गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरचा ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा सिनेमा सोशल मीडियावर बराच प्रसिद्ध होतोय. स्त्री-पुरुष नात्याबाबत १९८६ च्या ‘पंचवटी’त आणि २००२ च्या ‘लिला’ मधे बाईचं जसं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेझॉन प्राईमवरच्या ‘द ग्रेट इंडियन किचन’ या सिनेमाची चांगली चलती आहे. सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेंड तयार झालाय. सिनेमाची गोष्ट एकदम साधी आहे. ही गोष्ट आपण पहिल्यांदा पाहतोय का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. मग हा सिनेमा पॉप्युलर होण्यामागे एवढं काय कारण? तर त्याचं उत्तर आहे ‘सोशल मीडिया’.
चेन रिएक्शन आणि पीयर प्रेशरमुळं ‘द ग्रेट इंडियन किचन’ला ‘अच्छे दिन’ आले. फेमिनिझमच्या नावाखाली हा सिनेमा खपवला जातोय. हा विचार फार वरवरचा आहे. आपण पितृसत्ताक समाजात राहतो आणि त्यातून घडणारी ही गोष्ट तशी फार काही नवीन नाही.
सिनेमा पाहिल्यावर काही पुरुष बदलले तर बरंच होईल. नाही तर ‘कहानी घर घर की’ पध्दतीनं घडलं तर काही दिवसांनंतर आपण सर्वच हे विसरून जाऊ. कारण सोशल मीडियाचा ट्रेंड रोजच बदलता राहतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
‘द ग्रेट इंडियन किचन’चा विचार करताना तो फक्त नवरा आणि बायकोचा विचार न करता संपूर्ण भारतीय समाजाचा व्हायला हवा. अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व्हायला हवा. आपण जेव्हा ‘द ग्रेट इंडियन किचन’बद्दल लिहतो, बोलतो तेव्हा गेल्यावर्षी सर्वाधिक गाजलेल्या ‘लैला और सत्त गीत’ या काश्मिरी सिनेमाचाही तेवढाच विचार व्हायला हवा.
हाही सिनेमा भारताच घडतोय आणि याच्यातली बायको म्हणजे ‘लैला’ ही तशीच आहे जशी या ‘किचन’मधली. किंबहुना लैला जास्त प्रभावी आहे. काश्मिर खोऱ्यातल्या महिलांची ही घुसमट आपल्याला पडद्यावर कधीतरीच दिसते. कारण इथले सिनेमे ओटीटी किंवा सिनेमागृहात क्विचितच दिसतात. सध्या मल्याळम भाषेतल्या सिनेमा पाहण्याचा ट्रेंड आहे. सोशल मीडियाच्या चेन रिएक्शनमुळं तो वायरल होतोय.
हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
तर ‘लैला और सत्त गीत’मधे काश्मिरमधल्या लैलाची गोष्ट आहे. संपूर्ण सिनेमाभर तिचा स्वत:चा शोध आहे. पुरषी अहंकारही आहे आणि स्त्रियांचं होणारं नेहमीचं दमनही आहे. अश्या परिस्थितीत लैला आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय. ती गोंधळलीय. पण तिला कात टाकायचीय. तिला पिंजऱ्यातून बाहेर पडायचंय. तिनं तिचा मार्ग ही शोधला.
एक तर निकाह करताना तिचं ‘कबुल है’ येण्यापुर्वीच काझी शादी डिक्लेअर करतो. मग संपुर्ण सिनेमाभर ती स्वत: ला या नवीन नात्यासाठी तयार करतेय. गुलजारचं ‘दिलसे मधलं सतरंगी रे’ हे गाणं आहे. तसंच दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंग यानं लैलाची गोष्ट सात काश्मिरी लोकगीतांमधे सांगितलीय. काश्मिरचं बॅकडॉप असल्यानं लैलाचा प्रवास देवदार वृक्षांच्या दाटीवाटीतून विस्तीर्ण डोंगररांगांपर्यंत झालाय.
‘द ग्रेट इंडियन किचन’ आणि ‘लैला और सत्त गीत’मधे एक समानता ती म्हणजे बेडमधलं पती-पत्नीचं नातं. तिला काय हवंय आणि तो काय करतोय हा समान धागा दोन्ही सिनेमात सापडतो.
दोन्ही सिनेमातल्या बेडसीनमधली समानता ही प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबातली गोष्ट सांगते. याचा जास्त विचार व्हायला हवा. तिथं पुरुष हा फक्त त्या शरीरावर हक्क जागवणाराय. तिला काय हवंय हे त्याच्या ध्यानीमनी नाही. तिच्या विरोधाचीही त्याला तमा नाहीच.
पुरुषाने हक्क गाजवण्याची ही प्रक्रिया फार जुनी आहे. अगदी अनादीकाळापासूनची. बासु भट्टाचार्य यांच्या ‘पंचवटी’ सिनेमातली दीप्ति नवलनं साकारलेली साध्वी आणि या दोघी सिनेमातली मध्यवर्ती स्त्री पात्रं यांचा पोत सेम आहे. ‘पंचवटी’त साध्वीचा पतीही त्याला हवा तेव्हा आणि कुठेही सेक्स करतोय. तिचा एक प्रश्न आहे जी ती तिच्या मैत्रिणीला विचारते, ‘कोई कभी भी खाना खा सकता है क्या?’ यातुनचं समान वेवलेन्थ असलेल्या दिरासोबत तिचे संबंध येतात.
इथं सोमनाथ सेन यांच्या २००२ च्या ‘लिला’ या सिनेमाचा उल्लेख करावासा वाटतो. त्यातल्या लिलाचं पात्र जास्त खमकं आहे. ती या दोघींपेक्षा जास्त शिकलीय. भारतातून अमेरिकेत पोचलीय. पण तरीही लिला नात्याच्या प्रिजन ऑफ स्पींगमधे अडकलेय.
नौशाद म्हणजे लिलाचा लीव इन पार्टनर अर्थात विनोद खन्ना आणि क्रिश म्हणजे लिलावर प्रेम करणारा तिचा विद्यार्थी अर्थात अमोल म्हात्रे या दोघांना तिच्यावर हक्क गाजवायचा आहे. ज्याला ती नकार देते. लिलाची ही स्ट्रॉंग भूमिका डिंपल कापाडियानं केलीय.
हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
स्त्री-पुरुष नात्याबाबत ‘लिला’ आणि ‘पंचवटी’मधे बाईचं प्रोजेक्शन करण्यात आलंय, त्यालाच ‘लैला’ आणि ‘किचन’मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.
‘द ग्रेट इंडियन किचन’ व्यतिरिक्त बाकी तिन्ही सिनेमात 'तिला' आवडलेल्या इतर पुरुषाशी शरीर संबंधाच्या घटना आहेत. दिरापासून गर्भार राहिलेली ‘पंचवटी’तली साध्वी तिच्या नवऱ्याला माझ्या पोटात वाढणारं मुल तुझं नाही हे ठणकावून सांगते. एका रात्री क्रिशसोबत सेक्स केलेली लिला त्याला माझ्यावर हक्क सांगू नकोस, असं सांगते.
तर ‘लैला और सत गीत’मधली लैला कात टाकतेय नव्याच्या आयुष्याच्या शोधात निघालेय. देवदारच्या खोऱ्यातून विस्तीर्ण पसरलेल्या पर्वत रांगामधे जाताना दिसतेय. तो तिनं निवडलेला मार्ग आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’मधे बायको घरातल्या पुरुषांविरोधात उभी ठाकते. घरातून बाहेर पडते. हे सर्व पाहताना प्रसिध्द लेखिका अमृता प्रितम यांच्या काही ओळी आठवतात.
‘औरत की पाकिजगी का ताल्लुक समाज ने कभी भी औरत की मन की अवस्था से नही पहचाना हमेशा उसके तन से जोड दिया.’
एकूणच बाईच्या मनाचा विचार हा किचनच्या पलिकडे व्हायला हवा. बाकी जे आहे ते असं आहे. ते ट्रेंडी नको तर पक्क आणि शास्वत हवंय. एवढंच.
हेही वाचा :
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी
अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!
पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
(लेखक जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार असून ही त्यांची फेसबुक पोस्ट आहे)