५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'साने गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात सोशल मीडियातून वायरल झाल्या. पण या पराक्रमींनी खटल्याच्या भयाने आठवणी कशा फेकल्या-लपवल्या याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत.
'भाजप' ही 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'ची राजकीय शाखा आहे. 'हिंदू राष्ट्र' निर्माणासाठी 'हिंदू संघटन' हा संघाचा मूळ उद्देश आहे. त्यात 'ब्राह्मण धर्मसत्तेचं संरक्षण' हा छुपा अजेंडा आहेच आहे. असो. आजवर संघ प्रचारकांनी 'द्वितीय सरसंघचालक' गोळवलकर गुरुजींच्या आठवणी सांगत; त्यातून हिंदूंत मुस्लीम द्वेष वाढवत 'हिंदू संघटन' करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तो देशहितासाठी घातक होता आणि आहे.
२७ वर्षांपूर्वी बाबरी मशिदीचा विध्वंस रामसेवकांनी करताच, 'आम्ही मशीद पाडलीच नाही; आम्ही नवे मंदिर उभारण्यासाठी जुने मंदिर पाडले,' अशा प्रतिक्रिया 'भाजप-संघ' नेत्यांनी दिल्या. हा दात विचकून अंगावर धावून बघणाऱ्या कुत्र्याने अचानक मागच्या दोन पायांत शेपूट घालून 'कुंईकुंई' करीत कुंथण्याचाच प्रकार होता. तो अटळ होता. कारण, जे घडले ते अनपेक्षित होते.
१९९०मधे लालकृष्ण अडवाणी यांनी 'राम जन्मभूमी मंदिर' निर्माणासाठी 'रथयात्रा' काढली. त्याच्या पुढे-मागे नळाचंच पाणी 'गंगाजल' म्हणून विकण्याचा आणि देशभरातून अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी विटा जमवण्याचा 'बजरंगी' कार्यक्रम झाला. १९९१ला मंदिर निर्माणासाठी पहिली कारसेवा झाली. 'कारसेवा' हा शब्द गुरुद्वारात शीख बांधव जे सेवाकार्य करतात त्याला धरून आहे.
हे 'कारसेवक' तेव्हा अयोध्येत 'बाबरी' पाडायला गेले नव्हते; तर आपण पाठवलेल्या 'रामनामां'च्या विटांचे मंदिर बांधायला आले होते. त्यातल्या एका गटाने 'बाबरी'वर चढून भगवा फडकावण्याचा आततायीपणा केला. त्यांना सबुरीने ताब्यात न घेता; तेव्हाच्या 'मुलायमसिंह यादव सरकार'च्या पोलिसांनी कारसेवकांवर बेछूट गोळीबार केला, तो अमानुषपणा संतापकारी होता. त्याच्या अयोध्येत दिसणाऱ्या खुणा ६ डिसेंबर १९९२च्या कारसेवेसाठी जमलेल्या बर्यािच कारसेवकांच्या डोक्यात गेल्या.
दरम्यानच्या २ वर्षांच्या काळात 'राम जन्मभूमी मंदिर न्यास'च्या माध्यमातून 'विश्व हिंदू परिषद'ने 'बाबरी' भोवतीच्या जागा विकत घेऊन मंदिर निर्माणाच्या कामात 'बाबरी'ला धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊन तणाव दूर केला होता. त्यामुळेच या कारसेवेचे आयोजन झाले होते. देशभरातून लाखो 'कारसेवक' अयोध्येत जमले होते, ते आपण पाठवलेल्या विटांनी मंदिर बांधण्यासाठी.
हेही वाचा : मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे
तो मंदिर भूमिपूजनाचाच कार्यक्रम होता. तथापि, त्यांना 'शरयुची मूठभर वाळू आणि लोटाभर पाणी टाकून अयोध्येतून सटका,' अशा सूचना दिल्या गेल्याने भूमिपूजन सोहळ्यात त्यांची सटकली. त्यांनी 'भाजप-संघ' नेत्यांचे, संत-महंत-मठाधिपतींचे आदेश झुगारून 'बाबरी'वर चाल केली. तेव्हा 'संघ-भाजप' नेत्यांची झालेली घबराट पाहण्यासारखी होती. त्यांच्यापैकी कुणीही विरोध केला असता, तर आक्रमक झालेल्या कारसेवकांनी त्यांचीही 'बाबरी' केली असती! इतके हे कारसेवक पेटले होते.
त्याला कारणही तसेच होते. एक तर, त्यांना 'मंदिर वही बनायेंगे चे कारण सांगून आणले होते. ती शुद्ध फसवणूक असल्याचे कारसेवकांच्या लक्षात आले. दुसरे म्हणजे, वारंवार उन्मादकारी, आक्रस्ताळे राजकारण करून आपले राजकीय स्वार्थ साधणाऱ्या अल्पसंख्याकांच्या नेत्यांना सफाचाट करण्यासाठी हिंदूही आक्रमक होऊ शकतो, हे दाखवण्याची संधी आहे, हे आक्रमक कारसेवकांनी हेरले होते. त्यानुसार त्यांनी 'बाबरी' भुईसपाट केली!
स्पष्टच सांगायचे तर, 'भाजप-संघ' परिवार आणि तेव्हाच्या सत्ताधारी 'काँग्रेस' पक्षाने आपल्या स्वार्थासाठी जे डावपेचांचे राजकारण चालवले होते; ते स्वार्थी राजकारण लोकांनी आततायीपणाने का होईना पण संपवले.
आता ५ ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. त्या निमित्ताने 'बाबरी' उद्ध्वस्त करणाऱ्या कारसेवेच्या संघटकांच्या आणि संघ प्रचारकांच्या पराक्रमाच्या आठवणी 'गुरुजींच्या आठवणी'च्या थाटात 'सोशल मीडिया'तून प्रसारित झाल्यात. तथापि, या पराक्रमींनी 'बाबरी' पतनाच्या आठवणींसाठी, ढिगार्या तून जमवलेल्या दगड-विटा घरी परतेपर्यंत खटल्याच्या भयाने कशा फेकल्या- लपवल्या, याच्या सुरस-चमत्कारिक अनेक कहाण्या आहेत.
'गुरुजींच्या आठवणी' जशा फसव्या; म्हणजे 'हिंदू संघटना'ऐवजी परधर्मद्वेष वाढवणाऱ्या होत्या; तशाच आता सुरू होणाऱ्या 'राम मंदिर निर्माणा'च्या आठवणी नटव्या आहेत. भेकडाचे शौर्य सांगणाऱ्या आहेत. त्यातून 'पाडली ती मशीद होती की मंदिर होते? अयोध्येत मंदिर बांधायला गेला होता की, मशीद पाडायला?' या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. म्हणूनच मंदिराचे भूमिपूजन केले म्हणायचे! 'बाबरी'चे श्राद्ध घातले, म्हणायची हिंमत नाही! तथापि, सत्य सत्तेला दडवता येते; बदलवता वा संपवता येत नाही, येणारही नाही!
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
'राम जन्मभूमी मंदिर' निर्माणाच्या माध्यमातून लालकृष्ण आडवाणी यांनी 'हिंदू वोट बँके'चा पाया रचला आणि नरेंद्र मोदींनी 'हिंदू कट्टर वादा'च्या बळावर सत्तेचा कळस गाठला, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यासाठी वीर सावरकर यांच्या शब्दांत सांगायचं तर, 'अवघ्या राष्ट्राची बुद्धीहत्या केली आहे!' देशाला पुरते भ्रमिष्ट बनवून टाकले आहे. 'विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून 'राम मंदिर' उभे राहतेय,' असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पण त्यासाठी संघाचं छाटलं गेलेलं नाक, देवेंद्रजी कधी पाहणार?सत्तालोलुपता आणि व्यक्तिमाहात्म्यास 'भाजप-संघ' परिवाराचा सक्त विरोध असल्याचे सांगितले जाते.
तथापि, सत्तेसाठी मोदी-शहा जोडीने काय करायचे बाकी ठेवलेय? पक्ष आणि संघ परिवार यांना सत्तेची रसद पुरवण्याच्या पराक्रमाशिवाय, मोदींनी प्रधानमंत्री म्हणून गेल्या सहा वर्षांत 'देशापेक्षाही मोठे व्हावेत' असा कोणता पराक्रम केलाय? फार तर, देशाची घडी विस्कटून ते देशापेक्षा मोठे झाले असतील; पण त्याने संघाची जी 'कथित' त्यागाची, देशभक्तीची, धर्माची, हिंदुत्वाची, हिंदूराष्ट्रवादाची 'झाकली मूठ' उघडी पडली, त्याचं काय?
'राष्ट्रीय थिंक टँक' म्हणवणार्याव 'संघ कारभाऱ्यां'च्या बुद्धिमत्तेचा पंचनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारभारातून केलाच आहे. त्याचे दुष्परिणाम सत्ता गेल्यावर 'संघ-भाजप' नेत्यांना मान्य करावे लागणारच आहेत. तेव्हा त्याची किंमतही चुकती करावी लागेल. पण आज, या चुकांची किंमत सारा देश चुकती करतोय. मोदींच्या 'नोटबंदी'ने दहशतवाद संपला नाही. त्याचप्रमाणे 'राम जन्मभूमी मंदिर निर्माणा'ने रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि जगण्याशी संबंधित अन्य समस्याही सुटणार नाहीत. हे हिंदूंना जितकं लवकर समजेल, तितकं देशाचे लवकर भलं होईल. हा बदल 'देश सर्वप्रथम' या संघ-शिकवणीनुसार केला पाहिजे!
हेही वाचा :
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत
पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज
(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक असून हा लेख चित्रलेखाच्या १७ ऑगस्ट २०२०च्या अंकातील संपादकीय आहे.)