कोरोनामुळे वाढत्या गरिबीत अब्जाधीश मात्र वाढले

०२ जून २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या नुकत्याच झालेल्या वार्षिक बैठकीत ऑक्सफॅमचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावाच्या या अहवालात कोरोना काळात लोक भूक, गरिबीमुळे आक्रोश करत असताना औषध, तेल, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ठराविक कंपन्यांनी भरमसाठ कमाई केलीय. त्यातून कोरोना काळात प्रत्येक ३० व्या मिनिटाला एका अब्जाधीशाचा जन्म झाला. या काळातली सरकारची धोरणं त्यांच्या फायद्याची ठरलीत.

कोरोनामुळे जगभरातली अस्वस्थता वाढली. कोट्यवधी लोकांसाठी हा काळ जीवघेणा ठरला. योग्य वेळेत उपचार, औषधं, लस मिळावी म्हणून लोक धडपडत होते. त्याचवेळी दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून लोकांना वणवण करावी लागत होती. ही वणवण सुरू असताना दुसरीकडे जगभरात नवे अब्जाधीश तयार होत होते. त्यांची संपत्तीही त्याच वेगाने वाढत असल्याचं 'ऑक्सफॅम इंटरनॅशनल' या संस्थेचा ताजा रिपोर्ट सांगतो.

२२ मे ते २६ मे दरम्यान स्वित्झर्लंडच्या दावोस इथं 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'ची बैठक झाली. या बैठकीत हवामान बदल, कोरोनाचं संकट, रशिया-युक्रेनवर चर्चा झाली. जगभरातले प्रमुख पाहुणे नेते या बैठकीला उपस्थित होते. याचवेळी 'ऑक्सफॅम इंटरनॅशनल' या संस्थेचा 'प्रॉफिटिंग फ्रॉम पेन' नावानं एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता.

३० मिनिटात एका अब्जाधीशाचा जन्म

ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार, आज जगात २,६६८ अब्जाधीश आहेत. २०२०च्या तुलनेत ही संख्या ५६३नं वाढलीय. अब्जाधीशांची संपत्ती १२७ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. कोरोना काळात त्यात ३.७८ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली. ही संपत्ती १३.९ इतक्या जागतिक जीडीपीच्या बरोबरीची आहे. २००० हा आकडा ४.४ टक्के इतका होता. आताची वाढ ही तीन पटींची आहे.

गरीब आणि श्रीमंतांमधली ही दरी टोकाची आहे.  जगातल्या १० सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती जगातल्या सगळ्यात गरीब ४० टक्के लोकसंख्येच्या म्हणजेच ३१० कोटी लोकांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. गरीब वर्गातल्या एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्यक्तीइतकं उत्पन्न मिळवायचं तर ११२ वर्ष काम करावं लागेल.

कोरोना काळात प्रत्येक ३० मिनिटामधे एका अब्जाधीशाचा जन्म झाल्याचं ऑक्सफॅमचा रिपोर्ट सांगतो. दुसरीकडे यावर्षी ३३ मिनिटांमधे १० लाखच्या संख्येनं २६.३ कोटी लोकांना भयंकर गरिबीचा सामना करावा लागलाय.

किंमती वाढल्या, उद्योगपतींची संपत्तीही

मागच्या वर्षभरात अन्नधान्याच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्यात. दशकभरातली ही सर्वोच्च वाढ आहे. गेल्या दोन वर्षात याच कृषी क्षेत्राशी संबंधित ६२ नव्या अब्जाधींशांचा जन्म झालाय. अन्नधान्य आणि ऊर्जा क्षेत्रातल्या अब्जाधींशांच्या संपत्तीत मागच्या दोन वर्षात ४५,३०० मिलियन डॉलरची वाढ झालीय. याचा अर्थ त्यांच्या संपत्तीत प्रत्येक दोन दिवसात १०० मिलियन डॉलरपेक्षा अधिक फायदा झालाय.

कारगिल नावाच्या उद्योगपतींचं घराणं जगातल्या खाद्य व्यवसायाशी संबंधित आहे. कारगिल कंपनी इतर दोन कंपन्यांसोबत २०१७ला ७० टक्के जागतिक कृषी बाजारपेठ नियंत्रित करत होती. याच कंपनीने मागच्या दोन वर्षात रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. कोरोनाच्या आधी या घराण्यातल्या उद्योगपतींची संख्या ८ होती. ही संख्या कोरोनानंतर १२ वर पोचली.

अन्नधान्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा आपल्या रोजच्या आयुष्यावर होत असतो. त्याचे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणामही दिसून येतात. एखाद्या वस्तूची किंमत १००ने वाढली असेल तर त्यातल्या ६० रुपयाला या कंपन्यांचा गडगंज फायदा कारणीभूत ठरल्याचं निरीक्षण या रिपोर्टमधे नोंदवलं गेलंय.

हेही वाचा: विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

औषध कंपन्या फायद्यात

कोरोना काळात औषध क्षेत्रात नवे ४० अब्जाधीश जन्माला आले. मॉडर्ना, फायझरसारख्या कंपन्याही कोरोना काळात लसींचं उत्पादन घेत या क्षेत्रात मक्तेदारी मिळवली. या कंपन्या दर सेकंदाला १ हजार डॉलर कमावत होत्या. सामाजिक उत्तरदायित्वाच्या नावाखाली या कंपन्यांनी १० बिलियन डॉलरची मदत मिळवली.

जगभरातली सरकारं या लसी मूळ किमतीच्या २४ पट अधिक किमतीने विकत घेत होती. आजही जगातल्या गरीब देशांमधल्या ८७ टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालेलं नाहीय. त्यामुळे बूस्टर डोसच्या नावाखाली या लसी बाजारात आणल्या गेल्या. पण त्याचा फायदा कितीशा गोरगरिबांना झाला? हा प्रश्न विचारायला हवाय. कारण या लसीच्या नावावर कोट्यवधी रुपये या कंपन्यांनी कमावलेत.

मास्क बनवणाऱ्या कंपन्याही या काळात तेजीत होत्या. ज्या कंपन्या महिन्याला १ लाख कमावत होत्या त्याच कोरोना काळात महिन्याला १० कोटींवर पोचल्या. इतर क्षेत्रांचा विचार करता तेल कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुगल, टेस्ला, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट यांनी सर्वाधिक फायदा उठवलाय.

आर्थिक विषमता वाढली

संयुक्त राष्ट्राने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलाय. त्या रिपोर्टच्या अंदाजानुसार, जगातल्या ५३ देशांतले जवळपास १९३ मिलियन लोक तीव्र स्वरूपाच्या उपासमारीतून जातायत. कोरोनाच्या काळात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं पुरेसं अन्न मिळालं नाही. पूर्व आफ्रिकन देशांमधे तर प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती भुकेने मरत होती. अनेकांचा रोजगार गेला. चांगलं राहणीमान, शिक्षण, आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी लोकांना झगडावं लागत होतं. लोकांचा हा संघर्ष आजही चालू आहे.

दुसरीकडे जगातल्या अब्जाधीशांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. कोरोना सारख्या अवघड काळातही अब्जाधीश व्यवस्थेचा फायदा उठवत होते. त्याला सरकारही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करत होतं. जगभरातलं वाढतं खाजगीकरण या अब्जाधीशांच्या फायद्याचं ठरलं. त्यामुळे आर्थिक विषमता वाढली. ही विषमता कमी करायची असेल तर या अब्जाधीशांच्या संपत्तीवर कर लावायला हवा असं ऑक्सफॅमच्या रिपोर्टमधे म्हटलंय.

कोरोनामुळे जगभरात जवळपास ६३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगतेय. मोठ्या विकासाच्या गप्पा होत असताना हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे. काही ठराविक लोकांची भरभराट आपलं भविष्य ठरवू शकत नाही. त्यामुळे ही विषमता दूर करून एक चांगलं भविष्य उभं करण्यासाठी सगळ्याच देशांची धडपड गरजेची आहे.

हेही वाचा: 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया