आपला आपला अंदाजः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार

१७ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभेचा निकाल लागायला आता सातेक दिवस राहिलेत. रविवारी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. पण महाराष्ट्रात सध्या कोण कुठली जागा जिंकणार, हरणार याचीच चर्चा सुरू आहे. हे ध्यानात घेऊन सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षही सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आपला आपला अंदाज या कोलाजवरील सदरातला हा आणखी एक लेख.

भाजपला २०१९ ची लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशमधे जड जाणार याची आधीच खात्री पटल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे आणि पश्चिम बंगालकडे वळवला. शिवाय महाराष्ट्रात २०१४ मधे जिंकलेल्या  ४२ जागा पुन्हा कायम ठेवता येणार नाही याचा अंदाज आला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं अस्तित्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं पणाला लावलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं विश्लेषण आपल्याला त्याचं अंगाने करावं लागणार आहे.

राष्ट्रवादीत सबकुछ शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी  वयाच्या ७८ व्या वर्षीही थेट मैदानात उतरून यंदा निवडणूक गाजवली. त्यांनी सुरवातीपासून शेवटपर्यंत महाआघाडीची सर्व सुत्रं आपल्या ताब्यात ठेवली. अर्थात बारामतीमधे मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
 
माढा, शिरूर आणि मावळमधे ही बरंच लक्ष घालावं लागलं. सुप्रिया सुळे बारामतीत तर अजित पवार मुलगा पार्थसाठी मावळमधे अडकून पडले. याचाच अर्थ राज्यात जी ताकद ऊर्जा खर्ची पडते ती या जागांमुळे मर्यादित झाली. घराणेशाही यानिमित्ताने बळकट झाली इतकंच. शिवाय  राष्ट्रवादीतला अंतर्गत  संघर्ष काँग्रेससारखाच उफाळूनवर आला.

हेही वाचाः महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

काँग्रेसमधे विस्कळीतपणाचा बोलबाला

दुसरीकडे काँग्रेस पक्ष  प्रचारात आणि संघटन  शक्तीत दुबळा ठरला. ज्यांच्या शिरावर महाराष्ट्राची धुरा होती त्या अशोक चव्हाण यांना निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत स्वतःच्या प्रचारासाठी  नांदेडमधेच अडकून पडावं लागलं. हीच  परिस्थिती काँग्रेसच्या इतर महत्वाच्या नेत्यांची होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांची मोदी, शहा यांच्याविरोधातली आक्रमक भाषण हीच काय काँग्रेससाठी जमेची बाजू म्हणता येईल.

मात्र एक निश्चित सांगता येईल की ज्या मेहनतीने आणि जिद्दीने  राहुल गांधी यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात यश मिळवलं तसंच यश महाराष्ट्रात मिळवण्याची चांगली संधी काँग्रेसने  स्वतःहून घालवली. अर्थात त्याची कारणही भरपूर आहेत. मात्र काँग्रेसच्या परंपरेनुसार  संभावित अपयशाचं खापर हे केवळ अशोक चव्हाणांवरच फुटेल. अर्थात पूर्ण निकाल हाती आल्यावरच आणखी ठोस विश्लेषण करता येईल.

म्हणून राष्ट्रवादीला मिळतील जास्त जागा

सुजय विखे पाटील यांना भाजपमधे पाठवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं समाधान झालं नाही. आघाडीच्या जागावाटपात मिळणारच नव्हती त्या अहमदनगरच्या जागेसाठी स्वतःच सारं राजकीय अस्तित्व पणाला लावण्याची काही गरज नव्हती. किमान लोकांच्या नजरेत विखे झिरो झाले. सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या  मनोबलावर याचा  वाईट परिणाम झाला.

या सर्व कारणांमुळे आघाडीमधे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील. त्यामुळे राज्यात शरद पवार यांचा आवाज हा विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी मोठा राहणार आहे. याच कारण असं की निवडणुकीचा  चौथा टप्पा पार पडत असतानाच्या दिवशीच  शरद पवार  यांनी मुंबईत मतदान करून थेट दुष्काळी भागात धडक दिली. आणि  चार मेला त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत मुंबईत दुष्काळ परिषदही घेतली. शिवाय मुख्यमंत्र्यांना भेटून पक्षाने सरकारसमोर काही ठोस  मागण्याही ठेवल्या. तर काँग्रेसने १० मेला दुष्काळावर बैठक घेतली.

हेही वाचाः दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई

भाजपची सारी भिस्त फडणवीसांवर

भाजप आणि शिवसेना प्रचारात आक्रमक होती. तरी त्यांचेही नेते स्वतःच्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचासारखा मातब्बर नेता असून राज्यातल्या प्रचाराची सारी धुरा मुख्यमंत्री यांच्यावरच होती. पहिल्या टप्प्यात तर गडकरींसारख्या दिग्गजाला  काँग्रेसच्या नाना पटोले यांनी शेवटपर्यंत नागपूरमधेच अडकवून ठेवलं होत.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालनाच्या प्रचारातून आणि नंतर स्वतःच्या आजारातून बाहेर पडू शकले नाहीत. मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती असलेल्या सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांचेही राज्यभर म्हणावे तसे झंझावाती  प्रचार दौरे दिसले नाहीत. त्यांच्या सभांचीही फार चर्चा झाली नाही. बीडमधे धनंजय विरुद्ध पंकजा  अशीच  लढाई पाहायला मिळाली.

गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार. त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणात फडणवीसांच्या ताकदीच्या जोरावर बाजी मारली. शिवाय उत्तर महाराष्ट्राची  पक्षाची कमानही त्यांच्याच खांद्यावर होती. चंद्रकांत पाटील  यांनी अमित शहांच्या आदेशानुसार  बारामतीमधे तळ ठोकला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली.

हेही वाचा: आपला आपला अंदाजः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

उद्धव ठाकरे सावध पवित्र्यात

शिवसेनेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरं कोणतंही प्रभावी नेतृत्व राज्यभर दिसलं नाही. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या निमित्ताने मीडियामधे चर्चेत राहणाऱ्या ठाकरेंनी यावेळी मीडियापासून अक्षरशः पळ काढला. नाही म्हणायला घरच्या घरी  सामनाचे संपादक संजय राऊत यांना मुलाखत देण्यातच धन्यता मानली. दुसरीकडे भाजपसोबतच्या युतीमुळे शिवसैनिकही म्हणावा तसा प्रचारात दिसला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भरसभेत सारखं विचारावं लागलं, ‘ही युती तुम्हाला मान्य आहे ना. मग आहे तर विरोधी पक्षांच्या पोटात का दुखतं?’

याचा अर्थ प्रत्येक पक्षात राज्यव्यापी नेतृत्व हे ऐका मतदारसंघात अडकून पडलं आणि भाजपमधे ते मुद्दाम अडकवून ठेवलं गेलं. विनोद तावडे यांच्यावर मीडियाला सामोरे जाण्याची जबाबदारी देवून त्यांना विरोधी पक्षांतल्या मित्रावरही वार करण्यास बाध्य केलं गेलं.

हेही वाचाः कोण जिंकणार, निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज

निवडणुकीचं चित्रचरित्र बदलणारे मुद्दे

राष्ट्रीय मुद्द्यावर निवडणूक रंगण्याऐवजी जातीपातीच्या आणि गटातटाच्या राजकारणात  ती विभागली गेली. स्थानिक उणीदुणी काढली गेली. नगरसेवक, आमदार,खासदार यांच्या कामात लोकांनी सरमिसळ केली. लोकसभेच्या निवडणुकीचं चित्रचरित्र त्यामुळे बदललं. यावर छगन भुजबळ हे जय महाराष्ट्र चॅनलशी बोलताना म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधानच स्वतः जातीचा उल्लेख करत असतील तर इतरांना दोष कसा दिला जावू शकतो.’

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरानी आघाडी होण्यापासून ते त्यात बिघाडी होण्यापर्यंत स्वतःला खूप चर्चेत ठेवलं. इतकं करून त्यांच्या पदरात काय पडणार आहे हे छातीठोकपणे धड त्यांनाही सांगता येत नाही. आंबेडकरांची राजकीय समीकरण जगावेगळी आहेत. ते म्हणतात की काँग्रेसला भाजपकडे गेलेला बहुजन मतदार आपल्याकडे वळवण्याची पूर्ण संधी होती. मात्र ती त्यांनी महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामील न करून घालवली.

हेही वाचा: आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

आंबेडकरांच्या बोलबाल्याचा निकाल लागणार

मात्र हाच ६० टक्के बहुजन स्वतःकडे वळवण्यात वंचित आघाडीला यश मिळल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसणार आहे. त्यांची ही राजकीय मांडणी अनेकांच्या पचनी पडत नाही. मात्र उलटा प्रश्न विचारला की भाजप नेत्यासारखे तेही बिथरतात. इतके बिथरूनसुद्धा त्यांचे किती उमेदवार निवडून येतील हे सांगताना त्यांची पुरती दमछाक होते.

आंबेडकरांची बौद्धिक  मांडणी करण्याची भूक काही संपत नाही. आणि त्यासाठी ते कायम वेगवेगळे तर्क देत राहतात. विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकर किती प्रभावी ठरतील हे लोकसभेच्या यशावर अवलंबून असेल. कारण त्यांचा अतिबुद्धीप्रामाण्यवाद, आडमुठेपणा, टोकाचा काँग्रेस आणि शरद पवार द्वेष हा ठळकपणे समोर आलाय.

आंबेडकर यांच्यामुळे दलित नेते म्हणवून घेणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या राजकारणावर मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. आठवले यांनी आपला आरपीआई पक्ष पूर्णपणे भाजपच्या दावणीला बांधल्याची वाईट प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधे आहे. मात्र आठवले यांना ते मान्य नाही.

गेल्यावेळी सहा जागा असलेल्या काँग्रेस आघाडीला २०  जागा मिळतील. मतमोजणीची तारीख जशी जवळ येतेय तसा थोडा फरक या अंदाजावर पडतोय. दुसरीकडे ४२ जागा जिंकणाऱ्या युतीला ३० जागांवर समाधान मानावं लागेल.

हेही वाचाः आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?

(लेखक हे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधे एसिस्टंट एडिटर आहेत.)