भाजपला ब्राह्मण खरंच नकोसे झालेत का?

०७ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पुण्यात मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिलीय. त्यानंतर 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला… आता बापटांचा पण जाणार का?’ असे बोर्ड पुण्यात लागलेत. दुसरीकडे 'आएसएस'चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'जाती या इश्वराने नाही, पंडितांनी निर्माण केल्या’, असं विधान केलंय. या सगळ्याचा अर्थ नक्की काय?

पुण्यातला कसबा मतदारसंघ हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे. मानाच्या पहिल्या गणपतीप्रमाणेच इथून निवडून जाणारे लोकप्रतिनिधीही कायम चर्चेत राहिले आहेत. गेली ४० वर्ष कसबा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. नुकत्याच निवर्तलेल्या मुक्ता टिळक, त्याआधी २००९ पासून गिरीश बापट आणि त्याआधी अरविंद लेले, अण्णा जोशी असे ब्राह्मण आमदारच या मतदारसंघातून निवडून गेले आहेत.

लेले, जोशी, बापट, टिळक या ब्राम्हण लोकप्रतिनिधींनंतर पहिल्यांदाच रासने यांच्या रुपाने कसब्याला ओबीसी उमेदवार मिळालाय. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं तरी ब्राह्मण उमेदवार द्यावा, तर तसंही झालेलं नाही. काँग्रेसनंही रोहित टिळक यांच्याऐवजी रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी दिलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातला ब्राह्मण समाज नाराज झाला असून, अनेक ठिकाणी नाराजीचे बोर्ड लागलेत.

पुण्यातल्या नाराजीनाट्याच्या मुळाशी...

पुणे शहाराच्या नावाच्या उच्चारासोबतच पेशवाई आणि ब्राह्मण्य यांचा संबंध जोडला जातो. इथून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि तिथली एकंदरितच समाजव्यवस्था पाहिली, तर इथलं ब्राह्मणी वर्चस्व कोणीही नाकारणार नाही. पण सत्तेचं गणित आकडेवारीच्या गणिताशी जोडलं की आज तशी परिस्थिती उरलेली नाही, हे हळूहळू कळू लागतं.

आज कसबा मतदारसंघावरून वादाला तोंड फुटलंय. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी तर, थेट 'आता कसब्यात ब्राह्मण नेतृत्व राहिलं नाही, असं वक्तव्य केलं आहे. पण परिस्थिती अशी आहे की, कसब्यात ब्राह्मण मतदारांची संख्या आहे अवघी १३.२५ टक्के. सर्वाधिक म्हणजे ३१.४५ टक्के मतदारसंख्या आहे ती ओबीसी समाजाची आणि त्यापाठोपाठ २३.८५ टक्के मतदार आहेत मराठा आणि कुणबी समाजाचे.

मतदारांची ही आकडेवारी पाहता, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारी देताना, भावनिक निर्णयावर न जाता मतदारांचं गणित पाहिलं, हे स्पष्टपणे दिसतं. प्रत्येक मतदारसंघाचा बुथनिहाय अभ्यास करून उमेदवार द्यायचा, तिथं भावनिक गोष्टी पाहायच्या नाहीत, ही भाजपनेच नव्याने विकसित केलेली पद्धत आता निवडणुकीत सर्वच पक्षात रुजत असल्यानं हे घडतंय, असंही बोललं जातंय.

हेही वाचा: हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होईल का?

भाजपवर दुटप्पीपणाचाही आरोप

कसबा मतदारसघात जशी मुक्ता टिळक यांच्या मृत्यूमुळे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे, तशीच परिस्थिती चिंचवड मतदारसंघातही आहे. तिथं लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली. कुटुंबात उमेदवारी देण्याची पद्धत तिथं पाळली गेली, मग टिळकांवरच अन्याय का? असा प्रश्न विचारला गेला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. तसंच भाजपकडून चिंचवडमधे एक न्याय तर कसब्यात दुसरा असं का, हा ब्राह्मण समाजावर अन्याय आहे, असं मत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे. तसंच या अन्यायाविरुद्ध आनंद दवे स्वतः कसबा मतदारसंघातून हिंदू महासंघाचे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत.

एकीकडे ब्राह्मण समाजात नाराजीचे सूर असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांना फोन करून समजून घातल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार दिला तरी ब्राह्मण समाज त्याला पाठिंबा देईल, अशी भाजपला आशा आहे. आता दवे म्हणतायत ते खरं की भाजपला वाटणारा आत्मविश्वास खरा, ते निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

सरसंघचालकांच्या वक्तव्याचा काही संबंध आहे का?

निवडणुकीसाठी कामी येणारी आकडेवारी आता डेटा सायन्सच्या चार्टमधून जशी स्पष्ट होत चालली आहेत, तसंच देशातलं जातीचं गणित वेगानं बदलतं आहे. आज निवडणुकीसाठी ही अशी 'एक्सपर्ट कन्सल्टंट'ची फौज बाळगणाऱ्या पक्षांना जातीचं गणित नव्यानं कळू लागलंय. त्यामुळे बहुजनांना खूष करण्यासाठी काही भन्नाट विधानं ऐकू येऊ लागली आहेत.

संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 'सर्व धर्म समान आहेत. माझ्यात कोणतीच जात किंवा धर्म नाही, असं इश्वरानं सांगितलं आहे. पण पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची आहे. प्रत्येक काम समाजासाठी असेल तर कोणी उच्च, नीच किंवा वेगळा कसा असू शकतो?’

भागवत यांचं हे वक्तव्य आता राष्ट्रीय पातळीवर गाजतंय. त्यात त्यांनी ब्राह्मणांनाच टार्गेट केलंय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उत्तर भारतात रामचरितमानस प्रकरण गाजत असताना, हिंदी मीडियानं भागवत यांच्या मराठी भाषणावरून हिंदीमधे राळ उठवली आहे. यावर ब्राह्मण महासभेनं भागवत यांचा निषेध करणारं पत्रक काढलंय.

हेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

भागवतांनी सांगितलेले 'ब्राह्मण' कोण?’

नागपूरात ७ ऑक्टोबर २०२२ला झालेल्या एका कार्यक्रमातल्या सरसंघचालक भागवत यांच्या विधानावरूनही वाद झाला होता. त्यावेळीही भागवत यांनी 'ब्राह्मण कोण?’ हे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, 'ब्राह्मण हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने ब्राह्मण होतो. इतिहास साक्ष आहे की, माणुसकीला मान खाली घालावी अशा गोष्टी आपल्याकडून घडल्या आहेत. हे कबुल करायला हवं'

भागवतांच्या या विधानावरूनही तेव्हा वाद पेटला होता. जे अनिल दवे आता कसबा विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार म्हणून म्हणून उभे राहिले आहेत त्यांनी त्यावेळी जाहीरपणे भागवत यांचा निषेध केला होता. 'ब्राह्मणांनी नाही तर भागवतांनी पापक्षालन करण्याची गरज आहे. तुम्ही देशभरात जातीयवाद वाढवता आहात.’ असं विधान दवे यांनी केलं होतं.

आता पुन्हा नव्याने भागवत यांच्या नव्या विधानावर संघानं स्पष्टीकरण दिलंय. संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी, भागवत हे ब्राह्मण समाजाच्या नाही तर पंडितांबद्दल बोलले आहेत. त्यांना पंडित म्हणजे विद्वान असं अपेक्षित आहे, अशी सारवासारव आंबेकर यांनी मीडियाकडे केली. आता मुद्दा पुन्हा हाच उरतो की, ही सगळी विधानं नक्की कशासाठी?

शब्दांचा खेळ आणि मतांची आकडेमोड

एकीकडे पूर्वजांनी केलेल्या चुका, पंडितांनी केलेली वर्गवारी अशी भाषा वापरायची आणि समजातल्या बहुजनवर्गाला आकर्षित करायचं. दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघात असलेली बहुजनांची आकडेवारी पाहून नवी गणितं बांधायची ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे, हे कुणीही सांगू शकेल. गेल्या काही वर्षात ही स्ट्रॅटेजी भाजपकडून फार कठोरपणे वापरलेली दिसते.

शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी भाजपने 'माधव' म्हणजे माळी, धनगर, वंजारी हा फॉर्म्युला वापरला. त्यामुळेच गोपीनाथ मुंडेपासून सुधीर मुनगंटीवारापर्यंत अनेक नावं भाजपमधे मोठी झाली. दुसरीकडे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पूनम महाजन यांचं स्थान पूर्वीसारखं उरलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाची आशा असताना, उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं.

हे सगळं पाहता भाजप, बहुजन नेत्यांना मोठं करत असल्याची चर्चा वाढीला लागलीय. निवडणुकीच्या आकडेमोडीसाठी ही योग्य स्ट्रॅटजी असली तरी त्यामुळे भाजपवर परंपरागत निष्ठा असलेला ब्राह्मण समाज यामुळे नाराज आहे, हे पुण्यातल्या बॅनरबाजीमुळे, बंडखोर उमेदवारामुळे आणि एकंदरितच सोशल मीडियातल्या प्रतिक्रियांमुळे उघड दिसू लागलंय. त्यामुळे पुन्हा भाजपचीही काँग्रेस होणार का? असा खासगीत विचारला जाणारा खोचक प्रश्न खूप काही सांगून जातो.

हेही वाचा: 

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफि

कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?