आता परिवर्तनवादी चळवळींमधेच परिवर्तन व्हायला हवं

३० ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशाच्या सुधारणेसाठी परिवर्तनवादी चळवळी फार महत्त्वाच्या आहेत. पण सध्या अगदी २ – ३ चळवळी सोडल्या तर बाकी कोणत्याही चळवळीची निश्चित योजना नाही हे दिसतंय. देशात परिवर्तन आणायला या चळवळी कमी पडतायत. त्यामुळेच परिवर्तनाच्या घाईमुळे हातात आलेली सुधारणा निसटून जातेय हे या चळवळींनी लक्षात घ्यायला हवं. नव्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नव्या मार्गांचाही आता वापर करायाल हवा.

समाजातल्या परिवर्तनवादी चळवळींमधल्या अगदी २-३ चळवळी सोडल्या तर बाकी कुणाचीच निश्चित योजना नाही. कुठं पोचायचं आहे हे पक्कं ठरलेलंय. पण ध्येयापर्यंत कोणत्या मार्गाने पोचायचं हे निश्चित नाही. त्यामुळे या चळवळी भरकटत आहेत किंवा त्या परिणामकारक सिद्ध होत नाहीयत. 

शत्रू नको मित्र बना

या चळवळींची सर्वात मोठी चूक म्हणजे अनेक चळवळींद्वारे धर्माला टार्गेट केलं जातं. काही विशिष्ट धर्मांवर टीका करण्याला हे लोक परिवर्तन मानतात. परंतु त्यांच्या अशा वागण्याने परिवर्तनालाच रोक लागतेय हे त्यांच्या लक्षात येत नाही.

एखादी व्यक्ती एखाद्या धर्मात जन्माला आल्यावर, त्याच संस्कृतीत २५-३० वर्षे वाढल्यावर तुम्ही तिच्या धर्मावर प्रत्यक्ष प्रहार करून २५-३० वर्ष तिच्या मेंदूवर झालेल्या संस्कारांना तासाभरात पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर निकाल काय लागेल? ती कधीच तुमचा आणि तुमच्या विचारांचा स्वीकार करणार नाही. उलटपक्षी ती तुमच्यापासून दूर जाईल. 

तुम्हाला आधी व्यक्तीला आपलंस करावं लागेल. त्याला तुम्ही त्याचे मित्र वाटले पाहिजे, शत्रू नाही. आपल्या आयुष्यात आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याच विचारांची असेल, आपल्याला अनुकूल वागेल असं नाही. प्रत्येकाची विचारसरणी आणि स्वभाव वेगवेगळे असतात, आपल्याला हे समजून घेऊन पुढील वाटचाल करायची आहे हे सत्य उमगलं की पुढील मार्ग सुकर होतो.

हेही वाचा : भारताच्या किनाऱ्यावर धडकेल का कोरोनाची दुसरी लाट?

पुरोगामीत्व दाखवण्याची घाई

अशा संघटना चळवळींच्या कार्यकर्त्यांनी फक्त घरात बसून काहीच होणार नाही, हे समजून घ्या. कारण परिवर्तन होऊ द्यायचं नाहीय असे लोक प्रत्यक्ष समाजात फिरून तुमचे मार्ग खडतर करतायत. तुम्हाला बाहेर निघून समाजात जावं लागेल, लोकांमधे मिसळावं लागेल. फक्त परिवर्तनाचाच एकमेव विषय घेऊन तुम्ही समाजात टिकू शकणार नाही. तर लोकांच्या सुख-दुःखात आणि धार्मिक कार्यक्रमांमधे तुम्हाला सहभागी व्हावं लागेल.

वारंवार एकत्र बसावं लागेल, समविचारी लोकांच्या चर्चा घडवून आणाव्या लागतील. त्या चर्चांमधून, विचार मंथनातून परिवर्तनाचे वेगवेगळे मार्ग आपल्याला गवसू शकतील. आपण दोघं तिघं मिळून काय करू शकू ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. तुम्ही सुरुवात केल्यावर दोनाचे दहा व्हायला वेळ लागणार नाही.

डॉक्टर आ.ह. साळुंखे याच्या म्हणण्याप्रमाणे ‘प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आचार-विचारांची आहे. देशातील प्रत्येकाला त्याचं वेगळेपण जपण्याचं स्वातंत्र्य देत आपण सेतू बनून माणसं जोडण्याचं काम करायचं. माणसं जोडत असताना, कुणाच्या घरी जाताना फक्त आणि फक्त मित्र बनून जायचं न्यायाधीश बनून जायचं नाही.’

म्हणजेच आपला मित्र घरात कुणाची प्रतिमा लावतो, कुणाला पूजतो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरुन त्या व्यक्तीला मोजायचं ठरवलं, बोलण्यावागण्यातून आपलं पुरोगामीत्व दाखवण्याची घाई केली तर ती व्यक्ती कायम आपल्यापासून दूर जाणार हे लक्षात घ्या.

औषधाचा डोस किती द्यायाचा?

तुम्हाला जे सत्य गवसायला अनेक वर्ष लागली ते काही तासात तुम्ही इतरांच्या डोक्यात पेरू शकत नाही. परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे. त्यात घाई केली तर परिवर्तनाचे मार्ग कायमचे बंद होऊन जातील. बोट धरून चालायला शिकवताना मुलगा हळूहळू आपल्या बापाच्या पायावर चालण्याचा प्रयत्न करत असेल. तर बापालाही त्या मुलाच्या गतीनेच चालावं लागेल. 

त्याला झेपेल इतका वेग बाप वाढवू शकेल. पण बाप स्वतःच्या गतीने चालायला लागला तर मुलाला फरफटत नेईल. त्याचे पाय, बोट घासतील त्यामुळे तो पुन्हा चालायची हिंमत करणार नाही. तसंच परिवर्तनाचं आहे.

डॉक्टरही आजारी व्यक्तीला लवकर बरं व्हावं म्हणून औषधाची पूर्ण बाटली प्यायला सांगत नाहीत. हळूहळू शरीराला झेपेल त्या प्रमाणात औषधाचे डोस देतात.

हेही वाचा : आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

नवे मार्ग हवेत

चळवळीतील मंडळी अनेकदा धार्मिक कार्यक्रम, सण उत्सव टाळतात. धार्मिक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेत नाहीत. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला ज्या लोकांचं प्रबोधन करायचं आहे ते लोक प्रचंड धार्मिक आहेत आणि धर्माचा आधार घेतल्याशिवाय आपण त्यांच्या डोक्यात सत्याची बीजं पेरू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी गाडगेबाबांचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. 

काही लोक चुकीच्या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी धर्माचा वापर करतात त्याचप्रमाणे आपणही सत्याच्या प्रचार प्रसारासाठी धर्माचा वापर करून घ्यायला शिकलं पाहिजे. सत्य कळलं आहे त्यांनाच वारंवार तेच तेच सांगून आपण आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवतोय हे लक्षात घ्या. नवीन लोकांपर्यंत पोचण्यासाठी नवे मार्ग शोधा.

कुठल्याही वर्गाला बदलायचं असेल तर सगळ्यात पहिले त्यांना आपलंसं करावं लागेल, याबद्दल साळुंखे सर म्हणतात, ‘समजा हिंदू-मुस्लिम वाद आहे तर यापैकी एका संपूर्ण गटाचे धर्मपरिवर्तन शक्य नाही. एका गटाची पूर्ण कत्तल करणं शक्य नाही. कुण्याही एका गटाला पूर्णपणे देशाच्या बाहेर हाकलून देणं शक्य नाही किंवा पूर्णपणे कुण्या गटाला गुलाम बनवणंही शक्य नाही. कारण कायम कुणीच कुणाचं गुलाम राहू शकत नाही आणि कायम कुणीच कुणाला गुलाम ठेऊ शकत नाही. हे चारही मार्ग कामाचे ठरू शकत नाहीत.’ 

त्यासाठी दोन्ही गटांना सामंजस्याने एकमेकांचा स्वीकार करावा लागेल आणि परिवर्तन घडवून आणावं लागेल. कोणत्याही पक्ष किंवा नेत्यासाठी चळवळीच्या विचारांचा खून होऊ देऊ नका.

माथी भडकवणाऱ्यांची गती प्रचंड

सोशल मीडियावर आपण बघतो की अनेक लोक मनात येईल तो खोटा इतिहास पसरवत असतात. आपण ती सगळी माहिती वाचतो आणि दुर्लक्ष करतो किंवा ही खोटी आहे अशी टिप्पणी करून पुढे जातो. पण थोडा वेळ काढून त्या खोट्या माहितीऐवजी खरी माहिती संदर्भासहीत समाजाला हवी म्हणून ४ पुस्तके चाळत नाही. किंवा १० ओळी टाईप करून त्याचा प्रतिवाद करत नाही. परिवर्तनाच्या प्रवाहात सामील होणाऱ्यांपेक्षा माथी भडकवणाऱ्यांची गती प्रचंड आहे. त्याकरता आपणही सगळे आधुनिक मार्ग आणि माध्यमांद्वारे आपलं कार्य करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे.

छोटे प्रबोधनात्मक वीडिओ, लेख, मॅसेज, फोटो अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खऱ्या विचारांच्या प्रचारासाठी केला पाहिजे. आपण काहीच करू शकत नसू तर निदान वेळ काढून चळवळीसाठी कार्य करणाऱ्या, भाषणं, लिखाण आणि इतर मार्गांद्वारे परिवर्तनशील विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या, आर्थिक मदत करणाऱ्या लोकांना वेळोवेळी संपर्क करून त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. चळवळींसाठी 'प्रोत्साहन' हेच सर्वात मोठं इंधन आहे.

हेही वाचा : ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला

'कोण' वाईट यापेक्षा 'काय' वाईट

चार्वाकांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे. त्यामुळे चळवळीत काम करताना आपल्याबरोबरच सर्वांचं वैयक्तिक स्वातंत्र्यही जपता आलं पाहिजे. इतरांनाही भावना आहेत. ते आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांमधे राहिलेले आहेत. त्यांचे विचार वेगळे असू शकतात हे समजून घेतलं पाहिजे.

सामाजिक प्रगतीच्या नुकसानाचं मुख्य कारण धर्म नसून समाजातला भेदभाव आहे. जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, धर्मवाद, कट्टरवाद ही समाजातल्या वादाची, असंतोषाची मुख्य कारणं आहेत. कुणाच्या पूर्वजांनी काय केलं हे उगाळत बसण्यापेक्षा नवीन पिढ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संघर्ष टाळला पाहिजे. 'कोण' वाईट यापेक्षा 'काय' वाईट हे आपण समाजाला सांगितलं पाहिजे.

हृदयाकडून डोक्याकडे

स्त्रियांच्याही भावनांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. जिजाऊंना शहाजीराजेंनी राज्यकारभार सोपवला. प्रत्यक्ष व्यवहारात पडल्यामुळे त्यांना राजकारणातले बारकावे लक्षात आले. ते अनुभव पुढे शिवरायांना मार्गदर्शक ठरले.  सावित्रीबाईंना ज्योतिबांनी प्रत्यक्ष अनुभव घेऊ दिला. सावित्रीबाईंनी स्वतः वाईट अनुभव घेतल्यामुळे त्यांना आपण करत असलेल्या कामाचं महत्त्व कळलं आणि त्याबद्दल जिद्द निर्माण झाली.

परिवर्तनाचा प्रयत्न जबरदस्तीनं कधीच नकोय. महिलांनाही योग्य मार्ग दाखवून, योग्य ज्ञान पुरवून त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांना शिकू दिलं पाहिजे. म्हणजे त्या आपल्या मतावर ठाम असतील. एकच तर्क-मांडणी सर्वांमधे सारखं परिवर्तन घडवून आणेल असं होत नाही. वेगवेगळे तर्क-वितर्क, प्रक्रिया-प्रयोग आपल्याला राबवाव्या लागतील. त्यासाठी संयम, जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. 

आपल्याला समाजात परिवर्तन खरंच घडवायचं असेल तर परिवर्तनाचा मार्ग हा हृदयाकडून मस्तिष्काकडे असावा. परिवर्तनाची घाई हीच परिवर्तनाच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे.

हेही वाचा : 

वो सुबह कभी तो आयेगी!

मुलांना कोडिंगचं शिक्षण द्यावं का?

३२ हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा अजेंडा!

इम्रान खान यांचा राजकीय बळी देणार पाकिस्तानी लष्कर?

पुन्हा कुणी लिहिल का एखादी संवेदना जागवणारी प्रार्थना?

आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा

(लेखक अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अकोला शाखेत महानगर संघटक आहेत.)