खेळाडूंसाठी देश की क्लब मोठा?

१९ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.

गेली दोन वर्षं कोरोनामुळे काळवंडलेला आयपीएलचा यंदाचा १५वा हंगाम पुन्हा पूर्वीच्या जोशाने सुरु झालाय. प्रेक्षकांविना ओस पडलेले मैदानांचे स्टँड पुन्हा तुडुंब भरायला लागले आणि क्रिकेटमधल्या या सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या स्पर्धेवरचं मळभ दूर झालं. आयपीएलमधे पैसा आहे आणि त्यामुळेच नवनवीन वादांच्या किंवा चर्चेच्या भोवर्‍यात ही स्पर्धा अडकते.

अर्थात, पैसा हेच अंतिम सत्य मान्य असल्याने सर्व वादातून आयपीएल सहीसलामत बाहेर पडत आलीय. ललित मोदींच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या या भारतीय क्रिकेटच्या अपत्याने प्रथम ललित मोदींनाच हद्दपार केलं. नंतर हे अपत्य आर्थिक गैरव्यवहार, स्पॉटफिक्सिंग, संघमालकांचा बेटिंगमधे सहभाग, दोन वर्षांचं निलंबन अशा सर्व गदारोळातून नुसतं सुखरूप बाहेरच पडत नाही, तर दरवर्षी आपली आर्थिक उलाढाल वाढवतंय.

खेळाडूंच्या सहभागाचा वाद

या आर्थिक कारणामुळेच यंदाच्या स्पर्धेच्या आयोजनात नवा वाद उत्पन्न झाला, तो म्हणजे खेळाडूला देशासाठी खेळणं का क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? या वादाला निमित्त झालं, ते दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंनी बांगलादेश दौरा सोडून एकमताने आयपीएल खेळायला प्राधान्य दिलं त्याचं.

आयपीएलचा हंगाम एप्रिल- मेमधे घेण्याची प्रमुख कारणं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम या काळात वर्षातल्या बाकीच्या महिन्यांच्या तुलनेत थंड असतो. इंग्लिश समर पूर्ण बहरात यायचा असतो. कौंटी क्रिकेट जरी या महिन्यात सुरु होतं, तरी इंग्लंडचं आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक जून- जुलैमधे बहरात येतं. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधे जूनमधे हिवाळ्याला सुरवात होत असल्याने क्रिकेट हंगाम संपलेला असतो.

उरतात ते द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू. बीसीसीआयला या गरीब देशांच्या क्रिकेट मोसमाची दखल घ्यायची गरज नाही. त्यामुळे बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर जातो तेव्हा आयपीएलला त्याची दखल घ्यायची गरज नाही. पण जर अ‍ॅशेस मालिका किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघांचे न्यूझीलंडबरोबरचे सामने सोडून या देशांचे खेळाडू आयपीएल खेळायला आले असते, तर हा वाद मोठ्या पातळीवर गेला असता.

परदेशी खेळाडूंची अडचण

सध्याच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात आयपीएल बसवणं हे मुळातच कठीण काम आहे. त्यातून आयपीएल यंदा दोन नवीन संघांच्या समावेशामुळे फुगत गेली. साधारण ५६ दिवसांत संपणारी स्पर्धा यंदा ७० साखळी सामने आणि ४ बाद फेरीचे सामने मिळून तब्बल ६५ दिवस चालणार आहे. या आयपीएलच्या वाढलेल्या कालावधीने आयपीएलच्या करारबद्ध परदेशी खेळाडूंच्या अडचणीत वाढ झाली.

ऑस्ट्रेलियाचे १६ खेळाडू आयपीएलमधे आहेत. आयपीएलची सुरवात २६ मार्चला झाली आणि ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा ३ एप्रिलला संपला. यात पॅट कमिन्स, वॉर्नर आणि मॅक्सवेल हे खेळाडू दोन एप्रिलपूर्वीच भारतात दाखल झाले होते; पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी असलेल्या करारामुळे ते ५ एप्रिलपर्यंत आयपीएल खेळले नव्हते.

पाकिस्तान दौर्‍यावरचे बाकी ऑस्ट्रेलियन खेळाडू दौरा संपवून भारतात आले. इथं २६ मार्च ते ३ एप्रिल आणि विलगीकरणाचे ३ दिवस मिळून ६ एप्रिलपर्यंचा म्हणजे ११ दिवसांचा प्रश्न होता. त्यामुळे आयपीएलच्या संघांना विशेष नुकसान झालं नाही.

हेही वाचाः लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

आफ्रिकेच्या खेळाडूंचा सहभाग

दुसरीकडे बांगलादेशच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या कसोटी मालिकेला ३१ मार्चला सुरवात झाली आणि दुसर्‍या कसोटीनंतर ही मालिका ११ एप्रिलला संपली. दक्षिण आफ्रिकेचे कसोटी संघातले आयपीएल खेळाडू यामुळे कमीत कमी १५ एप्रिलपर्यंत आयपीएल खेळू शकले नसते.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे बीसीसीआयशी संबंध, आयपीएलदरम्यान कोणता दौरा न करण्याचा दोन संघांतला करार आणि एकूणच दक्षिण आफ्रिकेचा आयपीएलबद्दलचा मवाळ द़ृष्टिकोन बघता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिका खेळायची का आयपीएल खेळायची, हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य खेळाडूंना दिलं. या स्वातंत्र्याचा फायदा घेत रबाडा, एन्गिडी आणि मार्को जेन्सेन यांनी एकमताने आयपीएल खेळायचं ठरवलं.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गरने बोर्डाच्या या स्वातंत्र्य देण्याच्या निर्णयावर आता खेळाडूंच्या निष्ठेची लिटमस टेस्ट आहे, अशी टिप्पणी केल्यामुळे हा वाद रंगला. कारण दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आपली निष्ठा आयपीएलच्या पायावर वाहिली.

दक्षिण आफ्रिकेची जलदगती गोलंदाजीची बाजू रबाडा, एन्गिडी, जेन्सन यांच्या आयपीएल सहभागाने आणि नॉर्कीयाच्या दुखापतीमुळे पूर्णपणे लंगडी झाली. सुदैवाने दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा तरीही दोन्ही कसोटीत दणदणीत पराभव केला म्हणून हा वाद इथंच थांबला.

व्यावसायिकता की देशद्रोह

पण क्लब का देश? हा प्रश्न सर्वच खेळांत वारंवार विचारला जातो. फुटबॉलमधे क्लब का देश? हा वाद अनेक वर्षं डोके वर काढत असतो. टेनिसमधेही अनेक नामांकित खेळाडूंनी व्यावसायिक स्पर्धेत खेळत असल्यामुळे देशासाठी डेविस कप खेळायला उपलब्धता नसल्याची उदाहरणं आपण बघितली आहेत.

कोणत्याही खेळात व्यावसायिक खेळाडूंना आपली कारकीर्द कुठे घडवायची, हे चांगलं ठाऊक असतं. मुख्य म्हणजे क्रीडापटू. मग तो कोणत्याही मैदानी खेळातला असो. त्याची कारकीर्द ही मर्यादित वर्षांची असतं. साधारणत: पस्तिशीच्या आसपास बाकीच्या क्षेत्रांतल्या व्यावसायिकांची कारकीर्द बहरायला लागून ती पुढे आयुष्याची साठ वर्षं होईपर्यंत शाश्वत उत्पन्नाची फळे देत राहते, पण क्रीडापटूंचं तसं नसतं.

एकदा पस्तिशीच्या आसपास निवृत्त झाल्यावर त्यांना बाकीच्या कोणत्या व्यावसायिक क्षेत्रात विशेष वाव नसतो आणि आयुष्य मैदानावर काढल्यावर त्यांना कॉर्पोरेट वातावरणात रुळायला जमेल असं नाही. अगदी विजय मांजेरकरांपासून आपण हे बघत आलो आहोत. त्याचप्रमाणं प्रत्येक खेळाडूला निवृत्तीनंतर प्रशिक्षक, समालोचक अथवा क्रीडाक्षेत्राशी संलग्नित अर्थार्जनाचं साधन मिळेलच असं नसतं.

तेव्हा क्लब का देश? या प्रश्नावर खेळाडूचं मत हेच अंतिम ग्राह्य धरलं पाहिजे. कोणत्या खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने बघणं चुकीचं आहे आणि त्या खेळाडूच्या निष्ठेवरही प्रश्न करणं चुकीचंच आहे.

हेही वाचाः आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

दक्षिण आफ्रिकेची आर्थिक आकडेवारी 

दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख खेळाडूंनी बांगलादेश कसोटी मालिका सोडून आयपीएल खेळणं का पसंद केलं, हे त्यांच्या आर्थिक आकडेवारीवरून आपण समजून घ्यायला हवं. २०२१-२२च्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या करारानुसार, रबाडा आणि एन्गिडीचं वार्षिक मानधन प्रत्येकी साधारण १ कोटी ९० लाख रुपये आहे. नॉर्कीयाचं वार्षिक मानधन ५७ लाख रुपये तर मार्को जेन्सनसारखा खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या वार्षिक करारातही नाही.

दक्षिण आफ्रिका बोर्ड अशा खेळाडूंना सामना खेळायचं वेगळं मानधन म्हणून दर कसोटीसाठी ३ लाख ४२ हजार, वनडेसाठी ९१ हजार रुपये, तर टी-ट्वेंटी सामन्याला ६० हजार रुपये देतं. या तुलनेत आयपीएल कराराच्या रकमा बघितल्या, तर रबाडाला पंजाब किंग्सने ९.२५ कोटी, एन्गिडीला दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख, तर जेन्सनला सनरायझर्स हैदराबादने ४.२ कोटी रुपयांना विकत घेतलंय.

यात एन्गिडीची आयपीएलची रक्कम कमी असली, तरी बोर्डाच्या अधिकृत परवानगीने दोन कसोटीच्या मानधनापेक्षा ही कित्येक पटींनी जास्त आहे. रबाडासाठी ही रक्कम बोर्डाच्या वार्षिक करारापेक्षा पाचपट आहे.

नाण्याची दुसरी बाजू

तसंच जेव्हा वेगवेगळे क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळायची परवानगी देतात, तेव्हा त्यांच्या कराराचा भाग म्हणून बीसीसीआय खेळाडूच्या कराराच्या रकमेच्या २०% रक्कम त्या-त्या बोर्डाला देतं. तेव्हा त्या द़ृष्टीनेही बीसीसीआयच्या तुलनेत गरीब असलेल्या बोर्डांना हा एक उत्पन्नाचा ओघ आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आयपीएलमधल्या सोळा खेळाडूंची एकत्रित रक्कम १३ दशलक्ष डॉलर्स आहे, तेव्हा याच्या २०% म्हणजेच २.६ दशलक्ष डॉलर्स क्रिकेट ऑस्ट्रेलिया या त्यांच्या बोर्डाला बीसीसीआयकडून काहीच न करता मिळत असेल, तर आयपीएल सर्वांसाठीच फायद्याची आहे.

या सर्व आर्थिक उलाढालीचा आणि खेळाडूच्या मर्यादित कारकिर्दीचा विचार केला, तर क्लब का देश? या प्रश्नाचं भावनिक भांडवल न करता, त्या-त्या खेळाडूवरच हा निर्णय घेण्याचं सोपवणं ही दक्षिण आफ्रिका बोर्डाची कृती व्यावहारिक ठरते. यापुढेही सर्वच खेळांतल्या श्रीमंत लीगमधे खेळणार्‍या खेळाडूंसाठी क्लब का देश? हा प्रश्न उरत नाही कारण नाण्याच्या दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

हेही वाचाः 

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’  

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)