फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

११ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या काही दिवसांपासून देशभरात केंद्र शासनाने केलेल्या नवीन शेती कायद्यांच्या विरोधात वातावरण तापलंय. हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित न राहता अतिशय कमी वेळेत देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपलं. नेहमीप्रमाणे केंद्राने हे शेतकरी नाही तर खलिस्तानी आंदोलन आहे वगैरे प्रचार करून बघितला. महाराष्ट्रासारखेच आपले सगळ्या क्षेत्रातले गुर्गे याकामाला लावले. पण यावेळी त्यांचे सगळे डावपेच अयशस्वी झाले. कारण यावेळी सामना महाराष्ट्राशी नाही तर पंजाबशी होता.

नवीन कृषी कायदे पूर्णपणे रद्द करावेत किंवा त्यात सुधारणा कराव्यात याबाबतीत मतभेद असतीलही परंतु ते जसेच्या तसे स्वीकारू नये याबाबत कुणाचंच दुमत नसेल. या आंदोलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील नागरिकांद्वारे जपल्या जात असलेल्या आपल्या राज्याच्या अस्मितेबाबतचा फरक ठळकपणे जाणवला. 

अस्मिता म्हणजे स्वाभिमान, स्वत्व. माझ्या राज्यातल्या नागरिकांसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी मी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, कुठलाही स्वार्थ नाकारू शकतो, कोणत्याही पदाला-पुरस्कारांना लाथाडू शकतो हे पंजाबमधल्या राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी दाखवून दिलं. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र असं चित्र दिसलं नाही.

महाराष्ट्रापेक्षा पक्षादेश महत्त्वाचा

कोण कुठला अर्णबगोस्वामी त्याच्यामुळे एक महाराष्ट्रीयन माणूस आपल्या आईसह आत्महत्या करतो, तो अर्णबगोस्वामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना एकेरी नाव घेऊन ’उखडलो जो उखडना है’ म्हणत ललकारतो. मुंबई पोलिसांना अद्वातद्वा बोलतो तरीसुद्धा महाराष्ट्रातील काही महाराष्ट्रापेक्षा आपल्या पक्षाला आणि नेत्याला श्रेष्ठ मानणारे महाभाग त्या अर्णबगोस्वामी करता रस्त्यावर आले.

त्याच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडं घातलं. म्हणजे ज्या अन्वय नाईक नावाच्या मराठी माणसाचे लाखो रुपये बुडाले आणि त्यापायी त्याला आपल्या आईसह आत्महत्या करावी लागली तो यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. तर ज्याने अन्वय नाईकला आत्महत्या करायला भाग पाडले तो यांच्यासाठी महत्त्वाचा. कारण महाराष्ट्रापेक्षा पक्षादेश महत्वाचा.  

हेही वाचा : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

महाराष्ट्र आणि पंजाबमधली कंगना

दुसरी कंगना राणावत. जिने मुंबई आणि महाराष्ट्राला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख केला, धमक्या दिल्या. पत्रकारांना धमक्या दिल्या त्या कंगनाच्या समर्थनासाठी ज्यांनी स्वतःसह महाराष्ट्राची अस्मिता आपल्या पक्षाला आणि नेत्यांना विकली ते लोक उभे झाले. तिला झाशीची राणी संबोधू लागले. तिच्यावर अन्याय होतोय म्हणून ओरडू लागले. हे सगळं महाराष्ट्राने मागील काही महिन्यात अनुभवलंय.

आता आपण पंजाबची परिस्थिती बघुयात. काही दिवसांपूर्वी कंगनाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या वृद्ध महिला शेतकरी मोहिंदर कौर यांना शाहीन बागेची ’बिलकीस बानो’ असं म्हणून शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. या कंगनाच्या एका ट्विटविरोधात संपूर्ण पंजाब पेटला. मोहालीच्या झिरकपूर इथं राहणार्याग वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठवली.

दरम्यान शेतकरी महिलेचा अपमान करण्यावरून कंगना विरोधात लीगल केसही फाइल करण्यात आली. त्यानंतर दिलजीत दोसांज, स्वरा भास्कर, अंगद बेदी, कुब्रा सैत, श्रुति सेठ, मिक्का सिंग, बॉक्सर विजेंदर सिंग, अनेक पंजाबी गायक, कलाकार, बॉलिवूडचे कलाकार यांच्या विरोधानंतर कंगनाला नमती घेत जुने ट्विट डिलीट करून ’मी शेतकर्यां सोबत आहे.’ असं ट्विट करावं लागलं.

ठासून भरलेली पंजाबी अस्मिता

या प्रकरणात एक अतिशय महत्वाची घटना इथे नमूद करावी लागेल की पंजाबचे काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनीं पूर्वी दिलजीत दोसांझ विरोधात दाखल झालेल्या ऋखठ संदर्भात ट्विटरवर लिहिले होते. त्या रवणीत सिंग यांच्या ट्विटचा हवाला देत जेव्हा कंगनाने दिलजीत वर निशाणा साधला तेव्हा खा.रवणीत सिंग जे बोलले ते खूप महत्वाचं आहे.

ते कंगनाला इशारा देत म्हणाले, ‘कंगना आमच्या अंतर्गत प्रकरणांपासून दूर रहा, पंजाबसाठी आम्ही सर्वजन एक राहू. हिमाचलचे सडलेले सफरचंद तू दूर रहा. आमच्या पंजाबी लोकांमधे हजारो समस्या असतील, परंतु बाहेरच्या लोकांनी दखल दिलेली आम्ही कदापि सहन करणार नाही.’  याठिकाणी ’दुष्मन का दुष्मन दोस्त’ अशा सर्व म्हणी गळून पडतात. दिसते ती फक्त रक्तात ठासून भरलेली पंजाबबद्दलची अस्मिता.

हेही वाचा : शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?

महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिल?

अर्णब गोस्वामी ला तर शेतकरी आंदोलनातून शेतकर्यां नी ’बिकाउ मीडिया-गोदी मीडिया हाय हाय’ चे नारे लावत अक्षरशः हाकलून लावलं. त्यावर अर्णबएक शब्द सुद्धा आपल्या चॅनलवरून बोलू शकला नाही. हा आहे पंजाबच्या अस्मितेचा धाक.

पंजाब - हरयाणातल्या अनेक मान्यवरांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलाय. बॉक्सर विजेंदर सिंह, कुस्तीपटू करतार सिंह यांच्यासह जवळपास ३० खेळाडू आपापले पुरस्कार सरकारला परत देण्यासाठी दिल्लीत पोचलेत. या आंदोलनातला एक ७० वर्षीय इसम एका पत्रकाराला सांगतात की, ‘बेटा, आम्ही एकच होतो. पंजाब थोरला आणि हरियाणा धाकटा. दोघे आता सोबत आहोत तर सरकारला धडा शिकवूच.’ हे आहे पंजाब आणि हरियाणातील सामंजस्य.

पण महाराष्ट्रात? महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन माणूस आपल्या पक्षासाठी-नेत्यासाठी महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्याकरिता, वागण्याकरिता उतावीळ असतो. परंतु शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून एक तरी पंजाबमधील भाजपच्या नेत्याचं या आंदोलनाविरूद्ध वक्तव्य ऐकलंय? उलट भाजप सोबत केंद्रात मंत्री असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाला लात मारत पंजाबच्या अस्मितेसाठी राजीनामा दिलाय.

पण महाराष्ट्रात तर आपल्या दिल्लीतील नेत्यांना खुश करण्याकरिता महाराष्ट्र विरोधी वक्तव्ये करण्याची जणू चढाओढच लागलेली असते. शेतकरी-कामगारांसाठी किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कधी सर्व पक्ष असे एकत्र आलेले बघितलेत? संपूर्ण राज्य सर्व हेवेदावे विसरून एकतर्फी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं बघितलं?  

हेही वाचा : शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला?

मोरारजींच्या चेल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?

तिकडे पंजाबमधे दिलजीत दोसांज आपल्या शेतकर्यां साठी एक कोटी रुपये मदत म्हणून देतो. अनेक कलाकार, खेळाडू मदत देत आहेत. पण महाराष्ट्रात मात्र एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनल्यावर हे पद टिकत नाही कळल्यानंतर महाराष्ट्रासाठी असणारा ४० हजार कोटींचा विकास निधी देवेंद्र फडणवीसांकडून केंद्रात परत पाठवला जातो. मेट्रो ट्रेन चा ३०% मार्ग महाराष्ट्रातून जात असूनसुद्धा ७०% मार्गाची रक्कम महाराष्ट्राच्या तिजोरीतून मंजूर केली जाते.

कोरोनाच्या कठीण काळात महाराष्ट्राच्या मदत होईल अशा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे न देता पीएम केअर्स नावाच्या खाजगी फंडात मदत करण्याकरिता जीवाचा आटापिटा केला जातो. सरकार कोणत्याही पक्षाचे असो दिल्लीसमोर महाराष्ट्र मागील काही वर्षांत झालाय इतका लाचार आधी कधीच नव्हता. पण ह्या गोष्टी ह्या लोकांकडून काही अनपेक्षित नाहीत. 

मोरारजी देसाईंनी जेव्हा महाराष्ट्र तोडण्याकरिता संपूर्ण ताकद लावली आणि शाहिद स्मारक भागात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर पोलिसांकरवी गोळीबार करवला त्यावेळी १२६ आंदोलक हुतात्मा झालेत. त्याच मोरारजींचे वारस असलेल्या आजच्या आधुनिक मोरारजींच्या चेल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? 

या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेतील तफावत संपूर्ण देश अनुभवतोय. पंजाबकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र आज जर काही शिकला नाही तर येणार्याव काळात महाराष्ट्राचे निश्चितच तुकडे होणार आहेत हे नक्की. 

हेही वाचा : 

शेतीला आकाश मोकळं करून देणारे कायदे

बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

केंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार?

(दैनिक अजिंक्य भारतमधून साभार)