एकेकाळी बॉलीवूड गाजवूनही तिथलं राजकारण प्रियांकाला का खुपतंय?

१४ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘सिटाडेल’ या आपल्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री प्रियांका चोप्रा भारतात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना तिने बॉलीवूडमधल्या तथाकथित लॉबी आणि त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला होता. इतक्या वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतरही प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाचा त्रास होताना दिसतो. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानलाही मागे असाच अनुभव आला होता.

२०१८मधे, प्रियांका चोप्राने निक जोनास या आपल्यापेक्षा १० वर्षं लहान असलेल्या अमेरिकन गायक-अभिनेत्यासोबत लग्न केलं तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या जोडीतल्या वयाच्या फरकाचं आश्चर्य तर तेव्हा होतंच, पण लग्नानंतर अमेरिकेला स्थायिक होण्याचा तिचा निर्णय मात्र त्याहून जास्त धक्कादायक होता. वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रियांका परदेशी चाललीय, असं जरी वाटत असलं तरी ते खरं नव्हतं.

प्रियांकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिटाडेल’ या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनचा मुहूर्त साधत प्रियांका गेल्या महिन्यात भारतात आली होती. यावेळी तिला तिच्या बॉलीवूडपासून लांब राहण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं होतं. आजवर सूचक मौन पाळणाऱ्या, जुजबी उत्तरं देऊन विषयांतर करू पाहणाऱ्या प्रियांकाने यावेळी मात्र अगदी बिनधास्तपणे बॉलीवूडमधल्या घराणेशाही, कंपूशाही आणि राजकारणावर ताशेरे ओढले.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

शेवटचा हिट ‘बाजीराव मस्तानी’

२००० साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणाऱ्या प्रियांकाला बॉलीवूडमधे आपली बैठक पक्की जमवण्यासाठी २००४ पर्यंत वाट बघावी लागली. २००४पर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांमधे प्रियांकाची भूमिका ही एका ग्लॅमरस युवतीचीच राहिली होती, ज्यात तिच्यातल्या अभिनेत्रीला फारसा वाव नव्हता. पण २००४च्या ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘ऐतराज’च्या घवघवीत यशाने हे चित्र पालटलं.

त्यानंतर पुढच्या दशकभरात प्रियांकाने अनेक हिट-फ्लॉप सिनेमांची रांगच लावली. शाहरुख खान-सलमान खानसारख्या आघाडीच्या सिनेनायकांपासून ते राजकुमार राव-अर्जुन कपूरसारख्या नवख्या अभिनेत्यांसोबत प्रियांकाने काम केलं. संजय लीला भन्साळी, विशाल भारद्वाज, राकेश रोशन, फरहान अख्तर, अनुराग बसू, आशुतोष गोवारीकरसारख्या प्रख्यात दिग्दर्शकांसोबतच धर्मा, यशराज, युटीवी, इरॉससारख्या तगड्या सिनेनिर्मिती संस्थांसोबत तिने काम केलं.

२०१४मधल्या ‘मेरी कोम’ या बायोपिकमधे सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सर मेरी कोमची भूमिका साकारणारी प्रियांका ‘शूटआऊट ऍट वडाला’, ‘गोलीयोंकी रासलीला - रामलीला’सारख्या सिनेमांमधे आयटम सॉंगवरही थिरकली होती. बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या प्रेमप्रकरणावर आधारित ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात प्रियांका बाजीरावांच्या पत्नी काशीबाईंच्या भूमिकेत झळकली होती. बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर हा तिचा शेवटचा हिट सिनेमा ठरला.

त्यानंतर २०१९मधे रिलीज झालेल्या ‘द स्काय इज पिंक’ आणि २०२१चा ओटीटी रिलीज असलेल्या ‘द व्हाईट टायगर’चा अपवाद वगळता, प्रियांकाकडून भारतात काही भरीव काम झालं नाही. खरं तर तिला काही कामच दिलं गेलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित निर्मितीसंस्थांशी हातमिळवणी करत असलेल्या प्रियांकाला बॉलीवूडच्या राजकारणाने मात्र पुरतं जेरीस आणलं होतं.

कंपूशाहीचा मनमानी कारभार

२००६मधे आलेल्या फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन’मधून प्रियांका आणि शाहरुख आमनेसामने आले. पुन्हा २०११मधे त्या दोघांनी एकत्र मिळून ‘डॉन २’मधेही काम केलं. त्यानंतर जवळपास सगळ्याच मोठ्या कार्यक्रमांना दोघे एकत्रच हजेरी लावू लागले. २०१२मधे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरुखने प्रियांकाशी साधलेली जवळीक मात्र लपून राहिली नव्हती. या पार्टीनंतर प्रियांका ‘बॉलीवूड वाईव्ज’च्या निशाण्यावर आली.

शाहरूखची बायको गौरी खानच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या ‘बॉलीवूड वाईव्ज’ या गृपमधे हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची बायको सुझान खान, संजय कपूरची बायको महीप कपूर, चंकी पांडेची बायको भावना पांडे अशा काहीजणींचा भरणा आहे. करण जोहरला या कंपूत मानाचं स्थान आहे. प्रियांकाला बॉलीवूडबाहेर ढकलण्यात या कंपूचा मोठा वाटा असल्याचा रिपोर्ट ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने केला होता.

शाहरूखशी प्रियांकाचं अफेअर सुरु असल्याच्या अफवांना उत येत असताना या ‘बॉलीवूड वाईव्ज’नी करणच्या मदतीने प्रियांकाला त्रास दिल्याचं प्रियांकाच्या एका मैत्रिणीने ‘मुंबई मिरर’शी बोलताना सांगितलं. त्यानंतर करणनेही आपल्या ट्विटरवरून या वादात उडी घेतली होती. बॉलीवूडवर बऱ्यापैकी वर्चस्व जमवलेल्या या कंपूपुढे आऊटसायडर ठरलेल्या प्रियांकाचं काहीही चाललं नाही आणि शेवटी तिला ही इंडस्ट्री सोडून परदेशी जावंच लागलं.

सुप्रसिद्ध सिनेसमीक्षक आणि सिनेअभ्यासक अमोल उदगीरकर यांनी ‘कोलाज’ला सांगितलं, ‘प्रियांकाने बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. मोठमोठ्या निर्मितीसंस्था, दिग्दर्शकांसोबत तिने हिट सिनेमांची रांगच लावली होती. प्रियांकाचं हे यश जितकं खरं आहे, तितकंच हेही खरं आहे की तिला बॉलीवूडमधे एका बाजूला ढकलून मुख्य प्रवाहाबाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता. त्यामुळेच तिला बॉलीवूड सोडावं लागलं.’

हेही वाचा: तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

भल्याभल्यांना बसलाय फटका

सिनेपुरस्कारांमधे प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ऑस्कर’ विजेता संगीतकार ए. आर. रेहमानही बॉलीवूडच्या अशाच राजकारणाचा बळी ठरला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या वादग्रस्त मृत्युनंतर बॉलीवूडमधे इनसायडर विरुद्ध आऊटसायडर असा वाद पेटला. सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा रेहमानने संगीतबद्ध केलेला सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर होता. त्यावेळी रेडियो मिर्चीला दिलेल्या मुलाखतीत रेहमानने एक मोठा खुलासा केला होता.

‘दिल बेचारा’चा दिग्दर्शक मुकेश छाब्राने रेहमानला त्याच्याविषयी बॉलीवूडमधे पसरत असलेल्या अफवांविषयी सांगितलं होतं. एक ठराविक कंपू आपली बदनामी करत असून आपल्यापर्यंत चांगला सिनेमा येऊ द्यायचा नाही, हे तो कंपू ठरवत असल्याचं रेहमानने या मुलाखतीत सांगितलं होतं. गेल्या काही वर्षांत रेहमानने संगीतबद्ध केलेल्या सिनेमांमधलं संगीत पूर्वीइतकं प्रभावी का वाटत नाही, याचं उत्तर याच मुलाखतीत दडलंय.

अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक अरिजीत सिंग, संगीतकार मिथुनही पूर्वी बॉलीवूडच्या अशाच भाईगिरीचे शिकार ठरलेत. या इंडस्ट्रीत कुणी गॉडफादर नसेल, तर इथं टिकणं किती अवघड आहे हे वेळोवेळी अनेक आऊटसायडर सिनेकलाकारांनी सांगितलंय. वरवर आकर्षक वाटणारी ही चंदेरी दुनिया आतून घराणेशाही आणि कंपूशाहीच्या धुराने काळवंडली गेलीय. स्वतःला इनसायडर म्हणवणाऱ्यांनाही इथं बऱ्याचदा झगडावं लागलंय.

संघर्ष कुणाला चुकलाय?

‘कोईमोई’ आणि ‘स्पॉटबॉय’चे माजी संस्थापक तसंच सिनेमागल्ली या फेसबुक गृपचे संस्थापक गुरुदत्त सोनसूरकर यांच्याशी कोलाजने संवाद साधला. बॉलीवूडमधल्या राजकारणाबद्दल ते म्हणतात, ‘जगात सर्वत्र जसा आणि जितका घराणेशाही, राजकारणाचा बजबजाट असतो तसाच तो बॉलीवूडमधेही आहे. एखादा सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी आपल्या मुलांना आपल्या जागी चिकटवायला बघतो तसा.’

‘पण घराणेशाहीबद्दल बोलायचं म्हटलं तर बॉलीवूडमधे स्टारपुत्रांना फक्त पदार्पण सोपं मिळालंय. संघर्षाचा सुरवातीचा काळ त्यांना ग्रेस मार्क म्हणून सुटला असला तरी पुढे स्थान टिकवण्यासाठी सर्वांनाच संघर्ष करायला लागलाय. अमिताभचा मुलगा असो की राकेश रोशनचा. उलट स्टारपुत्र पुत्रींना सतत तुलनेच्या कसोटीवर उतरावं लागतं. त्यांचं अपयश लागलीच ठळक केलं जातं.’

‘बाकी राजकारणाबद्दल बोलायचं तर बॉलीवूडमधे तुमचा कॅम्प आर्थिकदृष्ट्या किती सबळ आणि देशभरातल्या सिनेवितरकांवर वजन ठेवून आहे, या वर तुम्ही हिटचा फ्लॉप आणि फ्लॉपचा हिट करू शकता. ही ताकद म्हणजे बॉलीवूडच्या राजकारणाचा कणा आहे. पन्नासच्या दशकात काही मोजके स्टुडिओ होते; आता स्टुडिओ जाऊन काही मोजक्या निर्मितीसंस्था आहेत, इतकाच काय तो फरक उरलाय बॉलीवूडचं राजकारण खेळणाऱ्यांमधे.’

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

मनातला रावण काढायची ‘ऊर्मी’ देणारा स्वदेस

हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या