चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका

१९ मे २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारत कोरोना संकटाला तोंड देत असतानाच आता नवं संकट उभं झालंय. वीस वर्षांनी बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होतंय. ताशी २०० किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकतंय. २१ मेला संध्याकाळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला अम्फन असं नाव देण्यात आलंय. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकणार आहे.

भारतावरची संकटाची मालिका काही थांबत नाही. एकीकडे कोरोनाचं संकट थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग निवडला तर लॉकडाऊनमुळे नवे प्रश्न समोर येतायत. हे प्रश्न निस्तरताहेत तोवर आणखी एक संकट आता भारतावर फिरू लागलंय आणि ते म्हणजे चक्रीवादळाचं. भारताच्या पूर्वेला असणाऱ्या बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ तयार झालंय. क्षणाक्षणाला अधिकाधिक तीव्र होणारं हे वादळ हळूहळू भारताच्या दिशेनं सरकतंय. अम्फान असं या नव्या चक्रीवादळाचं नाव आहे.

हेही वाचा : दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स

अम्फान हे नाव कुणी दिलं?

जगातल्या महासागरात येणाऱ्या अशा वादळांना नावं द्यायची पद्धत १९५३मधे सुरू करण्यात आली. अमेरिकेतल्या मियामी शहरातल्या नॅशनल हरिकेन सेंटरने याची सुरवात केली. २००४ मधे वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे डब्लूएमओनं ही पद्धत रद्द केली आणि प्रत्येक देशाला आपापल्या पातळीवर नाव ठेवायला सांगितलं.

तेव्हा भारत, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या देशांनी एकत्र येऊन वादळांना काय नावं दिली जाऊ शकतात याची एक यादी बनवली. प्रत्येक देशाने ८ वादळाची नावं सुचवली आणि ती यादी डब्लूएमओकडे देण्यात आली. 

एखादं मोठं चक्रीवादळ आल्यानंतर या देशांनी पाठवलेल्या नावांपैकी एक नाव निवडलं जातं. प्रत्येक देशाने पाठवलेल्या ८ नावांपैकी आलटून पालटून एक नाव दिलं जातं. अम्फान हे या यादीतलं शेवटचं नाव आहे. थायलंडने हे नाव सुचवलंय. म्हणजे, आता पुन्हा चक्रीवादळ आलं तर त्याला काय नाव द्यायचं यासाठी नवी यादी तयार करावी लागेल. ही नवी यादी आधीच तयार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

वादळाला नाव का दिलं जातं?

एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीनं उत्तर हिंद महासागरात येणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची १६९ नावं जारी केलीत. जागतिक हवामान विभाग, यूनायटेड नेशन्स आणि यूनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक या संस्थांसोबत मिळून आयएमडीनं ही यादी जाहीर केलीय. या यादीत १३ सदस्य देशांची प्रत्येकी १३ नावं आहेत. सदस्य देशांमधे बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमन यांचा समावेश होतो.

आयएमडीनं गेल्या महिन्यात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. त्यानुसार, लोकांच्या शिफारसीवरून भारतानं आपली १३ नावांची यादी दिलीय. पण ही नावं अजून जाहीर करण्यात आली नाहीत. आयएमडीच्या मते, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचं नामकरण वादळांची ओळख निश्चित करण्यासाठी केलं जातं. जनजागृतीसोबत गोंधळाचं वातावरण टाळण्यासाठी नामकरण केलं जातं. एकाच भागात दोन चक्रीवादळं आली तर अशा वादळासंबंधीचे इशारे देणं सहज शक्य होतं.

याआधी २००४ मधे नावांची ही यादी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी अम्फान हे शेवटचं नावं शिल्लक होतं. ही यादी आठ देशांच्या सहभागातून तयार करण्यात आली होती. पण नव्या यादीत पाच नव्या देशांचा समावेश करण्यात आलाय.

अम्फान चक्रीवादळ कसं आहे?

१६ मेला बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात हे वादळ तयार झाल्याचं हवामान खात्याच्या लक्षात आलं. त्यानंतर १८ मेला सकाली ११:३० च्या सुमारास हे वादळ चक्रीवादळात बदललं असल्याचं लक्षात आलं. तेव्हा त्याचा वेग ताशी २०० किलोमीटर होता. भारतीय हवामान खात्याच्या प्रेस नोटनुसार, १८ मेला हे वादळ ओडिशाच्या दक्षिणेला ७७० किलोमीटर दूर तर पश्चिम बंगालपासून ९२० किलोमीटर दूर आणि बांग्लादेशपासून १०४० किलोमीटर दूर होतं. १९९९ नंतर पहिल्यांदाच बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होणार आहे.

आता पुढे सरकत असताना हे चक्रीवादळ थोडंसं उत्तरेकडे सरकेल. त्यानंतर २० मेच्या दुपारी किंवा संध्याकाळी पश्चिम बंगालमधल्या दीघा आणि बांग्लादेशमधला हटिया या किनारपट्टीवरून ते पुढे जाईल. तेव्हा त्याची गती ताशी १६३ ते १८५ किलोमीटर असेल. २१ मेला हे अम्फान वादळ शांत होईल. २१ तारखेला सिक्कीममधेही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

मात्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे वादळ धडकणार असल्याने या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीवर जोराचा वारा आणि भरपूर पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. यामुळे या दोन्ही राज्यांचं खूप मोठं नुकसान होईल. ही हानी टाळण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पोन्स फोर्स म्हणजेच एनडीआरफ पथक आणि भारतीय हवामान खातं जंगी तयारी करताहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा:

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

एनडीआरफची तयारी काय?

अम्फान हे चक्रीवादळ अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी १८ मेला संध्याकाळी ४ वाजता एनडीआरएफ पथकातल्या आणि हवामान खात्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. एनडीआरएफ आणि हवामान खात्याने काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या चक्रीवादळाची आणि पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती दिलीय. ऑक्टोबर १९९९ मधे ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादाळानंतरचं बंगालच्या उपसागरातलं हे सगळ्यात मोठं चक्रीवादळ असल्याचं या प्रेस कॉन्फरन्समधे सांगण्यात आलं.

जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कच्ची घरं, पत्र्याचं छत असणारी घरं, नारळाची झाडं, फोनचे किंवा वीजेचे खांब यांचं भरपूर नुकसान होऊ शकतं. चक्रीवादळाचा फटका बसणारे ओडिशा आणि पश्चिम बंगालमधली शहरं ही भरपूर लोकसंख्या असलेली आहेत. त्यासाठी ११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ येऊ शकते. एनडीआरफची टीम यासाठी तयार असल्याचं एनडीआरफच्या अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

सध्या देशात लॉकडाऊनमधे अडकलेल्या लाखो लोकांना आपापल्या राज्यात नेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे चक्रीवादळाचं संकट लक्षात घेऊन देशभरातून ओडिशा आणि पश्चिम बंगालमधे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात आलंय. ओडिशातील १२ आणि पश्चिम बंगालमधे कोलकातासह पाच जिल्ह्यांना या वादळाचा तडाखा बसण्याचा धोका आहे.

पश्चिम बंगालमधे एनडीआरएफच्या १९ तुकड्या तैनात करण्यात आल्यात. तर आपतकालीन परिस्थितीत वापरण्यासाठी एकूण ४ तुकड्या तयार ठेवण्यात आल्यात. ओडिशामधे १३ तुकड्या तैनात केल्या असून १७ तुकड्या तयार आहेत. याशिवाय गरज पडली तर भारतातल्या ६ बटालियनमधल्या प्रत्येकी ४ तुकड्या एनडीआरएफनं तयार ठेवल्या आहेत. १९ तारखेच्या सकाळपर्यंत सगळ्या तुकड्या आपापल्या जागी पोचतील आणि चक्रीवादळाबद्दलची सगळी माहिती स्थानिक लोकांना देतील, असं एनडीआरएफनं सांगितलं.

हेही वाचा : पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

कोरोना वायरसचा विसर पडला का?

महत्त्वाचं म्हणजे, चक्रीवादळाची भीती असली तरी भारतीय हवामान खातं आणि एनडीआरफला कोरोना वायरसचा विसर पडलेला नाही. बचाव कार्य करायची वेळ आली तरी लोकांमधे कोरोना वायरसचा प्रसार होऊ नये यासाठी गरजेची सगळी काळजी घेतली जाईल, असं आश्वासन एनडीआरएफनं दिलंय.

‘ओडिशामधल्या १२ जिल्ह्यांना अम्फान चक्रीवादळाचा धोका आहे. या १२ जिल्ह्यात ८०९ चक्रीवादळाचे शेल्टर म्हणजे आश्रयस्थान आहेत. पण यातली २४२ शेल्टर लॉकडाऊनदरम्यान बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मेडिकल कॅम्प म्हणून वापरले जात आहेत,’ अशी माहिती ओडिशाचे स्पेशल रिलिफ कमिशनर प्रदीप कुमार जेना यांनी एएनआयशी बोलताना दिली.

त्यामुळे लोकांना हलवण्याची वेळ आली तर ओडिशामधे सध्या ५६७ शेल्टर उपलब्ध आहेत. शिवाय प्रशासनानं ७०९२ बिल्डिंगचीही व्यवस्था करून ठेवलीय. थोडक्यात, अम्फान चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारने सगळी तयारी करून ठेवलीय.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?