अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

१५ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


हातावर पोट असणारे मजूर दोन वेळच्या जेवणासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. पोलिस टू व्हिलरवाल्या मवाल्यांच्या ढुंगणांवर फटके देतात. पण घोटाळेबाज वाधवान कुटुंब मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमधे मुंबईहून महाबळेश्वरला येतात. गृहखात्यातला बडा अधिकारी अमिताभ गुप्ता त्यांना परवानगीचं पत्र देतो. पण सातारा जिल्हा या वाधवानच्या नोटांच्या पुडक्यासमोर न झुकता आपला हिसका दाखवतो, हे कौतुकास्पद आहे.

पाचगणी आणि महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणं अलिकडच्या काळात देशविदेशातल्या धनिकांनी आपल्या रासलीला चालवणारी तुडुंब केंद्रं बनवली आहेत. भाजलेल्या शेंगा आणि मक्याची कणसं विकून गुजराण करणारा स्थानिक  पाचगणी - महाबळेश्वरकर या गोलमटोल धनिकांच्या मस्तीपुढे पुरता वाकून गेला आहे. कुणीही यावं आणि पाचगणी - महाबळेश्वरला टिकलून जावं, उकलून जावं, उत्खनून जावं, हवेतून यावं, हवेतून जावं अशी अलिकडच्या काळात पाचगणी - महाबळेश्वर या इको सेनसेटिव शहरांची गत करून ठेवली आहे.

हेही वाचा : साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

महाबळेश्वरात धनदांडग्यांचा उच्छाद

बड्या उद्योजकांपासून सिनेसृष्टीतल्या कलाकारांपर्यंत, देशविदेशातल्या राजकीय नेत्यांपासून अंडरवर्ल्ड डॉनपर्यंत अनेकांनी पाचगणी - महाबळेश्वरात आपले हातपाय पसरले आहेत. हे गुंडपुंड मग अमावस्या - पौर्णिमेला भुतांसारखे उगवतात आणि शांत असलेल्या पाचगणी – महाबळेश्वर शहरात उच्छाद मांडून जातात.

कोरोनासारखं महाभयानक संकट असताना, सगळ्या जिल्ह्यांच्या सीमा सील असताना आर्थिक घोटाळ्याशी संबंधित संशयित आरोपी उद्योगपती वाधवान आपल्या कबिल्यासह महाबळेश्वरात येण्याचं धाडस करतो, राज्याच्या गृहविभागाचा अमिताभ नावाचा सचिव त्यांना फॅमिली फ्रेंड संबोधून २०० किलोमीटरच्या प्रवासाची पत्रावळी त्यांच्या हातात देतो आणि बिनदिक्कतपणे वाधवानांचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होतो.

हेही वाचा : बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

वाधवानचा प्रताप पहिल्यांदा नाही

२०० किलोमीटरच्या प्रवासात यस बँकेच्या मनिलॉड्रिंगमधून जामिनावर सुटलेले हे वाधवान अडवण्याचं धाडस कुणालाही त्या पत्रामुळे होत नाही. बाबुगिरीचा हा फार मोठा नमुना आहे. वाधवानने हे धाडस काही पहिल्यांदाच केलं आहे, असे नाही. अनेकदा पाचगणी - महाबळेश्वरात कागदाची विमानं उडवावीत तसंच अनेक धनिक बेकायदा हेलिकॉप्टर उडवत असतात. कोणतीही परवानगी न घेता टेक ऑफ आणि लॅण्डिंग होत असतं.

पाचगणी - महाबळेश्वर आपल्या खिशात आहे, अशा अविर्भावात हे धनदांडगे वागत आहेत. डीएचएफएल या फायनान्स कंपनीचा मुखिया, बँकिंग, हॉटेलिंग, बिल्डिंग, फिल्म इंडस्ट्री अशा सगळ्या रानात घाण करून ठेवलेला डिफॉल्टर वाधवान महाबळेश्वरात अनेकदा चरत आला आहे. हिवाळी, उन्हाळी सुट्टयांमधे महाबळेश्वरच्या थंड हवेचा गारवा वाधवांनच्या भानगडींचा श्रमपरिहार करणारा ठरत आला आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

दीड वर्षांपूर्वीची यंत्रणा जागरूक नव्हती

या वाधवानांनी पाचगणी - महाबळेश्वर इको सेन्सिटीव क्षेत्र असतानाही अनेकदा बेकायदेशीरपणे हेलिकॉप्टरचं लॅण्डिंग केलं आहे. दीड वर्षापूर्वीच वाधवानच्या हेलिकाँप्टरने सातारा जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता महाबळेश्वरात लॅण्डिंग केलं होतं. मात्र त्यावेळेस आजच्यासारखी जागरूक महसूल आणि पोलिस यंत्रणा नव्हती.

तेव्हा वाधवानच्या बंडलांपुढे पोलिस मॅनेज झाले आणि गुन्हा दाखल झालाच नाही. त्याचवेळी सातारा जिल्ह्याचा खाक्या वाधवानांना समजला असता तर बेधडकपणे हवेतून येणारे वाधवान रस्त्याने बेमुर्वतपणे आले नसते. मात्र चरायला मिळणारी यंत्रणा वाधवानांपुढे एवढी झुकली की महाबळेश्वर ही आपली जहागिरी आहे, अशा थाटात या कंपनीचा मिजास वाढत गेला.

हेही वाचा : प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

छत्रपतींच्या जिल्ह्याने हिसका दाखवला

महाबळेश्वरच्या बाजारपेठेत मोकाटपणे गाड्या दांडलाव्यात, ‘दिवाण विला’ या अलिशान बंगल्यात रात्री, अपरात्री कसाही धांगडधिंगा घालावा आणि या सगळ्याकडे महाबळेश्वरच्या यंत्रणेने कानाडोळा करावा, अशीच यापूर्वीची वाधवानांची कर्तृक राहिली. एकदा पचलं म्हणजे सारखं पचत नाही. यस बँक, पीएमसी,  डीएचएफएल असा सगळीकडे घोळ घालून ठेवलेल्या वाधवानांना छत्रपतींच्या सातारा जिल्ह्याने शेवटी हिसका दाखवलाच.

राज्याची सगळी यंत्रणा खिशात घालून फिरणाऱ्यांची मिजास सातारा जिल्ह्यातल्या माध्यमांपुढे टिकली नाही. माध्यमांमधला कोणी मॅनेज झाला नाही आणि गृहखात्याच्या अमिताभचे पत्र कारवाईपासून वाचवू शकले नाही. ईडीची झंझट मागे लागू नये, म्हणून कोरोनाचे कारण सांगून २०० किलोमीटर पळून आलेले वाधवान माध्यमांच्या कचाट्याने क्वारंटाईन झाले.

हेही वाचा : प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

वाधवाला आता गाडावा

या सर्व प्रक्रियेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता वाधवानना कायद्याची जरब दाखवली. सगळीकडून पळून आलेल्या वाधवाला आता असा गाडावा की सातारा जिल्ह्यात यापुढे कुठल्या बड्या धेंडाची जहागिरी चालणार नाही, सत्तेचा माज चालणार नाही, हा संदेश देशभर गेला पाहिजे.

‘अब आया हैं वाधवान पहाड के नीचे. तो दिखा दो अब कानून के हात बहुत लंबे होते हैं. तुम आसमानसे आए तो बच गए. लेकिन जमीनने तुम्हे जखडही लिया.’

हेही वाचा : 

तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच?

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत छापून येते तेव्हा,

अमेरिकेला हवं असणारं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

(लेखक सातारा येथील दैनिक पुढारीचे ज्येष्ठे पत्रकार आहेत. साभारः दैनिक पुढारी)