फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?
गेल्या आठवड्यात मोदींच्या ‘५६ इंच सीना’वाल्या वक्तव्याची जोड देत प्रियंका गांधी यांचा शर्ट, पँटमधला एक फोटो विकृतपणे वायरल केला गेला. त्यात प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवलेत. त्यासोबत मजकूर आहे, ‘वो तुम्हे २८-२८ इंच के दो दिखाकर ललचाने की कोशिश करेंगे, पर तुम छप्पन इंच पे अडे रहना.’
स्पष्टच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५६ इंची छातीच्या दाव्याविषयी ही पोस्ट आहे. प्रियंकांच्या राजकारणातील एण्ट्रीमुळे मोदींचे समर्थक काँग्रेसकडे जाऊ नयेत, अशी प्रतिक्रिया या पोस्टमधे आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीनंतर योगी सूरजनाथ नावाच्या व्यक्तीला बिहार पोलिसांनी अटक केली. कटिहार गावचा हा सूरजनाथ फेसबुकवर स्वत:बद्दल ‘भक्त ऑफ प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी’ असं लिहितो. तो `मिशन भाजप २०१९`चा उत्साही कार्यकर्ता आहे.
छप्पन इंचाच्या छातीची गोष्ट भारतीय राजकारणात आली ती २०१४च्या निवडणुकीआधी. भाजप विरोधी पक्ष असताना पंतप्रधानपदाचे तेव्हाचे उमेदवार नरेद्र मोदी म्हणाले होते, दहशतवादी, नक्षलवादी यांचा बीमोड करण्यास काँग्रेस सरकार असमर्थ आहे. ‘दिल्ली की सल्तनत में वो सीना नहीं है, उसके लिये ५६ इंचका सीना लगता है दोस्तों.’
पुढे मुलायमसिंग यादव यांच्यावर टीका करताना २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यानही ‘नेताजी आपकी हैसियत नही है. गुजरात बनाने के लिये ५६ इंच का सीना लगता है नेताजी!’ या मोदींच्या डायलॉगला समोरच्या श्रोत्या-प्रेक्षकांनी शिट्ट्या टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद दिला होता. तर, मोदींच्या या डायलॉगनंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षातले स्त्री-पुरुष राजकारणी मोदींच्या ५६ इंची छातीचे गोडवे गात आलेत.
अर्थात त्यावर टीकाही होत आलीय. लालूप्रसाद, मुलायमसिंग, राहुल गांधी आणि इतर विरोधक त्यावरून तिखट टोमणे मारत आलेत. प्रियंका गांधी यांनी मागे एका भाषणादरम्यान म्हणलं, ‘ये भारत है इसे चलाने के लिये ५६ इंच का सीना नही दरिया जैसा दिल चाहिये.’ त्यालाही श्रोत्यांचा जोरात प्रतिसाद मिळाला होता.
युट्यूबवर ‘५६ इंच सीना’ सर्च केल्यावर एक गाणं सापडतं.
‘नाम शरीफका काम गुंडोके, लोकलाज सब खोदी
छप्पन इंच सीने का म्हारा देख लिया नरेंदर मोदी’
हे गाणं पाकिस्तानवर टीका करत नरेंद्र मोदींचं कौतुक करणारं आहे. नरदेव बेनिवाल नावाच्या गायकानं गायलंय. मस्त मजेदार आहे. पण त्याहूनही मनोरंजक आहे न्यूज २४ नावाच्या न्यूज चॅनलने ‘पीएम मोदीके सीनेकी सच्चाई’ शीर्षकानं मोदींच्या शरीराची मापं भक्तिभावानं सांगत केलेला एक कार्यक्रम.
'मोदींची छाती ५६ इंची नसली तरी ५० इंची नक्कीच आहे. इतकी भरदार छाती तर एखाद्या पहलवानाची किंवा जिमनॅस्टचीच असू शकते! त्यांचे खांदेसुद्धा २१ इंच आहेत.’ मग सलमान-विराट कोहलीपेक्षाही पंतप्रधानांचा सीना कसा मोठा आहे याचं ग्राफिकल वर्णन झळकतं. कार्यक्रम संपतांना अँकर पुन्हा एकदा भारदस्त छातीचं माप सांगत म्हणतो, ‘सॅल्यूट है पीएम को! अब ब्रेक के बाद देखिये मोदी की ड्रेसिंग स्टाईल.’
एरवीही घरातला कर्ता कमावता माणूस, कुटुंबप्रमुख म्हणल्यावर डोळ्यांपुढे नकळत उभी राहणारी प्रतिमा पुरुषाचीच असते, बाईची नाही. त्यातही पुन्हा मर्द उर्फ कर्तबगार असण्याची लोकप्रिय कल्पना भारतीय पुरुषाच्या बाबतीत तरी बलदंड, रुंद खांद्याचा, टॉल, डार्क हॅन्डसम अशीच असत आलीय. घर चालवणारा, घरातल्या सदस्यांचं लालनपालन करणारा, त्यांच्या सुरक्षेची काळजी वाहणारा पुरुष वाघाचं काळीज असलेला ५६ इंची पाहिजे.
मग भारतमाता आणि तिच्या लेकरांची काळजी वाहणारा तसा का नको? म्हणजे नेतृत्वाची खरी काबिलीयत पुरुषातच आहे, अशी पक्की धारणा भारतीय समाज बाळगतोच. इंदिराजींना ‘तिच्या मंत्रिमंडळातली एकमेव पुरुष’ म्हणणं, झांशीच्या राणीला ‘मर्दानी’ हे विशेषण बहाल करणं, अशा काही गोष्टी उदाहरण म्हणून बघता येतील.
पण त्यातही ‘ऑल मेन आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल’च्या चालीवर नेताही आपल्याहून अधिक उंचीचा, ५६ इंची छातीचा, भारदस्त आवाजाचा अशी एकूणएक मर्दानगीची लक्षणं असलेला पाहिजे. तसा असेल तरच तो भारतीयांना नेता किंवा अगदी सिनेमातला हिरो म्हणूनही सर्वश्रेष्ठ वाटत असेल असं दिसतं.
या पुरुषी माजाला जेव्हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळतो, तेव्हा त्यातली विकृती समोर येते. स्त्री किंवा पुरुषाच्या टीका चिकित्सेचा प्रतिवाद न करता वैयक्तिक पातळीवर उतरत हिणकस भाषा वापरणारे ट्रोल विघातक आणि विकृत बनतात. समोरचं टार्गेट बाई असेल तर तिच्या शरीराला, चारित्र्याला ते लक्ष्य करतात. हे वेळोवेळी सिद्ध झालेलंय. पण मुळात बाईच्या शरीराला कायम इतकं संवेदनशील, इतकं वल्नरेबल बनवणाऱ्या समाज, संस्कृतीचं काय करायचं हा मूळ प्रश्न आहे.
बाई गूढ असते. तिचं शरीर गूढ असतं. आई बनण्याची क्षमता असलेलं तिचं शरीर तर टोकाचं महान आणि रहस्यमय असतं. तिची योनी फक्त एक अवयव कधीच नसते, तर एक कमालीची अपवित्र किंवा कमालीची पवित्र गोष्ट असते. मग एकतर तिला कामाख्या बनवून आसाममधल्या देवळात फुलं वहा किंवा केरळात शबरीमलाच्या बाहेर फटके द्या.
तिचे स्तन एकतर बाळाला दूध पाजून जगवणारी थोर वत्सल गोष्ट असते किंवा पुरुषाला चघळायला लावणारी अश्लील गोष्ट. ती, तिचे अवयव, अगदी तिच्या अवयवावर घालायची अंतर्वस्त्रं काय, शाळेत मानवी शरीररचनेचा धडा शिकतानाची वस्तुनिष्ठता आयुष्यभर बाईचं शरीर बघताना कुणी मनामेंदूत आणूच शकत नाही. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष!
मी सध्या मुंबईत राहते. एक शहरात जन्मलेली वाढलेली समवयीन पत्रकार मैत्रीण एकदा घरी आली. गप्पा झाल्या. निघताना एकदमच आवाजात ‘विस्पर’ आणत म्हणाली, ‘काय गं? तू तुझे ‘इनर्स’ बाहेर दोरीवर टाकलेस?’ मी म्हणाले, ‘का गं? काय झालं?’ आवाजाचा तो टोन खुसफुसता ठेवत ती म्हणाली, ‘ऑड वाटतं ग!’ आणि वर मला माझ्या दोन खोल्यांच्या घरातली अरुंद, कोंदट बाथरूम हीच त्यांची योग्य जागा असल्याचा सल्लाही देऊन टाकला.
वरवर बघताना हे तिचं म्हणणं निरुपद्रवी आहे. पण शहरी, खुल्या वातावरणात वाढलेली मुलगी असण्याचे सगळे प्रिविलेजेस किंवा झगडून मिळवलेली स्पेस आपण केवळ अनेक निरर्थक टॅबू मनाशी घट्ट असल्यानं नाकारतो. अंतर्वस्त्र उन्हात, हवेशीर जागी न सुकवता अंधाऱ्या जागी चोरून वाळवतो. अशावेळी ग्रामीण, निमशहरी भागात अंतर्वस्त्रच काय पण पाळीच्या काळातले कपडेही ज्यांना नीट उन्हात वाळवायची चोरी आहे त्यांचे प्रश्न कोण मांडणार?
'पोरीनं असं पाय फाकवून बसू नये’पासून सुरू झालेली साधीसोपी बंधनं ‘पोरी वयात आल्यावर’ त्यांचे ते अवयव विकसित झाले म्हणून काय लेवायचं, कसं जगायचं सगळं कळत नकळत नियंत्रित केलं जातं. अनेक ठिकाणी तर घाईघाईत लग्नच लावून टाकलं जातं. वयात आलेल्या कित्येक पोरी स्वत:ला नीट झाकून, चोरासाराख्या खांदे पाडून चालतात. तसं न करणाऱ्या कुणावर तिनं तथाकथित ‘झाकणारे’ नाही तर ‘दाखवणारे’ कपडे घातले, पुरुषाची काय चूक? म्हणत बलात्काराचा दोष तिच्यावर ढकलला जातो. ही यादी संपणारी नाही.
बाईला वाटणारी स्त्रीसुलभ लज्जा नैसर्गिकच आहे. पण तिच्या शरीराला एकतर ग्लोरिफाय करत किंवा अपवित्र म्हणत त्याच्यावर चढवलेले सामाजिक-सांस्कृतिक धारणांचे वर्ख ओळखता आले पाहिजेत. ‘मुस्लिम स्त्रीचा बुरखा आणि सध्याच्या काळात त्याला जोडून असलेल्या धारणा’ या विषयावर शोध घेत एक छोटासा लेख मागे लिहिला होता.
त्यासंदर्भानं लोकांशी बोलताना एक बुरखा विक्रेता मला म्हणाला, ‘मॅडम, जो चीज पवित्र और अहम होती है, उसको हम संभालके, कवर करके रखते ना! वैसे ही हमारे मजहब में औरत पवित्र है. इसलिये उसको बुरखे में लपेट के रखते.’ आता ऐकायला हे कितीही आदर्शवादी वाटलं तरी याचा व्यत्यास प्रियंका गांधीच्या ट्रोलिंगसारखाच भयंकर किळसवाणा आहे.
तो म्हणजे, आपल्या धर्मातली बाई पवित्र आहे म्हणून तिचं शरीर आदराने बुरख्यात लपेटून, झाकून ठेवा. दुसऱ्या धर्माच्या किंवा स्वधर्मातल्याही `वाईट` बाईला धडा शिकवायचा असेल तर तिचं शरीर उघडं करा, त्याच्यावर शेरेबाजी करा, अत्याचार करा.
बाईच्या शरीराला ‘केवळ शरीर’ म्हणून बघणं नक्कीच अवघड आहे. तितकंच किमान गूढ, महान, पवित्र अशा भयंकर विशेषणांची उधळण घातक आहे. मग त्याचा बळी प्रियंका गांधी यांच्यासारखी सेलिब्रिटी राजकारणी असेल किंवा कुणी बलात्कार केला म्हणून न्याय न मागता स्वत:च आत्महत्या करणारी एखादी सामान्य महिला, आपण सगळेच त्या सगळ्याला नकळत जबाबदार असू!