नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?

०९ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


नरेंद्र मोदी सरकारमधले कार्यसम्राट मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ते त्यांच्या होमग्राऊंडवर म्हणजे नागपुरात निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या कामाचं कौतूक स्वतः सोनिया गांधींनी केलं होतं. नितीन गडकरी नागपुरातून मागच्या वेळेसारखेच प्रचंड बहुमताने निवडून येतील, असंच माध्यमं सांगताहेत. पण त्यांच्याविरोधातही काही मुद्दे जात आहेत. पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या लेखातले हे काही मुद्दे.

महारुद्र मंगनाळे हे लातूर इथले ज्येष्ठ पत्रकार.विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लिहिणारे.त्यांच्या फेसबूक पोस्टचंही पुस्तक बनलंय,इतकं फेसबूक हे माध्यम ताकदीनं वापरणारे.वर्तमानपत्रं असोत की सोशल मीडिया,सर्वसामान्य लोकांमधे शिरून जमिनीचा माग काढण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

महारुद्ध मंगनाळे नागपूर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे मित्र म्हणून गेल्या महिनाभर काम करत आहेत. ते सतत त्यांच्यासोबत फिरताहेत. मतदारांशी बोलताहेत. त्यातून माध्यमांसमोर न आलेले अनेक मुद्दे त्यांनी टिपलेत. ते नितीन गडकरी यांच्या पराभवाचं भाकीत करत आहेत. ते आता गडकरींच्या विरोधातल्या प्रचारमोहिमेशी जोडलेलं असलं तरी त्यांच्यामुळे फारशा चर्चेत नसलेल्या काही गोष्टी समोर आल्यात.

नितीन गडकरी हे का जिंकणार, त्यांनी केलेली विकासकामं कोणती, याची माध्यमांतून वारंवार चर्चा झालेली आहेच. त्यात कधीच नसणाऱ्या गोष्टींची चर्चा महारुद्र मंगनाळे यांनी एका लेखात केलीय. त्या लेखातून घेतलेले हे काही मुद्दे.

विलासराव हरले होते, त्याची आठवण

नागपुरातल्या सामान्य लोकांशी चर्चा करताना, मला सतत १९९५च्या लातूर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक प्रचाराच्या वातावरणाची आठवण होत होती. महाराष्ट्राचे तत्कालीन लोकप्रिय नेते, मंत्री विलासराव देशमुख विरूद्ध शिवाजी पाटील कव्हेकर अशी ती लढत होती. तेव्हाही मी असाच मतदारांमधे फिरत होतो. लोकांचा सगळा मूड लक्षात घेऊन, विलासरावांच्या पराभवाचं भाकीत मी पहिल्यांदा केलं. पहिल्या टप्प्यात एक दोन पत्रकार माझ्याशी सहमत होते. नंतर सगळेजण या मताचे पुरस्कर्ते बनले.

नागपूरातले बहुतांश पत्रकार माझ्या दाव्याशी  सहमत होणार नाहीत. पण सामान्य मतदार माझ्या मताशी सहमत आहेत. आज मतदानाला केवळ तीन दिवस उरले असताना, मी स्पष्ट अंदाज व्यक्त करतोय, या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पराभूत होतील. हा अंदाज विविध स्तरांतील शेकडो लोकांच्या मुलाखतींवर, लोकांच्या प्रतिसादावर आधारित आहे.

विकासकामांमुळेही नाराजी आलीय का?

गडकरी यांचा पराभव शक्य नाही, असा दावा करणाऱ्या लोकांनी केलेल्या विकासकामांची भली मोठी यादी देतात. ते ज्याला विकास म्हणतात, त्याबद्दल बहुसंख्य जनतेत मोठी खदखद आहे, हे त्यांना माहीत नाही. उच्च मध्यमवर्गीय म्हणून ओळखला जाणारा वर्ग सोडला तर, मेट्रो प्रकल्प जनतेच्या पचनी पडलेला नाही. दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची गरज होती का? याच्यामुळं खरचं लोकांची सोय होणार का? हे प्रश्न लोक गांभीर्याने विचारत आहेत.

हेही वाचा: भाजपच्या जाहीरनाम्यातून काय समोर आलंय?

कारण मेट्रोमुळं दळणवळणाचा प्रश्न सुटणार नाही. दरमाणसी सर्वात जास्त दुचाकी असलेलं शहर, ही नागपूरची ओळख आहे. केवळ दुचाकीला प्राधान्य देणारे नागपूरकर, गैरसोयीची मेट्रो स्वीकारतील का?यावर प्रश्नचिन्ह आहेच. मेट्रोचं काम संपायला आणखी किती वर्षे लागतील माहिती नाही. पण २०१६ पासूनच मेट्रोचा टॅक्स नागपूरकरांच्या डोक्यावर बसलाय.

सिमेंट रोडबाबतही लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. गडकरींनी चांगले डांबरी रोड फोडून सिमेंट रोड केल्याचा उघड आरोप होतोय. या रस्त्यांना तडे जाताहेत.याच्यामुळे शहराच्या तापमानात तीन डिग्रीची वाढ झालीय. या दोन्ही गोष्टींची गरज बहुसंख्य लोकांना वाटत नाही. सिमेंट रोडच्या उंचीमुळे गतवर्षी पावसाळ्यात हजारो घरात पाणी शिरलं, अनेक इमारती खचल्या. त्यांचं काय? असा प्रश्न लोक थेट विचारताहेत. या विकास कामांसाठी शहरातली १२००पेक्षा अधिक परिपूर्ण वाढ झालेली झाडं तोडण्यात आलीत.

नागपूर महापालिका सत्तेची अँटीइन्कम्बन्सी

नागपूर महापालिका गेल्या १३ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. ही गोष्ट गडकरींसाठी नुकसानीची ठरलीय. पाणी, कचरा, वीजेचं खाजगीकरण, मालमत्ता करात झालेली चुकीची वाढ असे अनेक मुद्दे भाजपविरोधी जनमत बनण्यास कारणीभूत ठरताहेत. अव्वाच्या सव्वा कर लादूनही अनेक भागातल्या लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही, असा आरोप आहे. कचरा उचलला जात नाही. त्यामुळे लोक भाजपावर चिडून आहेत.

गडकरींचा सोशल इंजिनिअरिंगचा मुखवटाही गळून पडलाय. गडकरींच्या विकासाचे लाभधारक कोण? असा प्रश्न केला की दुर्दैवाने एकाच जातीची जास्तीत जास्त नावं समोर येतात. ही नावंच सगळं काही सांगून जातात. गडकरींच्या या लाभधारकांबद्दल लोकांच्या मनात तीव्र असंतोष आहे. त्यांची सामान्य माणसांसोबतची वागणूक चांगली नाही. नागपूरमधील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हा नेहमीच टीकेचा विषय राहिलाय.

हेही वाचा: नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

विकास म्हणायचं तरी कशाला?

मुळात विकासाचं हे भव्यदिव्य मॉडेल लोकांना आवडलेलं नाही. मिहानच्या माध्यमातून  ५० हजार तरूणांना रोजगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. प्रत्यक्षात हजारभर नोकऱ्याही निर्माण झाल्या नाहीत. इथेनॉलवर चालणारी बस सेवा बंद पडणं, स्मार्ट सिटी, नाग नदीची स्वच्छता मोहीम आणि त्यातून जलपर्यटन अशा अयशस्वी योजनांची मोठी यादी गडकरींच्या नावावर आहे. शहरात वाहतुकीसाठी पुरेशा बस नाहीत, वाहतूक व्यवस्था चांगलीनाही. स्वच्छतागृहनाहीत, बागांची अवस्था चांगली नाही, ही यादी बरीच मोठी आहे.

त्यामुळं विकास नेमका कशाला म्हणायचं? हाच मुद्दा ऐरणीवर आलाय. गडकरींचा जनसंपर्क हा पत्रकार, शासकीय अधिकारी आणि पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यापुरताच मर्यादित आहे. गडकरींना प्रत्यक्ष भेटलात का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मला नागपूरच्या गल्ल्यांमधे मिळालं नाही. त्यांना टीवीवर आणि पेपरांमधूनच पाहिलं, असं उत्तर लोक उपरोधानं देतात. वृत्तपत्र वाचून आणि टीवी बघून मत बनण्याचे दिवस कधीच संपलेत, हे अद्याप फारसं कुणाच्या लक्षात आलेलं नाही.

वाड्यावरचे नेते, ठेकेदारांचे, कंपन्यांचे हितकर्ते अशीच गडकरींची प्रतिमा आहे. स्कूटरवर फिरणारे गडकरी ते आजचे विमानाने फिरणारे करोडपती गडकरी हा प्रवास नागपूरकरांनी पाहिलाय. त्यांच्या बांधकामाधीन असलेल्या आलिशान बंगल्याच्या सुरस कथा जनतेत चर्चिल्या जात आहेत. 'विकास' म्हटलं की, या बाबींची चर्चा होणं अटळ आहे. तसंच मोदी यांचा गेल्यावेळचा करिष्मा उतरलाय. त्याचा फटका गडकरींना भाजप उमेदवार म्हणून बसतोय.

संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी

नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र असलं तरी काँग्रेसचा हा गड आहे. मुळात इथंली भाजप म्हणजे काँग्रेसच आहे. इथं संधी मिळाली नाही म्हणून बहुतेकजण भाजपातून आमदार, नगरसेवक बनलेत. मात्र बहुतांश मतदारांची काँग्रेसशी जुळलेली नाळ तुटलेली नाही. गटातटात विभागलेली काँग्रेस नाना पटोले यांच्यामुळं एकत्र झालीय.

पटोले यांनी मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध बंड करून खासदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांचं नाव घराघरात पोचलंय. स्वच्छ प्रतिमा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता,या प्रतिमेमुळे त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करायला मुद्दाच नाही. नागपूरभर ते  दरदिवशी भर उन्हात सहा सात तासांच्या पदयात्रा काढून मतदारांना भेटत आहेत. त्यांच्या भाषणात कुठंच जातीचं आवाहन नाही. मात्र संघभूमी विरूद्ध दीक्षाभूमी हा मुद्दा ते प्रभावीपणे मांडत आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रः पहिल्या टप्प्यातल्या सात जागांचा पॉलिटिकल एक्स-रे

निवडणूक लोकांनी हातात घेतलीय

प्रसारमाध्यमं नाना पटोले मतांसाठी डीएमकेची बांधणी करीत असल्याची नकारात्मक चर्चा घडवून आणताहेत. ही बाब त्यांना फायद्याची ठरतेय. दलित, मुस्लिम आणि कुणबी म्हणजे डीएमके. यातील बहुसंख्य दलित आणि मुस्लिम यावेळी काँग्रेसच्या बाजूने आहेतच. नानाभाऊंच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ओबीसी, शेतकरी हाच राहिलाय. त्यामुळे केवळ कुणबी नाही तर माळी, कोळी, कोष्टी, तेली, पिंजारी असा सगळा ओबीसी त्यांच्या बाजूने उभा आहे.

सततच्या फसवणुकीमुळे हलबा समाज भाजपाला धडा शिकवायला सज्ज आहे. ख्रिश्चन समाजही काँग्रेसच्या बाजूने आहे. कायम भाजपच्या पाठिशी उभा राहणारा व्यापारी वर्ग यावेळी काँग्रेसला पाठिंबा देतोय. रिक्षावाले, हातगाडीवाले, हातावर पोट असणारे सगळे लोक भाजपाच्या विरोधात आहेत. ते उघडपणे म्हणताहेत, पैसे गडकरींचे, मत नानाला.

याउलट स्थिती नाना पटोले यांची आहे. यंत्रणा उभी करण्यासाठीचा पैसा नाही. विकत घेणं दूरचं, किमान काही जणांना खूष करण्याइतकेही पैसे नाहीत. पण सर्व थरांतील लोक उत्स्फूर्तपणे त्यांच्या सोबत आहेत. तेच सांगतात, नाना निवडून येणारच. मतदारचं जेव्हा निवडणूक आपल्या हातात घेतात, तेव्हा तिथं कसलाच फंडा कामाला येत नाही. नाना पटोले यांची ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलीय.

हेही वाचा: `होय, मी हिजडा` असं दिशाने गडकरींना का सुनावलं?