बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

१४ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज मकर संक्रांत. वाण लुटून हळदीकुंकवाचे कार्यक्रम भरवण्याची आता लगबग सुरू होईल. तेवढंच बायकांना एकत्र यायचं कारण म्हणून या समारंभाकडे पाहिलं जातं. पण खरोखर, हळदीकुंकू बायकांचं असेल तर तो पुरुष केंद्रस्थानी का बनतो? बाईचा नवरा जिवंत आहे की नाही यावरुन तिनं हा सण साजरा करायचा की नाही हे का ठरतं? सण साजरा करायला काहीच हरकत नाही. पण त्यातले पुरुषकेंद्री विचार आपल्याला काढून टाकता येतील का? 

संक्रांत म्हटलं की जोडीने हळदीकुंकू समारंभ हा आलाच. या हळदीकुंकवात बाया एकमेकांना काहीतरी भेटवस्तू देतात. छोटे पावडरचे डबे, टिकल्यांची पाकिटं इथंपासून ते महागडे फ्लॉवर पॉट आणि पोळ्या गरम ठेवायचे डबे वगैरेही दिले जातात. त्याला ‘वाण लुटलं’ असं म्हटलं जातं.

खरंतर, पूर्वी वाण म्हणून वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोरं असा खाऊ एखाद्या मातीच्या भांड्यात देणं ही प्रथा होती. त्यातही आपापल्या ऐपतीप्रमाणे छोटी किंवा मोठी मातीची भांडी देत असत. आता भेटवस्तू देतात. इतर सणांचं झालं तसं संक्रातीचंही बाजारीकरण झाल्यामुळे धान्य सोडून वस्तू वाण म्हणून लुटण्याची कल्पना पुढे आल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या या काळात तर बायका मास्कचं वाण लुटणंही कमी करणार नाहीत.
 
कुणी यंदा पहिल्यांदाच सवाष्ण म्हणून हळदीकुंकवाला हजेरी लावेल. ती फार आनंदी असेल. तर कुणी विधवा झाल्यामुळे हळदीकुंकवाला जाता येत नाही म्हणून उदास झालं असेल. कोणाच्या मासिक पाळीमुळे हळदीकुंकू रखडलं असेल. तर कुणाचं अजून काही कारण ठरेल. काही स्त्रिया घरगुती समारंभ साजरा करतील तर काही ऑनलाईन, सार्वजनिक ठिकाणी हा सण साजरा करतील. प्रत्येक जण आपापल्या परीने हळदीकुंकू समारंभ साजरा करुन आनंद लुटतील. हे सगळं करताना‌ कळत, नकळत बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घातलं जाईल.

सण हेच भेदाचं कारण

आपला समाज हा आधुनिक विचारसरणीकडे वाटचाल करत आहे, असं बोललं जातं. पण याच समाजात नवरा असेल त्याच बाईनं हळदीकुंकू समारंभ साजरा करायचा ही संकल्पना जनमानसात रुजलीय. साहजिकच, काही बायकांना या सणात अजिबातच स्थान मिळत नाही. एखाद्या बाईचा नवरा मेला असेल किंवा सोडून गेला असेल तर तिला हळदीकुंकू न लावता फक्त पुजलं जातं, वाण दिलं जातं.

पुरुषभान संवादमंचाकडून लैंगिकतेवर काम करणाऱ्या आरती नाईक सांगतात, ‘पुरुषसत्ताक व्यवस्थेत कोणत्याही सणाकडे सहज भावनेतून पाहता येत नाही. या समारंभात महिला महिलांमधील भेद प्रकर्षाने दिसतो. जात, धर्म, वर्ग, वर्ण, आर्थिक, प्रादेशिक, शैक्षणिक परिस्थिती याबरोबरच नवऱ्याच्या असण्या नसण्याचा संबंध देखील सधवा-विधवा अशा भेदातून समोर आणला जातो, हे जास्त वाईट आहे.’

हेही वाचा : नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

मानवतेवरची खरी ‘संक्रांत’

मुळातच हा सण पुरुषकेंद्री असल्याने मोठ्याप्रमाणात लिंगभेद निर्माण होण्याचं कारण ठरतो. काही बायकाच सणात भाग घेऊ शकणार नसतील तर तिथं इतर लिंगाच्या लोकांची गोष्ट येतेच कुठे! नवरा नावाची गोष्टच नशिबी नसल्याने बाई आणि पुरुष या दोन जेंडरच्या पलिकडच्या बायांना हळदीकुंकवाला बोलावण्याचा संबंधच येत नाही. भारतीय सण सर्वसमावेशक असतात, असं आपण म्हणतो. ते अशावेळी हवेत विरुन जातं.

ज्या थोड्या थोडक्या बायकांना कार्यक्रमात यायची परवानगी असते त्यांनीही येताना साडीच नेसावी, टिकलीच लावावी हे आवर्जून सांगितलं जातं. प्रतिकांच्या बाजारामधे बाईला हमखास आवडलां जातं. हा बायकांचाच सण बायकांनीच कसा साजरा करायचा हेही समाज ठरवणार का? खरोखर हा स्त्रियांचा सण असतो तर पुरुष केंद्रस्थानी का ठरतो? याचा विचार करायला हवा.

'हळदीकुंकवाचं आमंत्रण त्या समारंभाला कोण जाण्यास पात्र आणि अपात्र आहे हे ठरवणारं असतं. यापेक्षा खऱ्या अर्थाने या समारंभातून केवळ महिला म्हणून व्यक्तिमत्व पाहत 'तिळगुळ समारंभ' असे पर्याय द्यायला हवेत. कोणत्याही भेदाशिवाय माणसांना त्यात मोकळेपणाने सहभागी होता येईल, तेव्हा खरी मानवतेवरची 'संक्रांत' दूर होईल,’ असं आरती नाईक म्हणतात.

हळदीकुंकवावरुन ठरतो स्टेटस

संक्रांतीच्या काळात महिलांची बाजारात, दुकानात खरेदी करताना झुंबड उडालेली दिसते. प्रत्येकजण आपल्या घरी यावर्षी काय वाण असेल याचा अगोदरच विचार करतात. त्याप्रमाणे पैशांची जुळवाजुळव करायला सुरवात करतात. पैसे नसतील‌ तर बचत गट, साठवणीतील पैसे किंवा भिशीचे वगैरे पैसे वापरतात. मग हळदीकुंकू समारंभ दिमाखात साजरा केला जातो.

यावर्षी कुणी काय दिलं, आता पुढच्या वर्षी काय असेल याविषयी गप्पा रंगतात. यातून प्रत्येक बाईच्या आर्थिक परिस्थितीवर बोललं जातं. खरंतर, बाईच्याही नाही तर तिच्या नवऱ्याकडे किती पैसे आहेत यावरुन समाजातला तिचा स्तर ठरतो. हळूच दुसरीला टोमणे दिले जातात.एखाद्या वस्तूवरुन गरीब, श्रीमंत असं मोजमाप केलं जातं. शहरात तर हे प्रकार सर्रासपणे घडताना दिसून येतात.

यात शेतकरी कुटुंबातली बाई खरी श्रीमंत ठरते. तिला नसतो वेळ असली मोजमाप करायला. ती आसपासच्या चार बायकांना बोलवते. कधी फळं देते तर कधी फुलं देते. सण, समारंभ साजरा करुन शेतीच्या कामाला लागते.

पण शहरात ही परिस्थिती वेगळी दिसते. आपण किती श्रीमंत आहोत किंवा नवऱ्याने किती साड्या घेतल्या, सोनं केलं, भेटवस्तू कोणती यांची स्पर्धा सुरू होते. या सगळ्यात भरडली जाते ती सामान्य वर्गातली बाई! तिलाही हे सारं करायला, कृत्रिम दुनियेत जगायला आवडतं असतं. पण ती फक्त आरशात बघत राहते. स्वतःचं मोजमाप काढत राहते. मग स्वतःला आणि नशीबाला दोष देत जगते. यातूनच वैचारिक, सामाजिक राजकारणाची ठिणगी पडते.

हेही वाचा : लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

सणांचं राजकारण आणि मतांचा पाऊस

अनेक राजकारणी मंडळी खास सणांचं निमित्त साधून मत मिळवण्यासाठी डाव आखतात. हळदकुंकू हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा सण मानला जातो. मग राजकारणी मंडळी भव्य मैदानावर मंडप उभारतात. लगेच हळदीकुंकू आणि वाण घेण्यासाठी रांगा लागतात. वेगवेगळ्या स्पर्धा, आमंत्रणं, पत्रिका आणि बाजार असं सगळं घडवून आणलं जातं. 

तेवढ्यात राजकारणी फिरतात आणि स्वतःला मिरवतात. आपली लाळ गाळतात. महिलावर्गाला मतांच्या बाजारात ओढतात. मग लगेच निवडणुकीच्या वेळी‌ मतांचा पाऊस पडतो. कित्येक महिलावर्ग घोळक्याने हे समारंभ साजरे करतात.पण ही साखळी का तयार झाली? कशासाठी? सणाला राजकारणी वळण का देतात? असे प्रश्न आपल्याला पडच नाहीत.

हळदीकुंकू नको, तिळगूळ समारंभ

प्रत्येक स्त्रीने या सगळ्यात अडकताना एकदा तरी विवेकी विचार करणं ही काळाची आवश्यकता आहे. हा थाट मांडण्याऱ्यांनी सणांचं बाजारीकरण थांबवण्याचीही गरज आहे. अनेक महिलांसाठी घराबाहेर पडायला हा सण निमित्त ठरत असेल. काही जणी आनंदासाठी, थोडा बदल म्हणून एकत्र येत असतील. काहीजणींची गप्पा आणि गाण्यांची मैफल रंगत असेल. त्यामुळे हा सण साजरा करायला हरकत नाही. 

पण हळदीकुंकूच्या प्रतिकात्मक गोष्टीत स्त्रियांनी अडकण्यापेक्षा फक्त तिळगुळ समारंभ साजरा करा. तिळगुळ बनवताना पुरुषांना देखील मदत करायला लावा. यामुळे पुरुषकेंद्री सणांचा बाजार नष्ट होईल. मग लिंगभेदाला समानतेची शिकवण मिळेल. जगात विवेकी बदल नक्कीच घडून येईल. हे सारं करताना माणुसकीची शिकवण आणि माणूस म्हणून जगणं विसरता कामा नये.

हेही वाचा : 

बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?

बुद्धांच्या मार्गाने जाणारे विवेकानंद आपल्याला माहीत आहेत का?

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!