‘माहीम पार्क’ ते ‘शिवतीर्थ’ वाया ‘शिवाजी पार्क’!

०५ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


‘दादर, मुंबई २८’ हा पत्ता आज मुंबईचं स्टेटस सिम्बॉल आहे. या पत्त्यातल्या २८ आकड्यामधली आणखी एक गंमत म्हणजे २८ एकरावर पसरलेलं दादरचं शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवर दसऱ्याची सभा घ्यायला नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी मिळणार, हा वाद नुकताच मिटलाय. मुळात शिवसेनेचं मैदान अशी ओळख असणारं शिवाजी पार्क मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सांस्कृतिक इतिहासाची पाऊलखूण आहे.

शिवाजी पार्कवर ज्याची सभा ती खरी शिवसेना असं वाटावं एवढं महत्त्व शिवाजी पार्कला का? हे समजून घ्यायला हवं. शिवसेनेच्या जन्मापासून ते बाळासाहेबांच्या अंत्यविधीपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात महत्त्व असलेल्या या मैदानासाठी आजवर कायमच संघर्ष झालाय. राज ठाकरेंच्या सभांनी याच शिवाजी पार्कवरून सेनेला आव्हान दिलं. तर याच शिवाजी पार्कसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना कोर्टात खेचलं. आज हा निकाल लागलाय पण गर्दीची लढाई अद्याप संपलेली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातल्या शिवसेनेला अखेर शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. पण, यावेळी पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर शिवाजी पार्कवर किती गर्दी जमणार हा सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. खरं तर असाच प्रश्न १९६६ मधे शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याला बाळासाहेबांसमोर होता. त्यावेळी सभेचं व्यासपीठ शिवाजी पार्कच्या टोकाला नाही, तर मधोमध बांधण्यात आलं होतं. शिवाजी पार्कचा इतिहास शोधताना असे अनेक किस्से आपल्या समोर येतात. अगदी पाठीपाठी जात राहिलो तर आपण थेट राजा बिंबाच्या महिकावतीपर्यंत जाऊन पोचतो.

माहिम पार्कची गोष्ट

खरं तर, मुंबईचा इतिहास म्हणून जेव्हा आपण काहीही शोधायला सुरवात करतो तेव्हा आपल्याला महिकावतीची बखर सापडतेच सापडते. या महिकावतीच्या बखरीत आज जो शिवाजी पार्कचा परिसर आहे, तो माहीमचाच भाग असल्याचं आढळतं. अगदी प्रभादेवीचं मंदिरही माहीममधे असल्याचा उल्लेख या बखरीमधे आहे. म्हणजे साधारणतः आजच्या प्रभादेवी मंदिरापासून माहीमपर्यंतचा हा भाग त्यावेळच्या माहीममधे मोडायचा. याच कारणामुळे १९२५ मधे जेव्हा या मैदानाची जागा निश्चित करण्यात आली, तेव्हा त्याचं नाव ‘माहीम पार्क’ असंच ठेवण्यात आलं होतं.

माहीमचा हा परिसर पूर्वी ओसाड, वैराण असा भाग होता. या बेटाला ‘बरड बेट’ किंवा ‘बॅरन लँड’ म्हणत. ११३८ मधे राजा प्रताप बिंब याने माहीममधे आपली राजधानी वसवली आणि पुढे या जागेचं भाग्य बदलत गेलं. या बिंब राजाचा महाल आज शिवाजी पार्क आहे, त्या परिसरातच कुठे तरी असावा, असं माझ्या वाचनात आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कला राजा बिंब याचं नाव द्यावं असा ठराव, त्यावेळी मुंबई महापालिकेत आला होता, अशी आठवण मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक नितीन साळुंखे यांनी सांगितली.

मुंबईतल्या ‘प्लॅनिंग'चा पहिला प्रयत्न

१८९६-९७ मधे आलेल्या महाभयंकर अशा प्लेगच्या साथीनंतर जेव्हा मुंबईची नवी रचना करण्याचं ठरलं, तेव्हा १८९८ मधे बॉम्बे इंप्रुवमेंट ट्रस्ट म्हणजे बीआयटीची स्थापना करण्यात आली. आजच्या दक्षिण मुंबईत एकवटलेली वस्ती आणि कार्यालयं, त्यावेळी भायखळ्यापर्यंत असलेल्या मुंबईच्या पलिकडे नेण्यासाठी बीआयटीने सुनियोजित शहराची पहिली योजना बनवली. त्या योजनेचं नाव होतं दादर-माटुंगा-वडाळा-सायन स्किम. याच योजनेमधून दादरमधली हिंदु कॉलनी, पारसी कॉलनी, फाइव गार्डन हा परिसर उभारण्यात आला. तसंच आजच्या दादर पूर्वेला समुद्रात भर घालून जमिनी निर्माण करण्यात आल्या. सुरवातीला आगर, वाड्यांचा असलेला हा परिसर हळूहळू सुनियोजित पद्धतीने शहरीकरणाचा भाग बनत गेेला. त्यातून मधे मोकळं मैदान आणि सभोवती साधारणतः एकाच आकाराच्या इमारती असं नियोजन साकारत गेलं.

मुंबईच्या इतिहासाबद्दलचे अनेक संदर्भ प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या ग्रंथात सापडतात. त्यात एके ठिकाणी प्रबोधनकार आणि आर्किटेक्ट इंजिनिअर द्वारकानाथ राजाराम उर्फ बाळासाहेब वैद्य यांच्यातला संवाद आहे. प्रबोधनकार त्यात बाळासाहेब वैद्य यांचा उल्लेख ‘शिवाजी पार्कचे आद्य कल्पक’ असा करतात. मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या या अनाम शिल्पकारांचा इतिहास नव्याने मांडणं आज गरजेचं झालंय.

ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी शिवाजी पार्कच्या इतिहासाबद्दल ‘शिवाजी पार्क: दादर २८, हिस्ट्री, प्लेसेस, पीपल’ असं इंग्रजी पुस्तक लिहिलंय. त्यात त्या म्हणतात की, ‘शिवाजी पार्क परिसरात लोकांनी राहायला यावं यासाठी तेव्हा सरकारने विशेष सवलती जााहीर केल्या होत्या. तसंच फ्लश असलेले संडास असणारी घरं ही त्याकाळात नव्यानेच या भागात बांधली गेली होती. मुळात घरात संडास असणं, हीच गोष्ट त्याकाळात मान्य होण्यासारखी नव्हती. तसंच हे संडास साफ करायला सफाई कर्मचाऱ्यांना घरातून प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे अनेक घरांमधे संडासमधे जाण्यासाठी स्वतंत्र जिन्यांची व्यवस्था करण्यात आली.'

हेही वाचाः असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा

माहीम पार्काचं शिवाजी पार्क

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३०० व्या जयंतीचं औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे यांनी माहीम पार्काचं नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ ठेवावं असं सुचवलं. तेव्हा या विभागाच्या नगरसेविका होत्या अवंतिकाबाई गोखले. गांधीजींचं पहिलं मराठी चरित्र लिहिणाऱ्या लेखिका अशी अवंतिकाबाई गोखले यांची ओळख. गांधीवादी विचारसरणीच्या अवंतिकाबाईंनी शिवाजी पार्कचं नाव बदलण्यासंदर्भातला ठराव महापालिकेत उचलून धरला.

१० मे १९२७ रोजी हा ठराव मंजूर झाला आणि या ऐतिहासिक मैदानाचं नाव शिवाजी पार्क असं झालं. यामुळे शिवाजी महाराजांचं जन्मवर्ष ही १६२७ की १६३० असाही एक वाद तेव्हा इतिहासकारांमधे झाला होता. एकंदरीत वाद आणि शिवाजी पार्क हे समीकरण काही आजचं नाही, हे इतिहासात वारंवार दिसून येतं. आता तर या मैदानाचं नाव फक्त शिवाजी पार्क असं नसून १२ मार्च २०२०ला महापालिकेनं ठराव करून ‘छत्रपती शिवाजी महाराज मैदान’ असं नाव देण्यात आलंय.

संयुक्त महाराष्ट्राचा वणवा आणि शिवतीर्थ

रोखठोक भाषणं आणि शिवराळ भाषा ही काही शिवाजी पार्काच्या झाडांनी आज ऐकलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या आधीपासून शिवाजी पार्कावर असल्या भाषणांची परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी या मैदानावर अनेक सभा गाजवल्या आहेत.

अशाच एका सभेमधे आचार्य अत्रे यांनी या मैदानाचा उल्लेख शिवतीर्थ असा केला. त्यानंतर या मैदानाला भावनिकदृष्ट्या शिवतीर्थ असं नाव मराठी मनात कोरलं गेलं. आचार्य अत्रे यांच्या सभेचे बॅनरही ‘आज शिवतीर्थावर आचार्य अत्रे यांची जाहीर सभा’ असे छापले जात.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १९६६ मधे याच शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याचं ठरवण्यात आलं. लोकवर्गणीतून हा पुतळा बसवण्यात आला. साधारणतः हातात तलवार नसलेला, फक्त दिशा दाखवणारा शिवरायांचा हा एकमेव पुतळा असावा. या साऱ्या घटनांमुळे आज आज या मैदानाचं नाव काहीही असलं तरी मराठी माणसासाठी हे शिवतीर्थ जिव्हाळ्याचा विषय आहे.

हेही वाचाः उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

शिवसेना आणि शिवाजी पार्क

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर १९६० मधे जो महाराष्ट्र हातात आला, त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकवण्यासाठी सतत लढावं लागणार आहे. त्यातून पुढे १९६६ मधे शिवसेनेचा जन्म झाला. शिवाजी पार्कजवळ असलेल्या प्रबोधनकारांच्या घरी शिवसेनेची स्थापना झाली असली, तरी शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार तिथे होते. याच मेळाव्यात त्यांनी ‘मी माझा बाळ महाराष्ट्राला देत आहे’ असं जाहीरपणे सांगितलं होतं.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा हे नंतर समीकरणच बनलं. एकीकडे शिवसेना वाढत होती आणि दरवर्षी सभेची गर्दीही. आजवरचे अनेक रेकॉर्ड शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने मोडले. तसंच दसरा मेळाव्यातले वेगवेगळे प्रयोगही प्रचंड गाजले. १९८२ च्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार आणि समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचीही भाषणं झाली होती.

२०१२ला झालेल्या मेळाव्यात बाळासाहेबांना तब्येत बरी असल्याने येता आलं नाही. तेव्हा त्यांचं वीडियो रेकॉर्डेड भाषण ऐकायला शिवाजी पार्क भरलं होतं. याच सभांच्या जोरावर १९९५ मधे शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. मनोहर जोशी यांच्या मुख्यंमत्रिपदाचा शपथविधी हा देखील राजभवनात न होता, शिवाजी पार्कावरच झाला होता. आता उद्धव ठाकरे यांच्याही मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही इथंच झाला.

शिवाजी पार्कशी भावनिक नातं

या सभांचा एक परिणाम असाही झाला की, २०१० मधे मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर केला. या सायलेंट झोनच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. सामनामधून आणि शिवसेना नेत्यांच्या विधानांनी त्यावेळी मोठी राळ उठवली. सायलेंट झोनच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा दसरा मेळावा कोर्टात गेला. शेवटी अपवादात्मक निर्णय म्हणून शिवसेनेला दरवर्षी हा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली.

१९९५ मधे बाळासाहेबांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा पुतळा याच शिवाजी पार्कवर उभारण्यात आला. तसंच, २०१२ मधे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधीही याच शिवाजी पार्कात करण्यात आले. गिरगाव चौपाटीवर झालेल्या लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीनंतर सार्वजनिक खुल्या जागी अंत्यविधी करण्याची परवानगी मुंबईत फक्त बाळासाहेबांच्या वेळी देण्यात आली.

त्यानंतर यावर्षी २०२२ मधे लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीसाठीही पुन्हा शिवाजी पार्क वापरण्यात आले. शिवाजी पार्कचा असा अंत्यविधीसाठी वारंवार वापर होऊ नये, यासाठी माध्यमांमधे आणि समाजमाध्यमांमधूनही आवाज उठवण्यात आला.

हेही वाचाः बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

भारतीय क्रिकेटची पंढरी

माधव मंत्री, वासू परांजपे, नरी काँट्रॅक्टर, विजय मर्चंट, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, अजित आगरकर अशी भलमोठ्ठी यादी शिवाजी पार्कने घडवलेल्या क्रिकेटपटूंची करता येईल. रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या अनेक क्रिकेट प्रशिक्षकांनी या मैदानावर क्रिकेटपटू घडवले. एकेकाळी ‘दादर युनियन स्पोर्ट्स क्लब' आणि ‘शिवाजी पार्क जिमखाना’ यांच्यामधे झालेल्या  क्रिकेट सामन्यांनी शिवाजी पार्कवर तुफान गर्दी खेचलीय. आजही दिवसाउजेडी कधीही गेलो तरी, शिवाजी पार्कवर क्रिकेट सुरू नाही, असं दृश्य दिसणं अवघड आहे.

शिवाजी पार्क जिमखाना ही आज विख्यात संस्था असली तरी तिची सुरवात शिवाजी पार्कवर झालीच नव्हती. दादर स्टेशन परिसरात असलेला हा ‘न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब’ नंतर शिवाजाी पार्कात आला. याच संस्थेचं नाव नंतर दादर हिंदू जिमखाना असं झालं आणि पुढे हा क्लब शिवाजी पार्क जिमखाना म्हणून लोकप्रिय झाला. याच शिवाजी पार्क जिमखान्यावर पहिलंवहिलं टेनिस कोर्ट स्थापन झाल्याची नोंद सापडते. त्यामुळे फक्त क्रिकेटच नाही, तर क्रिकेटसोबत टेनिस, फुटबॉल आणि इतर अनेक खेळ या मैदानात सतत बहरत राहिले.

उद्यान गणेश आणि इतर संस्था

शिवाजी पार्कची आणखी एक ओळख म्हणजे उद्यान गणेश मंदिर. १९७० मधे बांधण्यात आलेल्या या छोटेखानी पण नितांत सुंदर गणेश मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. तिथं असलेल्या झाडाखाली कुणीतरी एक गणपतीची मूर्ती ठेवली. नंतर सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी मंडळी तिथं पाया पडू लागली. हळूहळू त्याचं एक छोटं मंदिर झालं. अनेकांच्या श्रद्धाविश्वाचा भाग बनलेला हा गणपती पुढे १९७०मधे नेटक्या मंदिरात नव्या रुपेरी स्वरूपात विराजमान झाला. आज अनेक सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांचं उद्यान गणेश हे श्रद्धास्थान आहे.

उद्यान गणेशाच्या शेजारीच कालीमातेचं मंदिर आहे. हे कालीमातेचं मंदिर आहे तो बंगाल क्लबही शिवाजी पार्कवरची जुनी संस्था. यावर्षी हा बंगाल क्लब आपलं शतक महोत्सवी वर्ष साजरं करतोय. फुटबॉलच्या सामन्यांसाठी, नवरात्रातल्या दुर्गापुजेसाठी प्रसिद्ध असलेला हा क्लब मुंबईतल्या बंगाली बांधवांची सर्वात जुनी संस्था आहे. तिथं होणारी दुर्गापूजा ही शहरातली सर्वात पहिली दुर्गापूजा असल्याचं या क्लबचं म्हणणं आहे.

या बंगाल क्लबच्या पुढे असलेला स्काउट आणि गाईड हॉल, त्याच कोपऱ्यावर असलेला प्लेगचा क्रॉस, शिवाजी पार्कच्या चैत्यभूमीकडच्या कोपऱ्यावर असणारं समर्थ व्यायाम मंदिर आणि तिथला प्रसिद्ध मल्लखांब, मीनाताईंच्या पुतळ्याशेजारी असलेलं नानी-पार्क अशा अनेक संस्थांनी हे पार्क मुंबईतली हॅपनिंग जागा ठरलेली आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी तिथं गेलो तरी तुम्हाला एकटं वाटणार नाही, असं वातावरण तुम्हाला कायमच शिवाजी पार्क परिसरात फिरताना जाणवतं.

मुळात मुंबईत २८ एकर जमीन अशी सपाट पसरलेली पाहायला मिळणं हीच मोठी चैन आहे. त्यामुळे शिवाजी पार्क आणि त्याचा सभोवती असलेला कट्टा हा मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्याची सर्वात मोठी सोय आहे. त्यामुळेच शिवाजी पार्क म्हणजे फक्त राजकीय युद्धभूमी नसून, ती कला, क्रीडा, संस्कृती आणि शहर इतिहासाची साक्ष देणारी वास्तू आहे, याची आठवण आपण कायमच ठेवायला हवी.

हेही वाचाः 

ओबीसी राजकारणाचा गुरुमंत्र देणारा भगवानगड

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही