महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखांचं गणित कोणाच्या सोयीचं?

११ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रात चार टप्प्यांत ४८ मतदारसंघांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत. या तारखा कोणत्या राजकीय पक्षांना फायदेशीर ठरू शकतात आणि कोणाला त्याचा फटका बसणार?

लोकसभेत सर्वाधिक ८० खासदार उत्तर प्रदेशमधून जातात. त्यापाठोपाठ नंबर लागतो तो आपल्या महाराष्ट्राच्या. महाराष्ट्र लोकसभेसाठी तब्बल ४८ खासदार निवडून देतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या निवडणुकांच्या तारखांत महाराष्ट्रातल्या मतदानाचं वेळापत्रकही महत्त्वाचं ठरतं.

महाराष्ट्रात मतदान कधी कुठे?

देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होतंय. त्यापैकी पहिल्याच ४ टप्प्यांत महाराष्ट्रातल्या मतदारसंघात मतदान होतंय. ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला महाराष्ट्रात मतदान होतंय. २३ मे या दिवशी मतमोजणी होतेय.

११ एप्रिलला इथे मतदान

पूर्व विदर्भातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या आठ मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होतंय.

१८ एप्रिलला इथे मतदान

दुसऱ्या टप्प्यात एकूण १० मतदारसंघांत मतदान होतंय. पैकी वऱ्हाडातले बुलडाणा, अकोला आणि अमरावती असे तीन मतदारसंघ आहेत. तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर हे मतदारसंघही त्यात आहेत. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातला असूनही मराठवाड्याशी तितकाच जोडलेला सोलापूर मतदारसंघही १८ एप्रिलला मैदानात आहे.

२३ एप्रिलला इथे मतदान

तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघात मतदान होतंय. त्यात मराठवाड्यातले औरंगाबाद आणि जालना हे २ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. खानदेशातल्या जळगाव, रावेर या २ मतदारसंघांतलं मतदानही त्याच दिवशी आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग आणि रायगड हे कोकणातले २ मतदारसंघही तिसऱ्या टप्प्यात आहेत. तर पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले हे ८ मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातले आहेत.

२९ एप्रिलला इथे मतदान

चौथ्या टप्प्यात सर्वाधिक १७ मतदारसंघात मतदान आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातले नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिर्डी हे ५ मतदारसंघ आहेत. मुंबईचे सगळे ६ मतदारसंघ आणि मुंबईला लागून असणारे पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मावळ या मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होतंय.

महाराष्ट्र सुरवातीलाच कशामुळे?

मतदानाच्या तारखा पाहिल्या की लक्षात येईल, पहिल्या चार टप्प्यातच ५४३ पैकी ३७४ जागांवर मतदान होतंय. तर पुढच्या तीन टप्प्यांत फक्त १६९ मतदारसंघांत मतदान होतंय. उन्हाळ्याचा विचार करता मे महिन्याच्या आधीच जास्तीत जास्त जागांवर मतदान होणं गरजेचं आहे.

पण त्याचबरोबर सुरवातीच्या टप्प्यातल्या मतदानामधे बालाकोट एअर स्ट्राईकमुळे झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा जास्तीत जास्त फायदा होईल. माजी निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनी एक ट्विट केलंय, त्याचा अर्थ असा काढता येईल.

शिवाय भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एकमेव महत्त्वाचे प्रचारक आहेत. ते कितीही `उत्साही कर्मयोगी` असले तरी ते माणूसच असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्यांचा आवाज आणि शरीर थकतं. मोदी अगदी भरात असताना महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत.

चार टप्पे कशाला?  

ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाई यांनी ट्विट करून महाराष्ट्रातल्या चार टप्प्यांविषयी प्रश्न उभा केलाय. ते ट्विटमधे म्हणतात, महाराष्ट्रासारख्या शांत आणि स्थिर राज्यात मतदानासाठी चार टप्पे हवेत कशाला? कधीच न संपणाऱ्या सिनेमांसारखं आपण निवडणूक खेचू लागलो आहोत. डिजिटल युगात खरंतर निवडणुकांची आवर्तनं फटाफट आटोपायला हवीत.

सरदेसाई यांनी उभा केलेला प्रश्न तर्काला धरून आहेच. २०१४ आणि २००९ मधे ३ टप्प्यांत तर २००४ मधे २ टप्प्यांत महाराष्ट्रातलं लोकसभेचं मतदान झालं होतं. नवं तंत्रज्ञान आणि आधुनिक सोयीसुविधांच्या काळात टप्पे कमी होण्याऐवजी ते वाढतच चाललेत.

एबीपी माझावर झालेल्या चर्चेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील म्हणाल्यात की मोदींना जास्तीत जास्त सभा घेता याव्यात म्हणून इतके टप्पे केलेत.

दुष्काळाचा फटका सत्ताधाऱ्यांना?

मराठवाडा तसंच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याला लागून असलेल्या भागात दरवर्षीच दुष्काळाचं सावट असतं. यंदा तर डिसेंबरपासूनच दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवायला लागल्यात. नोटाबंदीनंतर सुरू झालेली शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश वारंवार व्यक्त झालाय.

अशा परिस्थितीत मेपर्यंत दुष्काळ जास्तच भीषण झाला असेल. पण महाराष्ट्रातलं मतदान त्याआधीच एप्रिलमधे संपतंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका सत्ताधाऱ्यांना कमीत कमी बसण्यासाठी या तारख्या सोयीच्या आहेत. तोवर बजेटच्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये भरण्यासाठी राज्यातली यंत्रणा जोरात कामाला लागलीच आहे.

मुंबईतलं मतदान आणि शाळांच्या सुट्या

मे महिन्यांत निवडणुका घोषित झाल्या की मुंबईत सुट्यांवरून बोंबाबोंब सुरू होते. शाळांचे रिझल्ट एप्रिल महिन्याच्या शेवटी लागतात. त्यानंतर मुंबईतले चाकरमानी गावी जातात. राजकीय पक्ष निवडणूक आयोगात तक्रारी करतात. कोकणात गावी जाणाऱ्यांमधे प्रामुख्याने मूळ कोकणातले शिवसेनेचे मतदार असतात.

पण आता मुंबई ठाण्यात २९ एप्रिललाच निवडणुका असल्यामुळे त्याची तितकी चर्चा होणार नाही. एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती हे सण येताहेत. आयोगाने सांगितल्याप्रमाणे मतदानाच्या तारखा त्याचा विचार करूनच ठरवल्यात. तसंच या काळात राज्यभर यात्रा, जत्राही होतील. ते सगळेच उत्सव यंदा उत्साहात साजरे होणार, हे नक्की.

गुजराती कार्यकर्त्यांची सोय  

आपल्या राज्यांतलं मतदान संपलं की वेगवेगळ्या पक्षांचे निवडणूक एक्स्पर्ट पदाधिकारी इतर राज्यांत नेमले जातात. प्रमोद महाजनांच्या काळात महाराष्ट्रातले पदाधिकारी देशभर जात. आताही महाराष्ट्रातले संघाचे पदाधिकारी देशभर जातात. पण आता गुजरातमधल्या अमित शहांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते.

विशेषतः मुंबई, मुंबईच्या शेजारची शहरं आणि खानदेशात गुजरातमधले भाजपचे कार्यकर्ते निवडणुकांमधे हजेरी लावतात. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतल्या गुजरातीबहुल भागांत त्यांची संख्या लक्षात येण्यासारखी असते. यंदा गुजरातमधे एकाच टप्प्यात २३ एप्रिलला निवडणुका होत असल्यामुळे मुंबईत प्रचारासाठी त्यांना पाच दिवस तरी मिळतील. शिवाय महाराष्ट्रातलेच सर्व पक्षांचे कार्यकर्तेही आपल्या भागातल्या निवडणुका झाल्या की दुसऱ्या ठिकाणी जातीलच.

राजकीय चित्र लवकरच स्पष्ट 

आताच वेगवेगळ्या पक्षांचे आमदार, खासदारांची बंडखोरी गाजू लागलीय. सर्वच राजकीय पक्षांना बंडाळीची झळ पोचणार आहे. विशेषतः विदर्भात उमेदवार जाहीर होताच काँग्रेसमधे फाटाफूट होण्याची शक्यता आहे. पण विदर्भात निवडणुकांना एक महिनाही नसल्यामुळे आता बंडखोरांना खूपच कमी वेळ मिळणार आहे.

आता लगेचच महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं स्पष्ट झालेली नाहीत. प्रत्येक मतदारसंघात भांडणं उफाळून येत आहेत. शिवाय प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना आता लवकरच आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील.