पुण्यात १२ तारखेला १२ वाजता १२ ठिकाणी लोक का जमले?

१७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ९ मिनिटं


एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यात नोव्हेंबरच्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता वेगवेगळ्या १२ ठिकाणी भारताचा नकाशा असलेला मास्क घातलेले तरुण शहरातल्या समस्यांवर मोठ्या तावातावात बोलू लागले. हातात फलक घेऊन बोलणारे हे लोक कोण आहेत? अचानक लोक रस्त्यावर येऊन काय बोलत आहेत? असे अनेक प्रश्न गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबद्दल सांगतोय असाच एक मास्कवाला.

एक आजी उभ्या होत्या. मी त्यांना विचारलं, ‘आजी, तुम्ही अनुभव आणि वयाने माझ्याहून खूप मोठ्या आहात. तुम्हाला आपल्या शहरात अगोदरपेक्षा जास्त सुरक्षित वाटत का हो?’ 

माझ्या या प्रश्नाने आजी विचारात पडल्या आणि त्यांनी इकडे तिकडे बघून बोलायला सूरवात केली. ‘आजकाल घरातून बाहेर पडताना सुरक्षित वाटत नाही. पहिलं असं नव्हतं. सारख्या बलात्काराच्या घटना ऐकून तर तरुण मुलींची जास्त काळजी वाटते. पोलीसही मदत करतील का नाही याचा भरवसा वाटत नाही. सगळीकडे भीतीच वातावरण आहे.’ 

आजींना जे भीतीचं वातावरण जाणवलं, ते तुम्ही आम्ही सगळेच अनुभवतोय. पण त्याबाबत आपण बोलतो का? नाही. आपण बोललं पाहिजे, आपण संवाद केला पाहिजे. लोकांशी, व्यवस्थेशी, स्वत:शी एक नागरिक म्हणून. त्यासाठीच १२ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता १२ ठिकाणी १२ मुद्यांवर पुण्यात सार्वजनिक चर्चा झाली. या चर्चेला लोकांचा अपेक्षेहून चांगला प्रतिसाद मिळाला.

‘झालं अजून एक आंदोलन सुरू’

अशीच एक चर्चा पोलिस मुख्यालयासमोर सुरू होती. पोरांनी लोकांना विनंती करून चर्चेत सामील करून घेतलं. ‘नमस्कार मी भारत, मला तुमच्याशी बोलायचंय. तुमचे दोन मिनिटं देता का?’ या विनंतीला मान देऊन काही लोक थांबलेही. मग चळवळे तरुण त्यांच्याशी बोलू लागले, ‘मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्या संघटनेचाही नाही. मी तुमच्यासारखा भारताचा नागरिक आहे, भारत आहे.’ जसंजसं सहभागी तरूण एक एक मुद्दा घेऊन बोलून लागले तसंतसं लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना तोंड फुटलं.

पुण्याच्या पोलीस आयुक्तालयासमोर कायदा सुव्यवस्थेवरच्या चर्चेत मीही सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन हेही तोंडाला मास्क लावून पोलीस मुख्यालयाबाहेर पोचले. येणारे जाणारे लोक ‘झालं अजून एक आंदोलन सुरु’ अशा आविर्भावात बघत होते. पण हे आंदोलन नव्हतं. हा होता संवाद लोकांचा, लोकांशी, लोकांच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर पीपल्स पॉइंटवर.

चर्चा सुरु असताना पोलीस कसं गुंडांसारखं वागतात या मुद्द्यावर गाडी आली. एक पोलीस कर्मचारीही त्यात सहभागी झाला. ते म्हणाले ‘आम्ही मुळात वाईट आहोत असं नाही. आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. वरून दबाव आला की चुकीच्या गोष्टीही होतात. त्याचं आम्हाला पण वाईटच वाटतं.’ 

त्यांच्या या कबुली जबाबाने साऱ्या चर्चेचा नूरच पालटला. त्यांच्या बोलण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असलेला राजकीय दबाव, भ्रष्टाचार, न्याय-अन्यायाची संकल्पना सगळंच आलं. शेतकऱ्यांच्या पाठोपाठ पोलीस कर्मचारी आत्महत्या का करतात या समस्येची अंधारातील बाजू उजेडात आली.

या सगळ्यांच्या मागं कोण?

लोकांच्या मनातल्या या सगळ्या धुसफुशीला वाट करून दिली ती महाराष्ट्र नागरिक सभेनं. ही काही कुठली संघटना नाही, ना कुठली संस्था. लोकांनी आपले विचार मोकळेपणाने मांडावेत, प्रश्नांना वाचा फोडावी म्हणून जागरूक नागरिकांनी जाणीवपूर्वक सुरु केलेली ही एक कृती आहे. धर्म, जात, मंदिर, मशीद यातून कुणाचं भलं होणार नाही, अशी मनाशी गाठ घालून हे सगळे लोक जमलेत. लोकांच्या जीवनमरणाच्या समस्या मीडियानं, मायबाप सरकारनं वाऱ्यावर सोडल्याची या लोकांची तक्रार आहे. त्यामुळं आपणच आपला मीडिया, आपणच सरकार असं ठरवून महाराष्ट्र नागरिक सभेचं काम सुरू झालंय.

‘महाराष्ट्र नागरिक सभा’ या बॅनरखाली वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आलेल्या या चळवळ्या लोकांमधे तरुण, तरुणी, विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, कलाकार, महिला यांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र नागरिक सभे’च्या माध्यमातून मूलभूत प्रश्नांवर लोकांशी संवाद साधण्यात आला. केवळ समस्यांवर बोलत बसण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी काय करता येईल, यावरही यावेळी चर्चा झाली.

मन की बात अशीही

सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी १२ विषय होते. यावर १२ ठिकाणी सार्वजनिक चर्चा झाली. यामधे शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक स्वच्छता आणि पाणीपुरवठा, कायदा सुव्यवस्था, महिला अधिकार, सामाजिक न्याय, पेट्रोल-गॅस दरवाढ, शेती पाणी आणि कला साहित्य संस्कृती अशा १२ प्रश्नांचा समावेश होता. यावेळी जागरूक नागरिकांनी या प्रश्नांवर आपली ‘मन की बात’ सांगत लोकांशी हितगुज साधलं. या कृतीची सगळीकडे चर्चा झाली.

भाषातज्ञ गणेश देवी यांनी विचारवंत साहित्यिकांना सोबत घेऊन दक्षिणायन ही मोहीम सुरू केली. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातील तरुण तरुणींशी संवाद साधत त्यांना सार्वजनिक प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिलं. लोक आपल्या प्रश्नांवर बोलू लागले आणि त्यातूनच आकाराला आली ‘महाराष्ट्र नागरिक सभा’. सुप्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे या सभेचे राज्य समन्वयक म्हणून काम पाहत आहेत, तर हनुमंत पवार पुणे जिल्ह्याचे.

या सगळ्या चर्चेसाठी निवडण्यात आलेली ठिकाणंही महत्वाची होती. म्हणजे कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा पोलीस आयुक्तालयासमोर, पेट्रोल दरवाढीची चर्चा पेट्रोल पंपासमोर अशा ठिकाणी ही सार्वजनिक चर्चा झाली.

महिला अत्याचारास कपडे जबाबदार कसे?

सारसबागेसमोरच्या सावित्रीबाई फुले स्मारकावर कल्याणी मानगावे यांनी महिलांच्या प्रश्नांवर उपस्थित लोकांशी संवाद साधला. कल्याणी मानगावे म्हणाल्या, `महिलांच्या अनेक प्रश्नांची शासन दखलच घेत नाही. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहं नाहीत. पीएमटी, सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास दिला जातोय. या सगळ्यांची कोणतीच दखल घेतली जात नाही. महापालिकेनं लक्ष दिलं पाहिजे. महिलांवरील अत्याचारासाठी आरोपीला दोषी धरण्यापेक्षा त्यांच्या कपड्यांवर चर्चा केली जाते. पोलिस यंत्रणेसोबतच समाजानेही ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.`

नळाला येणारं घाण पाणी, विकासाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल, नागरी वस्तीत घुसलेल्या कंपन्यांमुळे होणारं हवा प्रदुषण यासारख्या समस्यांवर आपण गप्प बसतो. जातीपातीवर मोठमोठ्यानं बोलणारे लोक पर्यावरणाचा मुद्दा चर्चेत येताच गप्प बसतात, अशी खंत हवामान खात्याच्या क्षताक्षी गावडे यांनी बोलून दाखवली. पुण्यात नदीचा नाला झाला, कचरा व्यवस्थापन नाही, त्याबाबत प्रशासन लक्ष घालत नाही. पर्यावरणाच्या प्रश्नावर पुण्यात मोठं व्यासपीठ उभं राहीलं पाहिजे, असा मुद्दा तिनं मांडला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो तरुण तरुणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येतात. त्यामुळे पुणं आता स्पर्धा परीक्षा हब झालंय. एवढा मोठा लोंढा स्पर्धा परीक्षेच्या अरुंद मार्गावरून जाताना कोणते प्रश्न घेऊन जगतो हे जाणून घेण्यासाठी अनुप देशमुख यांनी शास्त्री रस्त्यावरील एका अभ्यासिकेबाहेर तरुणांशी संवाद साधला. दुपारी बाराला सुरु झालेली ही चर्चा दोनपर्यंत चालली. त्यातून शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे असा सूर निघाला. शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून त्याला व्यवसायाभिमुख केल्यास बेरोजगार तरुण निर्माण होणार नाहीत, असं मत अनुपने मांडलं. मुद्रा योजना, जोडधंदा योजना यांचा थेट कुणालाच लाभ होत नसल्याचं सहभागी तरुणांनी सांगितलं. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी बेरोजगारीचा मुद्दा होता.

ज्ञान हवं की जातीचं राजकारण

शिक्षणावरच्या चर्चेत प्रा. शमसुद्दिन तांबोळी यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नं उपस्थित केले. देशात शाळा कॉलेजांच्या उभारणीपेक्षा पुतळे, मंदिर, मशीद बांधण्यावर मोठा खर्च केला जातोय, असा आरोप त्यांनी केला. लोकांना ज्ञान हवं की जातीचं राजकारण, असा सगळ्यांना अस्वस्थ करणारा प्रश्न या चर्चेतून उभा राहिला.

पेट्रोल गॅस दरवाढीबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळाला. भाजपने निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासनं न पाळून लोकांची फसवणूक केल्याची भावना यावेळी बोलून दाखवण्यात आली. तेल प्रश्नाचे अभ्यासक अजित अभ्यंकर यांनी लोकांशी संवाद साधला. तेलाच्या वाढत्या किमतींचा संबंध हा आंतराष्ट्रीय किमतींशी नसून इथल्या मुठभर पैसेवाल्या कंपन्यांच्या लाभाशी असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं. घनकचरा, पाणीपुरवठा, आरोग्य, साहित्य संस्कृती या विषयांवरच्या चर्चांनाही लोकांचा प्रतिसाद मिळाला.

आमच्याकडंही कार्यक्रम घ्या

चर्चेच्या समारोपावेळी जमलेले लोक आमच्या भागात येऊन हा कार्यक्रम करा, अशी विनंती करत होते. कार्यकर्ते त्यांना ‘हा मास्क घ्या! याला आपलं अंतरंग बनवा आणि कुठंही उभं राहून तुम्ही बोला या प्रश्नावर. कारण तुम्ही देखील भारत आहात. तुम्ही देखील भारताचाच आवाज आहात,’ असं सांगत होते.

हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जागं राहिलं पाहिजे. त्यावर बोललं पाहिजे. या मुद्द्यांवर आपले लोकप्रतिनिधी भरकटत असतील तर त्यांना आपण बदललं पाहिजे. एखादी वस्तू घेताना आपण चार दुकान हिंडतो की नाही तसंच आपला लोकप्रतिनिधी निवडताना हात जोडून येणाऱ्या उमेदवाराला आपण प्रश्न कसा सोडवणार याबाबत विचारलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे, असा १२ तारखेच्या १२ वाजताचा एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या शहराला संदेश होता.