जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥

२९ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?

ज्येष्ठाचं मेघमंडल आकाशात जमायला लागलं की, अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. माऊलीचं प्रस्थान जवळ यायला लागलं की, आवराआवरीला गती येते. ज्याच्या घरी वारीचा कुळाचार आहे, ते तर वारी चुकवत नाहीतच. पण हल्ली ‘एक तरी वारी अनुभवावी’ असं म्हणत सगळ्या थरातून माणसं सामील होतायत. यात स्त्रियांचा वाढता सहभाग ही फार उल्लेखनीय गोष्ट आहे.

भेटेन माहेरा आपुलिया

स्त्री संसारात जास्त गुरफटलेली असते, असा समज आहे. म्हणूनच स्त्रीचं वारीला जाणं म्हणजे ‘आवा चालली पंढरपुरा। वेशीपासून फिरे माघारा॥’ असं असतं, असं म्हणतात. याचा अर्थ, स्त्री अजूनही पारंपरिक व्यवस्थेतच गुंतलीय. पण मग जेव्हा वारीचं प्रस्थान जवळ यायला लागतं तेव्हा स्त्रिया संसाराचे मोहपाश ठामपणे बाजूला सारून वारीला जायची तयारी करायला लागतात.

खरं तर स्त्रियांना वारीत सहभागी होताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण विठू माऊलीच्या भेटीची ओढ असते, त्यामुळे त्यांना या अडचणींचं काहीच वाटत नाही. एरवी घराचा उंबरा न ओलांडणार्‍या महिला वारीत मात्र ‘मी जाणारच’ असं म्हणत सामील होतात. कुठून मिळते ही ताकद, ही ऊर्जा?

हेही वाचा: पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

स्त्री संतांचा महिमा

वर्षभराच्या संसार-तापात पोळून निघाल्यावर त्यांना माहेराची ओढ लागलेली असते. ‘जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥’ असा निश्चय करून विठू माऊलीच्या भेटीसाठी त्या आतुर झालेल्या असतात. त्यांची ही विठू माऊलीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी तितकीच आतुर झालेली असते. या विठ्ठल भेटीला आतुर झालेल्या भगिनींसाठी ही वारीची वाट सुकर केली, ती ‘स्त्री’ संतांनी!

भागवत धर्माच्या स्थापनेपूर्वी समाजात जातिभेद होते. स्त्रिया आणि शूद्रांना वेदपठणाचे, ज्ञान ग्रहण करण्याचे अधिकार नव्हते. तेव्हा समतेचं तत्त्व स्वीकारत भागवत धर्माची पताका फडकली. त्यानं समाजातल्या सर्व लोकांना ज्ञानाची कवाडं खुली केली. ‘सर्वांना आहे येथ अधिकार’ असं सांगत भगव्या पताकेखाली सकल वैष्णव एकत्र आले. इथं स्त्रियांनीसुद्धा फार अलौकिक कामगिरी केलीय.

मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा, बहिणाबाई. अशा अनेक संत स्त्रियांची आध्यात्मिक कामगिरी फार उच्च पातळीवरची आहे. या सगळ्याजणी खूप वेगवेगळ्या थरातून आलेल्या होत्या. पण त्यांचं ध्येय आणि जीवितकार्य एकच होतं,

‘काया वाचा मन रंगले चरणी। धरियेला मनी पांडुरंग॥’

मूर्ती लहान पण किर्ती महान

ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण असणारी मुक्ता आध्यात्मिक क्षेत्रात फार उंचीवर होती. आईवडलांविना ही पोरकी भावंडं एकमेकांच्या आधारानं जीवितार्थ चालवीत होती. काही प्रसंगात प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांची शांती ढळली, तिथं मुक्ताबाईंनी सावरलं.

तिनं ‘आई’ होऊन भावंडांचा सांभाळ केला. दीर्घायुष्य लाभलेल्या चांगदेवांचा अहंकार मोडून काढला. चांगदेवांनी मुक्ताबाईला आपले गुरू केले. अशी ही मुक्ताबाई लहान वयात आध्यात्मिक क्षेत्रात फार वरच्या पातळीवर होती.

हेही वाचा: बेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर

जनाबाईचं भक्तीमय प्रेम

मुक्ताबाईप्रमाणे जनाबाईंचा अधिकारही फार मोठा आहे. तिनं आपल्या भक्तिपाशात प्रत्यक्ष परमात्म्याला बद्ध केलं. मोठमोठ्या तपस्वी, ज्ञानी माणसांना न सापडणारा परमात्मा तिला सहज प्राप्त झाला. जनाबाई मराठवाड्यातल्या गंगाखेडची. देवाच्या दृष्टांतामुळे तिला तिच्या आईवडलांनी ती लहान असताना पंढरपूरला नामदेवांच्या घरी सोडलं.

त्यामुळे तिच्यावर लहानपणापासून नामदेवांच्या भजन, कीर्तन, प्रवचनाचे संस्कार झाले. ती त्यांच्या घरी घरकाम करत असे. आईवडलांचं प्रेम तिनं विठ्ठलाच्या ठिकाणी पाहिलं. ती विठ्ठलाला आर्ततेनं विनवत असे. तिची व्याकुळता विठ्ठलाला कळाली. तो तिच्या हाकेला धावून येऊ लागला. तिला न्हाऊमाखू लागला. प्रत्येक कामात मदत करू लागला.

झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी॥

जनीनं विश्वव्यापी देवाला आपल्या हृदयात बंदिवान करून ठेवलं. जनाबाईनं भक्तीशिवाय काही केलं नाही. तिचं कर्मसुद्धा भक्तिमय होतं. तिचं विठ्ठलप्रेम इतकं उच्च दर्जाचं होतं की, विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांची चरणधूळ सतत आपल्या मस्तकी पडावी म्हणून नामदेव महाराजांबरोबर त्यांच्या घरातल्या चौदा जणांसह तिनं पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या पायरीजवळ समाधी घेतली.

भक्तीने मिळवला अधिकार

चोखामेळा शूद्र जातीत जन्माला आला. धर्मग्रंथ न वाचताही त्यानं उत्कट भक्तीनं परमेश्वराला प्राप्त केलं. त्या चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मळा याही विठ्ठल भक्तीमुळे संतपदाला पोहोचल्या. त्यांची उपलब्ध अभंग रचना फार थोडी आहे. पण जी आहे, ती अत्यंत उत्कट आहे. त्यांनाही विठ्ठलानं अनेकदा अडचणीत मदत केली आहे.

‘अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग॥’

हा एकच अभंग सोयराबाईचं आध्यात्मिक कार्य सिद्ध करतो. त्यांच्या घरी भोजनासाठी सार्‍या देवीदेवता आल्या होत्या. त्यांची हेटाळणी करणार्‍या लोकांना हे दृश्य पाहून उपरती झाली. त्यांनी चोखोबा, सोयराबाई आणि निर्मळा यांचा अधिकार मान्य केला.

हेही वाचा: सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

कान्होपात्राची निस्सीम भक्ती

असंच काहीसं कान्होपात्राच्या बाबतीत घडलं. कान्होपात्रा ही मंगळवेढ्याच्या श्यामा गणिकेची मुलगी. अतिशय सुंदर होती. गोड गळा लाभला होता. बिदरच्या बादशहाला तिच्याविषयी लोभ उत्पन्न झाला. तिचं मन विठ्ठलामधे गुंतलं होतं.

लहान असताना पंढरपूरला जाणारी दिंडी तिनं पाहिली आणि तिच्या मनात विठ्ठलाविषयी ओढ निर्माण झाली. विठ्ठलाच्या भेटीसाठी तिची तळमळ होऊ लागली. बिदरच्या बादशहानं तिला जबरदस्तीनं मिळवण्याचं ठरवल्यावर ती पंढरपूरला आली. तिनं विठ्ठलाचा आर्त धावा केला.

‘नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा जाऊ पाहे॥’

असं म्हणत त्याच्या चरणावर आपले प्राण अर्पण केले. पंढरपूरला विठ्ठल मंदिरातच तिची समाधी आहे. या समाधीवर दगडातून एक झाड उगवलंय. त्याला ‘तरटीचं झाड’ असं म्हणतात. ते झाड कित्येक शतकं तिथं उभं आहे.

पृथ्वीच्या पाठीवर हे एक आणि मंगळवेढ्याला तिच्या जन्मभूमीत एक, अशी दोनच या प्रकारची झाडं आहेत. वनस्पतिशास्त्रात हे एक आश्चर्य समजलं जातं. कान्होपात्राचे अभंग थोडेच आहेत; पण ते अतिशय आर्त आणि व्याकूळ आहेत. संत परंपरेत तिच्या निस्सीम भक्तीभावनेला आणि करुणार्ततेला तोड नाही.

‘संतांचा अभंग’ रचणाऱ्या बहिणाबाई

स्त्री संत परंपरेतलं आणखी एक ठळक नाव म्हणजे बहिणाबाई. तिनं ‘संतकृपा झाली। इमारत फळा आली॥’ या अभंगात वारकरी संप्रदायातल्या संतांनी या भक्तीमंदिराच्या उभारणीसाठी जी कामगिरी केली, तिचं सुंदर वर्णन केलंय. ही संत तुकाराम महाराजांची शिष्या होती. तिचं कुटुंब मूळचं मराठवाड्यातलं. पण नंतर ते कोल्हापूरला स्थिरावलं. बहिणाबाईंना लहानपणापासून भक्तिमार्गाची ओढ होती. कीर्तन आणि प्रवचनाची आवड होती.

त्यामुळे कुटुंबीयांकडून, विशेषतः पतीकडून खूप मानहानी सोसावी लागली. जयराम स्वामींच्याकडून तुकाराम महाराज, त्यांचं कार्य, अभंगवाणी यांचा परिचय झाला. त्यामुळे तुकारामांच्या भेटीबद्दल ओढ निर्माण झाली. तुकाराम महाराजांना भेटल्यानंतर साक्षात्कार झाला. त्यांना गुरू मानून त्यांच्या सहवासात बहिणाबाई उद्धरून गेल्या. काव्यरचना, अभंग करू लागल्या. भक्तीच्या बळावर त्यांचा नावलौकिक झाला.

वरचा अभंग हा वारकरी संप्रदायातला फार महत्त्वाचा अभंग आहे. यामधे मंदिराच्या रूपकाचा वापर करून प्रत्येक संताचं कार्य अत्यंत मार्मिकपणे सांगितलंय. या अभंगाला ‘संतांचा अभंग’ असं म्हणतात. अशा अनेक ‘माऊली’ विठ्ठल भक्तीत रंगून गेल्या. आजही वारीसाठी, विठू माऊलीच्या भेटीसाठी आजच्या माऊली आतुर आहेत. संसाराचा व्याप-ताप काही काळाकरता बाजूला सारत,

‘जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया॥’

असं म्हणत पंढरीची वाट चालू लागल्या आहेत...

हेही वाचा: 

आपापल्या प्रबोधनाची एकादशी

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची