वाघ मतदान करत नाहीत म्हणून

२० नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ९ मिनिटं


वाघ नाही तर माणसं मतदान करतात. त्यामुळे अवनी वाघिण मारल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विदर्भात राजकीय फायदाच होतोय. त्यांच्यावर जगभर जितकी टीका होईल, तितका त्यांना स्थानिक पातळीवर फायदाच आहे. फक्त भाजपच नाही तर स्थानिक पातळीवर सगळेच पक्ष अवनीला मारल्याचं समर्थनच करत आहेत.

वाघ वाचवा, हे सरकारी धोरण आहे. सरकारनेच या तत्वाला हरताळ फासत यवतमाळ जिल्ह्यात १३ माणसं खाणाऱ्या अवनी वाघिणीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात न टाकता तिला ठार मारलं. त्यामुळे प्राणीप्रेमी सध्या जगभर आंदोलनं करत आहेत. अवनी प्रेमींनी वनविभागासह, शार्पशूटर शहाफत अली खान, त्याचा मुलगा असगर अली यांना तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंच आहे. पण त्यांचं मुख्य टार्गेट राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.

वाघ मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतोय, असं म्हणण्याची वेळ अवनीच्या मृत्यूनंतर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे निर्माण झालीय. माणूस आणि जंगली प्राण्यांमधला अलीकडच्या काळातला महाराष्ट्रातला सर्वात भीषण संघर्ष म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीच्या दहशतीचा उल्लेख करता येईल. गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव, पांढरकवडा - केळापूर, कळंब या तीन तालुक्यांत १३ जणांचा बळी घेऊन अवनी धुमाकूळ घालत होती. अखेर दिवाळीच्या तोंडावर २ नोव्हेंबरला या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. 

तेव्हा अवनीप्रेमी कुठे होते?

वनविभाग आणि शासनाने नेमलेल्या खासगी शार्पशूटरच्या कारवाईने अवनीच्या दहशतीचा अध्याय संपला. मात्र देशात आणि जगात ठिकठिकाणी 'लेट अवनी लाईव', 'अवनी नॅशनल शेम!' असे फलक हाती घेऊन निषेध सुरू झालाय. या कारवाईनंतर अवनी समर्थक विरुद्ध अवनीच्या दहशतीखालील लोक, वनविभाग, शिकारी, महाराष्ट्र सरकार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असा दोन गटांत सामना रंगलाय. 

अवनीला ठार मारणं योग्य होतं किंवा नाही, तिला मारताना नियमांचं उल्लंघन झालं का? हे सारं बाहेर येण्यासाठी चौकशी समितीचा अहवालाची वाट् बघावी लागेल. वन्यजीव प्रेमींची अवनीबद्दलची सहानुभूती समजून घेता येतेच. पण या कारवाईनंतर देशात सुरू झालेलं राजकारण हे अवनीच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकारच आहे, अशी अवनीग्रस्त भागातील जनतेची ठाम समजूत आहे. या परिसरातील १३ माणसांची या वाघिणीने शिकार केली तेव्हा माणुसकीचा हा सोशल उमाळा कुठे लपला होता, असा संतप्त प्रश्न परिसरातील सामान्य नागरिक विचारत आहेत. 

अवनीला ठार मारण्यावरून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलाय. त्यांचं प्राणीप्रेम प्रसिद्ध आहेच. महाराष्ट्र सरकारने अवनीची ठरवून हत्या केली आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अवनीचे मारेकरी आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा, असं पत्रच मनेका गांधींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं. काँग्रेस, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी या सर्वच पक्षातील नेत्यांनी मृत अवनीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपची शिकार करण्याचा प्रयत्न चालवलाय.

अवनीमुळे सगळे पक्ष एकत्र

दुसरीकडे याच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या कारवाईचे समर्थन करून वनविभाग आणि वनमंत्री मुनगंटीवार यांची पाठ थोपटलीय. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, भाजप आमदार डॉ. अशोक उईके, शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी वनविभागाच्या कारवाईचं समर्थनच केलंय.  

इतकंच नाही, तर अवनी मृत्यूच्या वादानंतर एका जाहीर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर संपूर्ण देशात सुधीर मुनगंटीवारांइतका कार्यक्षम वनमंत्री नसल्याचं प्रमाणपत्रच दिलंय. मुख्यमंत्र्यांनीही या विषयात विरोधक राजकारण करीत असून मुनगंटीवार कोणाला बंदूक घेऊन मारायला गेलेले नाहीत. त्यामुळे अवनी वाघिणीच्या कारवाईवरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं सांगितलंय. 

राळेगाव, पांढरकवडा या भागाचं नेतृत्व सध्या भाजपाचे आमदार करत आहेत. या दोन्ही आमदारांनी जनभावनेसोबतच मुनगंटीवारांच्या बाजुने उभं राहणं पसंत केलंय. एरवी राजकीय फडात एकमेकांना लोळवण्याचे‍ इरादे ठेवणारे विरोधक अवनी प्रकरणामुळे एकत्र आल्याचं चित्र या परिसरात दिसतंय. कोणत्याही निर्णयावरून एकमेकांचं उणंदुणं काढणारे विरोधी पक्षांचे नेते अवनीने भाजपच्या समर्थनात उभे केलेत, अशी कोटीही केली जातेय. 

मुनगंटीवार विरुद्ध मनेका

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे प्राणीप्रेम सर्वांना माहीत आहेच. पण त्यांच्याच पिलभीत मतदारसंघात जंगली प्राण्यांच्या त्रासातून लोकांना सोडवण्यासाठी शार्पशूटर शहाफत अली खानचीच मदत सरकारने घेतली होती, याचे दाखले मनेका गांधींना दिले जात आहेत. अवनी वाघिणीवरील कारवाईसंदर्भात मनेका गांधींचा विरोध हा राजकीय हेतूने प्रेरीत असल्याची टीका भाजपातूनच होतेय. 

मनेका गांधी केंद्रसरकारचा भाग असल्या तरी त्यांना भाजपमधे किती सन्मान आहे, हे संघाच्या जवळ असलेल्या सुधीर मुनगंटीवारांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळेच मुनगंटीवारांनी मनेका गांधींच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं. देशातल्या वाढत्या माता आणि बालमृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारून या खात्याच्या मंत्री मनेका गांधींनीच आधी राजीनामा द्यावा, असं मुनगंटीवारांनी सुनावलंय. मनुगंटीवारांच्या या प्रत्युत्तरानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अवनीवरील कारवाईबाबत मुनगंटीवारांची पाठराखणच केलीय. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही आपलं वजन मुनगंटीवारांच्याच पारड्यात टाकले.

दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनीही मुंबईत मुनगंटीवारांना पिंजऱ्यात अडकवण्याचे प्रयत्न केले. मात्र या पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भूमिका ही जनमतासोबत आहे. `अवनीमुळे या भागातील जनता काय यातना भोगत होती, ज्यांच्या घरातील लोकांना अवनीने ठार केलं, त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे, शेकडो हेक्टर शेती पडीक राहिल्याने शेतकरी, शेतमजुरांचं किती नुकसान झालं, हे वरिष्ठ नेतृत्वाला थोडंच कळतं? आम्ही सतत लोकांमध्ये राहतो. आम्हाला गावकऱ्यांचं दु:ख माहीत आहे. त्यामुळेच आमचे नेते काय म्हणतात यापेक्षा जनता काय म्हणते, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे`,  एका राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक नेत्याने याप्रकरणी बोलताना आपल्या भूमिकेचं असं समर्थन केलंय.  

अवनीला भेकडासारखं मारलं, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलीय. त्याच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पूर्वी राळेगावच्या जंगलातल्या गावांना भेटी देऊन वनविभागाला अल्टिमेटम दिला होता की अवनीच्या दहशतीतून गावकऱ्यांना मुक्त करा आणि तिचा बंदोबस्त करा. अवनीच्या मृत्यूनंतर भावना गवळी यांनी यवतमाळात ठिय्या आंदोलन करून मागणी केली होती, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करावी. हे आंदोलन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचंही गवळी यांनी माध्यमांना सांगितलं.

अवनीग्रस्तांची व्यथा

अवनीपुराण इतकं जोरात सुरू आहे की तिची आख्यायिकाच बनते की काय, अशी स्थिती निर्माण झालीय. पण अवनीग्रस्त नागरिक दोन वर्षं किती दहशतीत होते, हे समजून घेण्यासाठी राळेगाव, पांढरकवडा परिसरातल्या रायमुनिया नावाच्या वनस्पतींच्या झुडपी जंगलातच पोचावं लागतं. येडशी गावचे सरपंच अंकुश मुनेश्वर सांगतात, `मृत्यूनंतर अवनी रातोरात स्टार झाली. पण ज्या घरातील जीव गेले आणि गेली दोन वर्ष या वाघिणीच्या दहशतीमुळे ज्यांची शेती पडीक राहिली, रोजगार बुडाला ते कसे जगत आहेत, याकडे सर्वजण सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत.` 

अवनीच्या पाठीराख्यांनो मुंबई, दिल्ली, पुण्यात एसीत बसून सोशल मीडियातून शहाणपण शिकवण्यापेक्षा वाघग्रस्त भागात मुक्कामाला या, असं आव्हानच मुनेश्वर यांनी दिलंय. वाघिणीच्या दहशतीतून शहाफत अली, त्याचा मुलगा असगर अली आणि वनविभागाच्या टीमचा २२ गावांनी एकत्र येऊन सावरखेड गावात जाहीर सत्कार केला. मुनेश्वर सांगतात, यामागची आमची भावना समजून घ्या. 

वाघ विरुद्ध माणूस

अवनी प्रकरणाने माणूस आणि जंगली प्राण्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. पूर्वीही हा संघर्ष होताच. पण अलिकडच्या काळात हा संघर्ष वाढल्याची कारणं अनेक सांगता येतील. प्राण्यांच्या परिसरात माणसांनी केलेली घुसखोरी, विरळ झालेली जंगलं, वाघांसारख्या प्राण्यांच्या वाढींसाठी जाणीवपूर्वक झालेले प्रयत्न, त्या तुलनेत त्यांच्या भरणपोषणाची नैसर्गिक व्यवस्था नसणं, व्याघ्र पर्यटन वाढीसाठी वाघांच्या जंगलात सोडली जाणारे पर्यटक अशी त्याची भलीमोठी यादी होईल. माणसांच्या जंगलातल्या हस्तक्षेपामुळे वाघांच्या सवयी बदलल्याची नोंद अनेक वन्यजीव संशोधकांनी घेतलीय. यात माणसांचं आणि वाघांचंही नुकसान होतंय.   

२०१६ च्या आकडेवारीनुसार देशात ४८ व्याघ्रप्रकल्प आहेत. त्यात एकूण ३ हजार ८९० वाघ असल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर हे व्याघ्रप्रकल्प आहेत. यवतमाळ जिल्ह्याचाच विचार केला तर पांढरकवडा वनक्षेत्रात असलेल्या टिपेश्वर अभयारण्य आणि लगतच्या ५० किलोमीटर क्षेत्रांत ३२ वाघ आणि काही बछडे असल्याची नोंद वनखात्याकडे आहे. त्या तुलनेत या वाघांसाठी आवश्यक वातावरण नाही. 

जंगलात वाघ वाढवण्याच्या प्रक्रियेत वाघांना खाण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राण्यांची संख्या वाढली पाहिजे, याकडे सर्व यंत्रणेचं सोईस्कर दुर्लक्ष झालंय. याआधी विदर्भात अशा पाच वाघिणींना ठार केलंय. तर संपूर्ण महाराष्ट्रात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गेल्या ७ वर्षात २६० लोकांचा जीव गेल्याची नोंद आहे. २०१५-१६ या एका वर्षातच जंगली प्राण्यांनी ४५ बळी घेतलेत.

आणि संयमाचा बांध फुटला

नैसर्गिक न्यायाने जंगली प्राणी आणि माणसं या दोघांनाही जगण्याचा समान अधिकार आहे. दोघांनाही न्याय मिळायला हवा. अवनीने सखी या गावातल्या सतीश पवार या तरुणाचा सातवा बळी घेईपर्यंत प्रशासन, वनविभाग, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते आणि या दहशतग्रस्त गावांतले लोक सारेच सुस्त होतं. त्यानंतर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

वनविभाग वाघिणीच्या बंदोबस्ताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. सखी गावात घटनास्थळी भेट द्यायला आलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांचं वाहन पेटवून दिलं. त्यानंतर हा संघर्ष उग्र झाला. प्रशासकीय, कायदेशीर अशी सर्व लढाई लढत अवनीला ठार करेपर्यंत तिने एकूण १३ जणांचा बळी घेतला. 

आता तिचा नर साथीदार टी-२ आणि दोन बछडे या भागात आहेत. नर वाघाची लोकांना फारशी दहशत नाही. मात्र अवनीच्या दोन बछड्यांना पकडून त्यांना सुरक्षित स्थळी सुखरूप हलवण्यासाठी नागरिक आग्रही आहेत. त्यासाठी वनविभागाचा ट्रॅप या जंगलात लागला आहे. तरीही लोकांच्या मनातील वाघाचे भय मात्र अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही.

(लेखक यवतमाळ येथील अनुभवी पत्रकार आणि लेखक आहेत.)