इग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे?

०२ जुलै २०२१

वाचन वेळ : १० मिनिटं


इंदिरा गांधी ओपन युनिवर्सिटीनं मास्टर्स ऑफ आर्ट्स इन ऍस्ट्रॉलॉजी हा ज्योतिषशास्त्रावरचा कोर्स चालू केलाय. ज्योतिषशास्त्र खोटं आहे की खरं हा नंतरचा मुद्दा. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं बरोबर नाही असं म्हणत सोशल मीडियावरून भरपूर टीका केली जातेय. त्यातल्या काही फेसबुक पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत.

'द पीपल्स युनिवर्सिटी' म्हणजेच लोकांचं विद्यापीठ अशी टॅगलाइन असणारं  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच ‘इग्नू’. संसदेत पारित झालेल्या १९८५ च्या कायद्यानुसार या युनिवर्सिटीची स्थापना करण्यात आली.  ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे वेगवेगळे कोर्स इथं उपलब्ध आहेत. लेक्चर, हजेरी, कॉलेज असं काही करायची गरज नाही. ऍडमिशन घेतली की पुस्तकं थेट घरी येतात. त्यातला मजकूर इतका दर्जेदार असतो की काही जण फक्त पुस्तकं मिळावीत म्हणून ऍडमिसनचे पैसे भरतात.

इथल्या कोणत्याही कोर्सला देशभरात मान्यता असते. आता याच विद्यापीठात मास्टर ऑफ आर्ट्स ज्योतिष हा कोर्स सुरू केलाय. एकूण दोन वर्षाच्या या कोर्सची फी १२,६०० रूपये आहे. वेगवेगळ्या राज्यातल्या इग्नूच्या ५७ केंद्रांवर हा कोर्स उपलब्ध असेल. 

ज्ञानाची भूक भागण्यासाठी उभ्या केलेल्या विद्यापीठात अंधश्रद्धा का शिकवल्या जातायत असा प्रश्न विचाराण्यात येतोय. ज्योतिष हे विज्ञान आहे की तोथांड हा वाद आपल्याकडे अनेक वर्षांपासून चाललाय. त्याबद्दलचं प्रत्येकाचं मत वेगवेगळंही असू शकतं. पण विज्ञान म्हणून मान्यता न मिळालेल्या विषयाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणं हे निषेधार्ह असल्याचं म्हणणं अनेकांनी सोशल मीडियावर मांडलंय. त्यातल्या काही फेसबुकवरच्या पोस्टींचं संकलन करून इथं देत आहोत.

हेही वाचा : किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

हाय का नाय उल्टा प्रवास? :  किरण माने, अभिनेते

लै भारी व्हईल गड्या, ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमात आलं तर... पोरांना आधीच कळंल आपन पास होनार का नापास. 'अभ्यास' करायची गरजच नाय... पोरंपोरी कॉलेजमधीच आपापली 'पत्रिका' जुळवत्याल. घरी येऊन पोरं आईबापाची नीट कुंडली मांडत्याल. मास्तर दर म्हैन्याला कॉलेजात होमहवन करून शांतीफिंती करत्याल.. निस्ता जाळ आन् धूर्रर्रर्र!

काय राव.. काय चेष्टा चाल्लीय का काय तेच कळंना झालंय. आपन नक्की कुनीकडं चाल्लोय भावांनो? काळ असा आलाय की भविष्य सांगनार्‍यांना स्वत:च्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ते सुधरंना झालंय. पार भंजाळून गेल्यात सगळे ज्योतिषी! पैज लावुन सांगतो, आजबी एखाद्या ज्योतिषाकडं जा.. तुमी समोर बसल्यावर ते गपदिशी मास्क लावतंय तोंडाला!! म्हंजी भूतकाळ आन् वर्तमानकाळबी कळंना त्याला. तुमी दक्षिना देऊन गेल्याव ते स्वत:च्या भविष्याला घाबरुन दक्षिनेसकट सगळ्यावर सॅनीटायजर मारतंय!!!

एरवी मेडिकल सायन्सची टिंगल उडवनारे सगळे धुरंधर 'वॅक्सीनेशन'च्या लायनीत गपगुमान उभे र्‍हायलेत. एका बारक्या विषाणूनं सगळ्या जगाला टाळं लावलंय. एवढ्या मोठ्या साथरोगाचं भविष्य भल्याभल्या सेलीब्रिटी ज्योतिषांनाबी कळलं नव्हतं. अजूनबी कुनी माईचा लाल कुंडली मांडून हे सांगू शकत नाय की हे संकट कधी जानार! आन् आपन आता पोरांना ज्योतिष 'शास्त्रा'चा डिप्लोमा द्यायला चाल्लोय!! हाय का नाय उल्टा प्रवास?
तुकोबारायानं चारशे वर्षांपूर्वी यावर काय सांगीतलंय ऐकायचंय? ऐका :

"सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।। 
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळा ।।
रिद्धीसिद्धीचे साधक । वाचासिद्ध होती एक ।।
तुका म्हणे जाती । पुण्यक्षये अधोगती ।।"

आम्हाला शकुन-अपशकुन कळतं, आम्हाला भूतकाळ-भविष्यकाळ-वर्तमानकाळ यातलं सगळं अंतर्ज्ञान आहे.  अशा भाकडकथा सांगून पोट भरण्यासाठी जे भामटे जनसामान्यांना गंडा घालतात, अशांचा मला कंटाळा आहे. एवढंच नाही तर या लोकांना मी डोळ्यांपुढंही उभं करू इच्छीत नाही. हे लोक स्वत:ला रिद्धीसिद्धी प्राप्त असल्याचा आव आणतात. आम्ही वाचासिद्ध आहोत.. आम्हाला दैवी शक्ती प्राप्त झालीय की आम्ही जे बोलतो ते खरं होतं. अशा थापा मारून जनतेला फसवतात आणि स्वत:चे खिसे भरून घेतात! शेवटी तुका म्हणतो, ‘लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणारे स्वत:च अधोगतीला जातात. मग ते इतरांचं कल्याण काय करणार?’  म्हणून लोकहो, अशा भोंदूंपासून सावध रहा, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

आनखी काय सांगू दोस्तांनो? जमिनीवर पाय ठेवून भवतालाचं-जगण्याचं-व्यवहाराचं भान आणि जाण देनारी 'तुकारामाची गाथा' कॉलेजात शिकवायला पायजे का भविष्याचे अंतराळी 'अंदाज' बांधनारं ज्योतिष? बघा जमलं तर इचार करा.

इठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

हेही वाचा : महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

भविष्य उज्ज्वल पण भवितव्य नाही : डॉ. मोहन देस

ज्योतिष, भविष्यशास्त्र, ग्रह तारे मंगळ बिंगळ हे सारं गूढ खूप गंभीरपणे घेतलं जातं तेव्हा ते शास्त्र, विज्ञान म्हणून विद्यापीठात रीतसर समोरच्या दाराने आणलं जातं. किती तरी गोष्टी म्हणजे शिक्षण, प्रवेश, पास नापास, लग्न, नवरा चांगला किंवा बरा मिळणं, नोकरी, शेती उत्पन्न, पाणी, दुष्काळ, पाऊस, विस्थापन, धारण, वणवे, शेतीमालाला बाजारात भाव मिळणं, हुंडा, मिळालेली नोकरी टिकणं, प्रमोशन, घर, कर्ज, शेअर, व्यसन सुटणं, बाळंतपण, बाळंतपणात मृत्यू, मुलगा होणं,  आजारपण,  म्हैस गाभण राहाणं, दुधाला फॅट मिळणं, ट्रेनमधे जागा मिळणं,  आजारांच्या साथी, लस मिळणं, बेड मिळणं, ऑक्सिजन मिळणं, अपघात, हत्या, दंगली, युद्धं, मृत्यू, मृत्यूनंतरचा सन्मान हे सगळं सगळं बाय चान्स मिळालं तर मिळालं. नाही तर नाही. कधी कधी तर नाही म्हणजे नाहीच!

अशी अवस्था सगळ्यांची करून सोडायची. यावर उपाय काहीच नीट करायचे नाहीत, ‘बाय चान्स’ चा घटक नाहीसा करायचा प्रयत्न करायचाच नाही. काहीतरी केल्याचं दाखवायचं, तसा प्रयत्न समाजाने करावा असं सामूहिक वातावरण तयार होऊच द्यायचं नाही. सगळीकडे अनिश्चिततेचं भयाचं कृत्रिम पर्यावरण निर्माण करायचं. त्यासाठी माध्यमे वापरायची, काही लोकांना पगारावर ठेवायचं, एकमेकांचा द्वेष करायला शिकवायचं, प्रचंड प्रयत्न करूनही काही लोक, काही मुली, मुलं अपयशीच ठरणार अशी भक्कम रचनाच करायची. सर्वत्र अभावाचं वातावरण तेवत ठेवायचं.

सरकारनेही हीच वेळ हाच चान्स म्हणून ज्योतिष शास्त्राला विज्ञान म्हणायचं. त्याला उजाळा द्यायचा, कल्हई करून त्याची नीटपणे रीतसर शाळा कॉलेजात विद्यापीठात मांडामांड करायची! निधी देऊन त्याची गेलेली प्रतिष्ठा पुनः प्रदान करायची. असं करून सरकारने स्वतःचं भविष्य निश्चित उज्ज्वल करायचं, प्रजेचं, पुढच्या पिढीचं काही का होईना, मरेना का ती!

मात्र सरकारवर अशी वेळ येते आहे याचा अर्थ आता एकूणच परिस्थिती आणि हे मॅटर खूप गंभीर आहे. कारण वाढत्या अनिश्चिततेमुळे अशा गूढविद्येला यापुढे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. पण त्यात गुंग मग्न होणाऱ्यांचं भवितव्य खरोखरच शून्य आहे!

जयतु हिंदू राष्ट्रम : सागर एम

ज्योतिष विद्या अभ्यास शाखा इग्नू विद्यापीठाने या वर्षापासून सुरू केलीय. बाकीची विद्यापीठंही डिप्लोमा इन सत्यनारायण पूजा, अंत्यविधी पूजा, लग्न लावायची पूजा इत्यादी आणि डिर्गी इन नारायण नागबळी, कालसर्पसारखे अभ्यासक्रम सुरू करू शकतात. कुणी बेनिफिट्स ऑफ गायत्री मंत्र, इफेक्ट अँड एफिशियन्सी ऑफ मृत्यूंजय मंत्र यांत डॉक्टरेट करतील.

यापुढे आपणाल्या लसीफिसी शोधत बसायची गरज नाही. नवीन पूजा किंवा मंत्रही इतक्या अभ्यास-संशोधनानंतर शोधला जाऊ शकतो. अशीच एखादी नवीन पूजा किंवा आधीच्याच एखाद्या मंत्रानेच कुठलाही विषाणू, जिवाणू, आपत्ती आपण आधीच पळवून लावू. विश्व गुरू व्हायचं आहे आपल्याला आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
जयतु हिंदू राष्ट्रम!!!

हेही वाचा : डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

शिक्षण दैवाचे की कर्माचे? - पुरुषोत्तम आवारे पाटील, संपादक दैनिक अजिंक्य भारत

अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने सगळ्या विद्यापीठांना ज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे काम तत्कालीन मानव संसाधन विकासमंत्री डॉ.मुरलीमनोहर जोशी यांचं होतं. काही विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम सुरू केला. पण काही वर्षातच त्याच्या शाखा चालेना झाल्या. हा अनुभव पुढ्यात असताना पुन्हा केंद्रातल्या भाजप सरकारने कुंडल्या बाहेर काढल्यात. दैववादी लोकांच्या सरकारनं येणार्‍या पिढ्याही कशा दैववादी होतील याची तजवीज करून ठेवलीय.

मुळात ज्योतिष हे शास्त्र नाही. एखादी ज्ञानशाखा विद्यापीठात चालवली जाते तेव्हा ती सर्वसामान्य होण्यापूर्वी तिला अनेक निकषातून बाहेर पडावं लागतं. काही कसोट्यांवर स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्या विषयाचा एखादा सिद्धांत सगळीकडे एकच असावा लागतो. यापैकी काहीच ज्योतिषबाबत सत्याच्या कसोटीवर उतरत नाही.

लोकांना खगोल आणि फल ज्योतिष यांच्यातला फरक कळत नाही. ज्योतिष खोटं असेल तर मग पंचांगात सांगितलं जातं ते खरं कसं ठरतं असा भाबडा प्रश्न लोक करतात. त्यांना हे समजावून सांगण्याची गरज आहे की पंचांगात ६० टक्के बाबी आताच्या विज्ञान शाखा असलेल्या खगोलशास्त्रातून चोरलेल्या असतात. उद्या तुमच्या भाग्यात काय लिहिलंय किंवा जीवनात काय घडणार आहे हे सांगण्याची कोणतीही यंत्रणा जगभर कुठेही निर्माण झाली नाही.

कोणतीही व्यक्ती झोपेतून उठल्याबरोबर पेपर हातात घेत असेल तर त्यापैकी ९० टक्के लोक राशीभविष्य वाचतात. कोरोनाकाळात लोक घरात बंदिस्त असताना राशीत प्रवासाचा योग लिहिलेला असतो. थोडक्यात राशीभविष्य ही शुद्ध फोकनाड आणि ठोकताळे असतात हे शहाण्या व्यक्तींना सांगण्याची गरज पडत नाही. ज्यांचा आपल्या कर्तृत्वावर भरोसा नसतो अशी कोट्यवधी माणसे दररोज राशीभविष्य वाचत असतात.

सरकार कुणाचंही असो त्यांनी भावी पिढ्यांना उजेडाकडे न्यायचं असतं. पण हे सरकार उलटा प्रवास कार्यक्रम आखताना दिसतं. नशीब आणि कर्तृत्व या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जो नशीब, भाग्यावर भरोसा ठेवतो तो कर्तृत्व नाकारत असतो. ज्योतिष माणसाला दैववादी बनवतं, प्रयत्न करायचे नाकारते. म्हणूनच आपल्या देशात गेल्या शंभर वर्षात संशोधनाचं नोबेल पारितोषिक कुणाला मिळू शकलं नाही. आता तर ते मिळूच नये अशी व्यवस्था केंद्र निर्माण करतंय. भाजपचं सरकार आणि लोक स्वामी विवेकानंदांना आदर्श मानतात. त्यांची ज्योतिषाबद्दल काय मतं आहेत हे तरी माहीत करून घ्यायला हवी होती.

हेही वाचा : अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’

मुद्दा नसलेले विषयच महत्त्वाचे - डावकिनाचा रिच्या

भविष्यात एमए इन एस्ट्रोलॉजी किंवा डिप्लोमा इन एस्ट्रोलॉजी अशी पदवी घेऊन सर्टिफाइड ज्योतिषी तयार होणार आहेत. प्राचीन ऋषी मुनींनी मांडलेल्या मतांचा अभ्यास इथं केला जाणार आहे. ज्या ऋषीमुनींना शनिच्या पलीकडे देखील आपल्या सूर्यमालेत ग्रह आहेत हे ठाऊक नव्हतं. अर्थात त्यांचाही नाईलाज होता म्हणा. कारण उघड्या डोळ्यांनी युरेनस नेपच्यून दिसत नाहीत.

एकाच हॉस्पिटलमधे एकाच वॉर्डात एकाच सेकंदाला जन्माला येणाऱ्या मुलांचं भविष्य सारखंच असायला हवं ना? पण ते तसं नसतं. पण ज्योतिषांकडे याचे उत्तर असतं त्याचं मागच्या जन्मातील संचित. अडचणीच्या प्रश्नांवर पळवाट काढत कसं बस तग धरून राहिलेलं हे ज्योतिष आता शास्त्राचा दर्जा मिळविण्याच्या वाटेवर आहे.

विज्ञानाने इतपत मजल मारलीय की भविष्यात एखाद्या बाळ मंगळ ग्रहावर जन्माला येईल. अशावेळी त्या बाळाच्या कुंडलीमध्ये मंगळ असणार की पृथ्वी? एखादं बाळ अमुक नक्षत्रावर जन्माला येतं, असं म्हणतात. पण मुळात ते नक्षत्र आपल्यापासून शेकडो प्रकाशवर्ष दूर आहे. एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेग असलेल्या प्रकाशही त्यांच्यापासून आपल्यापर्यंत शेकडो वर्षांनी पोचतो. आणि माणसाचं आयुष्य असतं अवघं सत्तर-ऐंशी वर्षांचं.

मूलभूत संशोधनात भारत अग्रेसर का नाही याचे हे ठळक उदाहरण. इथं मुद्दा नसलेल्या विषयांवर वाद घातले जातात. मुद्दा नसलेल्या विषयांवर जीव घेतले जातात. आणि मुद्दा नसलेल्या विषयांचा अभ्यास केला जातो, त्यावर संशोधन केलं जातं.

लोकांच्या जीवाशी खेळ : महाराष्ट्र अंनिस

ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असं म्हणतात  आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासानुसार ग्रह गोल ताऱ्यांचा माणसाच्या जगण्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचं प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतीष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणं आवश्यक आहे.

इग्नूच्या या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोल शास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचं काम केलं जातंय. ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांच्या पूर्वी घडली असताना अशा गैरसमजांना बळकटी देणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टी या लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. एकाच वेळी ज्योतिषाला विज्ञान म्हणायचं आणि त्यावर आधारित उपाय सुचवायचे. शिकवताना मात्र ते कला माध्यमात अभ्यासक्रम म्हणून घालायचं हीसुद्धा दिशाभूलच आहे.

हेही वाचा : 

राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

 परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

नव्याने उभं राहण्यासाठी कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी