यंदा संत रविदासांच्या जयंतीला मोठमोठे नेते देवळांत का पोचले?

१९ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा होती. त्यावेळी संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त साधत राजकीय नेते वाराणसीच्या रविदास मंदिरात नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यांमधे ट्विटरवर स्पर्धा पहायला मिळाली. रविदासांना मानणारा मोठा वर्ग उत्तरप्रदेश, पंजाबमधे आहे. तिथली दलित वोट बँक या सगळ्याच्या मुळाशी आहे.

१६ फेब्रुवारीला सगळेच राजकीय सकाळपासूनच सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचं दिसत होतं. या दिवशीचे त्यांचे ट्विट, पोस्ट लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी ते योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नींपासून अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सगळ्यात नेत्यांमधे जोरदार स्पर्धा पहायला मिळत होती. संत रविदास यांची जयंती या स्पर्धेचं निमित्त होतं.

सध्या देशातल्या ५ राज्यांमधे विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. पंजाब आणि उत्तरप्रदेशकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजकीय पक्षांसाठी या राज्यांमधली निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी मतांची बेगमीही सुरू झालीय. अशातच १६ फेब्रुवारीला आलेल्या संत रविदास यांच्या जयंतीचं निमित्त राजकीय पक्षांसाठी एक संधीच होती. त्याचा पुरेपूर वापर राजकीय पक्ष करून घेताना दिसले. 

संत रविदासांचं उत्तरप्रदेश, पंजाब कनेक्शन

संत रविदासांना मानणारा समुदाय स्वतःला रविदासिया म्हणतो. त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंजाबमधल्या जालंधरच्या डेरा सचखंड बल्लन या मठाने २०१०ला रविदासिया नावाचा स्वतंत्र धर्मच घोषित केलाय. मठाकडून जयंतीच्या काळात जालंधरहून `बे-गमपूर एक्सप्रेस` वाराणसीच्या दिशेने लाखो भाविकांना घेऊन जाते. वाराणसीतलं गोवर्धनपूर रविदास यांचं जन्मस्थान. तिथं त्यांचं मंदिरही उभारण्यात आलंय. दरवर्षी इथं माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते.

रविदास यांना रोहिदास, रेमदास, रैदासही म्हटलं जातं. त्यांचा काळ साधारणपणे इ.स. १४५० ते १५२० असा मानला जातो. ते संत कबीरांचे समकालीन होते. कबिरांप्रमाणेच संत रामानंद हे रविदासांचा आदर्श होते. अस्पृश्य मानल्या गेलेल्या चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला. पुढे आयुष्यभर त्यांना जातीयवादाच्या दाहक अनुभवाला तोंड द्यावं लागलं. त्याची कटुता न बाळगता त्यांनी आपल्या विचार आणि कामातून भारतीय समाजमनावर प्रभाव पाडलाय.

आपलं आयुष्य उत्तर भारतात घालवलेल्या रविदासांचं महाराष्ट्राशीही खास नातं आहे. इथं जागोजागी त्यांची मंदिरं पहायला मिळतात. वारकरी संप्रदायातल्या भजन कीर्तनात त्यांच्या रचनांना स्थान मिळालंय. त्यातून रविदास घरोघर पोचतायत. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांमधे त्यांना वारकरी संत म्हणून ओळख मिळालीय.

हेही वाचा : जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!

पंजाबची निवडणूक पुढे ढकलली

रविदास यांना अभिवादन करण्यासाठी पंजाबमधले लाखो लोक वाराणसीतल्या त्यांच्या जन्मस्थानी भेट देतात. पंजाब विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारीला होणार होती. पण १६ फेब्रुवारीला रविदास यांची जयंती आल्यामुळे निवडणूक आयोगाने ही तारीख पुढे ढकलली. त्यासाठी पंजाबमधल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. ती विनंती मान्य करत १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला मतदानाची तारीख घोषित करण्यात आली.

२०११च्या जनगणनेप्रमाणे पंजाबमधे ३१.९ टक्के दलित आहेत. यात १९.४ टक्के शीख दलित तर १२.४ टक्के हिंदू दलित आहेत. दलित लोकसंख्येत रामदासी आणि रविदासी समुदायाचा वाटा २०.७ टक्के इतका आहे. पंजाबमधल्या ११७ विधानसभा मतदारसंघांपैकी ९८ मतदारसंघांवर २० ते ४९ टक्के दलित लोकसंख्येचा प्रभाव आहे. तर ३४ मतदारसंघ हे राखीव आहेत. त्यामुळेच पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर चरणजीत चन्नी यांचं येणं हा मास्टरस्ट्रोक समजला गेला. 

चन्नी हे रामदासिया समुदायातून येतात. हा समुदाय रविदासियाशी जोडलेला आहे. पंजाबच्या निवडणुकीत काँग्रेससाठी दलित फॅक्टर महत्वाचा ठरतोय. काँग्रेसची वोट बँक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. हा मतदार आम आदमी पक्षाच्या बाजूने वळू नये म्हणून काँग्रेससोबत भाजप, शिरोमणी अकाली दल असे सगळेच पक्ष कामाला लागलेत. त्यामुळेच वाराणसीत रविदासांचं दर्शन घेऊन प्रतिकात्मक का होईना राजकीय पक्ष नेमका संदेश पोचवतायत.

काँग्रेस, भाजपची उत्तरप्रदेश स्ट्रॅटेजी

उत्तरप्रदेशमधे २१ टक्के दलित मतदार आहेत. तिथल्या एकूण राजकारणात दलित समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. २१ टक्के दलित मतदार जाटव आणि बिगर जाटव समाजामधे विभागला गेलाय. यातले जाटव मतदार ११ टक्के आहेत. जाटव समाज चर्मकार असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी संत रविदासांचं दर्शन महत्वाचं आहे असं उत्तरप्रदेश कवर करणारे बिजनेस स्टँडर्डचे पत्रकार सिद्धार्थ कालहंस यांनी 'द क्विंट'च्या मुलाखतीत म्हटलंय. 

सध्याची उत्तरप्रदेशमधली लढत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात होईल असं चित्र आहे. मोदी-योगींसाठी ही लढत फार प्रतिष्ठेची आहे. जाटव मतदार हे मायावतींच्या बसपाची वोट बँक मानली जाते. पण उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत सध्यातरी बसपा कुठंच दिसत नसल्याचं पत्रकार सिद्धार्थ कालहंस म्हणतात. त्यामुळे ही वोट बँक आपल्याकडे खेचायचा प्रयत्न भाजप आणि सपा दोन्ही पक्ष करताना दिसतायत.

१६ फेब्रुवारीला योगी आदित्यनाथ हे वाराणसीतल्या रविदास मंदिरात पोचले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या करोलबाग इथल्या रविदास विश्राम धाममधे दर्शन घेतलं. झांझा वाजवत ते भजनातही सहभागी झाले होते. तर वाराणसीच्या मंदिरात राहुल गांधी,  प्रियांका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, आपचे संजय सिंग यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : 

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत

माहिती अधिकारात बदल करुन सरकारला काय साधायचंय? 

सरकारी उद्योग विकणं हा तर कातडीबचावूपणा : अभय टिळक

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी