विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

१९ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


न्यूयॉर्कमधून भारतात आलेल्या पत्रकार अबिरा यांना स्वतःमधे कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे कोरोनाची तपासणी करायला गेल्या. या तपासणीचा आणि हॉस्पिटलमधे एकट्यानं घालवलेल्या दिवसाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. त्यांचा हा अनुभव असल्यालाही खूप काही शिकवणारा आहे.

कोरोना नावाची दहशत इतकी झालीय की साधं आपल्या आजूबाजूला कुणी शिंकलं तरी आपण त्याच्याकडे डोळे वटारून बघतो. खरंतर दरवेळीच सर्दी, पडसं म्हणजे कोरोनाचीच लक्षणं नसतात. पण आपण गर्दीच्या संपर्कात येत असू किंवा परदेशात जाऊन आले असू आणि त्यानंतर सर्दी, पडसं ही लक्षणं दिसू लागली तर हॉस्पीटलमधे जाऊन कोरोनाची टेस्ट नक्की करून घ्यायला हवी.

कोरोनाची टेस्ट म्हटलं तरी लोकांना धडकी भरते. कोरोनाची लक्षणं दिसली तर आपल्याला क्वारेन्टाईन करतात म्हणजे एकांतात ठेवतात वगैरे अफवा पसरल्यात. अनेक जण तर टेस्ट नको रे बाबा म्हणून पळून जात आहेत. कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्यांना आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकाच वॉर्डमधे ठेवतात. तसंच कोरोना झाला म्हणजे माणूस मरणार असे एक ना अनेक गैरसमज लोकांमधे पसरलेत.

पण मुंबईच्या एका पत्रकाराचा अनुभव काही वेगळाच सांगतो. द क्विंट या वेबपोर्टलसोबत एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट अबिरा धार ९ मार्चला त्या परदेशातून भारतात आल्या. दुसऱ्या दिवशी त्यांना कोरोनाची थोडी लक्षणं जाणवली. त्यानंतर काय काय झालं याचा त्यांनी स्वतः लिहिलेला अनुभव क्विंटच्या वेबसाईटवर टाकण्यात आलाय.

हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाची टेस्ट करून घ्या

अबिरा सांगतात, ‘मी ५ मार्च ते ८ मार्च या दरम्यान अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात गेले होते. ९ मार्चला भारतात परतले. मुंबई विमानतळावर उतरल्यावर इतर प्रवाशांसारखीच माझ्याही शरीराचं तापमान मोजण्यात आलं. १० मार्चला होळी होती. ११ मार्चला मला सकाळी डॉ. रिना नावाच्या एका व्यक्तिचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही प्रवास करत होतात. आमच्याकडे तुमची माहिती आहे. तुमचा पासपोर्ट नंबर अमुक अमुक आहे. तुमच्यात काही वेगळी लक्षणं दिसत नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला फोन केलाय. तुम्हाला सर्दी, ताप, खोकला काही जाणवतंय?’

त्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच अबिरा यांचा घसा खवखवत होता. त्याची माहिती अबिरा यांनी डॉक्टर रिना यांना दिली. त्यानंतर डॉक्टर रिना यांनी फोनवरूनच अबिरा यांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधे जाऊन तपासणी करून येण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे अबिरा लगेचच हॉस्पिटलमधे गेल्या.

‘साधारण साडेअकरा वाजता मी हॉस्पिटलमधे पोचले. तिकडे गेले. तिथल्या रिसेप्शनिस्टला कोरोनाची टेस्ट कुठे होतो वगैरे विचारणा केली. तेव्हा त्यांनी सरळ जाऊन डावीकडे वळा वगैरे सांगितलं.’

कोरोना संशयितांसाठी वेगळा वॉर्ड

कोरोनासाठी हॉस्पिटलमधे वेगळा विभागच केला होता. त्या विभागाच्या दाराशी एक पोलिस अधिकारी पहारा देत होता. अबिरा तिथं पोचल्या तेव्हा पोलिसानं त्यांना आत जाण्यापासून अडवलं. तुम्ही कोरोनाच्या टेस्टसाठी आला नसाल तर तुम्हाला त्या विभागात जायची परवानगी नव्हती. कोरोनाची लक्षणं नसणारे रूग्ण किंवा रूग्णांना भेटायला येणारे नातेवाईक वगैरे कुणीही त्या विभागात चुकून घुसू नये म्हणून ही व्यवस्था होती.

अबिरा यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला आपली माहिती कळवली. तेव्हा त्याने आत सोडलं आणि सरळ जाऊन उजवीकडे वळायला सांगितलं. कोरोना संशयितांचा विभाग फार आत, सेफ ठेवण्यात आला होता. ‘मला तिथे १० रूग्ण लाईन लावून उभे असलेले दिसले. ते शांतपणे उभे होते. त्यातलं कुणीच घाबरलेलं नव्हतं. सगळीकडे शांतता होती. मी आत गेले आणि डॉक्टरांनी माझ्याकडून अजून थोडी माहिती घेतली. मी कोणत्या तारखांना प्रवास केला? कुठून कुठे प्रवास केला? माझं वय काय, लक्षण कोणती वगैरे गोष्टी विचारून घेतल्या. त्यानंतर एका माणसानं माझ्या नावाचं कार्ड बनवलं’ असा अनुभव अबिरा सांगतात.

अबिरा यांचं पूर्ण नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, त्यांच्या एका नातेवाईकाचं नाव असं सगळं त्या कार्डवर लिहिलं गेलं. त्यानंतर ‘तुम्हाला अॅडमिट व्हावं लागेल. घाबरायचं कारण नाही. फक्त तपासणी करायची आहे. पण त्याचे रिझल्ट यायला २४ तास लागतात आणि त्याकाळात आम्ही तुम्हाला बाहेर सोडू शकत नाही,’ असं अबिरा यांना सांगण्यात आलं.

हेही वाचा : कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

नातेवाईकांना नो एन्ट्री

‘मला याची काहीच कल्पना नव्हती. एक वॉर्ड बॉय आला आणि त्याने मला वॉर्ड नंबर ९ मधे नेलं. कोरोनाची तपासणी करायला आलेल्या लोकांनाच तिथे ठेवलं जात होतं. त्या वॉर्डमधे पाय ठेवल्या ठेवल्या मला एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे तिथे प्रचंड स्वच्छता होती. एका वॉर्डमधे साधारण ३० बेड मांडले होते. पण तिथे तीन ते चारच लोक होते.’

त्या वॉर्डमधल्या गाद्या, बाथरूम सगळंच खूप स्वच्छ होतं, असं अबिरा सांगतात. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला फोन करून थोडे खायचे पदार्थ आणि पाण्याच्या बॉटल्स मागवून घेतल्या. ‘हॉस्पिटलमधे खूप स्वच्छ पाणी होतं. पण मला ते पाणी नको होतं. म्हणून मी घरून मागवलं,’ असं अबिरा सांगतात.

अबिरा यांचा नवरा त्यांच्यासाठी जेवण आणि पाणी घेऊन आला तेव्हा त्यांनाही त्या विभागात सोडण्यात आलं नाही. बाहेर एका वॉर्डबॉयला पाठवलं गेलं. त्या वॉर्डबॉयने खाद्य पदार्थ आणि पाणी अबिरा यांच्यापर्यंत पोचतं केलं.

रिपोर्ट पॉझिटिव आले तर?

त्यानंतर अर्ध्याएक तासाने डॉक्टर आले. फोटोत दाखवतात त्याप्रमाणे संपूर्ण अंग झाकलं जाईल असा एक सूट डॉक्टरांनी घातला होता. त्यांनी अबिरा यांची स्वॅब टेस्ट घेतली. स्वॅब टेस्ट म्हणजे थुंकीची तपासणी करणं. ही टेस्ट झाल्यावर मग वाट बघण्याचा खेळ सुरू झाला.

‘काही जण म्हणत होते टेस्टचे रिझल्ट संध्याकाळी ७ वाजता येतील. काही जण म्हणत होते उद्या संध्याकाळी ७ वाजता येतील. सगळ्यांच्याच मनात भरपूर गोंधळ चालला होता. आमच्यापैकी कुणीही एक कोरोना संक्रमित निघाला तर काय होईल असे एक ना अनेक विचार माझ्या डोक्यात चालले होते.’

शेवटी रात्री ११ वाजता रिपोर्ट आले. आमची नावं घेऊन आमचे रिपोर्ट आमच्या हातात देण्यात आले. अबिरा आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्यांचाच रिझल्ट निगेटिव होता. त्यांच्यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता.

‘आम्ही आमचं सामान घेतलं. नर्सकडे गेलो. त्यांनी आम्हाला एक सर्टिफिकेट दिलं. रिपोर्ट निगेटिव आहेत, असं त्या सर्टिफिकेटवर स्पष्ट लिहिलं होतं. त्यासोबत आम्हाला एक प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधांचा कागदही दिला गेला. त्यावर खबरदारी म्हणून घ्यायची काही औषधं दिली होती.’ असं अबिरा यांनी त्यांच्या अनुभवात सांगितलंय.

हेही वाचा : केरळनं तुटवडा बघून स्वतःचं सुरू केली मास्क, सॅनिटायझरची निर्मिती

अनुभवातून काय शहाणपण घ्यावं?

थोडक्यात, कोरोनाची लक्षणं दिसली तरी घाबरून जायचं कारण नाही. ‘तुम्ही तपासणी करायला गेला असाल आणि तुमच्या शरीरात कोरोनाची लक्षणं नसतील तर ते तुम्हाला अॅडमिटही करून घेणार नाहीत आणि तुमची टेस्टही करणार नाही. तुम्ही परदेशी प्रवास करून आला असला तरीही.’ असं अबिरा यांनी सांगितलंय.

दुसरं म्हणजे, ‘तुम्ही प्रवास करून आला असाल आणि तुमच्यात लक्षणं दिसत असतील तर टेस्ट करायला जाताना तयारीनिशी जा. सॅनिटायझर, पाण्याची बाटली वगैरे गोष्टी सोबत घ्या,’ असाही कानमंत्र अबिरा यांनी दिलाय. त्यांच्या या अनुभवावरून आपण शहाणपण घ्यावं आणि लक्षणं दिसली तर तपासणी करायला नक्की जावं, यासाठीच त्यांनी हा अनुभव शेअर केलाय. आपला अनुभव अबिरा यांनी आपल्या सगळ्यांसाठी शेअर केला त्याबद्दल त्यांना आपण खूप थँक्स म्हणायला हवं.

हेही वाचा : 

सगळ्यांनाच मास्क वापरण्याची गरज आहे का?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार

दिल्लीच्या दंगलीत एका पत्रकाराने कसा वाचवला स्वतःचा जीव?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय झालं?

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?