मुंबईमधे हिंदू साजरा करतात मुसलमान औलियाचा उरूस

०४ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


गोविंदाचे थर लावणारी, गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी हातिसकर वाडीतली मंडळी नव्या वर्षाचं कँलेंडर आणल्याबरोबर पहिल्यांदा माघ पौर्णिमा कधी आहे ते बघतात. कारण त्या दिवशी असतो पीर बाबरशेखचा उरुस. खरं तर या दिवशी उरुसाचा मुख्य कार्यक्रम होतो तो रत्नागिरीतल्या हातिसमधे. पण हिंदू-मुसलमान ऐक्याचा हा सोहळा याच दिवशी मुंबईतही दणक्यात साजरा होतो.

जुन्या प्रभादेवीतील हातिसकरवाडी. एकदम पोस्टल पत्ता हवा असेल तर संगीतरत्न एकनाथबुवा हातिसकर मार्ग येथे रविवारी ५ फेब्रुवारीच्या रात्री फुलटू जत्रेचा माहोल असणार. हार-नारळाची दुकानं, खेळण्यापासून खाण्यापर्यंतची दुकानं, रोषणाई, बँडबाजा सगळंसगळं असणार. एक झेंडा भगवा आणि एक झेंडा हिरवा. त्याच प्रमाणे सर्वधर्मातील, सर्व जातीतील लोकं जमणार. स्थानिकांसोबत माहेरवाशिणी येणार, पावणेरावणे येणार. मग धुपाच्या सुगंधात आणि वाजंत्रीच्या साथीनं पीर बाबाच्या ठिकाणाहून गिलाफ आणला जाणार आणि सगळ्यांचे हात नमस्कारासाठी जोडले जाणार.

गेली कित्येक वर्ष हे असंच सुरू आहे. हिंदू-मुसलमानांमधे कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी हा गंगा-जमुनी तहजीब सांगणारा सोहळा तसाच सुरू आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया' म्हणजे नक्की काय ते इथं कळतं. अजमेरच्या दर्ग्यात दिवाळी होते आणि हातिसच्या दर्ग्यात हिंदू उरूस करतात. हा खरा भारत आहे.  कितीही काहीही झालं तरी हा भारत असाच आचंद्रसूर्य राहायला हवा असेल तर उरुस नीट समजून घ्यायला हवा.

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

हातिसच्या उरुसाची गोष्ट

कोकणात आलेला इस्लाम हा व्यापाऱ्यांच्या बोटीतून आलेला इस्लाम आहे. तो उत्तरेकडे जसा आक्रमकांचा टोळ्यांसोबत आला तसा आलेला नाही. त्यामुळेच कोकणात हिंदू-मुसलमान तेढ जवळपास नव्हतीच. मध्यंतरीच्या काळात ती वाढविण्याचा प्रयत्न झाला. पण अद्याप तरी तिला फारसं यश आलेलं नाही. कोकणात होणारे उरुस आणि हिंदुंच्या शिमग्यासारख्या सणात असलेला मुसलमानांचा परंपरागत सहभाग आजही कायम आहे. तो टिकवून ठेवणं, हे आजचं खरं आव्हान आहे.

हातिस हे रत्नागिरी शहरापासून १८ किलोमीटरवर असलेलं काजळी नदीकाठचं गाव. तिथं दरवर्षी पीर बाबरशेक औलिया याचा उरुस होतो. माघ महिन्यातील पौर्णिमेला हा उरुस होतो. दोन दिवस सोहळा चालतो. या दर्ग्याला पीर बाबरशेख बाबांचं मंदिर किंवा दर्गा असं दोन्ही म्हटलं जातं. तिथल्या पूजेचा मान हा नागवेकर कुटुंबांकडे आहे. गावात मुसलमानांचं घर नाही. पण तरीही या दर्ग्यात नियमित पूजा होते.

उरुसाच्या दिवशी होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळील इब्राहमपट्टण गावातील मुसलमान कुटुंबातील मंडळी ही देखील मानकरी आहेत. त्या दिवशी होणाऱ्या चंदनलेपन, गालिफ आदी विधींसाठी ही मुसलमान मंडळीही हिंदूसोबत या उरुसामधे सहभागी होतात. उरुसानिमित्त गावात मोठी जत्रा लागते. संपूर्ण रत्नागिरीसह, मुुंबई आणि परदेशातूनही लोक या उरुसासाठी येतात.  परदेशी विद्यापीठातील अभ्यासकांनीही या उरुसावर संशोधन प्रसिद्ध केलेलं आहे.

सुफी सांप्रदाय आणि हातिसचा दर्गा

हातिसमधे ज्या पीर बाबरशेख यांचा दर्गा आहे. त्यांच्याविषयी फार माहिती उपलब्ध नाही. पण काहीशे वर्षांपूर्वी गावात पीर बाबरशेख नावाचे बाबा आले होते. त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला. लोकांच्या समस्याचं निवारण केलं. लोकांनी जे दिलं ते खाल्लं. अशी साधारणतः शिर्डीच्या साईबाबांच्या जशी गोष्ट सांगतात तशीच गोष्ट या पीर बाबरशेखांची गावात सांगितली जाते. पण सुफी सांप्रदायाच्या अनेक साधूंबद्दल एवढीच माहिती उपलब्ध होते.

सुफी हा सांप्रदाय भक्ती आणि प्रेमाचं नातं जोडणारा म्हणून ओळखला जातो. इसवी सन तेराव्या शतकात काही सूफी संत दक्षिण भारतात आले. त्या दरम्यानचाच हा दर्गा असावा. सर्वसाधारणपणे कोणत्याही सुफी सांप्रदायाच्या ठिकाणी सर्वधर्मियांचा वावर आणि सास्कृतिक संगम झालेला दिसतो. कोकणात हा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. त्यामुळे कोकणात हिंदू-मुसलमान तेढ जेवढी इतरत्र दिसते, तेवढी कधीच विकोपाला गेली नाही.

हातीसच्या दर्ग्याप्रमाणे रत्नागिरीतच सोमेश्वरचा हसनशेख, नारायणमळीचा हुसेनशेख, पावसाचा अलिशेख, महंमद शेख, भाट्याचा करवंदशहा शेख आणि लाड बिबी यांचेही उरूस होतात. तिथेही हिंदू-मुसलमान ऐक्य दिसून येते. या व्यतिरिक्त कोकणातील अनेक मंदिरासाठी मुसलमान व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणग्या, जमिनी यांचे किस्से आहेत. एकंदरित कोकणात हा भाईचारा गेली कित्येक शतके असाच सुरू असल्याचे दिसतो.

हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

हातिसचा हा उरुस मुंबईत कसा आला?

प्रभादेवी हा गिरणगावाचाच हिस्सा. मुंबई वाढू लागली आणि कोकणातील बंदरातून अनेक चाकरमानी बोचकी घेऊन भाऊच्या धक्क्यावर उतरले. त्यातील काही जण गिरगावातल्या चाळीत गेले तर काही लालबाग-परळमधे आले.  दादरजवळच्या आगर बाजारात किंवा प्रभादेवीच्या समुद्र किनाऱ्याजवळ अनेक आगरी-भंडाऱ्यांच्या वाड्या होत्या. तिथंही काहीजण आपल्या नातेवाईकांकडे राहू लागले. कपड्याच्या गिरण्यामधे कामाला लागले. शिफ्टनुसार काम करायचं आणि उरलेल्या वेळेत गावच्या आठवणी काढत राहायचे हा त्यांचा विरंगुळा.

दरवेळी गावाला जाणं परवडणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यांनी मुंबईतच गाव आणला. गावचे सण परंपरा मुंबईतच सुरू झाल्या. नारळीपौर्णिमेला नारळ फोडायचे, श्रावणात भजनं म्हणायची, गोविंदाला थर रचायचे, गणपतीमधे आरत्या करायच्या आणि शिमग्याला नमन नाचावायची ती मुंबईतच. बघताबघता सगळे सण मुंबईत आले. एवढे सण आले तर गावचा उरुस नाय का येणार? तो पण आला. हातिस गावातील मंडळीची वस्ती असणाऱ्या हातिसकर वाडीत हातिसचा उरुस सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.

प्रभादेवीला होणारा उरुसही त्याच तारखांना होतो, ज्या दिवशी हातिसला उरुस होतो.  तिथेेही नेहमीच्या ठिकाणी पीर बाबरशेखांची स्मृती असेलल्या शिलेला चंदनलेपन, चादर चढविणे आदी विधी केल्या जातात. तसेच गिलाफ म्हणजे नक्षीदार चादरीची मिरवणूक काढली जाते. नारळाच्या वाटीत दिवे पेटवले जातात आणि कोणत्याही देवळात होतात तशा विधीही होतात. लोक फुलं, नारळ, उदबत्त्या वाहतात. ज्या ठिकाणी ही पूजा होते तिथे वर दोन झेंडे फडकत असतात एक असतो भगवा आणि एक असतो हिरवा…

कोकणातील लोकांची विशेष गर्दी

हातीसकर वाडीत होणाऱ्या या उरुसासाठी कोकणातील लोकांची विशेष गर्दी असते. कारण ज्यांना हातिसला उरुसासाठी जाता येत नाही ते कोकणातील भाविक त्यादिवशी किमान प्रभादेवीला तरी येतात. अनेकांच्या मनोकामना येथे पूर्ण होतात, अशी श्रद्धा असल्याने नवस फेडणाऱ्यांचीही गर्दी असते. शेवटी श्रद्धेसोबत काही अंधश्रद्धाही एकत्र वाढतात. त्या इथे नाहीत, असे म्हणण्याचं काहीच कारण नाही.

हे सगळं जरी असलं तरी त्यातील नोंद घ्यावी असा मुद्दा म्हणजे धर्मातील कडवेपणा संपविण्याचा. आज सगळा देश हिंदू-मुसलमान द्वेषाचे परिणाम भोगत असताना, देशातील हे 'सलोख्याचे प्रदेश' जपले जायला हवेत. आज जो भाग फक्त श्रद्धेचा आहे त्यातील सामाजिक सलोखा वाढत जायला हवा. हे होऊ शकेल, फक्त द्वेष पेरणाऱ्यांच्या विचारांपासून या परंपरांचं रक्षण करायला हवं.

आजही हातिसकर वाडीतील मंडळाचं नाव, बाबरशेख क्रीडा मंडळ असंच आहे. तिथं होणाऱ्या कोणत्याही उत्सवाच्या वेळी दर्ग्यातील बाबरशेख बाबांचं स्मरण केलं जातं. खास करून गोविंदाच्या सरावाला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पोरं पीर बाबरशेखाला मानाचा नारळ देऊनच पहिला थर लावतात. भारत नावाचं गूढ रसायन या धर्मांच्या सरमिसळीमधेच आहे. इतिहास साक्ष आहे की, अनेकांनी प्रयत्न करूनही आजवर ते कुणाला संपवता आलं नाही, येणारही नाही.

हेही वाचाः 

खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

कॅनडातला इराणी म्हणतो, जॉर्ज फर्नांडिस माझा बाप!

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा पेटवणं कुणाच्या हिताचं?