प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण? मीच…’ हे तिसरं पुस्तकही भरपूर गाजतंय. बोली भाषेतल्या अस्सलपणासोबतच या पुस्तकातून समोर आलेली लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे लेखक ‘नई उमर की नई फसल’ आहे.
प्रसाद कुमठेकर यांचं ‘अतीत कोण?मीच...’ हे पुस्तक नुकतंच हातावेगळं केलं. त्यांची 'बगळा' आणि 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' ही दोन पुस्तकाही आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या उदगीरी बोली भाषेच्या जीवंत झऱ्याचं पाणी अख्ख्या महाराष्ट्रानं चाखलं. आणि लेखकाला लोकमान्यताही दिली.
खरं म्हणजे बोली भाषेच्या गोडव्यामुळेच मराठी भाषा टिकून आहे. एकेकाळी जगातल्या चौथ्या क्रमांकावर असलेला ‘अरल’ हा सरोवर सदृष्य समुद्र नद्यांचं पाणी न मिळाल्याने नामशेष होतोय. नद्यांचं पाणी समुद्राला मिळतं म्हणूनच त्याचं अस्तित्व असतं नाही तर त्याचा ‘अरल’ समुद्र होतो. तसंच बोली भाषेचं आहे.
लेखक प्रसाद कुमठेकर बोली भाषेचा आग्रह म्हणून किंवा याभाषेत कुणीच लिहिलं नाही म्हणून किंवा आपलं वेगळेपण सिद्ध करायचं म्हणून बोली भाषा वापरत नाही. तर ती त्याच्यात पूर्ण भिनली आहे म्हणून ती स्रवते. लेखकाची ही फक्त लिखित भाषा नाहीय. त्याच्याशी बोलत असतानाही हिच बोली त्याच्या बोलण्यात येते. अर्थात लेखक आता मुंबईकर झालाय. शिवाय अनेकविध लेखकांच्या मेळाव्यात वावरत असल्यामुळे त्याच्या जीभेवर प्रमाण भाषेचेही संस्कार झालेत. पण व्यक्त होण्यातला 'अस्सल'पणा कुठेही कमी नाही.
बोली भाषेबरोबरच या पुस्तकातून आपल्यासमोर येणारी लेखकाची आणखी एक बाजू म्हणजे त्याचा प्रचंड व्यासंग. आर्ष ग्रंथांपासून आसाराम लोमटेपर्यंत आणि पाश्चात्य लेखकांपासून दुर्लक्षित बी. रघुनाथांपर्यंत सगळ्यांना आत्मसात केलंय. आणि पाहिजे तिथं नेमकं संदर्भ दिले आहेत. सोपं नाहीय हे! बरं या व्यासंगाबद्दल 'बघा मी किती वाचलंय' हा वायफळ आविर्भाव नाहीच नाही. म्हणूनच हे संदर्भ सहज जाता जाता नैसर्गिकपणे पेरलेले जाणवतात.
या शिवाय परिवेश, निसर्ग, माणूस, सल देणाऱ्या सामाजिक प्रश्नांबद्दल तीव्र संवेदनशीलता हा जसा या लेखकाचा प्लस पॉइंट. तसाच व्यक्त होताना जाणवेल पण टोचणार नाही इतपत मारलेल्या टपल्या हे आणखी एक वैशिष्ट्य. त्यातल्या काही आपल्याला तर नाही ना? असं जाणवतं.
हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
या पुस्तकात फक्त लेखच नाहीयत. काही लेख, काही निरीक्षण नोंदी असा याचा आकृतीबंध आहे. तसंच सगळीकडेच बोली भाषा नाहीय. तर काही प्रमाण भाषेचेसुद्धा लेख आहेत. मग या पुस्तकाचं अंतःस्थ सूत्र काय? तर मीची मीपासून मीला वेगळं करून पहायची धडपड. हा मी प्रत्येकात असतो पण अशा तरल पातळीवरुन मीला मीच कधी बघत नाही हेच मीचं सांगणं मांडणारं हे पुस्तक.
'कोहम' पासून 'सोहम' पर्यंतचा प्रवास, व्यष्टी पासून समष्टीचा विचार, पिंडी ते ब्रह्मांडी पर्यंतचा प्रवास हे मीला अपेक्षित आहे का? पहिल्याच लेखात लेखक सांगतो ‘या पृथ्वीवर मी अतिथी’. या पुस्तकाबद्दल मी एक वाचक म्हणून मत मांडतोय. मी साहित्याचा अभ्यासक नाहीय. लेखक नाही आणि समीक्षक तर नाहीच नाही. एकदा लेखकाने पुस्तक लोकार्पित केलं की ते पुस्तक वाचकाचं होतं, लेखकाचं राहत नाही, असं मीचं म्हणणं आहे.
खरं म्हणजे पुस्तकावर फक्त समीक्षकांनीच का लिहावं? वाचकालाही मत आहेतच की. समीक्षकांची मतं वाचकांवर लादण्याऐवजी वाचकांनी ती निर्भेळपणे द्यावी. यात लेखकालाही समाधानाची पावती मिळेल. यात एक अडचण आहे. ज्या प्रतिमा, उपमांचा वापर लेखकाने केलाय, त्याचा गर्भित अर्थ वाचकाला न उमजता त्याने वेगळाच अर्थ काढला तर? लेखक स्वीकारणार का?
उदाहरणार्थ प्रस्तुत लेखकाने यात एक सुंदर शब्द वापरलाय आणि मीला तो खूप आवडलाय, ‘शाळीव’. मला त्याचे जे संदर्भ जाणवतात ते म्हणजे, शाळेने दिलेले सरधोपट शिक्षण ज्याचा व्यवहारात उपयोग होतोच असं नाही. दुसरा अर्थ, बाळबोध पोपटपंची करणारी माहिती. त्याला अभ्यासाची खोली नसते, नव-संशोधनाचा स्पर्श नसतो. तसंच शाळीव म्हणजे गाळीवसारखं वाटत असतं का?
अतीत मधून दिसणारं आभाळ हे मानवी स्वभावाचा, मीच्या धडपडण्याचा, निसर्गाप्रती बोथट होत जाणाऱ्या भावनांचा, बेगडी नात्यांचा कारण नसताना तोंडाची वाफ दवडणाऱ्या जमातीचा, रंडुलेपणाचं लक्षण मिरविण्याचा, झाडं नाही पण जागा उगवणाऱ्या मुंबईचा अशा असंख्य दृष्यांचा कोलाज आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
हा लेखक फक्त पुस्तकंच वाचतो असं नाही. तर माणूस वाचण्यातही पटाईत आहे. म्हणूनच लोकलमधे एका हाताने लटकत असताना, लोंबकळणाऱ्या मनाची, डोळे उघडे ठेउन झोपणाऱ्या वृत्तीची, स्वत:च्याच डबक्यात समाधान शोधणारी, अध्यात्माचा आधार घेऊन पळपुटेपणावर पांघरुण घेणारी, विविध स्वभावाच्या विविध रंगी छटा असलेली माणसं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर अशी मांडली की ती लोकल –गर्दी-माणसं दृष्यस्वरुपात आसपास जाणवतात. हे लेखणीचं यश आणि लेखकाचं निरीक्षण यांचा एकत्रित परिणाम आहे.
एकूण पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. विषयाचं वैविध्यही भरपूर आहे. त्यामुळे ‘अतीतच्या निमित्ताने’या शिर्षकाचं एक नवीन पुस्तक लिहिता येईल. तोंडाची चव गेलेल्या मीची जडणघडण, त्यातलं दडपण, शैक्षणिक प्रवास, सामाजिक स्थान, वैचारिक वारसा, परिवेशाचा प्रभाव यांचं सुंदर वर्णन एकीकडे तर गदिमांच्याबद्दल आदरभाव, फँटसीबद्दल वाटणारी भारतीय मानसिकतेची उदासीनता, स्वतःच्या नाकर्तेपणाबद्दलची परखड मतं, समाजाला धरून राहण्याची अतीव इच्छा ते मराठी साहित्य, शिक्षण, संस्कृतीमुल्य, निसर्गाच्या ओढीची इतरांकडून अपेक्षा दुसरीकडे. असा हा बहुपेडी विचारबंध या पुस्तकातून आपल्या समोर येतो.
हेही वाचा : एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता
मला वाचक म्हणून काही वैयक्तिक मतं मांडाविशी वाटतात. एक, ‘फँटसीचं वास्तव’ या लेखात अरबस्तानातल्या कथांचा उल्लेख आहे. आपल्याकडेही पहिल्या शतकात गुणाढ्याने पैशाची भाषेत ‘वड्डकहा’ लिहीली. पंचतंत्र, हीतोपदेश, वेताळ पंचविशी आणि आशिया खंडातल्या अनेक लोककथांचा प्रेरणास्रोत म्हणून गुणाढ्याचा उल्लेख होतो. आज हा ग्रंथ उपलब्ध नाही पण त्याचे तीन अविष्कार आहेत. ब्रहत्कथामंजिरी म्हणजे क्षेमेंद्र, कथासरित्सागर म्हणजे अनंतदेव आणि ब्रहत्कथाश्लोकसंग्रह म्हणजे बुधस्वामी.
कुमठेकरांच्या याच लेखात 'निसर्गनियमांचं ज्ञान कसं होणार' हा प्रश्न आहे. ऋग्वेदात मेधातिथी काण्व यांनी जलसूक्त रचलंय. संस्कृतचे गाढे अभ्यासक दा.वि.गर्गे यांनी ऋग्वेदात पर्यावरण संबंधी जवळजवळ ६०० सूक्त असल्याचं सांगितलंय. भगवंताची वाणी या चौकटीतून बाहेर पडून ऋग्वेदाचा अभ्यास केला तर त्यात निसर्ग विज्ञान किती आहे ते कळतं. आणि जर्मनीच्या हार्मेन याकोबी यांनी याचा कालखंड इ.स.पू. ४००० सांगितलाय. म्हणजे या ज्ञानाची प्राचीनता लक्षात येते.
शेवटच्या लेखात आद्य मराठी लेखनाचा मान कुडलकडे जातो असा उल्लेख आहे. त्यापूर्वी नाणेघाटात लेख आहेत. शिवाय पहिल्या शतकातल्या हाल सातवाहनाची गाहा सत्तसई आहे.
तीन पुस्तकातून आपल्यासमोर आलेला हा लेखक आज घडीला मला तरी आश्वासक वाटतो. वाचन, चिंतन, मनन, मंथन यातून स्वतःची अशी पक्की विचारबैठक असलेला आणि कुठल्याही चौकटीचं बंधन न जुमानता सहजस्फुर्त व्यक्त होणारा. हा लेखक नंदा खरे म्हणतात तसा ‘नई उमर की नई फसल’ आहे.
वाचक म्हणून मला हे पुस्तक, लेखकाची कौटुंबिक संस्काराची नाळ न तुटलेलं पण परिवेशाची जाण ठेवून मीकडून अपेक्षा व्यक्त करणारं वाटलं. शब्दावडंबर न माजवता, सरळ-सरळ भीडणारी बोली आणि मत मांडणारं आहे. म्हणून डाव्या बाजूचा कप्पा व्यापणारं हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव - अतीत कोण? मीच…
लेखक - प्रसाद कुमठेकर
प्रकाशक - पार प्रकाशन
किंमत - २५० रुपये
हेही वाचा :
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!
डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह
मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?