हा सक्रीय होऊ शकतं. तेच पालघरच्या बाबतीत झालं, असं म्हणता येईल.
याचं उत्तर ठामपणे कुणालाही देता येणार नाही. देता येतही नाही. पण एक निश्चित, आताचे लहान लहान धक्के फायदेशीर आहेत. कारण त्यांच्यामुळं जमिनीत निर्माण झालेली ऊर्जा हळूहळू बाहेर पडतेय. कुकरच्या शिट्टीप्रमाणे. आता कुकर फुटण्याचा धोका नाही हे नक्की. त्यामुळे सर्वच भूकंपतज्ज्ञ सांगतात, पालघरला फार मोठ्या किंवा हानीकारक भूकंपाची शक्यता खूपच कमी आहे.
भूकंपविज्ञानाचा आधार घेता त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण म्हणून सावधगिरी बाळगायला नको असं नाही. अर्थात लोकही सावध राहणारच. कारण माणसाने निसर्गातल्या सर्वच अनिश्चिततांवर अजून तरी विजय मिळवलेला नाही!
विशेष आभारः डॉ. वी. वी. पेशवा, पुणे
साभारः भवताल पेज. पाणी-पर्यावरणाच्या मुद्द्यांबाबत सखोल माहितीसाठी, विविध उपक्रमांसाठी: भवताल फेसबुक पेज / @bhavatal
(लेखक हे भवताल या नियतकालिकाचे संपादक आहेत.)