आज दिवसभर वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा नाही यावर घमासान चर्चा सुरू होती. त्याला कारणही तसंच होतं. प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी राज्य सरकारने शिवाजी पार्कचं मैदान दिलं. त्याचवेळी येत्या १ मार्चला होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला मात्र परवानगी नाकारली. त्यामुळे आजच्या सभेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सभेत काय होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं.
लाखभर गर्दी असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या सभेने अनेक प्रश्नांना, शंकांना निरुत्तर केलंय. तसंच काही नवे संकेतही दिलेत. येत्या काळातल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर या सभेचा दीर्घकाळ प्रभाव राहणार आहे. हा प्रभाव कुणालाही सहजासहजी मोडीत काढता किंवा मिटवता येणार नाही. आणि तसं करणं आता कुणाच्या हातातही राहिलं नाही. उलट तसं करणं हा कुणासाठीही आत्मघातच ठरेल.
कारण, वंचित बहुजन आघाडी हा काही ब्लॅकमेलिंगचा प्रकार नाही, हे ठसवण्यात आजच्या सभेला यश आलंय. ज्यांच्या जिवावर ही आघाडी आपलं राजकारण करतेय, त्या लोकांचा सभेला तुफान म्हणावा असा प्रतिसाद मिळाला. वंचितांचं, बहुजनांचं राजकारण करणाऱ्या एका दलित नेत्याच्या शिवाजी पार्कवरच्या सभेला मिळालेला हा प्रतिसाद कुणालाही तोंडात बोटं घालायला लावणारा होता.
सभा वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली होत असली तरी इथे मोठ्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय होता. आतापर्यंत निव्वळ सहा डिसेंबरलाच एवढ्या मोठ्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय बघणाऱ्या मुंबईकरांना तसंच महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडीने यानिमित्ताने आपलं अस्तित्व दाखवून दिलंय.
सभेला आलेले लोक वेल इन्फॉर्मड होते. त्यांना आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली केलेलं आतापर्यंतचं राजकारण चांगलं माहीत होतं. सभास्थळी तशी चर्चा अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. आंबेडकरांनी कशा पद्धतीने, चाणाक्षपणे कुठे, कुठल्या जातीचा उमेदवार दिलाय याची लोक आपापसात चर्चा करत होते. फेक न्यूजच्या जमान्यात एवढी चांगली इन्फॉर्मड टीम सोबत असणं ही आंबेडकरांची जमेची बाजू आहे.
गेल्या अनेक वर्षांमधे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिकांचा नेमका, प्रभावी वापर कुणी केला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीने. ठिकठिकाणच्या सभांमधे स्थानिक वंचित बहुजनांच्या प्रतिकांना स्थान देण्याचं राजकारण इतर पक्षांना बॅकफूटवर ढकलणारं आहे. यामुळे दलित, मुस्लिमांच्या मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच ओबीसी मतांचं राजकारण करणाऱ्या भाजप, शिवसेनेलाही चांगलाच फटका बसेल. आजच्या सभेतही कोळी समाजाला दिलेलं प्रतिनिधीत्व बोलकं होतं.
लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या राजकारणात भाजपला जसं यश मिळतंय तसं काँग्रेसला अजून काही पदरात पडताना दिसत नाही. त्याचवेळी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, आघाडी व्हावी म्हणून भाजपने जेवढे एफर्ट घेतलेत, जेवढ्या तडजोडी, कॉम्प्रमाईज केलंय तेवढं काँग्रेसने अजूनपर्यंत केलं नाही. काँग्रेसने तसं केलं असतं तर त्यांना उत्तर प्रदेशमधे बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या महागठबंधनमधे स्थान मिळालं असतं.
पण आजची सभा काँग्रेसला आपली असली नसली सगळी प्रतिष्ठा बाजूला ठेऊन तडजोडी, कॉम्प्रमाईज करायला लावणारी होती. काँग्रेसवर ‘आघाडीसाठी तडजोड करा’ असा दबाव आणणारी ही सभा होती, असंही आपल्या म्हणता येईल. कारण आजच्या सभेतून वंचित बहुजन आघाडीने आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. आणि हे अस्तित्व भाजपची बी टीम, दलित वोटबँक, बौद्ध वोटबँक असली कारणं सांगून कुणालाही नाकारता येणार नाही.
वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप वेळोवेळी होत आलेत. तशात काँग्रेसच्या सभेला परवानगी नाकारली गेल्याने ते अजुनच धारदार झाले. सभेचा सुरवातीपासूनच ‘काँग्रेससोबत आघाडी नको’ असा सूर राहिला. जवळपास सगळ्यांनाची या सुरात सूर मिळवला. पण या सगळ्यांमधे ‘काँग्रेस हे जळतं घर असल्याचा’ बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला एरवीसारखाच अर्धवट पद्धतीने मात्र कुणी दिला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दलित समाजाच्या जवळपास सगळ्याच सभा या थीमभोवतीच फिरताना दिसतात.
माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांचं भाषण खूपच बोलकं होतं. त्यांनी मोदीविरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना बोलून दाखवली. अशी भावना बोलून दाखवणारे ते वन अँड ओन्ली ठरले. विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकर, असदुद्दिन ओवेसी यांच्याआधी म्हणजे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर कोळसे पाटील यांचं भाषण झालं.
प्रकाश आंबेडकर भाषणाला उठले तसं लोकांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं. एवढंच नाही तर मोबाईलच्या बॅटऱ्या लावून सोबतीची खात्रीही दिली. अशा तुफान प्रतिसादातच आंबेडकरांच्या भाषणाला सुरवात झाली. धनगर आरक्षण, मुंबईतल्या कोळीवाड्यांवर आलेलं गंडांतर अशा मुद्द्यांना हात घालत मुस्लिमांकडेही त्यांनी पाठिंब्याचं आवाहन केलं. भाजपची बी टीम असा आरोप होत असतानाच आंबेडकरांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला.
‘आपली सत्ता आल्यावर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणू’, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या सुरात सूर मिसळला. आरएसएसला विरोध हा दलितांच्या अजेंड्यावरचा मुद्दा असल्याचं दिसून आलं. आरएसएसवर हल्ला चढवतानाच आंबेडकरांनी मोठ्या चलाखीने आणि हुशारीने आपले काँग्रेसशी जागांवरून नाही तर वैचारिक मतभेद असल्याचं स्पष्ट केलं. त्याचवेळी ओवेसींसारखीच आंबेडकरांनीही राहुल गांधींची ‘जनेऊधारी राहुल’ अशा शब्दांत संभावना केली. मीडियात आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात जागांवरून मतभेद असल्याचं बोललं जातानाच आंबेडकरांनी आज नवीन गुगली टाकलीय.
काँग्रेसने आरएसएसला संविधानाच्या चौकटी आणण्याचं आश्वासन द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेससोबत वाटाघाटीचे दरवाजे शेवटच्या दिवसापर्यंत खुलेच असल्याचंही आंबेडकरांनी दोनदोनदा जोर देऊन स्पष्ट केलं. स्टेजवरच्या अनेकांनी आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर वंचितांच्या बळावर पंतप्रधान, मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली. आंबेडकर मात्र चारेक महिन्यांच्या संघटनेच्या जोरावर पीएम, सीएम बनता येत नाही, जागा जिंकता येत नाही, हेच वास्तव अधोरेखित करत होते.
वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला येत्या दोन मार्चला बारामतीतून सुरवात होतेय. त्याआधी एक तारखेला राहुल गांधींची मुंबईत सभा होणार आहे. त्या सभेतही महाआघाडीच्या घोषणेची शक्यता निर्माण झालीय. लोकसभा निवडणूक पन्नासेक दिवसांवर आल्यामुळे राजकारण्यांना आपल्या आघाड्याबिघाड्यांसाठी पहिल्या आठवड्यातच चित्र स्पष्ट करावं लागणार नाही. त्यामुळे सध्या तरी आपल्या हातात वेट अँड वॉच शिवाय दुसरा पर्याय नाही.