रामदेवबाबांच्या कोरोनिलचं चुकीचं विज्ञान समजावून सांगणाऱ्या ६ गोष्टी

०३ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या फसवेगिरीचीच चर्चा जास्त होताना दिसते. आयएमए या संस्थेनंही कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे असल्याचं सांगितलंय. कोरोनिलनं कशाप्रकारे चुकीच्या विज्ञानाचा वापर करून वैद्यकीय नीतीमत्तेचे तीन तेरा वाजवलेत हे सांगणारा एक लेख अलिकडेच कारवान मासिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं देत आहोत.

कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागलाय. रामदेवबाबांच्या पतंजलीकडून काढण्यात आलेल्या कोरोनिल या कोरोना वायरसवरच्या औषधाची चर्चाही पुन्हा सुरू झाली. कोरोना अगदी ऐन भरात असताना २३ जून २०२० ला पहिल्यांदा हरिद्वारमधे इवेंट घेऊन रामदेव बाबांनी कोरोना वायरसवरचा रामबाण उपाय म्हणून कोरोनिल किट लॉन्च केलं होतं. या किटमधल्या औषधांनी कोरोनाची लागण झालेला माणूस १०० टक्के बरा होता, असा दावाही त्यांनी केला होता. पण औषधाच्या संशोधनपद्धतीवर आक्षेप घेतले गेले. आयुर्वेदिक औषधांना मानता देणाऱ्या आयुष विभागानंही त्यावर आक्षेप घेतला होता.

फेब्रुवारीपासून कोरोनाचे पेशंट वाढू लागले. त्यानंतर १९ फेब्रुवारीला रामदेवबाबांनी एक पत्रकार परिषद घेतली. कोरोनिल किटवरचा एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीसुद्धा होते. तीन दिवसानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने लगेचच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून कोरोनिलने केलेले दावे लोकांना फसवणारे आहेत, असं सांगितलं.

‘कारवान’ या मासिकाच्या वेबसाईटवर याचं सखोल विश्लेषण करणारा लेख २६ मार्च २०२१ ला प्रसिद्ध झाला होता. या लेखात केरळच्या इर्नाकुलम मेडिकल सेंटरमधे हेपॅटोलॉजिस्ट म्हणजे यकृतासंबंधीच्या आजारांवर काम करणारे सायरीक एबी फिलिप्स आणि सार्वजनिक आरोग्यात डॉक्टरकी आणि २५ वर्ष ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसमधे काम करणारे साथरोगतज्ञ जम्मी नागराज राव यांचं म्हणणं विचारात घेतलंय. 

या प्रकरणात रामदेवबाबांच्या पंतजलीनं विज्ञानाचा घाणेरडा वापर करून, वैद्यकीय नीतिमत्तेची सगळी सूत्र कशी पायदळी तुडवलीयत हे या दोघांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. हा संपूर्ण लेख ६ मुद्द्यांच्या मदतीने समजून घेता येईल. पण त्याआधी रामदेवबाबांचा रिसर्च पेपर काय सांगतो ते पहायला हवं.

हेही वाचा : कॉण्टॅक्ट ट्रेसिंगने लॉकडाऊनसोबतच कोरोनाची दुसरी लाटही रोखता येईल!

संशोधन काय सांगतं?

४ फेब्रुवारी २०२१ ला फायटोमेडिसिन या जर्नलमधे कोरोनिल किटच्या रॅण्डमाईज्ड टेस्टिंगची माहिती देणारा एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला होता. म्हणजे कोरोनिलचे लोकांवर प्रयोग केले तेव्हा काय निष्पन्न झालं हे यात दिलं होतं. या रिसर्च पेपरखाली लेखक म्हणून ज्यांचं नाव होतं ते पतंजलीचेच कर्मचारी आणि नॅशनल इन्सटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या राजस्थानमधल्या खासगी मेडिकल कॉलेजमधले डॉक्टर्स होते.

कोरोनिल या किटमधे तीन गोष्टी आहेत. एक कोरोनिल हे औषध, दुसरं श्वासारी वटी आणि तिसरं अणु तेल. कोरोनिलमधे अश्वगंधा, गेलॉय आणि तुळस यांचं मिश्रण आहे. अनेक औषधी वनस्पती एकत्र करून बनवलेली श्वासारी वटी सर्दी, खोकल्यावर औषध म्हणून पंतजलीकडून आधीपासूनच विकली जाते. अणु तेल पतंजलीचं जुनंच उत्पादन आहे. या तीन गोष्टींवर झालेल्या रिसर्च पेपरचं नाव होतं ‘पारंपरिक भारतीय आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा कोविड १९ संसर्गाची लागण झालेल्या असिम्प्टोमॅटिक पेशंटवर होणारा परिणाम.’ असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणं न दिसणारे पेशंट.

या रिसर्चमधे डबल ब्लाईंड रॅण्डमाईज कंट्रोल ट्रायलचा वापर करण्यात आलाय. म्हणजे, कोरोनाची लागण झालेल्या पेशंटपैकी निम्म्या लोकांना कोरोनिल किटमधली औषधं दिली गेली. आणि निम्म्या लोकांना प्लसीबो म्हणजे खोटी ट्रीटमेंट. औषधांच्या नावावर कॅप्सुलमधे पावडर घालून देणं. हे संशोधन करणारे किंवा औषधं घेणारे यापैकी कुणालाही कोणत्या पेशंटना कोणतं औषध दिलं गेलंय याची माहिती नव्हती.

या संशोधनाचा प्राथमिक एण्डपॉईंट म्हणजे उद्दिष्ट होतं औषध घेतल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर टेस्टकरून पेशंटचा वायरल लोड तपासणं. म्हणजे, पेशंटच्या शरीरात वायरसचं प्रमाण किती आहे हे पहाणं. संशोधनातून आलेल्या निकालातून असं स्पष्ट झालं की सातव्या दिवसापर्यंत कोरोनिल औषध घेतलेले १०० टक्के पेशंट पूर्णपणे बरे झाले. याउलट, प्लसीबो उपचार घेणारे ६० टक्के लोकच पूर्णपणे बरे होऊ शकले. 

आता यावर कारवान मासिकात काय म्हटलंय ते पुढच्या ६ मुद्द्यांमधे स्पष्ट होईल.

१. टेस्टिंगसाठी पेशंटची संख्या इतकी कमी कशासाठी?

डॉक्टर फिलिप्स यांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनातला पहिला दोष हा की हे संशोधन अगदी छोटं म्हणजे फक्त ९५ पेशंटवर केलं गेलंय. त्यातल्या फक्त ४५ लोकांना कोरोनिल किटमधली औषधं दिली गेली होती. तर उरलेल्या ५० लोकांवर प्लसीबो उपचार करण्यात आले. ‘टेस्टिंग करण्यासाठी जास्त लोकांचा वापर केला असेल तर कमी चुका होतात. याउलट, छोट्या तुकडीवर केलेलं संशोधन हे नेहमी भरपूर चुकांनी भरलेलं असतं,’ असं त्यांनी म्हटलंय.

डॉक्टर राव सांगतात, वैद्यकीय भाषेत याला टाईप टू स्टॅस्टिस्टिकल एरर, असं म्हणतात. म्हणजे लोकांना वगळण्याची चूक. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या अँटीवायरल ड्रगच्या एका संशोधनात ३० देशातल्या कोविड १९ च्या ४०५ हॉस्पिटलमधून ११,३०० पेशंटचा सहभाग घेतला होता. फायझर या लसीचं संशोधनही ४३ हजार पेक्षा जास्त लोकांवर अशाच रॅण्डमाईज्ड पद्धतीनं झालं होतं.

हेही वाचा : कोविड १९ च्या टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत करायच्या तीन गोष्टी

२. एण्डपॉईंट नेमका काय असावा?


दुसरा मोठा दोष हा संशोधनाच्या एण्डपॉईंटमधे होता. कोरोनिलच्या संशोधनात एण्डपॉईंट वायरल लोड तपासणं हा होता. पण वायरल लोड तपासल्याने आजार संपला की नाही हे कळत नाही, असं फिलिप्स यांचं म्हणणं आहे. ‘वायरल क्लियरन्स याचा अर्थ शरीरात वायरस नसणं असा होतो. पण आजार गेला असं समजायचं असेल तर त्या आजाराची लक्षणं गेली की नाही हे बघायला हवं,’ असं फिलिप्स यांनी म्हटलंय.  त्यातही लक्षणं कमी झाली की नाही हे बघण्यापेक्षा लक्षणं कमी होण्यासाठी आणि पेशंटला पुन्हा बरं वाटण्यासाठी किती वेळ लागला हा एण्डपॉईंट कोविड १९ बाबतीत जास्त योग्य ठरला असता. 

वायरल लोड कमी होणं किंवा पूर्णपणे शरीरातून वायरस नष्ट होणं हे महत्त्वाचं आहेच, असं राव मान्य करतात. टायफॉईड, टीबी या रोगांसाठी तर हे फार आवश्यक असतं. पण सध्याच्या साथरोगात वायरल लोड कमी होण्यावर भर दिलेला नाही. 

डॉ. राव म्हणतात, ‘संसर्ग झाल्यानंतर काही दिवसात वायरल क्लिअरन्स नैसर्गिकरित्या होतच असतो. त्यामुळे कोविड १९ सारख्या आजारांमधे बरं होण्याचा वेळ, मृत्यूदर किती कमी झाला याची नोंद, आयसीयूमधे ऍडमिट करण्यासारखी गंभीर परिस्थिती कमी झाली काही नाही याची नोंद हे एण्डपॉईंट महत्त्वाचे असतात.’

३. आजार नैसर्गिकरित्या बरा झाला की कोरोनिलने केला?

मुळातच या संशोधनात घेण्यात आलेले सगळे पेशंट हे असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणं न दिसणारे होते. त्यामुळे नुसता वायरल लोड कमी झाला हा अतिशय अनिश्चित, अस्पष्ट एण्डपॉईंट झाला असं म्हणावं लागेल. असिम्प्टोमॅटिक पेशंटना वायरसचा संसर्ग अत्यंत कमी प्रमाणात झालेला असतो. अशा पेशंटचा वायरल लोड कोणतंही औषध न देता कमी होणार हे नक्कीच असतं, असं राव यांचं म्हणणं आहे. ‘आयुर्वेदिक औषध घेतलं नसतं तर सातव्या दिवशी पेशंटचा रिपोर्ट निगेटिव आला नसता हे आपण कसं शोधून काढणार?’ राव विचारतात.

हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा, तुमची कार सिग्नलला अगदी पहिल्या रांगेत येऊन उभी आहे. लाल सिग्नल असतानाही मागून एक ट्रकवाला जोरजोरात हॉर्न वाजवतोय. हिरवा सिग्नल झाला म्हणून तुम्ही गाडी पुढे नेली. पण ट्रकवाल्याला वाटतंय की त्याने हॉर्न वाजवल्यामुळे तुम्ही गाडी पुढे नेली. असंच कोरोनिल औषधाचं आहे. कोरोनिलमुळे पेशंट बरे झाले, असा दावा केला जातोय. पण खरंतर, निसर्गाचा ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे पेशंटची गाडी पुढे गेलीय.

हेही वाचा : आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?

४. लक्षणं नसलेल्या पेशंटचा समावेश चुकीचा

वैद्यकीय पद्धतीनुसार, संशोधनात लक्षणं दिसणाऱ्या पेशंटचा सहभाग घ्यायला हवा होता. समजा, त्यांनी अशा पेशंटचा सहभाग घेतला असता तर त्यांना लक्षणं दिसतायत तो दिवस म्हणजे त्यांच्या आजाराचा पहिला दिवस, असं मानता आलं असतं. आता लक्षणं न दिसणाऱ्या पेशंटना घेतल्यामुळे त्यांना नेमका कधी संसर्ग झालाय हेच माहीत नाहीय.

संशोधनात सहभागी झालेल्या काही पेशंटना इतर पेशंटपेक्षा खूप आधीच संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ, या पेशंटचा वायरल लोड इतर पेशंटच्या तुलनेत लवकर कमी होणार. कोरोनिलची औषधं घेतलेले बहुतांश पेशंट हे असेच खूप आधी संसर्ग झालेले असतील, तर हे संशोधन चुकीचा निकाल दाखवतंय अशी शक्यता निर्माण होते.

‘सहभागी झालेला प्रत्येक असिम्प्टोमॅटिक पेशंट पहिल्यांदा वायरसच्या संपर्कात कधी आला होता हे अस्पष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक पेशंटची वायरसच्या संपर्कात यायची वेळ वेगवेगळी असणार. एका पेशंटचा आजाराचा तिसरा दिवस असेल तर तेच दुसऱ्या पेशंटचा आजाराचा सातवा दिवस असू शकेल. याला लीड टाइम बायस एरर असं म्हणतात. अशा गैरसमजुतींमुळे आपल्याला उपचारपद्धती काम करतेय असा खोटा अहवाल मिळतो,’ असं डॉक्टर फिलिप्स यांचं म्हणणं आहे. 

५. एकाही पेशंटला एकही साईड इफेक्ट नाही?

विशेष म्हणजे, १०० टक्के लोक कोरोनिल या औषधाने बरे होतायत, त्यातल्या एकालाही काहीही साईड इफेक्ट, औषधांचा उलटा परिणाम झालेला दिसत नाहीय ही अतिशय क्वचित घडणारी किंवा अगदी अशक्यच गोष्ट आहे.

‘संशोधनाची पद्धत चुकीची असताना, वायरल क्लिअरन्स हे चुकीचं उद्दिष्ट असताना आणि लीड टाइम एरर असताना १०० टक्के पेशंट बरे झाले असा निकाल येणं स्वाभाविकच आहे. पण एकाही पेशंटना औषध उलटलं नाही, त्याचे साईड इफेक्ट झाले नाहीत यावर विश्वास ठेवणं अवघड आहे,’ असं डॉक्टर राव म्हणाले. निदान प्लसीबो उपाचार घेतलेल्या पेशंटना तरी काही साईड इफेक्ट व्हायला हवे होते. किंवा अगदी आपल्या शरीरात काहीतरी बदल होतायत याची जाणीव प्रत्येकालाच होत असते.

आयुर्वेदिक औषधांचा काहीही साईड इफेक्ट होत नाही, असं म्हटलं जातं. पण डॉक्टर फिलिप्स सांगतात, फेब्रुवारी २०२०मधे झालेल्या एका संशोधनात हे अश्वगंधा कशाप्रकारे यकृतावर परिणाम करतं हे सांगण्यात आलंय. डिसेंबर २०२० मधेही कोरोनिल गोळ्यांवर झालेल्या एक तपासणीचा हवाला फिलिप्स यांनी दिला. त्यात गोळ्यांमधे लीड आणि कॅडियमचं प्रमाण जास्त असल्याचं म्हटलंय. मग याचा काहीही परिणाम पेशंटवर कसा झाला नाही?

६. वैद्यकीय नीतीमत्ता बसवलीय धाब्यावर

या संशोधनात इतक्या त्रुटी असतानाही सरकारी प्रतिनिधींनी कोरोना किटला पाठिंबा दिला. १९ फेब्रुवारीच्या प्रेस कॉन्फरन्समधे हर्षवर्धन आणि नितीन गडकरी उपस्थित होते. पतंजलीच्या रिसर्च पेपरवर वर्धन म्हणाले, ‘हे आधुनिक आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरून आयुर्वेदाचं महत्त्व जगभरात पुन्हा प्रस्थापित करणं ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

वैद्यकीय क्षेत्रातल्या बऱ्याच शाखांनी प्रेस कॉन्फरन्सला मंत्र्यांनी लावलेल्या हजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आयएएमने तर पतंजलीने केलेले दावे खोटे आहेत, असं सांगताना हर्षवर्धन यांच्या वक्तव्यावरही टीका केलीय. ‘कोणत्याही डॉक्टरनं कोणत्याही औषधाची जाहिरात करू नये किंवा त्याची शिफारस करू नये हे वैद्यकीय नितिमत्तेचं सूत्र आहे. आरोग्य मंत्री हे स्वतः डॉक्टर असताना त्यांनी या सूत्राचं उल्लंघन केलंय,’ असं आयएमएने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलंय. वर्धन यांना स्पष्टीकरणही द्यायला सांगितलंय.

हेही वाचा :

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

बाळासाठी सुरक्षित असेल का कोरोनाग्रस्त आईचं दुध?

आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?