तुर्कस्तानातल्या एका ऐतिहासिक चर्चचं न्यायालयाच्या एका निकालानंतर मशिदीत रूपांतर केलं जाणार आहे. पंधराशे वर्ष जुन्या हागिया सोफिया संग्रहालयाचं मशिदीत रुपांतर करण्याच्या चर्चेला वर्षभरापूर्वी सुरवात झाली. चहुबाजुंनी अडचणीत सापडलेल्या राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी बहुसंख्यांकवादाचं कार्ड काढलंय.
जवळपास पंधराशे वर्षांपूर्वी तुर्कस्तानातल्या इस्तंबूल शहरात एक ख्रिश्चन धर्मस्थळ म्हणून हागिया सोफिया चर्चची उभारणी करण्यात आली होती. १४५३ मधे इस्लाम धर्माला मानणाऱ्या ऑटोमन साम्राज्याची सत्ता आल्यावर या चर्चचं एका मशिदीत रुपांतर करण्यात आलं. पुढे १९३४ मधे आधुनिक तुर्कस्तानचे निर्माते मुस्तफा कमाल पाशा यांनी मुस्लिमबहुल तुर्कीला धर्मनिरपेक्ष देश म्हणून जाहीर केलं. तसंच मशिदीला पुराणवास्तू संग्रहालयाचा दर्जा दिला.
या घटनेकडे आधुनिक तुर्कीच्या इतिहासाला वळण देणारी घटना म्हणून बघितलं जातं. युनेस्कोनंही या ऐतिहासिक वास्तुला वर्ल्ड हेरेटेज म्हणून जाहीर केलं. ग्रीक शैली बांधण्यात आलेल्या या चर्चकडे स्थापत्य कलेचा एक अद्भूत, अनोखा नमुना म्हणून बघितलं जातं.
हेही वाचा : अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
जगभरातले पर्यटक तुर्कीला किंवा इस्तंबुलला गेल्यावर आवर्जून हागिया सोफियाला भेट देतात. त्यामुळे तुर्कीसोबतच जगभरातल्या उदारमतवादी, पुरोगामी वर्तुळातून या निर्णयावर कडाडून टीका होतेय. टीका करणाऱ्यांमधे ख्रिश्चन धर्मगुरू, धर्मानुयायांसोबतच इतिहासकार, अभ्यासक, राजकारण्यांचा समावेश आहे. तुर्कीच्या कोर्टानं हागिया सोफियाचं मशिदीत रूपांतर करायला परवानगी देताना म्हटलं, ‘मशिदीशिवाय या वास्तुचा अन्य कुठल्याही रुपात उपयोग करणं कायद्यानं शक्य नाही.’ त्यानंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी हागिया सोफिया इथे येत्या २४ जुलैला पहिली नमाज अदा होईल, असं जाहीर केलं.
तुर्कस्तानात अनेक वर्षांपासून कट्टर इस्लामवादी लोकांची हागिया सोफियाचं मशिदीत रुपांतर करण्याची मागणी आहे. तुर्कीतल्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मंडळींनी या मागणीला नेहमीच विरोध केलाय. पण त्यांच्या या विरोधाला लांगुलचालन म्हणून हिणवलं गेलं. बहुसंख्यांकवादाच्या जोरावर हा आवाज दाबण्यात आला. ख्यातनाम तुर्की लेखक आणि नोबेल विजेते ओरहान पामुक हे बीबीसीशी बोलताना म्हणाले, ‘या निर्णयानं काही तुर्क लोकांचा गौरव हिसकावून घेतला जाईल, जे आतापर्यंत तुर्की एक धर्मनिरपेक्ष देश आहे, असं म्हणत होते. माझ्यासारखे लाखो तुर्क मुसलमान या निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. पण आमचा आवाजच ऐकला जात नाही.’
युनेस्कोनंही आपली वर्ल्ड हेरिटेज कमिटी या वास्तुच्या स्थितीचा आढावा घेणार असल्याचं म्हटलंय. ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी तुर्कीचा हा निर्णय खूप वेदनादायी असल्याचं म्हटलंय. वर्ल्ड काऊन्सिल ऑफ चर्चने अर्दोआन यांना हा निर्णय बदलण्याची मागणी केलीय. ग्रीस सरकारनं तुर्कीच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला. रशिया, अमेरिकेनंही अर्दोआन सरकारला हा निर्णय न लागू करण्याची मागणी केलीय. रशियातल्या ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समुदायाच्या जगातल्या सर्वांत मोठ्या चर्चनेही या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केलीय. पण अर्दोआन आपली धार्मिक, कट्टरवादी प्रतिमा उजळवण्यासाठी सगळ्यांकडे कानाडोळा करत आहेत.
तुर्कस्तानात ९८ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. हीच गोष्ट आज अर्दोआन एखाद्या ढालीसारखी वापरत आहेत. धर्माची ढाल पुढं केल्यानं देशातल्या राजकीय पक्षांची मोठी गोची झालीय. कालपर्यंत सरकारचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या विरोधी पक्षांना हागिया सोफिया रूपांतरणामागचं राजकारण माहीत असूनही फारसा विरोध करता येईना. त्यामुळे अर्दोआन सरकार आमच्या या निर्णयाला सगळ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा डंका वाजवत फिरत आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ तुर्कस्ताननं या निर्णयाला कडाडून विरोध केलाय.
कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी अरबी आणि इंग्रजीत दिलेल्या प्रतिक्रियाही त्यांचा नेक इरादा बोलून दाखवतात. आपल्या ट्विटर हँडलवर अर्दोआन यांनी इंग्रजी आणि अरबी अशा दोन्ही भाषेतलं आपलं निवेदन चिकटवलंय. आपल्या या निर्णयाचा बचाव करताना ६६ वर्षांचे अर्दोआन इंग्रजीत म्हणतात, ‘हागिया सोफियाचे दरवाजे आमच्या सगळ्याच मशिदींसारखं सगळ्यांसाठीच खुले आहेत. मग तो माणूस देशातला असो की परदेशातला, मुस्लिम असो की गैरमुस्लिम. तुर्की सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतलाय.’
हे कोरोना स्पेशलही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
आपल्या देशी अनुयायांना धर्माच्या अफुच्या गोळीचा डोस देताना ते अरबीमधे याउलट प्रतिक्रिया देतात. ते सांगतात, ‘हागिया सोफियाचा पुनर्जन्म हा बुखारा ते अंदालुसिया सारख्या आमच्या सभ्यतेला म्हणजेच सिविलायझेशनला केलेला सलाम आहे.’ इंग्रजी प्रतिक्रियेत अर्दोआन आपण मानवतेचा पुजारी असल्याचं भासवतात. याउलट अरबीमधे ते आपल्या असल्या नसलेल्या वारशाचं गौरवीकरण करतात. गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची भाषा वापरतात. तो वारसा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल असल्याचं सांगत देशातल्या कट्टरवादी लोकांना, मतदारांना चुचकारत आहेत. अर्दोआन यांच्या या निर्णयाचं बहुसंख्यांक कट्टरतावाद्यांनी जोरदार स्वागत केलं.
प्रसिद्ध भारतीय इतिहासकार इरफान हबीब ट्विटरवर लिहितात, ‘हागिया सोफियाला मी अनेकवेळा भेट दिलीय. इथल्या अनोख्या स्थापत्यकलेचा आणि इतिहासाचा आनंद लुटलोय. पण एवढ्या सुंदर वास्तुचं एका मशिदीत रूपांतर व्हावं, असं कधीच वाटलं नाही. साऱ्या जगातच सध्या इतिहासाशी छेडछाड करणं उजव्या लोकांसाठी एखाद्या व्यसनासारखं आहे. धर्माचा चुकीच्या पद्धतीनं वापर करूनच या लोकांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय.’
गेल्यावर्षी अर्दोआन यांनी हागिया सोफियाचं मशिदीत रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर करण्याला एक पार्श्वभूमी आहे. अर्दोआन यांनी १९९० मधे इस्तंबूलचा महापौर म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. प्रदुषण, पाणी टंचाई, वाहतूक कोंडी यासारखे प्रश्न त्यांनी सोडवले. पुढे २००१ मधे त्यांनी जस्टिस अँड डेवलपमेंट पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली. याला तुर्कीमधे एके पार्टी असं म्हटलं जातं. आपल्या पक्षाचा धर्माशी काहीएक संबंध नसल्याचं सांगत त्यांनी मतं मागितली. धर्माचा आदर करतानाच विकासाचीही भाषा बोलणारा एक आधुनिक मुसलमान म्हणून जनता त्यांच्याकडे बघत होती.
वर्षभरातच २००२ मधे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकांनी एके पक्षाला भरभरून मतं देत अर्दोआन यांना पंतप्रधान केलं. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी १० वर्षांच्या आपल्या कार्यकाळात लोकशाही बळकट करणारे निर्णय घेतले. तीनदा पंतप्रधान राहिलेल्या अर्दोआन यांनी न्यायव्यवस्थेला बळकट करतानाचा सैन्यदलाचा हस्तक्षेप कमी केला. मानवी हक्कांना पाठबळ दिलं. त्यांच्या या आधुनिक, पुरोगामी चेहऱ्याचा देशाच्या आर्थिक प्रगतीलाही मोठा फायदा झाला. देशभरात पायाभूत सोयीसुविधांचं जाळं विणलं. रोजगार निर्माण झाले.
तुर्कीच्या संविधानानुसार कुणीही व्यक्ती तीनदा पंतप्रधान बनू शकतो. पण अर्दोआन यांना सत्ता सोडवेना. त्यामुळे त्यांनी २०१४ मधे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. राष्ट्राध्यक्ष बनले. निवडणूक जिंकताच नामधारी असलेल्या राष्ट्राध्यक्षाला कायद्यानं सर्वाधिकारी बनवलं. पंतप्रधान पदच संपवलं. पण त्यांच्या याच कारकीर्दीत देशावरचं कर्ज वाढू लागलं. देश आर्थिक संकटात सापडला. महागाई १० टक्क्यांवर पोचलीय. बेरोजगारी वाढतेय. त्यामुळे लोकांमधे अर्दोआन यांच्याबद्दल प्रचंड नाराजी वाढलीय.
अशातच एके पार्टीला इस्तंबूल आणि राजधानी अंकारा इथल्या महापालिकांमधून सत्ता गमवावी लागली. इस्तंबूलमधला पराभव तर अर्दोआन यांना पचवणंच शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी तिथे फेरनिवडणूक घेतली. फेरनिवडणुकीत त्यांचा आणखी मोठा पराभव झाला. दोन महत्त्वाच्या शहरांतली सत्ता गमावल्यापासून अर्दोआन यांचे दीर्घकाळापासूनचे पैशाचे आर्थिक मार्गचं डॅमेज झालेत. कोरोना वायरसमुळे पैशाचं हे संकट आणखी गंभीर बनलंय.
६६ वर्षांचे अर्दोआन १९९९ मधे धार्मिक द्वेष पसरवण्याच्या एका प्रकरणात चार महिने जेलची हवाही खाऊन आलेत. जवळपास २० वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या अर्दोआन यांच्या चाहत्यांमधे गेल्या काही दिवसांत झपाट्यानं घट होतेय. अशा अडचणीच्या, हातघाईच्या परिस्थितीत धर्माचं, वंशाचं कार्ड खेळण्याचा ट्रेंड जगभर सुरू आहे. अल्पसंख्यांकांना अधिकाधिक त्रास देऊन बहुसंख्यांकांना खूश ठेवलं जातंय. हाच ट्रेंड अर्दोआनही फॉलो करताना दिसत आहेत.
हेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
बहुसंख्यांकवादाचं धार्मिक राजकारण करणाऱ्या अर्दोआन यांना कोरोना संकटातही फार काही चांगलं काम करता आलं नाही. देशात सरकारबद्दल नाराजीचाच सूर वाढतोय. सत्ता जावू शकते हे ध्यानात आलेल्या अर्दोआन यांना देशाला पूर्वीपेक्षा आत्ताच आपली खरी गरज आहे, हे दाखवून द्यायचंय. त्यामुळेच अर्दोआन यांनी हागिया सोफियाचं मशिदीत रूपांतर करण्याचा निर्णय तडकाफडकी अमलात आणलाय.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्मनिरपेक्षतेचं आदर्श मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुर्कीत आता बहुसंख्यांकांचं किळसवाणं राजकारण सुरू झालंय. आम्ही संख्येनं जास्त तर मग अल्पसंख्यांकांनी आमच्या हिशोबानं राहिलं पाहिजे, असा आव या राजकारणात दडलाय. तुर्कस्तानचा गाडा आता उलटा फिरतोय. इथले जुने आदर्श अर्दोआन यांनी आऊटडेटेड ठरवलेत. तुर्कस्तानात कमाल पाशांसारखे पुरोगामी नेते आजही असतील. पण बहुसंख्यांक राजकारणाच्या गोंगाटात आज तो आवाज फार क्षीण झालाय. हेच आजच्या जगाचं वास्तव आहे.
हेही वाचा :
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?
वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट