इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?

२६ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पूर्णपणे अपयशी ठरलेत. इम्रान सरकार हे लष्कराचे कठपुतळी सरकार आहे. विरोधी पक्षांचे आंदोलन त्या सरकारला नियंत्रित करणार्याे लष्कराविरुद्ध आहे. सगळेच विरोधी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराची सरकारवरची पकड ढिली करण्याची संधी शोधतायत. सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इम्रान खान यांचा बळी देण्यासही लष्कर मागेपुढे पाहणार नाही.

पाकिस्तानी राजकारण आणि प्रशासनाच्या लष्करीकरणाला आव्हान देण्याचं धाडस पहिल्यांदाच पाकिस्तानातल्या राजकारणी आणि प्रशासकीय संस्थेनं दाखवलंय. पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच त्या देशावर लष्कराचं वर्चस्व आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा निम्मा काळ हा देश लष्करी हुकूमशाहीखाली होता. काही वेळा तिथं निवडणुकीद्वारे लोकशाही सरकारं स्थापन झाली. तर ती बहुतांशी लष्कराच्या मर्जीने आणि प्रभावाखाली चालत आलीयत.

बेनझीर भुत्तो आणि नवाज शरीफ हे पाकिस्तानातल्या आम जनतेवर पकड असलेले राजकारणी. पण लष्कराला डावलून त्यांनाही सत्ता राबवता आली नाही. बेनझीर भुत्तो आणि शरीफ यांचा राजकीय प्रभाव लष्कराला कधीही मिटवता आला नाही. शेवटी बेनझीर भुत्तो यांची हत्या करूनच हा प्रभाव संपवावा लागला.

आता नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आणि त्यांना आता दुस वासात पाठवलंय. त्यांचा राजकीय प्रभाव संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण नवाज शरीफ यांनी विजनवासातून राजकारण करण्याचा निर्णय घेतलाय. विजनवासातूनच देशाच्या राजकारणाचे सूत्रधार असलेल्या लष्करावर पहिली तोफ त्यांनी डागली आहे.

पोलिसांनी टाकली दोन महिन्यांची रजा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि त्यांची लोकप्रियता पार रसातळाला गेलीय. त्यातच देशाच्या अर्थव्यवस्थेचं दिवाळं निघालंय. पाकिस्तानात सध्या प्रचंड महागाई आहे आणि सामान्य जनता हवालदिल झालीय. याचा फायदा उठवण्यासाठी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इम्रान सरकारविरुद्ध आंदोलन छेडलंय.

इम्रान सरकार हे लष्कराचं कठपुतळी सरकार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांचं हे आंदोलन केवळ इम्रान सरकारविरुद्ध नाही तर त्या सरकारला नियंत्रित करणार्याक लष्कराविरुद्ध आहे. सिंध प्रांतातल्या कराची आणि पंजाब प्रांतातल्या गुजरानवाला या शहरांत नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या प्रचंड मोठ्या जाहीर सभांना नवाज शरीफ यांनी लंडनहून वीडियो कान्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. या सभेत त्यांनी थेट लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा आणि आयएसआयप्रमुख फैज अहमद यांच्यावर नाव घेऊन टीका केली. त्यांच्यावर घटनाविरोधी कृत्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडालीय.

त्यातच सिंध प्रांतात लष्कराने पोलिस खात्यालाच लष्करी खाक्या दाखवल्याने पोलिसांत असंतोष निर्माण झालाय. सिंध प्रांताच्या पोलिस प्रमुखांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्यां्नी दोन महिन्याच्या रजेचे अर्ज टाकलेत.

हेही वाचा : मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

लष्कर विरूद्ध पोलिस

नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांचे पती आणि लष्करातले निवृत्त कॅप्टन सफदर अवान यांच्या अटकेचा आदेश केंद्र सरकारने सिंध पोलिसांना दिला होता. पण सिंधमधे विरोधी पक्षांचे सरकार असल्याने तिथं या आदेशाची अंमलबजावणी करण्यास प्रांतिक सरकारनं नकार दिला. त्यामुळे लष्कराच्या अखत्यारीतल्या पाकिस्तान रेंजरच्या जवानांनी सफदर यांना एका हॉटेलमधून बेकायदेशीरपणे अटक केली. नंतर सिंधच्या पोलिस प्रमुखांना त्यांच्या घरातून बळेच नेऊन सफदर यांच्या अटकेच्या वॉरंटवर सही करण्यास भाग पाडले. त्यामुळे पोलिस प्रमुखांनी आणि त्यांच्या अनेक सहकार्यां्नी रजेचे अर्ज टाकले.

सिंध सरकारही या पोलिस अधिकार्यांफच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. त्यामुळे या सगळ्या प्रकारास लष्कर विरुद्ध पोलिस असं स्वरूप आलं. पाकिस्तानात लष्कराविरुद्ध बंड सुरू झाल्याचं चित्र उभं राहिलं. या सगळ्या परिस्थितीमुळे लष्कर प्रमुख बाजवा सध्या गडबडून गेलेत. त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय. 

त्यामुळे रजा टाकलेल्या सगळ्या पोलिस अधिकार्यां नी दहा दिवसांसाठी आपली रजा पुढे ढकललीय. याचा अर्थ येत्या दहा दिवसांत जनरल बाजवांना संबंधित लष्करी किंवा रेंजर अधिकार्यांजवर कारवाईची घोषणा करावीच लागेल. पोलिसांनी लष्कराला आव्हान देण्याचा हा देशातला पहिलाच प्रसंग आहे.

पाकिस्तानी सैन्य चांगलंच, पण

तिकडे नवाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख बाजवा आणि आयएसआय प्रमुखांना आरोपीच्या पिंजर्याात तर उभं केलंच आहे. पण आपलं सरकार पाडण्याचे कसे प्रयत्न लष्कराने केले याची जाहीर हकीकत सांगितलीय. आता नवाज शरीफ यांच्या आरोपांना  पाकिस्तानचे हे दोन सर्वोच्च लष्करी अधिकारी कसे उत्तर देतात ते पाहायचं.

सध्या तरी असे दिसते की, नवाज शरीफ हे राजकीय विजनवासातच राहूनच लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करत राहतील. त्यांची कन्या पाकिस्तानात राहून त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचा कारभार करत राहील. नवाज शरीफ यांनी देशाच्या परिस्थितीबद्दल संपूर्ण लष्कराला दोषी धरलेलं नाही. उलट ते पाकिस्तानी सैन्याचा गौरव करतायत. पण काही लष्करी अधिकार्यांधनी आपल्या स्वार्थासाठी लष्कराचा वापर केला असा त्यांचा आरोप आहे.

या आरोपाला उत्तर देणं लष्करासाठी अवघड होणार आहे. कारण लष्कराचे एक अधिकारी लेफ्टनंट जनरल असिम सलीम बाजवा यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहेत. त्यांनी गैरव्यवहार करून आपल्या कुटुंबाचं पिझ्झा चेनचं साम्राज्य उभारलंय. हा आरोप सकृत दर्शनी तरी खरा दिसतोय. त्यामुळे जनरल असिम बाजवा यांना पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉरचे प्रमुखपद सोडावं लागलंय. पण आता नवाज शरीफ यांच्या आरोपांनंतर त्यांची चौकशी करणे अपरिहार्य झालंय. किमान ही चौकशी केल्याशिवाय तरी लष्करप्रमुख बाजवा शरीफ यांच्या आरोपातून स्वत:ला मुक्त करू शकणार नाहीत.

हेही वाचा : तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?

जमीनदार राजकारण्यांचं पाकिस्तान

नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख आणि आयएसआयप्रमुख यांच्याविरुद्ध जे आरोप केलेत, त्याला अन्य सगळ्या विरोधी पक्षांचा सध्या तरी मूक पाठिंबा आहे. कारण देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना लष्कराचा जाच सहन करावा लागतोय. देशात जे काही चांगलं चाललंय ते लष्करामुळे चालू आहे आणि जे काही वाईट चाललंय ते राजकारण्यांमुळे चाललंय, असा समज लष्कराने पसरवलाय. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते लष्कराला अडचणीत आणण्याची आणि त्याची पकड ढिली करण्याची संधी शोधत आहेत. आता नवाज शरीफ यांनी ती संधी दिलीय.

अर्थात शरीफ यांचे आरोप त्यांच्यावर किंवा अन्य राजकारण्यांवर उलटवण्याचा प्रयत्न लष्कर करणार हे नक्की. अशावेळी राजकारण्यांची प्रतिमा किती उजळ आहे आणि त्यांची सामान्य मतदारांवर किती पकड आहे, हे महत्त्वाचं ठरतं. दुर्दैवाने पाकिस्तानातले बहुतेक राजकारणी हे जमीनदार आहेत आणि त्यांचा सामान्य माणसांच्या विवंचनांशी काही संबंध नाही. शिवाय अनेक राजकारणी भ्रष्टही आहेत. त्यामुळे राजकारण्यांत फूट पाडणं हे लष्करासाठी फार अवघड काम नाही. 

याच मार्गाने पाकिस्तानी लष्कराने राजकारणावरची पकड मजबूत केलीय. त्यामुळे येत्या काळात लष्कर अनेक राजकारण्यांवर खरेखोटे आरोप करून त्यांची धरपकड करण्याची आणि खोट्या चौकशांत त्यांना अडकवण्याची अधिक शक्यता आहे. लष्कराने नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवलेतच. 

इम्रान खान यांचा बळी देणार?

थोडक्यात येता काळ पाकिस्तानसाठी बर्याचच उलथापालथीचा असेल. लष्कराने पाकिस्तानात दडपशाही सुरू केली तर त्याचा पाय अधिकच खोलात अडकणार आहे. कारण नवाज शरीफ लंडनमधे बसून लष्कराविरुद्ध रान उठवत राहतील.

सध्याच्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांचा बळी देण्यास लष्कर मागेपुढे पाहणार नाही. पण इम्रान खान यांना काढल्यास सत्ता कुणाच्या हाती द्यावी हा प्रश्न लष्करापुढे असेल. सध्या तरी सत्ताधारी पक्षात तसा नेता नाही. लष्कराला कामचलावू नेता हवाय. तसा नेता शोधून ते त्याला खुर्चीवर बसवतील. पण, नवाज शरीफ यांची तोफ त्यामुळे शांत होईल असं वाटत नाही. येत्या काळात पाकिस्तानी राजकारण बरंच गाजत राहील यात काही शंका नाही.

हेही वाचा : 

कोविडनंतर जग कसं विभागलं गेलंय?

कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं?

म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

(लेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.)