डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

१३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोनाच्या युद्धात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा कसोटीचा काळ आहे. कोरोना बाधितांना या वायरसच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी मंडळी शर्थीचे प्रयत्न करताहेत. दुसरीकडे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं तर त्यासाठी पीपीई किट महत्वाचं ठरतंय. पण या किटची सध्या जगभरात कमतरता भासत आहे.

जगभरात कोरोना वायरसचं संकट वाढत चाललंय. आजची आकडेवारी विचारात घ्यायची तर कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येनं १६ लाखाचा आकडा पार केलाय. तर मृतांची संख्या उद्या, परवा लाखाच्या घरात जाईल. हे संकट इथंच थांबत नाही. सगळीकडे आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या वेंटिलेटर, मास्क, पीपीई किट सारख्या साधनांचीही कमतरता भासतेय.

भारतालाही या गोष्टी आयात कराव्या लागत आहेत. आम्ही लोकांचे जीव वाचवतो ओ, पण आम्हाला पीपीई किट द्या, अशी आर्जवं करणारी पत्रं डॉक्टरांना लिहावी लागतायत. यावरून एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल. सध्या पीपीई किटची मागणी जोर धरतेय.

हेही वाचा : आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

पीपीई किट हे डॉक्टरांचं संरक्षक कवच

पीपीई म्हणजेच 'पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट'. स्वतःचं संरक्षण करणारं हे किट आहे. एखादी लढाई लढायची तर सैन्याला तयारीनिशी मैदानात उतरावं लागतं. कोणत्याही संसर्गापासून बचाव करायचा तर तयारीही तशीच लागते.

फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेतली एक महत्वाची संस्था आहे. सार्वजनिक आरोग्याच्या सेवा आणि त्याचा प्रसार करण्याचं काम ही संस्था करत असते.  एफडीएच्या मते, पीपीई किटमुळे मानवी त्वचा, तोंड, नाक किंवा डोळे यांचं बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव होतो. पीपीई हे दिसायला एखाद्या सूटसारखं आहे. कोणत्याही व्यक्तीला गंभीर आजार होतो तेव्हा त्यापासून बचाव करायचा तर अत्यावश्यक साधनांची गरज असते. पीपीई किट त्यातलाच एक प्रकार आहे.

पेशंटला आजारातून बाहेर काढायचं झालं तर डॉक्टरांचे प्रयत्न महत्वाचे ठरतात. तसंच पेशंटपासून होणारा रोगाचा संसर्ग टाळायचा तर डॉक्टरला पीपीई किट अर्थात सूटची गरज असते. या सूटची बांधणी काही विशेष पद्धतीनं केली जाते. अनेक रोगांच्या उपचार किंवा महत्वाच्या वेळी अशा प्रकारचे किट वापरले जातात. केवळ आरोग्य क्षेत्रापुरते किट मर्यादित नाहीत. इतर अनेक कारणांसाठीही या किटचा वापर केला जातो. केमिकल, इलेक्ट्रिक तसंच कोणतंही इन्फेक्शन टाळण्यासाठी वेगवेगळे किट वापरले जातात.

किटमधे असतात या गोष्टी

संपूर्ण शरीराचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने पीपीई किट महत्वाचं ठरतं. या किटमुळे बाहेरच्या हवेशी असलेला संपर्क टाळता येतो. यात प्रामुख्याने हॅन्ड ग्लोव्ज, गॉगल, गाऊन, एप्रॉन, वर्क शूज असतात. सध्या कोरोना वायरसच्या भीतीमुळे घरचं काही सामान आणायचं तर माणसं मास्क लावून जाताना दिसतात. हे मास्क साध्या प्रकारातले आहेत. काही घरच्या घरीही तयार केले जातात. पण संसर्ग झालेल्या बाधितांना उपचार करताना असे मास्क वापरले जात नाहीत.

पीपीई किटमधले मास्क हे स्टँडर्ड दर्जाचे असतात. याबद्दलची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या साईटवर उपलब्ध आहे. किट कसं वापरायचं याची नियमावली तयार करण्यात आलीय.

एन ९५ हा मास्क सध्या डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. त्याला मागणीही अधिक आहे. हवेत पसरून इन्फेक्शन करणाऱ्या ९५% विषाणूंपासून हा मास्क संरक्षण करू शकतो. शिवाय मास्कच्या आजूबाजूने बाहेरची हवा आतमधे येऊ शकते अशा प्रकारे हा मास्क तयार करण्यात आलंय. यात अजून एक एफएफपी प्रकारातला मास्क असतो. जो धुळीचे कण आणि हवेतल्या वेगवेगळ्या वायरसपासून संरक्षण करतो. एफएफपी १, एफएफपी २ आणि एफएफपी ३ असे त्याचे प्रकार असतात. एफएफपी २ हा मास्क पीपीई किटमधे वापरला जातो.

थोडक्यात काय तर डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या शरीराचं संरक्षण करणाऱ्या गोष्टी या किटमधे असतात. आपल्या शरीराचा कोणताही अवयव खुला राहू नये, अशी बांधणी या किटची असते.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

याही गोष्टी ठरतायत महत्वाच्या 

पीपीई किट हे एकदा वापरल्यावर पुन्हा वापरता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. पण सामान्यपणे पीपीई हे केवळ एकदा वापरण्यासाठीच डिझाइन केले जातात. असं 'एफडीए'नं स्पष्ट केलंय. एफडीएसोबतच डब्ल्यूएचओनंही पीपीई वापरा संदर्भात काही नियमावली तयार केलीय. ग्लोव्ज फाटलेले किंवा खराब झाले असल्यास ते काढून टाकायला हवेत. रुग्णांची तपासणी केल्यावर ग्लोव्ज बदलून त्याजागी नवीन घालण्यापूर्वी हात स्वच्छ करायला हवेत. अशा अनेक गोष्टींची खबरदारी मास्क, गॉगल, अप्रॉन वापरताना घ्यावी लागते.

पीपीई किट याआधी आपल्या देशात तयार होत नव्हते. आते हे किट भारतात तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतंय असं सरकारने स्पष्ट केलंय. जगभरातली मागणीही मोठी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ३० मार्चला याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी सरकार यासंदर्भात काय पावलं टाकतंय हे सांगताना काही आकडेवारीही दिलीय.

सध्या देशभरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमधे ३.३४ लाख पीपीई उपलब्ध आहेत. याआधी सरकारनं ६०,००० किटची खरेदी केलीय. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने चीनकडून १०,००० पीपीईची व्यवस्था केलीय. परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.

एन ९५ मास्क पुन्हा वापरता येतो?

'मेड अर्काइव' हे आरोग्य विज्ञानातलं एक सर्वर आहे. अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीसोबत इतर काही संस्थांनी त्याची स्थापना केलीय. २७ मार्चला 'मेड अर्काइव'नं एक नवं संशोधन पुढे आणलंय. याचा संदर्भ हेल्थ डॉट कॉम या साईटने दिलाय. येल मेडिकल डॉक्टरांच्या मते, एकदा वापरल्यानंतर एन ९५ या मास्कचा उपयोग पुन्हा करता येऊ शकतो.

हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापरून तयार केलेल्या एन ९५ मास्कचं पुन्हा निर्जंतुकीकरण करता येतं असं हे संशोधन म्हणतं. जगभरात एन ९५ मास्कचा तुटवडा निर्माण होत असताना अशा प्रकारचं संशोधन हे महत्त्वाचं आहे. एन ९५ मास्कच्या किमती या भरमसाठ आहेत. शिवाय डॉक्टरांसाठी हे मास्क अत्यावश्यक आहे. त्याचा तुटवडा निर्माण होणं हे त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीनेही घातक आहे. अर्थात हे मास्क काही सर्वसामान्य लोकांसाठी नाहीय हेही तितकंच खरं.

हेही वाचा : तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

पीपीईचा तुटवडा आरोग्यासाठी हानिकारक

गेल्या आठवड्याभरापासून पीपीई किट हा शब्द चर्चेत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कोणताही रोग वाढण्याच्या काळात पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ते महत्वाचं ठरतं. सध्या भारतातच नाही तर जगभरात अशा पीपीई उपकरणांची कमतरता आहे. २७ फेब्रुवारीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओनं काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. शिवाय सगळ्या देशांना वैद्यकीय उपकरणांचा पुरेसा साठा करण्याचा सल्लाही दिला. तरीही मास्क आणि हॅन्ड ग्लोव्जसारख्या गोष्टींची निर्यात भारताने सुरूच ठेवली होती. १९ मार्चला सरकारने वेंटिलेटरची निर्यात थांबवली. आज या सगळ्याचा गंभीर परिणाम दिसतोय.

दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अर्थात एम्सच्या डॉक्टरांनी याबाबत सरकारला वेळीच सावध केलं होतं. सध्या कोरोना वायरसचं संकट अधिक गडद होत जातंय. आरोग्य सुविधाही म्हणाव्या तितक्या पुरेशा नाहीत. अमेरिकेसारखा शक्तिशाली देश मलेरियावरच्या हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधासाठी भारताला धमकीची भाषा वापरू लागलाय. अशा स्थितीत आपल्याकडे पीपीईचा तुटवडा निर्माण होणं हे वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.

देशाचं आरोग्य मंत्रालय काय म्हणतंय?

कोरोना वायरसच्या पार्श्वभुमीवर आरोग्य मंत्रालयाकडून रोज पत्रकार परिषद घेऊन माहिती शेअर केली जातेय. सध्या देशभरात पीपीई किटचा मोठा तुटवडा भासतोय. याबद्दल काल केंद्रीय आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी पीपीई आणि वेंटिलेटरचा अभाव लक्षात घेऊन त्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचं म्हटलंय. तसंच प्रत्येकाला पीपीईची गरज नाही. पीपीई किटची संख्या कितीही असली तरी ती सर्वांना देता येत नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय.

याबद्दलच्या काही मार्गदर्शक सूचनाही आरोग्यविभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्यात. जिथं जास्त जोखीम आहे अशा आरोग्य विभागांमधे या किटची गरज आहे. इतर परिस्थितीत मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ज पुरेसं असल्याचं अग्रवाल यांचं म्हणजेच सरकारचं म्हणणंय. शिवाय सरकार पीपीई किट इतर राज्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतंय. असंही ते म्हणताहेत.

कोरोनाच्या संकट काळात एकत्रित लढा देण्याऐवजी राज्य सरकारं आपल्यावर अवलंबून कशी राहतील हा प्रयत्न केंद्र सरकार करताना दिसतंय. आता राज्यांना स्वतः पीपीई किट, वेंटिलेटर, मास्क खरेदी करता येणार नाहीत. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. तसा जीआरच केंद्र सरकारनं काढलाय. त्यामुळे राज्य सरकारांकडून ओरडं होतेय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. कारण देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय.

हेही वाचा : 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या स्त्रियाच खऱ्या वीरांगना!

पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो

शेतकऱ्याच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?