केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला. देशातले अनेक उद्योग मंदीच्या विळख्यात सापडलेत. पण पॅथॉलॉजी कंपन्याचा धंदा मात्र तेजीत आहे. छोट्या सेंटर्संसाठी मोठ्या संधींचा काळ निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी नव्या आयडिया बाजारात आणल्यात.
आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो. बऱ्याचदा डॉक्टर काही टेस्ट करायला सांगतात. मग त्या टेस्टच्या रिपोर्टनुसार डॉक्टर उपचार करतात. दिलेल्या टेस्ट करण्यासाठी आपण पॅथॉलॉजी सेंटरमधे जातो. सध्या आपण, आपले कुटुंबीय किंवा आपल्या ओळखीतले महिन्या दोन महिन्यातून पॅथॉलॉजीमधे जाताना हमखास दिसतात.
सध्या या महागाईच्या काळात आपण काटकसर करून घर चालवतोय. आपले खर्च कमी करतोय. पण या बदलत्या जीवनशैलीत आजारपणच एवढी वाढतायत की खर्चाला पर्याय नाही. आता तर १४, १५ व्या वर्षांपासून मुलांना गंभीर आजार होऊ लागलेत. साठीनंतर येणारे आजार चाळीशीनंतर येऊ लागलेत. शाळा, कॉलेजात शिकणाऱ्य़ा मुलांना नवेनवे आजार होतायत. काही आजार तर असे आहेत ज्याचं आपण पूर्वी कधी नावही ऐकलं नाही.
आजार कन्फर्म करण्यासाठी, त्याची तीव्रता तपासण्यासाठी, आजारातले बदल समजून घेण्यासाठी वारंवार टेस्ट कराव्या लागतात. आणि त्यासाठी पॅथॉलॉजी सेंटर गाठावं लागतं. त्यात डायबिटीस, थायरॉईड, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचं प्रमाण वाढलंय. हे आजार असलेल्यांना दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला टेस्ट करावी लागते. ज्यामुळे आजारात काय फरक पडला याचं मॉनिटरिंग करता येतं. म्हणजे एकूणच पॅथॉलॉजी आपल्या बदलत्या जीवनाचा जणू भागच झालंय.
पॅथॉलॉजीची सुरवात प्राचीन ग्रीकमधे झाली. फादर ऑफ मेडिसिन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर हिप्पोक्रेट्स यांनी आजारांची लक्षणं आणि ती ओळखणं इत्यादी गोष्टींची सुरवात केली. पुढे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात हिरोफिलस आणि इरासिस्ट्राटस यांनी त्यात भर घातली.
पॅथॉलॉजीचा खऱ्या अर्थाने विकास झाला तो मिडल ईस्टमधल्या इस्लामिक गोल्डन एजमधे. म्हणजे ८ ते १४ व्या शतकामधे. नंतर पश्चिमी युरोपात इटालियन नव वसाहतीदरम्यान अर्थात १४ ते १७ व्या शतकात हे शास्त्र आणखी विकसित झालं. हा झाला पॅथॉलॉजीचा पूर्व इतिहास.
आताच्या मॉडर्न पॅथॉलॉजीचे जनक म्हणून रशियन डॉक्टर रुडोल्फ व्हर्चो यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी १८ व्या शतकात जर्मनीत राहून आपलं संशोधनाचं काम पूर्ण केलं, अशी माहिती येनपोयो युनिवर्सिटीने आपल्या वेबसाईटवर दिलीय. ही मेडिकल युनिवर्सिटी कर्नाटकात आहे.
भारतात १९२२मधे मॉडर्न पॅथॉलॉजी आली. म्हणजे पहिलं तपासणी केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र कोलकात्यात सुरू झालं, असं मेडिकल हिस्ट्री वेबसाईटवर लिहिलंय. आपल्यासाठी पॅथॉलॉजी म्हणजे जिथे ब्लड टेस्ट आणि डॉक्टरने सांगितलेल्या इतर टेस्ट करता येतात ते ठिकाण किंवा केंद्र. पण पॅथॉलॉजीचे एकूण १३ वेगवेगळे उपप्रकार आहेत.
या प्रकारांमधे ब्लड, शरीराच्या आतले टिश्यू, आतड्या, पेशी, फुफ्फुस तसंच पोस्टमार्टम, त्वचा, मेंदू, किडनी इत्यादी प्रत्येक शरीराच्या प्रत्येक घटकासाठी वेगळी पॅथॉलॉजी असते. म्हणजे फक्त सेंटर आणि मशीन नाही तर तंत्रसुद्धा वेगळं असतं. न्यूज मेडिकल लाईफ सायंसेस या वेबसाईटवर या प्रकारांची माहिती देण्यात आलीय.
हेही वाचा: लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?
डॉक्टरकी हे एक सामाजिक कार्य आहे, असं आपण वेळोवेळी ऐकतो. आपले आजी-आजोबाही आपल्याला तसं सांगतात. पण हा एक व्यवसायच आहे. त्यामुळे डॉक्टर, हॉस्पिटल आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टींचं प्रमोशन होतानाही आपण बघतो. सध्या डायग्नॉस्टिक सर्विसेस अशी एक टर्म वापरली जाते. म्हणजे यात आजारांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सेवा. जसं की अद्ययावत मशिन, प्रयोगशाळा, औषधं आणि पॅथॉलॉजी इत्यादी.
सध्या भारतात डायग्नॉस्टिक सर्विसेसची डिमांड मोठ्या प्रमाणात वाढलीय. सध्या मे २०१९मधे आलेल्या आकडेवारीनुसार भारतात १० ते १२ टक्क्यांनी या क्षेत्राची वाढ झालीय. आणि या वाढीत ४८ टक्के वाटा हा पॅथॉलॉजी सेंटरचा आहे. पॅथॉलॉजी चेन आणि डायरेक्ट कन्ज्युमर असे प्रकारही वाढताना दिसाताहेत. यात ८ टक्क्यांची वाढ झाल्याचं डॉ. ओम मनचंदा यांनी एक्सप्रेस हेल्थकेअरशी बोलताना सांगितलं. ते दिल्लीतल्या डॉ. लाल पॅथ लॅबचे सीआओ आहेत.
२०२० पर्यंत डायग्नॉस्टिक सर्विस इंडस्ट्रीची एकूण वाढ १६ टक्क्यांनी होईल. आणि यातला ५८ टक्के वाटा हा पॅथलॉजी व्यवसायाचा असेल. म्हणजे ही इंडस्ट्री ८०२ कोटींची होईल, असं मनचंदा म्हणाले.
हेही वाचा: रिलायन्स जिओचं गिगा फायबर आपण कसं वापरू शकतो?
दुसरीकडे जवळपास ३८ टक्के अर्थतज्ज्ञ म्हणतात, की २०२० पर्यंत जगात मंदी येईल. आणि मंदीची चिन्हंही बाजारात दिसू लागलीत. या मंदीने जगाची अर्थव्यवस्था ४२ टक्क्यांनी घसरेल, अशी भीती अमेरिकेतल्या सीबीएस न्यूज चॅनलवरच्या एका चर्चेत व्यक्त करण्यात आलीय.
मंदीच्या परिस्थितीत पॅथॉलॉजीचा धंदा मात्र वाढणार यावर अनेक पॅथलॉजी चालवणारी मंडळी ठाम आहेत. कोणी आजारी पडलं की त्यावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टर टेस्ट करायला सांगतात. टेस्टचं हे प्रमाण ७० ते ७५ टक्के आहे, असा एक जागतिक सर्वसाधारण अंदाज आहे. सध्याची बदलती जीवनशैली, वातावरण बदल यामुळे सगळ्यांचं जीवन आजारांनी ग्रासलंय.
आपण पैशांची बचत करताना ब्रँडेड वस्तू, चैनीच्या वस्तू घेणं कमी करतो. अवास्तव खर्च कमी करतो. गरज नसलेल्या गोष्टी वापरणं टाळतो. पण तब्येत खूप महत्त्वाची असते. आपलं तब्येतच नीट नसेल तर काम कसं करणार आणि घर कसं चालवणार? पैसेच मिळाले नाहीत तर बचत करणार कशाची?
तब्येतीला आपण नेहमीच प्राधान्य देतो. अनेकजण आजारी पडल्यावर घाबरून जातात. छोटे छोटे आजार झाल्यावरही डॉक्टरकडे धावतात. आणि बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला योग्य निदान करण्यासाठी पॅथॉलॉजीत जाऊन टेस्ट करायला सांगतात. आणि मंदीच्या काळात आपण महागड्या, मोठ्या पॅथॉलॉजी सेंटरकडे जाण्याऐवजी छोट्यांकडे जाणं पसंत करतो.
मंदीच्या काळात छोट्या लॅबचा फायदा होऊ शकतो. कारण मोठ्या सेंटरचं टेस्ट पॅकेज महाग असतं. अशावेळी लोक छोट्या, स्वस्त सेंटरकडे येऊ शकतात, असं डॉ. अजय फडके यांनी एक्सप्रेस हेल्थकेअरला सांगितलं. डॉ. फडके हे एसएलआर डॉ. अविनाश फडके लॅबचे प्रमुख आहेत.
हेही वाचा: लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
सध्या भारतातल्या मोठ्या पॅथॉलॉजी सेंटरमधे अपोलो डाग्नॉस्टिक्स, मेट्रोपोलिस, डॉ. लाल पॅथ लॅब, थर्मो फिशर, क्विस्ट डायग्नॉस्टिक्स या कंपन्यांचं नाव घेतलं जातं. हे सेंटर्स एकदम प्रोफेशनल पद्धतीने काम करतात. ग्राहकांना अनेक सुविधा देतात. घरी येऊन तपासणी, २-४ टेस्टचं एकत्र पॅकेज, फॅमिली टेस्ट पॅकेज, डॉक्टरांचा सल्ला, प्री बुकिंग इत्यादी सुविधा देतात. तसंच आपल्यापासून त्या कंपनीचं जवळचं सेंटर कोणतं हेसुद्धा लोकेट करता येतं.
तिशीनंतर किंवा साठीनंतर काही टेस्ट करायच्या असतात किंवा रेग्युलर चेकअप करायचं असतं त्याचेही वेगळे पॅकेज या मोठ्या कंपन्या देतात. या लॅब अद्यायावत तर असतातच पण यात ३ हजार प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्टही होतात. ग्राहकांना डिस्काऊंट किंवा गिफ्ट किंवा हेल्थकिट वगैरेसारख्या गोष्टी देतात. जेणेकरून ग्राहक टिकून राहिल, असं कोअर डायग्नॉस्टिकच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख पिओस सारस्वत यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितलं.
भविष्यात डायग्नॉस्टिक सर्विस इंडस्ट्रीची ग्रोथ होईल न होईल. त्यापेक्षा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हा व्यवसाय वाढतोय याचा अर्थ देशाचं म्हणजेच आपलं आरोग्य धोक्यात आहे. आताच ३ हजार प्रकारच्या टेस्ट होतात. म्हणजे लोकांना किती प्रकारचे आजार होतात याचा अंदाज येईल.
हेही वाचा:
नरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही