गणेशोत्सवात आपण अनेक मंडळांना भेटी देतो. आपण तिथे देखावे, सजावट बघण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जातो. मंडळांमधे सादर होणाऱ्या कलाकृतीपैकी एक म्हणजे नाटक. यंदा पर्यावर हे नाटक अनेक मंडळांमधे सादर होतंय. नुकताच आलेला पूर बघून निसर्गाचा कोप काय असतो हे आपल्याला समजलंय. या नाटकातून याच मुद्द्यावर म्हणजेच निसर्ग संवर्धनावर भाष्य करण्यात आलंय.
पृथ्वी ही पंचतत्त्वाने निर्माण झाली. या पंचतत्त्वांमुळे या ग्रहावर जीवसृष्टी उदयास आली. या ग्रहाची अदभूत निर्मिती म्हणजे ‘मानव’ आणि ही सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जाते. सुरवातीला मानवाने जगण्यासाठी निसर्गाकडून तेवढीच संसाधनं घेतली जेवढी गरजेची होती. या संसाधनांचा उपयुक्त वापर करून पुन्हा तीच ऊर्जा निसर्गाला देत होता. आणि नवनिर्माणाची प्रक्रिया निरंतर सुरू होती. या अविरल सुरु असणाऱ्या नैसर्गिक चक्राला जोरदार धक्का बसला तो औद्योगिकरण, शहरीकरण आणि भौतिक विकासाचा.
भौतिक विकास करताना आपण मूळ निसर्गाला विसरलो. त्याचे परिणाम आपण वेगवेगळ्या रुपात भोगतोय. यंदाचा महापूर आपल्याला सांगतेय की वेळीच निसर्ग संवर्धनासाठी पावलं उचला. निसर्ग संवर्धनाचं महत्त्वं पटवण्यासाठी काही कलाकारांनी मिळून गणेशोत्सवात नाटक सादर करतायत. ‘थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत ‘पर्यावरण’ हे नाटक मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधे सुरू आहे.
औद्योगिकरणाच्या वेगात, 'अति उत्पादन अति नफा' या मानसिकतेत राहून आपण पृथ्वीला नष्ट करतोय आणि तिची प्रकृती खराब करतोय याची कल्पना मानवाला नव्हती. मानवाच्या सगळ्या गरजा जश्या पूर्ण होत गेल्या, त्याच्या स्वभावात लालसा आणि हव्यास निर्माण होऊ लागला. आपल्या सभोवताली जेवढी नैसर्गिक संपदा आहे ती स्वतःच्या ताब्यात घेतली.
जमीन, जंगल, पाणी, डोंगर, खनिजे, पशु प्राणी या सगळ्या प्राकृतिक तत्वांना औद्योगिकरणाच्या जोरावर काबीज केलं. आणि एका कृत्रिम मशीनमधे बंदिस्त केलं. जिथे मानवाच्या संवेदनांची, विचारांची आणि माणुसकीची जागा कृत्रिमता, विकार, नफा आणि लालसेने घेतली.
भौतिक विकासासाठीे आपण कोणताही मागचा पुढचा विचार न करता जंगलांचं आणि खनिज संपत्तीचं शोषण केलं. वेगाने जंगलं तोडल्यामुळे, अगदी खोल वनक्षेत्रही वृक्षरहित झाली. त्यामुळे वन्यजीव नष्ट होतायत. आपण एक विचार करूया, आपला श्वास कोंडला तर काय होईल? आपण इतकी वर्षं प्लास्टिक, रासायनिक खतं, कारखान्यांचे सांडपाणी हे सगळं पृथ्वीवर सोडलं. यामुळे आपण पृथ्वीचा श्वास कोंडतोय.
हेही वाचा: बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत
पर्यावरण ऱ्हास, प्रदूषण, कार्बनचं उत्सर्जन, दुष्काळ, अतिवृष्टी, महापुर, खालावत चाललेली पाण्याची पातळी, विषारी होत असलेली जमीन आणि अन्न, पशु ,पक्षी आणि इतर प्राण्यांच्या घटत्या प्रजाती आणि वाढत असणारे जागतिक तापमान इत्यादी सर्वच गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत. पण याविषयीची जागरूक असूनही आपण आपली भूमिका निभावत नाही. दरवेळी दुर्घटना घडल्यावरच आपण उपाय शोधायला जातो.
दुर्घटना माझ्या इथे अजून नाही ना झाली? मग आपला त्याच्याशी काय संबंध? ही आपली मानसिकता. आपण किती स्वप्नं पाहिली विकसित होण्याची, अतिशय वेगाने जगण्याची, सुखावस्थेत राहण्याची, एका क्षणात पृथ्वीवरून चंद्रावर जाण्याची. खरंतर या स्वप्नांचा पिछा करता करता आपण पृथ्वी नष्ट करू. मग आपल्याला लवकरच चंद्रावर जावं लागेल.
हेही वाचा: आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी
आजच्या या स्थितीत आपली कोंडी होतेय. केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक कोंडी. त्याला कोण जबाबदा? केवळ निसर्ग? का मी, तुम्ही, आपण सारे? का आपलं प्रशासन? पर्यावरण संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारली नाही तर ही स्थिती कधीच बदलणार नाही. आज पावसाचं साचलेलं पाणी रस्त्यावर आहे, आपल्या ऍडव्हान्स गाडीत गुदमरून आपलाच जीव जातोय, आपल्या घरात आपलीच घाण आहे.
पावसाच्या पाण्याने संपूर्ण गावं, शहरं वाहून जातायत. पूराने माणसांचा जीव जातोय. एवढंच काय तर ज्या देवाला आपण मानतो, तो देवही पाण्यात बुडतोय. सिद्धिविनायक मंदिरात ही पावसाचं पाणी शिरलं होतं. प्रत्येक दिवशी कानावर पडणाऱ्या बातमीने जीवाचा थरकाप उडतोय, कोणी ट्राफिकमधे पाच तास अडकून होतं, कोणी ट्रेनमधे तर कोणी रेल्वे स्टेशनवर ३-४ तास खोळंबलं होतं, कोणी कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत होतं, तर कुठे दरड कोसळली होती, तर कुठे पुलावरून ओसंडून वाहण्याऱ्या पाण्यात गाड्या वाहून जात होत्या. कुठे पूर, कुठे ढगफुटी, कोणाचा मॅनहोलमधे पडून जीव गेला.
रोज ८-१० तास नोकरी करून परतणारे वेळेत सुखरुप घरी येतील की नाही अशी भिती वाटत असते. आपण हे संकट आपल्यावर येण्यापर्यंतची वाट बघणार आहोत का? आपण आपली लालसा इतकी वाढवणार आहोत का? आपल्या हातातून सगळ्या गोष्टी निसटून जात आहेत. ऐवढा पाऊस का? हा प्रश्न आज प्रत्येकाला पडला आहे. याचं कारण आहे आपली लालसा, पृथ्वीला ओरबाडून अंधाधुंद विकास करण्याचा स्वार्थी हेतू.
हेही वाचा: देश का नेता कैसा हो, गणपती बप्पा जैसा हो!
विकास, नेमका कुठला विकास? सध्याची परिस्थिती पाहता ज्या दुर्घटना घडत आहेत मग ते पूर असो किंवा दुष्काळ, भूकंप असो किंवा त्सुनामी, वादळ असो किंवा गारांचा पाऊस याला आपण विकास म्हणतो का? निसर्गाचे चक्र असंतुलित होण्यामागे मानवाचा स्वार्थ आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. म्हणूनच या दुर्घटना नैसर्गिक आपदा नसून मानवनिर्मित विध्वंस आहे, असं म्हणायला हरकत नाही. निसर्ग संकेत देतोय आतातरी आपण त्याचे संकेत समजायला हवे. काळ नाही पण वेळ अजूनही आपल्या हातात आहे. या चक्राला पुन्हा संतुलित करण्याची जबाबदारी आपली आहे.
स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गाकडून किती घ्यायला हवं आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी किती सोडून द्यायला हवं, या दोघांमधे संतुलन असणं गरजेचं आहे. आज हे स्पष्ट होत चाललंय की पर्यावरणाच्या संरक्षणाशिवाय आपण स्थायी विकास करू शकत नाही.
पर्यावरण हा विषय आता सामान्य राहिला नाही. या जीवनावश्यक विषयाला घेऊन ‘थिएटर ऑफ रेलेवंस' नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी, रंगचिंतक मंजुल भारद्वाज या ‘पर्यावरण’ हे नाटक जनसामान्यात रुजवत आहेत. त्यांनीच या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. नवीन संकल्प घेऊन प्रत्येक माणसात निसर्गाला जपण्याची आणि त्याच्या संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी यावर्षी गणेशोत्सवात 'पर्यावरण' हे नाटक मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या भागात प्रस्तुत केलं.
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, दिपक खेमनर, सायली पावसकर हे कलाकार रस्त्यावर उतरून थेट जनमानसाला भिडत आहेत. आम्ही एक पाऊल उचलले, आता अपेक्षा आपल्या प्रत्येकाकडून आहे.
हेही वाचा:
भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग
आसाममधे फेल गेलेली एनआरसी महाराष्ट्राच्या उरावर बसणार?
आवाजाइतकंच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट
रेडीचा गणपतीः महाराष्ट्रात एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा
(लेखिका या रंगकर्मी आहेत.)