आज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.
दक्षिण भारतात ब्राह्मणवादाच्या विरोधात एल्गार निर्माण करणार्या पेरियार यांची भाषणं प्रचंड प्रक्षोभक असत. भाषणात त्यांचा एक संवाद ठरलेला असायचा. ते विचारायचे, तुम्हाला एकाच वेळी साप आणि ब्राह्मण दिसले तर कुणाला माराल? लोक साहजिकच साप असं उत्तर द्यायचे. त्यावर रामस्वामी म्हणायचे, सापाला सोडून द्या आणि ब्राह्मणाला ठेचून मारा. कारण साप चावला तर एक माणूस मरतो आणि ब्राह्मण डसला तर पिढ्यान्पिढ्या बरबाद होतात.
पेरियार इरोड वेंकट नायकर रामस्वामी असं त्यांचं पूर्ण नाव. पेरियार किंवा थंताई पेरियार हा त्यांना लोकांनी प्रेमाने दिलेला किताब. इरोड हे गावाचं, तर वेंकट हे वडलांचं नाव. नायकर हा त्यांचा समाज. तो चातुर्वर्ण्यात शूद्र गणला जातो. रामस्वामी किंवा रामसामी हे त्यांचं नाव.
घरातल्या धार्मिक वातावरणामुळे त्यांचं हे नाव ठेवण्यात आलं. पण पेरियार हे मात्र चिकित्सक होते. ते स्वतःच प्रश्न विचारून धार्मिक कथा आणि कर्मकांडांचं खरं खोटं ठरवू लागले. लहानपणापासून ते जातिभेदाचे अनुभव घेत होते. काशीला गेल्यावर त्यांना ब्राह्मण नसल्यामुळे जेवण मिळालं नाही. शेवटी त्यांनी उष्ट अन्न खाल्लं. या घटनेमुळे ते ब्राह्मणी शोषण आणि धार्मिक थोतांड याविषयी खोलात जाऊन विचार करू लागले.
हेही वाचा: सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
हिंदू वर्णाश्रम धर्मातील वैचारिक फोलपणा त्यांना कळला. त्यांनी हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा परंपरावर कोरडे ओढायला सुरुवात केली. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह, दलित अत्याचार, भेदाभेद, पुरोहितशाही, पुराणकथांतील मूर्खपणा, देवळांतलं शोषण याच्याविरुद्ध त्यांनी मिळेल त्या मार्गाने जागृती केली.
पेरियार यांच्यामते, रामायण हे ब्राह्मणी विचारकल्पना बहुजनांवर थापण्याच्या षडयंत्राचा भाग होतं. त्यामुळे त्यांनी रामाला विलन ठरवून रावणाला हिरो बनवणारं खरं रामायण हे लोकप्रिय पुस्तक लिहिलं. त्यातून त्यांनी पुराणकथांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विकसित केला.
हेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया
१९१९ ला ते काँग्रेसमधे गेले. तिथे ते तामिळनाडूचे प्रांताध्यक्षही बनले. असहकार आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याच दरम्यान त्यांनी केरळमधील वायकॉम शहरातल्या अस्पृश्यते विरोधातल्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याचा दक्षिण भारतात मोठा प्रभाव पडला.
काँग्रेसच्या एका शिबिरात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या पंगतीत होणारा भेदाभेद पाहून ते चिडले. त्यांनी काँग्रेस सोडून सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट अर्थात स्वाभिमान चळवळ सुरू केली. ब्राह्मणेतरांना त्यांच्या द्रविड मुळाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा: ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव
पुढे त्यांनी बहुजनांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जस्टिस पार्टीची स्थापना केली. पुढे त्याचं रूपांतर द्रविड कळघममधे झालं. त्यांनी या प्रवासात बहुजनवादाच्या राजकारणाला सत्ता मिळवण्याचं सूत्र आखून दिलं. त्यामुळे तामिळनाडूत दीर्घकाळ पेरियार यांच्या विचारांना मानणार्या द्रमुक-अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता होती. मात्र काळाच्या ओघात त्यातले जातीय संदर्भ पातळ होऊन त्यातली तामिळी प्रादेशिकता प्रबळ झालीय.
स्वतंत्र द्रविडनाडू राष्ट्राची मागणी आणि हिंदी भाषेला विरोध यामुळे पेरियार यांचा प्रभाव दक्षिण भारतापुरताच मर्यादित राहिला. ९४ वर्षांच्या दीर्घ संघर्षरत आयुष्यानंतर आजही पेरियार हे बहुजन अस्मितेचे प्रतीक बनले आहेत.
हेही वाचा:
धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज