शारीरिक अंतर पाळून चैत्र वारी सहभागी होत वारकऱ्यांनी महिनाभराआधीच एक आदर्श घालून दिला होता. आता आषाढी वारीकरता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढलाय. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे. याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.
महाराष्ट्राचा लोकधर्म असणाऱ्या पंढरपूरच्या वारीचं हवाई छायाचित्रण करून तिला फोटोग्राफर उद्धव ठाकरे यांनी मोठ्या उंचीवर नेलं. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरात हवाई मार्गे नेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी विवेकनिष्ठ वारकरी धर्माची भगवी पताका गगनावरी नेली आहे.
हेही वाचा : वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं
विशेषतः अवघं वातावरण अस्वस्थ आणि अस्थिर, रोगट आणि कडवट झालं असताना भाविक वारकरी, कोरोनाग्रस्त समाज आणि लोकानुग्रही परंपरा या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधणं फार जिकिरीचं होतं. पण मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने आणि सामंजस्याने हा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांचं आणि सरकारचा निर्णय मोठ्या विवेकाने स्वीकारून समंजस महाराष्ट्राचं महा दर्शन घडवणाऱ्या तमाम जनतेचंही अभिनंदन केलं पाहिजे.
आजवर सर्वच वारकरी संतांनी समाजाची चौकट एकसंध राहावी यासाठी शांततामय मार्गाने क्रांती घडवली. तिचा महाराष्ट्राला खूपच फायदा झाला. पण तो यापुढे होईलच, असं सांगता येत नाही. याचं पहिले कारण म्हणजे ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले’ या न्यायाने वारकऱ्यांमधे कृतिनिष्ठ नेतृत्व मानण्याची पद्धत आहे, तेथे आज निर्नायकी अवस्थेमुळे वैचारिक गोंधळ माजलेला दिसतोय.
असं वातावरण असताना पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, शितोळे सरकार, गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज कबीर, संजय मोरे, अभय टिळक, शिवाजी मोरे आदी मान्यवर मंडळींनी आणि सात महत्वाच्या पालखी चालकांनी आषाढी वारी रद्द करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सकारात्मक योगदान दिलं आणि अवघ्या देशापुढे उत्तम आदर्श उभा केला याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल.
विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या संत, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्राला वारसा आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या समाजमनाची शेकडो वर्षे मशागत केली. त्यामुळेच महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, सुधारकाग्रणी आगरकर, महर्षी कर्वे, र. धो. कर्वे असे एकाहून एक पुढारलेले लोक या भूमीत जन्मले. आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला हे समस्त जग जाणतं.
तेराव्या शतकात संत नामदेव आणि ज्ञानदेव यांनी कर्मकांड, व्रतवैकल्य आणि तंत्रमंत्रात गुंगलेल्या महाराष्ट्रामधे कीर्तनाचे रंगी रंगुन ज्ञानदीप लावले आणि अवघाचि संसार सुखाचा करीत तिन्ही लोक आनंदाने भरून आणि भारून टाकलं होतं. तत्कालीन स्थितीत कर्मठ धर्मपंडितांच्या विरोधात पुकारलेलं ते सात्विक बंडच होतं. जे कधीच थंड पडलं नाही.
पुढे या बंडवाल्यांचा आक्रमक वारसदार म्हणून सतराव्या शतकात संत तुकारामांनी अक्षरश रणधुमाळी माजवली. त्यांच्या शब्दांची शस्त्रं तथाकथित शास्त्रांची चिरफाड करत गेली. एकूणच काय तर महाराष्ट्राचा आचारधर्म म्हणून ओळखला जाणारा हा भागवत धर्म आठशेहून अधिक वर्ष मराठी समाजमन घडवत आलाय. त्याचं ते मोठेपण पुढील पिढ्यांच्या हाती देण्याची निसर्गदत्त जबाबदारी आपल्या पिढीवर आहे, हे कोरोनाच्या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे.
‘एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।।’ असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. ते विचार आत्मसात करून फक्त मराठी जनतेनंच नाही तर राजकीय नेत्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि उमजून वागलं पाहिजे.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. तर ज्ञानोबा-तुकाराम हा मऱ्हाटी समाजाचा श्वास, उच्छवास आहे. म्हणूनच सध्याच्या दिल्या घेतल्याच्या जमान्यात ‘कशाच्या तरी मोबदल्यात’ भक्ताला पावणाऱ्या नवसाच्या देव-देवतांचे, स्वयंघोषित संतमहंतांचे स्तोम वाढत असताना ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी’ असं थेट सांगणाऱ्या रोखठोक वारकरी तत्त्वज्ञानाची डिजिटल युगात नव्याने मांडणी करण्याची गरज आहे.
आज देहू, आळंदी किंवा पंढरपूर इथे गेल्यानंतर 'विचार दर्शन' होण्याऐवजी 'प्रदर्शन' पाहायला मिळतं. अगदी सिझननुसार कपडे, आभूषण, फुलं कमी म्हणून की काय अगदी हापूस आंबेसुद्धा 'डेकोरेशन'साठी वापरले जातात. जो विठोबा नामदेव-ज्ञानदेवांनी जातीअंताच्या लढाईचं सर्वसमावेशक प्रतीक म्हणून उभा केला होता. ज्याला सावता माळ्याच्या शेतात, बांधावर आणि जनाबाईच्या काळोख्या खोलीत जात्यावर बसवला होता, जगन्नियंता देव असूनही ज्याला भावभक्तीबळे 'जोहार' करायला लावला होता.
तो विठोबा, ते त्याचे लाडके बंडखोर, अगदी जीव पणाला लावणारे चोखामेळा, सेना महाराज, बंका महाराज सगळे, सगळे जातींच्या भिंतीत चिणले गेलेत, काही भिंतीवर उरलेत. आणि त्यांचे विचार भंपक चमत्कारांच्या कथांमुळे, भोंदू कीर्तनकारांच्या कहाण्यांमुळे विस्मृतीत विरून गेलेत. त्यांचं नव्याने जागरण करण्याची गरज आहे. एकनाथ महाराजांनी ज्या पद्धतीने अवघ्या ज्ञानेश्वरी विचारांचं पुनर्भरण करून महाराष्ट्राला पुनरुत्थानाच्या दिशेने नेलं होतं अगदी तसे सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गेल्या आठशे वर्षापासून मराठी मनाची जडणघडण करणाऱ्या वारकरी संत विचारांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ‘राइज ऑफ द मराठा पॉवर’ अर्थात मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथामधे लिहिलंय, ‘ज्ञानेश्वर- तुकारामादी साधुसंतांनी पंढरपुरी वाळवंटात भक्तीचा झेंडा रोवून चहूंकडे या नीती-आचारप्रधान भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य अधिक सोपं झालं.’
न्या. रानडे यांच्या या मताला पुष्टी देताना थोर विचारवंत हभप शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर म्हणतात, ‘न्या. रानड्यांची न्यायबुद्धी सोने तोलायच्या तराजूप्रमाणे अतिशय काटेकोर होती. त्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सर्वकष योगदानाबद्दल दिलेल्या अभिप्रायाचं मोल फार मोठं आहे. त्यांच्या या अभिप्रायाचा आशय असा की, वारकरी साधुसंतांनी जे भक्तिप्रधान तत्त्वज्ञान पेरलं, त्यामुळे पताका-गंध टिकून राहिले. मुसलमानी आक्रमणाचे चपेटे वाजत असता, त्यांच्या वलीमुर्शदांच्या आरोळ्यांनी आकाश कोंदून गेले असतानाही संतांनी हे महत्कार्य केले. हे ध्यानी घेतलं, म्हणजे त्यांच्या कार्याचं मोठेपण लक्षात येतं.’
एकूणच काय तर जातिभेदाने ग्रस्त आणि रूढी, अंधश्रद्धांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह अनेक राज्यांतल्या वैष्णवजनांना वारकरी संतांनी जगण्याचा मार्ग दाखवला. धर्माभोवती जमलेले कर्मकांडाचे अवडंबर कोणताही ‘क्रांतिकारक’ आव न आणता आमच्या संतमंडळींनी दूर केले आणि सामाजिक, राजकीय संकटांनी घेरलेल्या त्या आठशे वर्षापूर्वीच्या काळात संत नामदेवराय मोठ्या विश्वासाने म्हणाले,
काळवेळ नसे नाम संकीर्तनी।
उंच नीच योनी हेही नसे।
धरा नाम कंठी सदा सर्वकाळ।
मग तो गोपाळ सांभाळील।
त्यांच्या त्या आश्वासक शब्दांनी उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी या भेदांनी विखुरलेल्या मराठी लोकांना भागवत धर्माच्या झेंडय़ाखाली एकत्र आणलं होतं. विशेष म्हणजे ज्ञानदेव-नामदेवांच्या नेतृत्वाखाली अठरापगड समाज प्रबोधन पर्वाच्या वारीत सामील होण्याच्या काळातच धर्म आणि राज्यसत्तेतली अधिकारी मंडळी अंधश्रद्धा, जाचक प्रथा-परंपरांचे जोखड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते.
हेही वाचा : वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे
देवगिरीचा शक्तिवान राजा रामदेवरायाचा ‘महाकर्णाधिप’ म्हणजे अर्थमंत्री असणाऱ्या हेमाद्री पंडिताने ‘चार्तुवर्ण्य चिंतामणी’ हा सर्व जातींना कर्मकांडाच्या बंधनात अडकवणारा ग्रंथ त्याच काळात लिहिला होता. शिवाय तंत्रमार्गाच्या वामाचाराने सर्वत्र थैमान घातलं होतं. त्यामुळे समाजाच्या सर्व थरातले लोक मूळ धर्मापासून, माणुसकी आणि सद्वर्तनापासून दूर गेले होते. त्यांना प्रेम, शांती, बंधुभाव आणि सद्भावाचं शिक्षण देण्याचं काम नामदेवरायांच्या पुढाकाराने सुरू झालं होतं.
ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतच्या अगम्य शब्दांमध्ये दडलेला धर्माचा अर्थ सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेत ऐकवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात धर्मज्ञान फक्त संस्कृतमध्येच सांगण्याचा दंडक होता, पण आपल्या ‘अमृताशी पैजा जिंकणाऱ्या’ मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या ज्ञानोबारायांनी मोठ्या प्रेमाने धर्म संकीर्तनाची परंपरा सुरू केली. या प्रबोधनकारक धर्मकार्याचा ‘ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस’ असं म्हटलं जाते. कारण तत्कालीन समाजस्थितीला अनुकूल होईल, असे बदल घडवताना ज्ञानेश्वरांनी सर्वसमावेशक वृत्ती धारण केली होती.
नामदेव महाराजांनी आपल्या जोडीला चोखामेळा, सावता माळी, जनाबाई, गोरा कुंभारादी दुर्लक्षित समाजघटकातल्या लोकांना लिहितं केलं. त्यामुळे बहुजन समाजाला आत्मभानासोबत जगण्याची दिशा सापडत गेली. वारकऱ्यांचं जीवनलक्षी तत्त्वज्ञान सहज सोपं करून सांगताना ज्ञानेश्वरांनी सगळे कर्मकांड नाकारले.
जयाचे उचित करा तैसे
‘सहयज्ञा : प्रजा : सृष्टा :’ या श्लोकाचं निरूपण करताना ज्ञानोबा माऊली म्हणतात, ‘तुम्ही स्वधर्माचे आचरण करा, तुमच्या सा-या इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी वेगळी व्रतवैकल्ये करायची गरज नाही. तप करून शरीराला पीडा देणंही नको. कामनायुक्त आराधना नवस, सिद्धी साधनांच्या मागंही जाऊ नका. इतर देवतांची उपासना सोडा आणि स्वधर्माचं पालन करा, की पुरे.’
ज्ञानोबारायांचा हाच विचार अगदी सोपा करून सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
पुण्य परउपकार पाप ते परपीडा।
आणिक नाही जोडा दुजा यासी।
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म।
आणि हे वर्म दुजे नाही।।
तुका म्हणे उघडे आहे हित घात।
जयाचे उचित करा तैसे।।
हेही वाचा :
वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!
साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!
इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट
विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका
तंबाखूविरोधी दिवसः तंबाखू कंपन्या तरुणांनाच आकर्षित करण्यासाठी कॅम्पेन का राबवतात?
(लेखक महेश म्हात्रे हे वारकरी संप्रदायाचे अभ्यासक असून न्यूज १८ लोकमत चॅनेलचे संपादक आहेत. हा लेख म्हणजे त्यांच्या फेसबूक पोस्टचा संपादित अंश आहे.)