कोकणातल्या कातळशिल्पाचं इजिप्त, इराक आणि चीनशी नातं

२४ मे २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोकणात सध्या रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पांमधून येणारा भकास विकास नको, म्हणून लोकआंदोलन पेटलंय. या विनाशकारी प्रकल्पांपासून कोकणाला वाचवण्यासाठी तिथल्या माणसांसोबत इथले दगडही पुढे आलेत. बारसूच्या सड्यावरची कातळशिल्पं पुन्हा चर्चेत आली असून, ही कातळशिल्पं थेट इजिप्त, इराक आणि चीनमधल्या आदिम संस्कृतीशी नातं सांगतात, असा अभ्यास पुढे येतोय.

हापूस आंबा ही आजवर कोकणची जगभर सांगायची ओळख होती. पण गेल्या दहा-पंधरा वर्षात कोकणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतंय, ते इथं सापडलेल्या कातळशिल्पांमुळे. माणसाच्या आदिम अस्तित्वाच्या या खुणांकडे आता जगभरातल्या संशोधकांचं आणि पर्यटकांचं लक्ष वेधलं गेलंय. त्यामुळेच आता या कातळशिल्पांची नोंद, जागतिक वारसा म्हणून व्हावी, अशी दखल थेट युनेस्कोनंच घेतलीय.

दरवर्षी कोकणात नवनवीन ठिकाणी कातळशिल्पं आढळल्याच्या बातम्या येतायत. ही शिल्पं त्या गावात आधीपासूनच माहिती होती. पण ही एवढी महत्त्वाची आहेत, याची जाणीव नवी आहे. या नवनव्या कातळशिल्पांमुळे कोकणाला एक नवी ओळख मिळू शकते, हेही आता सर्वांना कळू लागलीय. ज्या बारसूच्या सड्यावर रिफायनरी आणण्याची घाट घातला गेला, तिथंच आढळलेल्या महाकाय कातळशिल्पामुळेही रिफायनरी गुंडाळावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

बारसूतल्या कातळशिल्पाचं वैशिष्ट्य

बारसूच्या कातळावर काहीही उगवत नाही असं सांगत तिथं रिफायनरी आणण्याचा डाव रचला गेला. नाणारमधल्या लोकांनी ही रिफायनरी हाकलून दिल्याने ती बारसूच्या सड्यावर आणण्याचं ठरलं. पण इथल्याही लोकांनी त्याला जबरदस्त विरोध केला. पण कोकणातल्या राखणदाराचा कौल जनतेच्या बाजूने पडावा, यासाठीच जणू तिथंली मोठमोठी कातळशिल्पं लोकांपुढे प्रकट झाली आहेत. ही कातळशिल्पं अनोखी असून, तिचे धागेदोरे जगभर जोडले जातायत.

बारसूच्या कातळशिल्पामधे एक मानव आपल्या दोन्ही हातांमधे दोन वाघांच्या मानेला धरून उभा असल्याचा दिसतोय. हे चित्र सिंधू संस्कृतीतल्या मोहेंजोदडो, इजिप्त, इराक-इराणमधल्या मेसोपोटोमिया आणि चीनमधे सापडलेल्या चित्राशी साधर्म्य असणारं आहे, अशी बातमी पुढारीने प्रसिद्ध केलीय. या संदर्भात सखोल अभ्यास होत असून, यात जर तथ्य निघालं तर मानवंशशास्त्राच्या अभ्यासात नवे संदर्भ जोडले जाऊ शकतील.

बारसू परिसरातल्या या कातळशिल्पांमुळे राजापूर आणखी एकदा जगाच्या नकाशावर चमकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजापूर बंदरातून होणारा युरोपियन व्यापाऱ्यांचा व्यापार आणि त्यांची राजापूरची वखार ही ख्यात आहे. पण त्याच्याही कित्येक शतकं आधी, अश्मयुगीन काळातही येथून व्यापार किंवा देवाणघेवाण होत होती का, अशी शंका यावी अशी या कातळशिल्पांमुळे येऊ लागलीय.

कातळशिल्पं ही व्यापाराची चिन्हे?

जेव्हा एखादी गोष्ट फक्त चिन्ह रुपात आपल्यासमोर उरलीय, तेव्हा तिचा अर्थ लावण्यासाठी विविध शक्यता पडताळून पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसतं. कोकणातली विशेषतः राजापुरातली कातळशिल्पं पाहताना, ती एखाद्या व्यापारचिन्हाचा भाग होती का, अशी एक शक्यता वर्तवली जातेय.

आज आपण ज्याला लोगो किंवा स्टँडर्डायझेशन मार्क म्हणतो, तशा अर्थाने ही चिन्हं वापरली जात होती का, असाही विचार केला जातोय. सिंधू संस्कृती, मिस्र म्हणजेच इजिप्त; मेसोपोटेमियन म्हणजेच इराण-इराक आणि चीनी संस्कृतीशी इथून व्यापारी देवाणघेवाण होत असावी का, असा एक पर्याय अजमावून पाहिला जातोय. या चार प्राचीन सभ्यतांमधे व्यापारी संबंध असू शकतील.

त्यावेळी कातडी बॅगेमधून महत्वाच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठवल्या जात असतील आणि त्यासाठी टेराकोटा किंवा तत्सम साहित्य वापरून ही व्यापारचिन्हं केली असतील, असा तर्क लढवला जातोय. काळ हा अनेक गोष्टी आपल्यासोबत नष्ट करतो. त्याप्रमाणे या खाणाखुणांशिवाय त्या काळातल्या मानवी व्यवहाराचं आकलन होण्याच्या फारशा सुविधा आपल्याकडे नाहीत.

त्यामुळे या खाणाखुणांवर अधिकाअधिक चिंतन करून, त्याचा तत्कालीन संदर्भांशी ताळमेळ लावून सध्या अभ्यास केला जातोय. हा अभ्यास सतत सुरूच राहील, कारण शक्यतांची गणितं ही कायमच खुली राहतात. काहीही असलं तरी हा ठेवा फक्त राजापूरचा, कोकणाचा किंवा भारताचा नाही. तो मानवतेचा आहे आणि तो जपणं आपलं कर्तव्य आहे.

सहा वर्षांपासून राजापूरच्या शिल्पांचा शोध

रत्नागिरीतले अभ्यासक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, केदार लेले, सौरभ लोगडे, सुशांत पेटकर, प्रसन्न दीक्षित, श्रीशैल प्रचंडे, नितीन गावकर आणि विद्यार्थ्यांनी राजापुरातल्या कातळशिल्पांचा शोधप्रकल्प पूर्ण केल्याची बातमी २०१७मधे 'सकाळ'ने प्रसिद्ध केलीय. या शिल्पांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असून, बहुतांशी सर्व रचना आतापर्यंतच्या शिल्पांपेक्षा वेगळ्या आहेत.

राजापूर लॅटेराईट टर्फ हा राजापूर शहरासह पंचक्रोशीतल्या गावांना कुशीत घेतलेला विस्तीर्ण सडा आहे. गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव, बारसू, देवीहसोळ या गावांच्या या सड्यावर ही कातळशिल्पं आहेत. बारसू, पन्हळेच्या सड्यावर चार ठिकाणी ३७ शिल्पं आढळली. यात २० बाय १८ फुटांचे चौकोनी शिल्पपट आणि शेजारी लज्जागौरीची रचना आहे, असे सुधीर रिसबूड यांनी या बातमीत म्हटलंय.

कोकणात आढळून येणाऱ्या कातळखोदशिल्पांची शैली भारतात अन्यत्र आढळणाऱ्या रचनेपेक्षा भिन्न आहे. भारताबाहेर पोर्तुगाल, इजिप्त, ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या रचनांची शैली आणि कोकणातल्या शैलीत साधर्म्य आढळलंय. बारसूच्या सड्यावर आढळून आलेली सुमारे ५७ फूट लांबीची शिल्परचना ही महाकाय रचना असल्याचा संदर्भ या बातमीत देण्यात आलाय.

कोकणातल्या वारशाला युनेस्कोची मोहोर

कोकणातल्या विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेली प्राचीन कातळशिल्पं आता फक्त कोकणापुरती मर्यादित राहिली नसून, २०२२मधे त्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळालंय. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने ही मान्यता दिलीय.

या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेळी, रुंध्ये तळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोल, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातल्या पानसायमोल या ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश आहे. साधारणतः वीस हजार वर्षांपूर्वीपासून दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत ही कातळशिल्पं बनली असावीत, असा अंदाज आहे. त्यामुळे अश्मयुगापासून प्राचीन काळापर्यंतचा संदर्भ त्याला दिला जाऊ शकतो.

कातळशिल्पांच्या आसपास तीन किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही, असा नियम आहे. तसंच या जागतिक वारसास्थळाला धक्का पोचेल, असं कोणतंही बांधकाम परिसरात युनेस्कोच्या परवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे ही कातळशिल्पं कोकणातल्या पर्यावरणाला घातक असलेल्या रिफायनरीसारख्या प्रकल्पाला रोखू शकतील, अशी आशा व्यक्त केली जाते.

वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य

आजवर कुणाचं लक्षही न गेलेली ही कातळशिल्पं पिढ्यानपिढ्या अशीच पडून राहिली. आज ही कातळशिल्पं जगाच्या इतिहासासाठी महत्त्वाची ठरली आहेत. पण अजूनही इथल्या राज्यकर्त्यांना आणि काही प्रमाणात कोकणातल्या माणसालाही त्याचं महत्त्व पटलेलं नाही. त्यामुळे मोठमोठे विकासप्रकल्प आणि चिरेखणींसारखे स्थानिक उद्योग या वारशाला हानीकारक आहेत.

सध्या या कातळशिल्पांच्या दस्तावेजीकरण आणि संशोधनासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मान्यता मिळालीय. या प्रकल्पात आयआयटी मद्रास, आयआयटी हैद्राबाद, जेएनयू, जे जे स्कूल ऑफ आर्ट, सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज, मुंबई आणि रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांचा समावेश आहे.

कातळशिल्पं वाचली, तर कोकण वाचेल

पण हे काम पुढे मोठं आहे. कारण कोकणातल्या जमिनीसाठी मोठमोठे भांडवलदार टपून बसले आहेत. त्यांना रोखण्यासाठी स्थानिक नेते आणि स्थानिकांचं मोठे सहकार्य लागणार आहे. हा वारसा वाचला तर कोकणात येणारा प्रदुषणाचा भस्मासूरही रोखला जाऊ शकेल. त्यासाठी कातळशिल्पं वाचवण्यासाठी सर्वांनीच कामाला लागायला हवं. ही कातळशिल्पं आणि कोकणासाठी लढणारा कोकणी माणूस, हीच शेवटची आशा आहे.

काही दिवसांपूर्वी बारसू प्रकल्पाविरोधातल्या जनआंदोलनाचा नेता सत्यजित चव्हाण यानं त्याच्या फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट फार महत्त्वाची आहे. त्यात तो म्हणतो की,

बारसूमधल्या एका कातळशिल्पामधे एक व्यक्ती दोन्ही हात पसरून उभी आहे आणि तिच्या दोन्ही हातांच्या बाजूंना दोन वाघ आहेत, असं चित्र आहे. या चित्राचा अर्थ लावणं सोपं आहे. ती व्यक्ती एकतर वाघांशी सहज खेळतेय किंवा निर्भयतेने त्यांना अडवतेय. आज कोकणी माणूसही सत्तेच्या विरोधात असाच धैर्याने उभा आहे. त्याचा हजारो वर्षांपूर्वीचा पूर्वज राजापूरच्या विस्तृत पठारावर उभा होता तसाच.