पाडुंरंग शास्त्री आठवले : त्यांनी लोकांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश निर्माण केला!

१९ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


१९ ऑक्टोबर १९२०ला कोकणातल्या रोहा गावी एक क्रांतीकारी विचारवंत, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म झाला. समाजातल्या भेदाभेदांना दूर करायचं हाच त्यांचा संकल्प होता. कायदा, शिक्षण, राजकीय व्यवस्था यातूनही जे भेद समाजातून जाऊ शकले नाही, ते भेद दादांनी दैवी संबंधातून दूर केले. आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या स्वाध्यायाच्या वटवृक्षाची आठवण काढायला हवी.

एक आठ दहा वर्षांचा मुलगा, आजोबा हरिजनवस्तीवर मनाचे श्लोक, श्रीमद्भगवद्गीता शिकवायला जायचे आणि घरी आल्यावर आंघोळ करायचे. एवढासा पांडुरंग विचारायचा, ‘आजोबा, तुम्ही आल्यावर आंघोळ का करता?’

श्राध्दाच्या दिवशी उरलेल्या पत्रावळी आणि अन्न भिरकावून देण्यात येतं आणि ते उष्टं खरकटं अन्न झेलून काही लोक खातात. हे दृश्य पाहून छोट्याश्या पांडुरंगाच्या मनात वादळ सुरू होतं. हे असं का? माणूस माणसाला इतक्या हीन दर्जाचा का समजतो? हे चुकीचं आहे. बदलायला हवं हे सगळं! पांडुरंग त्याच वेळी निश्चय करतो की मी हे सगळं बदलेन! माणसामाणसातला भेद दूर करेन. सगळीच माणसं ईश्वराची लेकरं आहेत, तर हा जातीभेद, पंक्तीभेद का? असा विचार तो करत असे. तिथूनच एका महान कर्मयोगाची सुरवात झाली.

तपोवन पद्धतीचं शिक्षण

१९ ऑक्टोबर १९२०ला कोकणातल्या रोहा गावी एक क्रांतीकारी विचारवंत, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच दादांचा जन्म झाला. त्याकाळात समाजात असलेला जातीभेद, श्रेष्ठ कनिष्ठ, श्रीमंत गरीब हे संपायला हवं असं वाटणारे अनेक समाजसुधारक होते. प्रस्थापित देवाधर्मावर सडसडून टीका करायची आणि पाश्चिमात्य विचांरांनी भारावून त्यांच्यासोबत री ओढायची, अशी या सुधारकांची पद्धत होती. त्यासाठी असलेली समाजाची अनुकुलता, वैचारिक बैठक आहे की नाही हे न जाणताच ते सुधारणांचा पुरस्कार करायचे.

पांडुरंग शास्त्री लहानपणी रोहामधे वडलांनी म्हणजे वैजनाथ शास्त्रींनी स्थापन केलेल्या सरस्वती पाठशाळेत शिकले. भारतीय तत्त्वज्ञान, वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान, इंग्रजी साहित्य यांचा अभ्यास पांडुरंग करत असे. प्राचीन भारतीय तपोवन पद्धतीचं शिक्षण घेऊन पांडुरंग रोह्याच्या कुंडलिनी नदीकाठी एक प्रचंड क्रांती डोक्यात घेऊन संकल्प मांडत होता.

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

शेवटच्या माणसापर्यंत गीतेचा विचार

भविष्यातल्या समाजाची धारणा करणारा पांडुरंग मुंबईत वडीलांसोबत माधवबागेत जाऊ लागला. रॉयल एशियाटीक ग्रंथालयात इंग्रजी साहित्य आणि मानवीय संस्कृतीच्या इतिहासाचा अभ्यास पांडुरंगशास्त्री तहानभूक विसरून करत असत.

पुढे १९५४ मधे जपानमधल्या विश्व धर्म परिषदेत पांडुरंग शास्त्रींनी श्रीकृष्ण आणि समाजाची धारणा यावर तेजस्वी विचार मांडले. ते ऐकून प्रभावित झालेले अमेरिकेचे विचारवंत डॉक्टर क्रॉम्प्टन यांनी पांडुरंग शास्त्रींना अमेरिकेत येण्याचा प्रस्ताव दिला. पण ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि’ मानणारे दादाजी भारतात आले.

जपान ते मुंबई या विमान प्रवासात दादांच्या डोक्यात एक तुफान घोंघावत होतं. समोर काळोख, सोबत कुणीच नाही आणि फक्त क्रांतीकारी कृष्णाचाच विचार घेऊन दादा परत भारतात आले. आता समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत गीतेचा विचार घेऊन जायचा, समाजातल्या भेदाभेदांना दूर करुन त्यांना मुख्य धारेत सामील करायचं हाच दादांचा संकल्प होता.

दैवी संबंधातुन दूर केले भेद

परमपूज्य दादा माधवबाग पाठशाळेतून गीता, उपनिषद, रामायण यावर प्रवचन करायचे. केवळ भगवंताला केंद्रस्थानी ठेऊनच माणसाला दादा जवळ करायचं. स्वतःच्या पदरचे पैसे, वेळ खर्च करुन देवाचा विचार गावोगावी पोचवण्यासाठी दादा इतर स्वाध्यायींसोबत भक्तीफेरी करू लागले. हे सगळं इतकं कठीण काम कोणत्याही आमिषाशिवाय करायला दादांनी शिकवलं.

माझ्याकडे असलेली निपुणता देवाला अर्पण करणं हीच देवाची भक्ती, माणसात असलेला ह्द्ययस्थ भगवंत. हाच दोन माणसा माणसातला संबंधांचा पाया आहे. हे दादांनी मोठा भाऊ बनून समाजाला शिकवलं. आपल्या कार्याची सुरूवात त्यांनी गुजरातमधून कृष्णाच्या भुमीतून केली. दादांनी माणसाला माणसाशी दैवी संबंधांनी बांधले. कायदा, शिक्षण, राजकीय व्यवस्था यातुनही जे भेद समाजातून जाऊ शकले नाही, ते भेद दादांनी दैवी संबंधातुन दूर केले.

समाजाने नेहमीच तिरस्कार केलेला वर्ग दादांनी प्रेमाने जवळ घेतला. महाराष्ट्र, गुजरात मधल्या किनारपट्टीच्या गावांमधून दादांचा स्वाध्यायाचा विचार स्थिर होऊ लागला. ज्याच्या अंगालाही वास येतो अशा वर्गाला दादांनी सागरपुत्र म्हणुन जवळ केलं. गीतेचे श्लोक शिकवले. हा पापाचा नाही आपल्या बापाचा व्यवसाय आहे हे सांगून दादांनी त्यांच्यात आत्मगौरव निर्माण केला. मारहाण, शिविगाळ, दारू, जुगार यात संसाराची राखरांगोळी करणारी लोक पुन्हा सुसंस्कारी दादांनी बनवली. ओख्यापासून गोव्यापर्यत दादांनी या वर्गात क्रांती घडवली.

हेही वाचा : केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

माणसाला माणसाशी जोडलं

शांतीत क्रांती घडवणारे दादा. दादा सांगतात माणसाला पद, प्रतिष्ठा, सत्ता आणि पैसा याशिवायही मूल्य आहे. कारण तो देवाचा मुलगा आहे. त्याला दीन, हिन लाचार बनवण्यापेक्षा तेजस्वी बनवलं पाहिजे. तो चार पैसे फेकून विकला जाणार नाही. देव, पूजा, भक्ती केवळ भीतीतून नाही तर देवावरच्या प्रेमातून केली पाहिजे. देवाची भीती नको तर देवाबद्दल प्रेम निर्माण व्हावा यासाठी ते अहोरात्र झटले. कोणत्याही प्रलोभनाशिवाय  माणसाला चालतं केलं.

मद्भगवद्गीतेच्या ‘अनन्यांश्चितयंतोमाम’ या वचनांवर शंभर टक्के विश्वास ठेवून दादांनी स्वाध्याय परिवार ऊभा केलाय. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल, उत्तर प्रदेश, तामिळनाडु, कर्नाटकमधल्या हजारो खेडोपाड्यांतून दादांनी माणसाला तेजस्वी बनवलं.

अमृतालयम, योगेश्वर कृषी, विद्यापीठ, भक्तिफेरी, स्वाध्याय केंद्र, त्रिकाल संध्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी दादांनी नेहमीच योगेश्वर भगवान, देवालाच ठेवलं. आणि निस्वार्थ दैवी संबंधातून माणसाला माणसाशी, माणसाला सृष्टीशी जोडलं. वृक्षात वासुदेव आहे, गंगा माझी आई आहे यासारख्या भावनिक अध्यात्मिक संकल्पना दादांनी सर्वसामान्यांना जगायला शिकवल्या.

‘तुम्हारा खून बनानेवाला और मेरा खून बनानेवाला एकही भगवान है,’ असं अगदी सोप्या शब्दांत ते सांगत असत. अगदी हायकोर्टाच्या न्यायाधीशासमोर सिग्मंड फ्रॉईड आणि कार्ल मार्क्स समजवणारा तेजस्वी खेडूत दादांनी घडवला. निरक्षर लोक घडाघडा गीता आणि श्रीसुक्तमची पारायणं करू लागली. 

पुरस्कार म्हणजे ईश्वराची शाबासकी

हे सगळं दादांनी पाच सहा दशकं अव्याहतपणे केलं. माणसाला उभं केलं. दधिची ऋषींनी संस्कृतीसाठी हाडंदेखील दिली असं पुराणात वर्णन आहे. या आधुनिक दधिचींनी भारतीय सांस्कृतिक जीवन मूल्यं अशीच ऊभी केलीय. Upliftment of human life साठी मँगसेसे पुरस्कार,  progress in religion साठी जगमान्य टेंम्पल्टन पुरस्कार दादांना मिळाला. तेव्हा अत्यंत प्रेमाने दादांनी हा पुरस्कार ईश्वराची शाबासकी आहे आणि परिवाराच्या तपामुळे आहे, असं सांगितलं. दादा चंदनासारखे आपल्यासाठी झिजले. 

आज दादांची जन्मशताब्दी. आज देहरुपाने ते आपल्या सोबत नाहीत. पण त्यांनी उभ्या केलेल्या स्वाध्यायाच्या वटवृक्षाखाली बसून आम्ही जीवन जगतोय. दादा, स्वतः निर्मल गंगेपरी शुभ्र होते, श्वेतवस्र धारी आणि मनामधे मानवाबद्दलचे निस्वार्थ प्रेम. कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्ती किंवा संस्था यावर टीका नाही, प्रशंसा नाही फक्त वेद, भगवंताला मान्य आणि माणसाला उभं करेल तोच विचार देणारे हे महापुरुष. लाखो लोकांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश निर्माण करणारे तेजःपुंज!

माणसाला माणुस बनवण्याचा लहानग्या पांडुरंगाचा संकल्प पुरा झाला. लहानपणी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधुन काढणारा पांडुरंग, मी माझ्या देशातल्या खेड्यातल्या माणसाला गीतेच्याच विचारांनी उभा करीन. हा १९५४ च्या विमानप्रवासातल्या संकल्प दादांनी अविरत कर्मयोगाने सत्यात उतरवला.

हेही वाचा :   

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

प्रबोधनकारांच्या पत्रकारितेविषयी आपल्याला काय माहितीय?

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

फ्रेडरिक नित्शे : देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

(बंगळुरू येथील ब्लॉगर तुषार भट यांच्या ब्लॉगवरून साभार)